पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माहेर

                         माहेर





   पहाटे पाचची मॉर्निंग ट्यून वाजली. पशु पक्षांचे मंजुळ आवाज. अगदी कुठल्यातरी अरण्यात असल्यासारखं. खूप सुंदर सुरावट.


      रजनी नाराजीनीच उठली.ट्युन बंद केली. परत अंथरुणावर पाठ टेकली. बोचरी थंडी आणि पहाटेची साखरझोप. उठायला नको वाटतं पण कामाचा रगाडा मोठा. अशी ही झोपेची चैन आपल्याला परवडायची नाही.


     क्षणार्धात ती उठली. जोमाने तयारीला लागली.


     तरी आता बर होतं.भिड्यांचं एकच घर. बाकीची सारी कामं सोडली होती. एक किलोमीटर अंतरावरच्या उच्चभ्रू काॅलनीत  भिड्यांचा बंगला होता. 'माहेर.'


    ' माहेर' नाव असायला कारणही तसंच होतं.त्यांची दोन्ही मुलं परदेशात.. पण ती कधीतरी घरी यायची तेव्हा घराला माहेराच रुप यायचे.म्हणून माहेर हे नाव ठेवले होते. मुलींच नाही तर मुलांचे माहेर.


      सगळे घर एकटीचा ताब्यात होते. घरात माणसं दोनच. बाबा आणि माई. खूप सुस्वभावी माणसं होती. बाबा , माई आणि रजनी ह्या तिघांची वेव्हलेंग्थ चांगली जुळत होती. त्यामुळे मजेत चाललं होतं. पैसा पण भरपूर मिळायचा.



      रजनी एका झोपडपट्टीमध्ये खोली घेऊन राहत होती. अर्थात खोली भाड्याची होती. खोलीत सर्व गैरसोयी  होत्या पण तिची काही तक्रार नव्हती.


     ती उठली. छकुली शांतपणे पडली होती.किती निरागस दिसत होती! तिने तिच्या गालाचा पापा घेतला.


     तिने पटापट छकुली साठी डबा तयार केला.


     तिचे आटोपलं तेव्हा छकुली डोळे चोळत उठली होती.


    "आई तु जा गं.माझा मी डबा भरते आणि जाते."


    तिला गहिवरून आलं.


    छकुली... तिची मुलगी.. तिसरीत शिकणारी. मुलगी नव्हे आईच तिची. अशी मुले क्वचितच कुणाला मिळत असतील! खूप समंजस.


  तिने भिड्यांच घर यांचे घर गाठलं.कामाला सुरुवात केली केली.


  बाबा,माई उठले होते..


  तिने प्रथम बंगल्याच्या आवारातील फरशी झाडून घेतली. बागेतल्या गुलाबाला सुंदर फुले लागली होती.


  कंपाउंड लागून असलेल्या जास्वंदीला पण खूप फुले लागली होती. पलीकडच्या काकूने पारोशा अंगाने हाताला येणारी फुले सूर्योदयापूर्वी देवासाठी म्हणून लपत-छपत काढली होती. अशा लपून छपून तोडलेल्या फुलांनी  त्यांचा देव्हारा बहरला होता. बरं तर बरं,गेट बंद असतं. नाहीतर बागेत एक फूल राहिलं नसतं.


   ती यंत्रवत काम करू लागली.


  बाबांचं आटोपले होते. त्यांना बिनसाखरेचा चहा दिला. माईना चहाबरोबर नाईसस् बिस्किटे लागायची. त्यांची पूर्तता केली. सकाळची गोळी न चुकता दिली.


  "रजनी मला एकच पोळी कर बाई."


  "का हो माई,बर वाटत नाही?"


   "तसं काही नाही. पण भुकंच लागत नाही. दोन संपत नाहीत."


   "ठीक आहे.करते. पण माई माझ्या पोळ्या छोट्याशा असतात. काही हरकत नाही दोन पोळ्या खायला."


   "तू काय ऐकणार नाहीस. कर तुझ्या मनासारखं. तू आल्यापासून माझं वजन वाढायला लागलंय.."


    तेवढ्यात बाबा पण आत आले,


   "काय चालले तुमच्या दोघींचं?


   "काही नाही बाबा, आमचा छोटासा प्रेमाचा संवाद."


   "बरं आहे तुमचं,आम्हाला मात्र एकटे पाडलंत."


   "काही नाही हो बाबा, आपण तिघे एकच आहोत."


    नंतर बाबा शांत बसले व नजर दुसरीकडे वळवत हाऊस बोलले,


    "एक महत्वाचं बोलायचं होतं."


    "बोला की बाबा."


    "बाहेरच्या कामाला आणखी एक बाई लावायची असे आमचे मत आहे."


    "मी करते ना बाबा."


    "तू करतेस पण…"


   "माझं काम आवडत नाही का?"


    "नाही नाही तसं नाही"


    "मग?"


    "ठीक आहे, आपण यावर नंतर परत बोलू."


    असे म्हणून ते बाहेर पण गेले. काही क्षणासाठी तिच्या मनात एक भितीची पाल चुकचुकून गेली.


     त्या घराला आता आपला कंटाळा आला नाही ना?बाबांनी स्पष्ट सांगितलं नाही माझं काही चुकतंय का?माझं काम यांना आवडत नाही कां?तिच्या मनाच्या पोळ्या भोवती अनेक विचाराच्या मधमाश्‍या घोंगावत होत्या.श्रिमंत लोकांच असंच असतं.


   


    रजनी तीन वर्षापासून भिड्यांच्या" माहेर" या बंगल्यामध्ये काम करते. जेव्हापासून इथं काम करू लागली तेव्हापासून बाकीची काम तीनं सोडून दिली होती.त्याअगोदर ती चार घरांमध्ये काम करायची.


   माहेर...उच्चभ्रू वसाहतीतला एक बंगला.घरात माणसं दोनच. माई आणि बाबा.


    त्यांना दोन मुले. मोठा समीर आणि छोटा ध्रुव.


    समीर अमेरिकेत तर कॅनडात स्थाईक झालेला. आपल्या मुलानी आपल्या बरोबर असावे. किमान भारतात काम करावे असे त्यांना वाटयचे. पण मोठ्या पॅकेजच्या मोहामुळे त्यांनी परदेशात कांम करायचा निर्णय घेतला. मुलांची इच्छा होती की माई ,बाबांनी आपल्या जवळ असावे!पण ते भारत सोडायला तयार नव्हते.पैसा भरपूर होता पण त्यांची काळजी घ्यायला कोणी नव्हते. 


       घरी काम करायला कोणी टिकत नव्हते.पैसे भरपूर देऊन सुद्धा हवी तशी कामवाली मिळत नव्हती.  सर्वात मोठं म्हणजे प्रेम, आपुलकी. कोणी तरी प्रेमाचं हवं होतं,आपुलकीचं हवं होतं पण तसं कोणी मिळत नव्हतं.


     वयोमानानुसार त्या दोघांच्या शरीरात एकेका  आजारानी प्रवेश केला होता. बाबांना मधुमेह, माईंना कंबरदुखी. अधून-मधून वातावरणात बदल झाला की त्रास व्हायचा. औषधे वेळेवर  घेणं व्हायचं नाही. विसरून जायचं.आणि मग ते असह्य दुखणे. घरात मुलं नसताना काय हाल होतात हे त्या दोघांनाच माहिती.



     एक दिवस रजनी भेटली.


    तिला कोणी नव्हतं. ती अशी चार घरची काम करून जगत होती. एका छोट्या मुली बरोबर झोपडपट्टीत रहायची. तिची मुलगी म्हणजे तिचं सर्वस्व होतं. तिच्या करता ती सर्व हाल-अपेष्टा सहन करून विलासच्या माघारी पूर्ण प्रेम द्यायचा  प्रयत्न करत होती.


     विलास... तिचा पती. आता तो ह्या जगात नाही.


    ती विलासच्मा प्रेमात पडली.तो पण एकटाच. आईबाप, नातेवाईक कोणी नव्हते.रजनीच्या घरी हे पसंत नव्हते. वडील कडक शिस्तिचे. आईच काही चालत नव्हतं. छोटा भाऊ प्रकाश खूप चांगला पण त्याचे काही चालत नव्हतं.


     रजनी विलास मध्ये खूपच गुंतून गेली होती. त्याच्यासाठी ती नाती सोडायला तयार झाली होती.


    विलास बरोबर लग्न केले. घरी गेली. वडिलांनी दारातच आडवले,


    "घरात पाय टाकायचं नाही. आल्यापावली परत जायचं.पाठीत सुरा खुपसला आमच्या. चल, चालती हो. तोंड दाखवू नकोस.  मेलीस तु आमच्यासाठी."


    आई काहीच बोलली नाही अश्रूंचा महापूर. घराकडे पाठ करुन ती माघारी वळली.


    "दारात गोमूत्र शिंपडा."


    वडिलांचा आवाज तिने ऐकला आणि तिला हुंदका फुटला. सर्वांची मुक्ताफळ ऐकत आपल्या पतीबरोबर चालू लागली.


    विलास खुप प्रेम करायचा तिच्यावर. नंतर तिला कळून चुकले आपण प्रेम करायला चुकलो नाही. तिला मनासारखा जोडीदार मिळाला होता.


    त्याला मग पुण्यामध्ये नोकरी मिळाली आणि तो पुण्याला स्थलांतरित झाला. एका छोट्याशा भाड्याच्या घरात तो सुखात राहू लागला.


    रजनी पण शास्त्र शाखेची पदवीधर होती. ती पण नोकरीसाठी प्रयत्न करत होती पण तिला नोकरी मिळाली नाही.विलासच्या पगारात सगळं भागत होतं. दिवस सुखात जात होते. विलासला पण कोणी नातेवाईक नव्हते आणि तिचे नातेवाईक तुटले होते.


     पण त्याच्या प्रेमाने तिला कुठलीही एकाकीपणाची जाणीव करून दिली नाही. ती सुखात होती आणि मग तिला आणखी एका सुखाची चाहूल लागली.


    तिला दिवस गेले होते. संसारात येणाऱ्या नवीन जिवाच्या कल्पनेने दोघेही सुखावले. 



      एक दिवस तो ऑफिसला गेला तो परत आलाच नाही.


     एका ट्रकने त्याच्या बाइकला धडक दिली. तो कधी हेल्मेट  वापरत नव्हता.परिणामी तो जागच्या जागी खलास झाला.


    आता मात्र दु:खान परिसीमा गाठली होती. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना तिला सहन होत नव्हती आणि पोटात एक नवीन जीव वाढत होता.


    घरचं कोणी आलं नव्हतं.एक दिवस भाऊ आला. ताईच्या मिठीत त्यांनं रडून घेतलं तो बोलला,


    "ताई, बाबांच्या पुढ्यात आमचं काहीही चालत नाही. खूप एकली पडलीस तु.बाबा खूप अहंकारी आहेत पण तू मात्र कोसळलीस.  तुझ्याकडे  पहायला धीर होत नाही आमचा."


    तो ताईला गुप्तपणे मदत करू लागला.


    आईनं मात्र अंथरुण धरलं. दोन महिन्यात ती पण गेली.


    तीचं आता कोणीही नव्हतं. पण ती हार न मानणारी होती. तिने भावाच्या मदतीने झोपडपट्टीत खोली भाड्याने घेतली. तिथेच नवीन आयुष्य सुरू झालं. कामाची अडचण नव्हती. काम कुठलीही मिळालं तरी पोटासाठी होतं.सुशीक्षित असुनही तिनं  भांडी घासण्याचं काम सुरू केलं. कष्टाचा, काटकसरीचा व समाधानाचा एकाकी संसार सुरु झाला.


     मुलीला जन्म झाला.नवीन पर्व सुरू झाले.


     ती सुशिक्षित असल्याने नोकरीसाठी प्रयत्न केला.पण नोकरी मिळाली नाही. काहीतरी करणे भाग होते.तिनं  ठरवले मोलमजुरी करायची, छकुलीला मोठे करायचे.


  चार घरची धुणी-भांडी. तिला कमीपणा वाटला नाही. काम करताना काय लाजायचं? अधिकार पदावर काम करणं आणि कष्टाचं काम करणं यात काही फरक नाही. शेवटी मोबदला मिळतोच.


     छकुली खूप समंजस होती.घरात आई  नाही म्हटल्यावर एकटी बसायची.  स्वतःशी खेळायची.कुठलंही द्वंद नाही.  कुठलीही तक्रार नाही.


     ती आशेवर जगत होती. दिवस बदलतील. कधीतरी चांगले दिवस येतील!


   पण चांगले दिवस येतील किंवा येणार नाहीत.  काय फरक पडतोय? परमेश्वराने आपल्यासाठी दिलेले क्षण प्रसाद समजून ग्रहण करायचे.आपया वाट्याला कष्ट असतील तर कष्ट करायचे,  दुःख असेल तर सोसायचं. एक दिवस त्या दु:खाला पण कंटाळा येईल आणि आपल्याला सोडून जातील. मग सुखाचे क्षण येतील!पुढचं चांगलं होईल सगळं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख किंवा दु:ख काही क्षणांचे सोबती असतांत.



    एक दिवस ती कामावरून घरी जात असताना भिड्यांच्याच् माईनं तिला हाक मारली,


   "ये बाळ, ईकडे ये जरा."


    तिला खूप समाधान वाटलं. त्या शब्दात वात्सल्य होते.


   "किती राबतेस? बघावं तेव्हा गडबडीत."


   "राबावं  लागतं माई, पोट चालतं त्याच्यावर."


   "खराय बाई, काळासारखा मोठा गुरु कोणी नाही. तोच सर्व शिकवतो.त्याच्या मर्जीप्रमाणे  जावे लागते. बर असू दे, किती घरची कामं करतेस?"


   "चार  ठिकाणची."


   "इथं काम करशील का? मग तुला बाकीच्या घरी जावे लागणार नाही. पूर्णवेळ काम करायचे. पैशाची काहीही अडचण नाही.तु सांगशील तेवढे पैसे देऊ आम्ही.बघ."


   "हो माई करेन की."


  "ये आंत ये."


    


    ती  घर सांभाळू लागली. बाकीची कामं सोडली.तिनं प्रेमानं घर आपलंसं केलं.


   घरातली सगळी कामं करायची. घर झाडण्यापासून ते स्वयंपाका पर्यंत. मोबदला पण चांगला मिळायचा. कधीकधी छकुलीला पण  घेउन जायची.बाबा आणि माईला तिचा लळा लागला होता. त्या दोघांचा तिच्यावर खूप जीव. 


   रजनी अगदी  घरच्या मुली सारखीच होती. त्या दोघांचं आजारपण,  पथ्थे, औषधे सर्व काळजीपूर्वक करायची. कधी गरज लागली तर दवाखान्यात पण न्यायची .दारात चारचाकी गाडी पण होती. बाबांच्या आज्ञेने ती गाडी पण शिकली.कधी प्रसंग पडला तर माईबाबांना दवाखान्यात न्यायचं.त्यामुळे गाडीचा आधार होता.तिला मुलीची माया मिळायची. त्यामुळे परदेशात असलेली मुलं  ही निवांत झाली होती.


    माई,  बाबा आपल्या मुलासोबत गप्पा मारायचे. रजनी त्यांना स्काईपवर जोडून द्यायची.रजनीचं कॉंम्पुटरवर खूप ज्ञान होतं.त्यामुळे ती मोलकरीण नसुन घरची मुलगी झाली होती..


    आणि काय हवं होतं..?



    आज तिच्या मनात विचार होते.माई आणि बाबा आपल्याला कंटाळले तर नाहीत नां? खरोखरच तसं असेल तर….


   मोबाईलची रिंग वाजली. रजनीनं घाईघाईत नंबर बघीतला. प्रकाश.. तिच्या भावाचा फोन होता.


    तिनं कॉल रिसीव केला.


   "ताई, प्रकाश बोलतोय. कशी आहेस?"


   "छान आहे, मजेत आहे."


   "महत्वाचं बोलायचंय."


   त्याने मुद्द्याला हात घातला.


    "ताई, आला वाटतं तु ईकडे राहायला यावंस.आतापर्यंत खूप कष्ट घेतलेस. आता बस झालं. आम्हालां तुझे कष्ट पहावत नाहीत.  काम सोडून दे. ईकडे कामचं रहायला ये.."


   ती शांतच.


   "ताई, बोल ना?"


   "नको रे, मला काही अडचण नाही.  सगळे व्यवस्थित आहे. तू आणि तुझी बायको सुखांत रहा. आता तुमच्या सुखात मला ढवळाढवळ करायची नाही आणि बाबा मला घरात घेणार नाहीत.उगीच तुमच्या सुखामध्ये अडचणी नकोत.बाबांची भीती वाटते ."


    "नाही गं, बाबा आता बदललेत.ते तुझी नेहमी आठवण काढतांत"


   "मला माहित आहे त्यांचा स्वभाव. आमचं नाही पटायचं. तू म्हणशील तर दोन दिवसा करता येईन."


  "अगं,तुला इथे जॉब पण मिळणार आहे. एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीत. वीस हजार पगार मिळेल. आणि काय पाहिजे?"


  "ठीक आहे.विचार करते."


  "नाही, मी उद्या येणार तुला न्यायला."


   त्यांनं मोबाईल बंद केला.


   मनाच्या एका कोप-यात आनंद होता. माहेरचे  दिवस भेटतील. ज्या बाबांनी टाकलं ते आपल्या जवळ करतील. आपल्यावर प्रेम करतील. मनापासून नसेल तर तडजोड म्हणून तरी.


    ती द्विधा  मनस्थितीत होती.


    आता वाईट काहीच वाटत नव्हतं. पण बाबा बदलले असतील तर चांगलंच आहे ना! माई आणि बाबांना सोडायचं वाईट वाटते.पण  कधी तरी हा क्षण येणार होता.


   तिने ठरवले माई आणि बाबांना सांगायचं.


   सर्वांची जेवणे झाली. दोघांची औषध दिली. आई टीव्ही पाहत होती बाबांच्या हातात वर्तमानपत्र होतं. ती अडखळत अडखळत बोलू लागली,


   "बाबा, मला महत्त्वाचं बोलायचं होतं."


   "निसंकोचपणे बोल."


   "मला काम सोडायचंय."


   बाबांना नि माईना जोरदार धक्का बसला. ते केविलवाणे होऊन रजनी कडे पाहू लागले.


   "अरे बाळा काल मी तुला कामवाली बद्दल बोलत होते त्याचा अर्थ असा काढलास काय? मला पण याच विषयावर बोलायचं होतं पण तू तर एकदम बॉम्बस्फोट केलास."


   "काय बोलायचं  होतं तुम्हाला?"


   "हेच, घरातलं सर्व आटोपतांना तुझी तगमग आम्हाला बघवत नाही. धुण्याभांड्यासाठी दुसरी बाई मिळाली तर तुझे थोडे कष्ट कमी होतील. पण तू का बाई आम्हाला  कंटाळलीस?"


    "नाही, कंटाळले नाही.बाबा, मला पण माहेरी जायचंय. तिथे मला चांगला जॉब मिळतोय."


   "म्हणून आम्हाला सोडणार?"


   "तसं नाही."


   माईंच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब घरंगळला,


   "तुला माहेरच हवंय ना? मग हे काय? हे पण माहेरच आहे ना तुझं? आम्ही कल्पना केली नसेल कि तू असे काहीतरी बोलशील. आम्हाला कंटाळाशील."


    रजनी पटकन माईजवळ गेली. 


   "तु लेक ना गं माझी आणि का कंटाळा आला आमचा? कां सोडणार आम्हाला?"


    रजनी स्थब्घ झाली‌. आई-बाबांनी तिला मुलीचा प्रेम दिले होते. आपण त्यांना समजायला चुकलो. आपला त्यांना आधार किती होता. बाबा बोलले,


    "समीरला कॉल कर.त्याच्याशी बोलायचं मला."


    तिनं कॉम्प्युटर चालू केला.एवढ्यात प्रकाश पंण प्रवेशला. छकूली पण होती. छकुली माईच्या कुशीत स्थिरावली. माईनी तिला घट्ट मिठी मारली.


   "अरे माझ्या सोन्या."


   तिच्या केसावरती नाजूकपणे हात फिरवू लागली.          रजनीनं स्काईपवर क्लिक केले. काही क्षणात समीर स्क्रीनवर प्रकट झाला.


   "बाबा, आता बोला"


   " नाही, तूच बोल."


   समीर बोलू लागला,


   "ऐक नां ताई, काय म्हणतो मी… आमची सर्वांची इच्छा, तू आमची बहिण आहेस ना! रक्ताची नाहीतर हक्काची. कारण कुठलीही मुलगी करणार नाही एवढे तु आई बाबांची सेवा केलीस.तुझ्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत. आमची काळजी दूर केलीस. तुझ्या निमित्तानं आम्हाला बहिण आणि आई-बाबांना मुलगी मिळाली. आपलं  कसे वेगळंच आहे. तू त्यांना सांग. असो हे माहेर तुझेच आहे. हे तुझेच घर. माई नी बाबांना तुझाच मोठा आधार.आमची विनंती तु इथंच रहावंस."


     "दादा, चुकले मी गावी जायचं ठरवलं होतं"


     "ताई, माझ्या सांगण्यात स्वार्थ असेल कदाचित, पण तू आम्हाला हवी आहेस आमची बहीण म्हणून. तु इथेच राहा.छकुलीला चांगल्या शाळेत घाल. माई-बाबांच्या सहवासात राहा.आम्ही यावेळी वेळ काढून  भाऊबीजेला येऊ.खास तुझ्यासाठी."


    रजनी गहिवरली होती. तिचा पण माई बाबांच्या वरती जीव होता. त्यांना सोडायला नको वाटतंय एवढ्या प्रकाश बोलला,


     "ताई, नशीबवान आहेस. तुला आई-बाबा मिळालेत‌. तु इथेच राहा. त्यांची सेवा कर. एवढे मोठे भाऊ मिळालेत. माझी काळजीच मिटली. बघ मी जाईन माघारी."


   " बघ ताई तुझ्या भावानं पण परवानगी दिली."


   "नाही, आता मला परवानगीची गरज नाही. तुम्ही आणि त्यांच्यात काही फरक नाही. मी माई बाबांची सेवा करीन. त्यांची काळजी देईन."


   "थँक्यू ताई, आम्ही नशिबवान आहोत. हक्काची बहीण मिळाली. तु तर आता कायमची माहेरवाशीन झालीस.  ओके. आता आम्ही समाधानांनं झोपतो."


    स्काइप डिस्कनेक्ट झाला‌.


    बाबा बोलले,


   "छकुलीला थोडं माझ्याकडे पण द्या.आमचा पण  तुमच्या इतकाच हक्क आहे. समजलं कां?"


   छकुली बाबांच्या मांडीवर स्थिरावली आणि रजनी आपल्या माहेर मध्ये बसून निश्चिंत झाली.तिला पण आई बाबा मिळाले होते.




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू