पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बालंट

 

        विस्मरण हा शाप की वरदान? असा जर कुणी मला प्रश्न विचारला तर मी बेधडकपणे सांगतो, वरदान! आपल्या आयुष्यात सतत काहीना काही घटना घडत असतात. खूप सार्‍या घटना ह्या त्रासदायक आणि दुःख देणाऱ्या असतात; सुखद घटना तुलनेने फारच कमी असतात म्हणूनच सुख जवा एवढे, दुःख पर्वताएवढे असे म्हटले जात असावे. सुखद, दुःखद अशा सर्वच घटना आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनाच्या कुठल्यातरी खणात जाऊन बसतात. 

        माणसाचे मन म्हणजे दिवसाचे चोवीस तास सताड उघडे असणारे दुकान असते. या दुकानाच्या कुठल्याही खणाला कुलुपे लावलेली नसतात. एखाद्या दुकानदाराला जर सुपारी खायचे व्यसन असेल तर तो गल्ल्यावरच्या एखाद्या खणात सुपारीची खांडे ठेवतो नि गल्ल्यावर बसल्या बसल्या त्या खणातून सुपारीची खांडे काढून घेऊन ती चघळत बसतो. त्याला जसे काळ-वेळाचे बंधन नसते तसे मनालाही काळ- वेळाचे बंधन नसते. जेव्हा मनाला येईल तेव्हा माणसाचे मन आठवणीच्या खणातील आठवणी काढून घेऊन त्या चघळत बसते. दुकानदार आपल्या आनंदासाठी सुपारी चघळत बसतो पण मन जेव्हा आठवणी चघळत बसते तेव्हा मनाला आनंद होण्याचा संभव फारच कमी असतो कारण आठवणींच्या खणात त्रासदायक आणि दुःखद आठवणींचाच भरणा सर्वाधिक असतो. 

        देवाने माणसाला स्मरणशक्ती दिलेली आहे. ज्याची स्मरणशक्ती अतिशय उत्तम असते, त्याच्या सगळ्या आठवणी मनात पक्क्या ठाण मांडून बसलेल्या असतात पण ज्याची स्मरणशक्ती मंद असते, त्याच्या बहुतेक आठवणी, मग त्या दुःखद असोत वा सुखद असोत; आठवणींच्या खणात थिजून गेलेल्या असतात. ज्याला आठवणीच आठवत नसतील, तो जरी दुर्दैवी म्हटला गेला तरी सुखी मात्र असतो कारण सुखद, दुःखद कुठल्याच आठवणी त्याला नीटशा आठवत नाहीत. मी असा आठवणींचे विस्मरण होणारा एक सुखी नि नशीबवान जीव आहे. एवढे सगळे जरी खरे असले तरी काही आठवणी मात्र विस्मरणात जात नाहीत कारण त्या आठवणींनी मनाच्या भिंतीवर ओरखडे काढलेले असतात. अशीच एक गोड नसलेली आठवण मी आज आपणाला सांगणार आहे.

        तशी खूप जुनी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीची ही आठवण आहे. मी पगारदार नोकरांच्या एका राज्यस्तरीय सहकारी बँकेच्या एका शाखेत त्यावेळी शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होतो. बँकेचे मुख्य कार्यालय मुंबईत व शाखा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होत्या. कर्ज मंजुरीसाठी प्रत्येक शाखेत एक शाखा समिती गठित केलेली असे. शाखा समितीच्या पाच सदस्यांपैकी तीन सदस्य पदसिद्ध असत तर दोन सदस्य हे बँकेच्या सभासदांमधून निवडून आलेले असत. त्यांच्या निवडणूकीची कार्यवाही सहकारी कायद्याच्या आधीन राहून पार पाडली जात असे.

        शाखा समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सभासदांकडून उमेदवारी अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे आणि गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेणे, मतमोजणी करणे नि निवडणुकीचा निकाल जाहीर करणे असा तो निवडणूक कार्यक्रम होता. प्रत्येक गोष्टीसाठी कालावधी नियत करून दिलेला होता. ठरलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी शाखा व्यवस्थापक म्हणून माझ्यावर होती.

        उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विहित वेळेपर्यंत आलेले अर्ज मी एका नोंद वहीत नोंदवले. सगळे अर्ज व्यवस्थित सांभाळून ठेवून छाननीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे एवढीच माझी जबाबदारी होती. पण इथे कारण नसता मी नको ती सावधगिरी दाखविली. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर कोणाचे तरी अर्ज घेतले असा आपल्यावर कुणी आरोप करू नये म्हणून मी तेथील कामगार अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना आपल्या समोर, आपल्या साक्षीने उमेदवारी अर्ज सीलबंद करुया अशी विनंती, उमेदवारी अर्ज स्वीकृतीची मुदत संपण्याच्या वेळी केली. सुरक्षा अधिकारी यांना महत्वाचे फोन येणार असल्याने त्यांनी आम्हाला या कामासाठी त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. दोन्ही अधिकाऱ्यांनी अर्जदारांची नावे व अर्जांची संख्या नोंदवहीतल्या नोंदी बरहुकूम असल्याची प्रत्यक्ष खात्री करून घेतली. तशी नोंद त्या नोंद वहीत केली व सर्व अर्ज तिघांच्या साक्षीने एका लखोट्यात ठेवून लखोटा सीलबंद केला. लखोटा सीलबंद करून नोंद वहीत व लखोट्यावर आम्ही तिघांनी स्वाक्षऱ्या केल्या.सीलबंद लखोटा मी माझ्या ताब्यात घेतला. 

        उमेदवारी अर्जांच्या छाननी दिवस उजाडला. छाननीसाठी उमेदवार, त्यांचे पाठीराखे कार्यालयात उपस्थित झाले. कामगार अधिकारी, सुरक्षा अधिकारीही आले. निवडणूक अधिकारी येताच छाननीच्या कामास सुरुवात झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी सीलबंद लखोटा उघडला नि उमेदवारी अर्ज मोजले आणि एकच हल्लकल्लोळ उडाला. नोंदवहीत नोंदलेल्या अर्जापैकी एक अर्ज लखोट्यातून गायब झाला होता. सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. मी तर पुरता भांबावून गेलो होतो. सगळेजण अविश्वासाने माझ्याकडे बघत होते कारण माझ्या हातून कुठलीही आगळीक होणार नाही याची सर्वांना खात्री होती. मग अर्ज गहाळ कसा झाला? निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचकपणे कामगार अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांच्याकडे कटाक्ष टाकला. खरेतर दोघेही गोंधळून गेले होते. आपण नोंदवहीप्रमाणे उमेदवारी अर्ज तपासले, होते मोजले होते आणि आपल्यासमोर लखोट्यात ठेवून सील केले होते. जे सील केले होते, त्याला कुठेही धक्का लागलेला नव्हता. लखोट्यावरच्या तिघांच्या सह्या असल्याने शंका घ्यायला कुठलीही जागा नव्हती. लखोट्यातला एक अर्ज चमत्कार व्हावा तसा गायब होतोच कसा? हा यक्षप्रश्नच होता. 

        कामगार अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी यांनी नोंदवहीत नोंदलेले सर्व उमेदवारी अर्ज आपण स्वतः तपासून मोजून लखोट्यात ठेवले असल्याचा पुनरुच्चार केला. छाननीसाठी आलेले सर्व उमेदवार त्यांचे पाठीराखे त्यांच्या संघटनांचे नेते ही मंडळी निरनिराळे तर्क वितर्क एक लढवू लागले. तिथे सुरू असलेला गोंधळ लक्षात घेऊन निवडणूक अधिकारी यांनी छाननीचे काम तासाभरासाठी पुढे ढकलले.  

         निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली. लखोटा सीलबंद करताना अर्ज तपासून घेतले होते यावर आम्ही तिघेही ठाम होतो पण एक अर्ज गायब कसा झाला याचे उत्तर आम्हा तिघांकडेही नव्हते. सर्वांची मती कुंठित झाली होती. आता पुढे करायचे काय? निवडणूक अधिकारी म्हणाले, आपण मुख्य कचेरीशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ. त्यांनी मुख्याधिकारी यांना फोन लावला. सगळा घटनाक्रम समजून घेतल्यावर मुख्य अधिकाऱ्यांनी मला फोनवर बोलवले आणि झाप झाप झापले.

          "उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आलेले उमेदवारी अर्ज एखाद्या रजिस्टरमध्ये नोंद करून सांभाळायचे साधे काम, एवढे गुंतागुंतीचे करण्याचा उद्योग तुम्हाला कुणी सांगितला होता? तुम्ही शाखा व्यवस्थापक आहात, तुमच्यावर सगळ्यांना विश्वास ठेवलाच असता. कुणीतरी आपल्यावर काही आरोप करतील ही शंका तुमच्या मनात आलीच कशी? तुम्ही नको तो घोटाळा करून ठेवलात. स्वतः अडचणीत आलात आणि इतर दोन अधिकाऱ्यांना अकारण तुम्ही अडचणीत आणले आहे. तुम्ही बँकेचे नाव बदनाम केले. कळतंय का,मी काय म्हणतो ते ? तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये ते सांगा."

          " मी त्यांना समजावून सांगत होतो की, मी बेजबाबदारपणे वागलोच नव्हतो. काम करताना सावधगिरी बाळगणे हा कसा काय गुन्हा होऊ शकतो ? उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची जपणूक कशी करावी याबाबत निवडणूक नियमात स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. ज्यावेळी नियमात काही सांगितलेले नसते त्यावेळी स्वयंनिर्णय घ्यावा लागतो तसा तो मी घेतला. मी जी कार्यपद्धती अनुसरली ती गैर आहे असे कोणीही म्हणणार नाही. अर्थातच एक उमेदवारी अर्ज गायब झाला, तो कसा झाला हे आम्हा तिघांच्याही लक्षात येत नाही पण त्याबाबतची जबाबदारी मी नाकारत नाही. "

           निवडणूक अधिकारी यांनी माझ्याकडून फोन मागून घेतला आणि ते मुख्याधिकारी यांच्याशी बोलू लागले. ते म्हणाले," जे झाले त्याचे पोस्टमार्टम आपण नंतर करा. आता पुढे काय करायचे ते सांगा. आम्हाला असे वाटते की, ज्या उमेदवाराचा अर्ज गहाळ झाला त्याच्याकडून नवीन उमेदवारी अर्ज भरून घ्यावा. अर्थातच याबाबतीत सभासदांचे दोन, तीन गट असल्यामुळे सहमती होणे कठीण असले तरी आम्ही सर्व उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. सहमती न झाल्यास निवडणूक अधिकारी म्हणून मी माझा विशेषाधिकार वापरून संबधित उमेदवाराकडून नवीन अर्ज भरून घेतो. ज्याला हा निर्णय मान्य नसेल,जो कोण याला विरोध करेल त्याला मी कोर्टात जा असे सांगेन." असे म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी फोन ठेवून दिला. 

           एवढे होईपर्यंत चाळीस पन्नास मिनिटांचा कालावधी उलटला होता. उमेदवारी अर्ज गहाळ झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. छाननीचे काम जिथे होणार होते तिथे सर्वजण गर्दी करीत होते; हॉल माणसांनी तुडुंब भरला होता.

           निवडणूक अधिकारी आपल्या जागेवर स्थानापन्न झाले. हॉल मध्ये शांतता पसरली. निवडणूक अधिकारी बोलू लागले." आम्ही इथे उमेदवारी अर्जांची छाननीच्या कामासाठी आलो आहोत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत जे अर्ज मिळाले होते. त्यापैकी एक अर्ज अनाकलयीन पद्धतीने गहाळ झाला आहे, पण तो अर्ज विहित मुदतीत मिळाला होता याची सर्व नोंदी व पुरावे पाहून मी खात्री करून घेतली आहे. जे घडले त्याची चौकशी होईलच पण ज्या उमेदवाराने नियमानुसार अर्ज भरला त्या उमेदवारावर अन्याय होऊ नये म्हणून, त्यांच्याकडून नवीन अर्ज भरून घेऊन छाननीच्या कामाला लगेचच सुरुवात केली जाईल."

           निवडणूक अधिकाऱ्यांची ही सूचना ऐकताच ज्याचा उमेदवारी अर्ज गहाळ झाला होता तो व त्याच्या बाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवून या सूचनेचे स्वागत केले. पण त्याच्या विरोधकांना मात्र हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आता आपण नवीन अर्ज भरून घेऊ शकत नाही; तुमची सूचना आम्हाला मान्य नाही असे म्हणत, हे लोक अधिकच गोंधळ घालू लागले. निवडणूक अधिकारी त्यांना समजावित होते पण ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. हा गोंधळ तास दीड तास झाले तरी आटोपेना. अचानक सुरक्षा अधिकारी काहीतरी आठवल्यासारखे ताडकन उठले, निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले," मी पाचच मिनिटात येतो तोपर्यंत गोंधळ चालू द्या, सांगितल्याप्रमाणे सुरक्षा अधिकारी पाच मिनिटात परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य चमकत होते. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. तो नाचवत ते येत होते.

           आल्या आल्या, त्यांनी हातातल्या लिफाफ्यातून एक कागद बाहेर काढला आणि सर्वांना दाखवला आणि बोलायला सुरुवात केली. " आमच्यासह सगळ्यांनाच एक उमेदवारी अर्ज कुठे गेला? असा प्रश्न पडला होता पण मित्रांनो तो अर्ज गहाळ झाला नव्हता तर हरवला होता, तो अर्ज माझ्या केबिनमध्ये हरवला नि पुन्हा तिथेच परत सापडला; तो उमेदवारी अर्ज हा! असे म्हणत त्यांनी तो अर्ज सर्वांना दाखवला. ते पुढे म्हणाले. " उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मिळालेले अर्ज शाखा व्यवस्थापकांना आपल्याजवळ ठेवता आले असते. पण त्यांना असे वाटले की, मुदत संपल्या नंतर अर्ज स्विकारले अशी कुणी शंका उपस्थित करू नये म्हणून त्यांनी कामगार अधिकारी व माझ्या साक्षीने अर्ज सीलबंद करून ठेवावेत असे ठरविले; आम्हालाही त्यात काही गैर वाटले नाही. मला मुख्य कार्यालयातून फोन येणार होते त्यामुळे मी जागा सोडू शकत नव्हतो. म्हणून या दोघांना त्या कामासाठी मी माझ्या केबिनमध्ये बोलावले. आम्ही रजिस्टर मधल्या नोंदी प्रमाणे अर्जदारांची नावे तपासली, अर्जांची संख्या मोजली. सर्व काही बरोबर असल्याची खात्री करून घेतल्यावर सर्व उमेदवारी अर्ज एका लिफाफ्यात ठेवून लिफाफा सीलबंद केला. पण सील लावताना ओल्या डिंकामुळे सील नीट झाले नाही म्हणून मी आमच्या सुरक्षा रक्षकाला सर्व अर्ज त्या लिफाफ्यातून काढून दुसऱ्या लिफाफ्यात ठेवायला सांगितले. पहिल्या लिफाफ्यातील अर्ज बाहेर काढताना एक उमेदवारी अर्ज पहिल्या लिफाफ्याच्या आतल्या बाजूला चिकटून राहून गेला. आमच्याकडे टाकून द्यायच्या कागदपत्रांची लगेच विल्हेवाट लावली जात नाही. टाकून द्यायची सर्व कागदपत्रे एका बॉक्समध्ये ठेवली जातात. आणि पंधरा दिवसातून एकदा आमचा वरिष्ठ लिपिक ती कागदपत्रे तपासून, ती खरोखरीच बिनकामाची असल्याची खात्री करून घेतो व त्यानंतर ती सर्व कागदपत्रे जाळून टाकली जातात. त्यामुळेच पहिला लिफाफा त्या बॉक्समध्ये सुरक्षित राहिला हे सुदैव. पहिल्या लिफाफ्यातील अर्ज दुसऱ्या लिफाफ्यात पुन्हा मोजून ठेवायला हवे होते त्याकडे आमचे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले. सुरक्षा रक्षकाच्या चुकीमुळे एक अर्ज पहिल्या लिफाफ्यातच राहून गेला. मी सकाळपासून काय गडबड झाली असावी याचाच विचार करत होतो पण चूक माझ्या लक्षात येत नव्हती आणि काही वेळापूर्वी आम्ही लिफाफा बदलला होता हे मला अचानक आठवले नि काय घडले असावे याचा मला अंदाज आला."

           सुरक्षा अधिकारी यांच्या त्या खुलाशानंतर उपस्थित सर्वांचे समाधान झाले आणि उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या कामास प्रारंभ झाला. पुढे निवडणूक पण कसलाही अडथळा न येता पार पडली.

           या प्रसंगाने माझ्यावर मोठे बालंट आले होते पण देव दयेने या प्रकरणातून माझी सहीसलामत सुटका झाली. जर का तो उमेदवारीअर्ज सापडला नसता तर माझ्यावर निश्चितच कारवाई झाली असती. या घटनेतून मी एक धडा शिकलो तो म्हणजे अति शहाणपणा दाखवायचा नाही तो असा अंगलट येऊ शकतो. 

           

            

           

        

        

  

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू