पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चुकामुक

लघुकथा 


चुकामुक


               सीसीटीव्हीचे फुटेज ते दोघेजण बघत होते. त्यापैकी एक होता तो सोसायटीचा सिक्युरिटी इनचार्ज आणि दुसरा म्हणजे सुनील. दोघांची नजर "एकटक" त्या स्क्रीनवर होती.   कंपाउंडमधून सोसायटीत कोण ये-जा करतेय. हे बघण्यासाठी साधारण 35 ते 40 फूट उंचीवर लावलेला तो कॅमेरा होता. आता स्क्रीनवर तिघेजण दिसत होते. बहुतेक एकमेकांशी बोलत असावेत. त्यातला एक जण किंचित जाडसर होता आणि तो बोलताना हातवारे करत होता. त्यातील एक जण अचानक तिथून निघाला. चालता चालता त्याने मोबाईल कानाला लावला. दुसरे दोघे तिथेच उभे होते.


            अवघ्या पंधरा पावलावर कार पार्किंग होतं, तिथे तो गेला. अचानक वरून बांधकामासाठी वापरतात तो लोखंडी पाईप तुफान वेगाने खाली आला. तिथे उभ्या असलेल्या दोघांच्याही डोक्यात दण्णकन आपटला. दोघेही धाड्कन जमिनीवर कोसळले. जाडसर दिसणारा उठण्याचा प्रयत्न करीत पुन्हा कोसळला. दुसऱ्याने तर पडल्यापासून हालचाल केलीच नव्हती. इतक्यात मोबाईलवर बोलत तिसरा परत आला. सोसायटीच्या गेटवरचा वाचमनही  पळत तिथे पोचला होता. मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीने फोन बंद करून खिशात ठेवला. वॉचमन आणि तो काही तरी बोलू लागले. 

 

      सुनील हे सगळे श्वास रोखून बघत होता. सीसीटीव्हीच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अवघ्या 14 सेकंदात दोघांचा खेळ "खल्लास" झाला होता. सुनील आपल्या फोनकडे पाहिले. सुनीताच्या अचानक आलेल्या फोनमुळे त्याची आणि "मृत्यू"ची थोडक्यात "चुकामुक" झाली होती.


©️ गजानन तुपे

   96992 46358

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू