पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रमण

 

नमस्कार, आज मी माझ्या आठवणीतील महासागरातला माझा सर्वात आवडता मोती तुमच्या सर्वांसाठी शिंपल्यातून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मोती दुसरा कोणी नसून माझी आजी यामुनाबाई( माहेरचि रमण).

काय सांगू तिच्या बद्दल, सर्वात शिस्तप्रिय पण तेवढचं प्रेमळ व्यक्तीमत्व. खूप कष्ट करणारी, नातवंडांवर प्रेमाचा वर्षाव करणारी माझी आजी,तिच्या बालपणी एका राजकुमारीचं जीवन जगली. वडील मोठे व्यापारी असल्याने गरीबी काय असते ते तीने कधी अनुभवलच नाही. हो पण लग्न झाल्यावर मात्र तिचं विश्वचं बदललं. माझ्या आजोबांशी लग्न झाल्यावर ती मुंबईत आली, एका भल्यामोठ्या वाड्यात राहणारी ती आता एका १० बाय १० च्या खोलीत राहू लागली. वर्षा मागे वर्ष सरली. आजीला एका पाठोपाठ तीन मुले आणि एक मुलगी झाली. आजोबांच्या तुटपुंज्या पगारावर घर चालेना म्हणून तिने पाकिटांना टिकल्या चिकटवणे, नवीन कपड्याना टॅग लावणे अशी बरीच काम करून घराला हातभार लावला. मुलं जशी मोठी झाली तशी त्यांची लग्न पण करून दिली. तरी आजीचं कष्ट करण काही थांबेना.
मोठ्या मुलाला दोन मुलं, म्हणजे मी आणि माझा दादा. आजी आजोबा आमच्या सोबतच राहायचे. आजीचं आताच कष्ट म्हणजे भाजी विकणे. त्या भाजीवर आजीने लक्ष्मीहार, बोरमाळ, अंगठ्या आणि बरेच दागिने बनवले. लग्नात डोक्याच्या केसांपासून पायाच्या बोटापर्यंत सोन्याने मढलेली माझी आजी , लग्नानंतर मुलाबाळांसाठी लंकेची पार्वती झाली. पण हळूहळू तिने भरपुर दागिने बनविले तेही स्वतःच्या हिमतीवर.
दिवस सरले, वर्ष सरली, आजी आता खरचं आजी (म्हातारी)वाटू लागली. पण कष्ट काही सुटले नाही. आजी नेहमी म्हणायची, “कष्ट बाईच्या पाट्यालाच पुजलेले असतात” तेव्हा त्यातला मला काडीमात्र कळलं नाही पण आता मोठं झाल्यावर त्याचा बोध होतोय.

मी शाळेत असताना, आठवड्याचे दोन दिवस ठरवून पहाटे लवकर उठून अभ्यास करायचे. माझ्यासोबत आजी पण उठायची आणि माझ्यासाठी काही खायला आणून द्यायची. एकेदिवशी असंच काही काम करताना आजी खूप जोरात पाय घसरून पडली. आई बाबा तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला व्यवस्थित चेक केले आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्यावर कोणाचाच विश्वास बसेना. त्यांनी आजीच्या दम्याबद्दल विचारले तेव्हा कळलं की , दम्यावर उपाय म्हणून आजी एक औषध घेत होती बरीच वर्षे. जे खरंतर एक स्टिरॉइड् होतं. इतकी वर्ष ते स्टिरॉइड् घेतल्यामुळे आजीच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. आजीची हाडं ठिसूळ झाली होती आणि एक महत्त्वाची कामरेतील शीर दबली गेली होती, त्यामुळे तिच्या कामरेखालचा भाग लुळा पडला होता. तिच्या कष्टाच्या आड येणाऱ्या, तिच्या शारीरिक व्याधी ती या स्टिरॉइड् च्या जोरावर दुर्लक्षित करीत होती. अखेर होत्याचं नव्हतं झालंच आणि आजी अंथरुणाला खिळली. रोजची कामं करूनही प्रफुल्लित असणारा आजीचा चेहरा आता मात्र मावळत्या सूर्यासारख्या दिसू लागला.
घरातल्या एका कोपर्‍यात आजी निपचित पडून राहायची. माझ्या आईने तिच्याकडून शक्य होईल तेवढी तिची सेवा केली. त्या दोघींच नातं काही वेगळंच होतं ते सासू-सुनेचं नसून एका आई आणि मुलीचं होतं आणि तो दिवस उजाडला, सकाळपासूनच आजीला बरे वाटेना तिला श्वास घेता येईना .लगेच आई-बाबांनी तिला हॉस्पिटल ला नेलं , डॉक्टरांनी ऍडमिट करायला सांगितलं आजीचा बीपी शूट झाला होता तो काही केल्या कंट्रोल मध्ये येईना. एक दिवस, झाला दोन दिवस झाले. पण आजीचं शरीर औषधांना काहीच प्रतिसाद देत नव्हते. दोन दिवस ती फक्त सलाईनवर होती. तिने जेवण सोडलं आणि बोलणही.
आजीला अशा अवस्थेत बघून खूप खूप रडू यायचं. पण आई समजवायची "देव आहे ना ,तो बघून घेईल सगळं ! आपली आजी लवकर बरी होईल बघ. " मी रोज शाळेतून आल्यावर आजी ला भेटायला जायचे मला बघून ती थोडं का होईना पण हसायची. आपली आजी काही खात नाही हे माझ्या बालमनाला कळत होते म्हणून एक दिवस मी तिला म्‍हणाले, "आजी, मी तुझ्यासाठी उद्या शिरा बनवून आणणार आहे तो तू खायचा. मला प्रॉमिस कर. तू खाणार म्हणून" निस्तेज डोळ्यांनी माझ्याकडे पहात तिने मान डोलावली आणि एक स्मित हास्य दिलं आणि मी खुश होऊन घरी गेले. उद्या साठी शाळेचे दप्तर वेळापत्रकानुसार भरू लागले.
रात्र झाली घरातले सगळे झोपायच्या तयारीला लागले, तेवढ्यात बाबांचा फोन वाजला. फोनवर बोलून झाल्यावर बाबांचा चेहराच पडला .आईशी काहीतरी बोलून ते लगबगीने हॉस्पिटलला गेले. माझ्या बाल मनाला तेव्हा कळत नव्हतं काय चाललंय? पण हे समजलं होतं की आजीला काहीतरी झालं, आई मला काहीच सांगत नव्हती. मग थोड्या वेळाने आईने मला कुशीत घेतलं आणि झोप म्हणाली. आईने माझ्या केसातून हात फिरवला आणि मला कधी झोप लागली ते कळलंच नाही.
सकाळ झाली. सातची शाळा म्हणून मी पटापट आटपून शाळेत गेले. प्रार्थना झाली. त्यानंतर मराठी,गणित आणि कला यांचे तास झाले आणि बेल वाजली. मधल्या सुट्टीची वेळ झाली. मी माझा डबा उघडला आणि आईने दिलेले धिरडे व चपाती खाऊ लागले तेवढ्यात बोडके टीचर आल्या आणि येऊन माझ्या बाकाजवळ थांबल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाल्या, "तुला बाबा न्यायला आलेत" कशासाठी हे विचारायच्या आधीच त्या म्हणाल्या" बाबा उपमुख्याध्यापिका केबिनमध्ये तुझी वाट पाहतायत. लवकर बॅग भर आणि ये
खाली". मला काही कळेना, मग मी सांगितल्याप्रमाणे सर्व आटोपून त्यांच्या केबिनमध्ये गेले.
समोर बाबा होते. खूप रडून त्यांचे डोळे लाल झाले होते. बाबा मला घरी घेऊन गेले आणि “आजी देवा घरी गेली” एवढंच बोलले. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. आई आजी जवळ बसून खूप खूप रडत होती. हळूहळू खूप लोक जमू लागले.
आजीला आम्ही घरी घेऊन आलो. मग काही बायकांनी आजीला आंघोळ घातली. मला प्रश्‍न पडत होता या बायका आजीला आंघोळ घालतायत तरी आजी काही बोलत का नाही? मग एक काकू आल्या, त्यांनी आजीच्या पूर्ण अंगावर हळदीचं पाणी ओतल, मग तिचे केस धुतले. सगळच दृश्य मला बघवत नव्हतं. मग त्या बायकांनी आजीला छान पिवळ्या रंगाची नऊवारी नेसवली, नवीन बांगड्या भरल्या, संपूर्ण कपाळ कुंकवाने भरलं. एवढं नटलेलं मी आजीला कधी पाहीलच नव्हतं. मी आईला विचारलं काय करतायेत हे सगळं? आई म्हणाली "आपली आजी अहेवपणी देवाघरी चालली आहे. तिला आपण छान नटवून पाठवणार बाळा."

अहेवपण हा शब्द कुठे पाहिला बरं मी! मला प्रश्न पडला. मग खूप विचार करून एक वाक्य आठवलं, "अहेवपणी मरण आलं, आजीच माझ्या सोनं झालं" शांता शेळके यांच्या" पैठणी "या कवितेतल्या ह्या ओळी. हेच का ते अहेवपण? त्यावेळी मला कळत होतं अहेवपण म्हणजे नटून-थटून देवाघरी जाणे.
अखेर सुख आणि धनसंपदेत जन्म झालेल्या आजीचा कठीण आणि कष्टाने भरलेल्या जीवनाची सांगता परत साज-शृंगारात झाली आणि आजीच्या जीवनाचे वर्तुळ पूर्ण झाले. पण आजीच्या जाण्याने माझ्या आयुष्यात कधीही भरून न येणारी पोकळी मात्र निर्माण झाली.

                                                         विजया कुइगडे

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू