पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सपोर्ट सिस्टीम

आजूबाजूला रोज शेकडोंच्या संख्येत होणारे मृत्यू, मंदावलेले व्यवसाय, गेलेल्या नोकऱ्या आणि कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सगळं काही लवकर मार्गावर येण्याबाबत रोडावलेल्या आशा अशा चहूबाजूंनी निराशेने वेढलेल्या परिस्थितीमधे जेव्हा एखादा सकारात्मक लेख किंवा कथा वाचनात येते तेव्हा आपण त्यात गुंतून जातो. त्यातली एकेमेकांना समजून घेणारी, मदत करणारी पात्रे आपल्याही आजूबाजूला असावीत असं वाटायला लागतं.
कथेतील सूनेला समजून घेऊन तिच्या बरोबर पावसात भिजणारी सासू वाचली की वाटतं की आपली सासू अशी हवी. सासू-सासऱ्यांच्या नंतरही आपल्या नणंदेचे माहेरपण जपणारी वहिनी वाचली की वाटतं की आपली वहिनी अशी हवी. ऑफिसमधली आपल्या असिस्टंटला सांभाळून घेत जपणारी सपोर्टीव्ह बॉस वाचली की वाटतं मला का नाही अशी बॉस? नकळत आपले मन त्या कथेतली पात्र आणि आपल्या खऱ्या कथेत आपल्या बरोबर असणारी जीवंत पात्र यांची तुलना करु लागते. या दोन पात्रांमधे जर साम्य असेल आणि खरोखरच अशी हवीहवीशी वाटणारी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आपल्या आयुष्यात असेल तर आपल्याला वाचलेली सकारात्मक कथा अजूनच भावते. पण कथेतल्या आणि प्रत्यक्षातल्या पात्रांत जर खूप तफावत असेल तर मात्र हे असे फक्त स्वप्नात किंवा कादंबरीतच घडते खऱ्या आयुष्यात नाही असा समज फार सहजपणे होतो. तोही अगदी ठाम. खरंतर लेखकाने कितीही कल्पक कथा रचली तरी कथेला जेव्हा तर्काची, वास्तवाची जोड असते तेव्हाच ती वाचकांना भावते. त्यामुळे कल्पनेचे प्रमाण कमी जास्त असले तरी ती कथा प्रत्यक्षात येऊच शकते. पण म्हणतात ना seeing is believing. काही believe करायला ते see करावं लागत. यात दुमत अजिबात नाही. फक्त see करतांना त्या दृष्यातली आपली जागाही फार महत्वाची असते. म्हणजे कथेत असणारी सपोर्टीव्ह बॉस, समजून घेणारी सासू, प्रेमळ वहीनी, जीवाभावाची मैत्रीण, आईचं मन जपणारा मुलगा (अशी मोठ्ठी न संपणारी लिस्ट करता येईल) ह्यातले एखादे कोणी जरी आपल्या आयुष्यात असले तर खरोखरीच ते आपले भाग्य. आणि आपण ह्यातलं कोणीतरी बनून इतरांच्या आयुष्यात जाऊ शकलो तर ते नक्कीच आपले कर्म. पण भाग्याचा पगडा नेहमीच कर्मापेक्षा जास्त असतो मनावर. म्हणून म्हणते see करतांनाच्या दृष्यातली आपली जागाही तितकीच महत्वाची. मला अशी वहीनी मिळायला हवी असं वाटण्यापेक्षा मला अशीच वहीनी होता येईल का असा प्रश्न जेव्हा पडेल आणि त्याचे उत्तर हो होता येईल असे मिळेल तेव्हाच कुठेतरी खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडायची शक्यता निर्माण होईल.

आपले आईवडील, भाऊ बहीण, शिक्षक, मित्रमैत्रिणी, सासरची मंडळी, ऑफिस कलीग्ज, बॉसेस हे सगळेच जण आपल्या इमोशनल सपोर्ट सिस्टीमचे अविभाज्य भाग असतात. ह्या सगळ्यांनी आपल्याला समजून घेण्याच्या अपेक्षेचा जन्म प्रत्येकाच्या मनात आपसूकच होतो. आणि आईवडील व जवळचे सगळेच आपापल्या परीने आपल्याला समजून घेतच असतात. पण ये दिल ऑलवेज मांगे मोअर. त्यामुळे स्वतःची सपोर्ट सिस्टीम बळकट करता करता आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षांची पातळी इतकी वाढत जाते की ती फक्त वैयक्तिक वा कौटुंबिक न रहाता सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरही जाऊन पोहोचते.

मग अगदी सहजतेने आपण शिक्षकांनी, डॉक्टरांनी, पोलिसांनी, न्यायाधीशांनी, नगरसेवकांनी, मंत्र्यानी, CM नी,  PM नी आणि हे कमी म्हणून की काय सगळ्या जगात नावाजलेल्या आपल्या लष्कराच्या दलांनी सुद्धा त्यांचे काम कसे करावे या विषयी आग्रही असतो. हे सगळे कसे चुकतात ह्याच्या चर्चा घरातल्या सोफ्यावर आरामात बसून  करतो. त्यात २४x७ आखो देखे अपडेट्स देणारा मिडीया आपल्या सोबत असतोच. घडून गेलेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येक घडामोडींचा एक्सपर्ट ॲनालिसीस आपल्यापासून फक्त एका बोटाच्या अंतरावर असतो. मग काय त्या ॲनालिसीसमुळे स्वतःही शहाणे व्हायचे आणि लगेच तो फॉरवर्ड करत शहाणे करुन सोडायचे सकळ जन. न्यूज चॅनेल्स आणि रिपोर्टर्सकडून ऑथेंटिक बातम्यांची अपेक्षा करणारे आपण स्वतःच्या सोशल मिडीयावरचे फॉरवर्ड्स खात्रीलायक आहेत की नाही ह्याची काळजी घ्यायला मात्र हमखास विसरतो.
परदेशात फिरुन आपल्या स्वतःच्या देशात परत आल्यावर आपण तिथल्या स्वच्छतेचे आणि कडक नियमांचे फक्त गोडवे गातो. इंटरनॅशनल स्कूल्समधे फ्रेंच आणि जर्मन शिकणारी आपली मुलं कशी हिन्दी, मराठी बोलत नाहीत ह्याचे कौतुकाने वर्णन करतो. पण स्वातंत्र्यदिनाला मात्र आपल्याला आपल्या  पणजोबांचा, आजोबांचा स्वातंत्र्य संग्रामातला सहभाग हटकून आठवतो. पूर्वजांच्या बलिदानामुळे भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले ह्याची वर्षातला एक दिवस उजळणी करत आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो.
गत पीढ्यांच्या शौर्याच्या, बलिदानाच्या वैभवात आणि येणाऱ्या पीढीच्या प्रगतीच्या वैभवात रमलेले आपण बऱ्याचदा आपल्या अनंत अपेक्षांची जबाबदारी सरकारी यंत्रणांवर टाकून परिस्थिती बदलायची वाट बघत राहातो आणि तरीही स्वतःला देशप्रेमी म्हणवतो.

यंदाच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण परिस्थितीत जर आपण इतरांकडून असलेल्या अपेक्षांच्या जोखडातून आपल्या मनाला स्वतंत्र करु शकलो. सकारात्मकतेने इतरांना मदतीचा हात देऊ शकलो. आपल्याला जी शक्य असेल ती मदत करुन  किमान एका व्यक्तीसाठी जरी आर्थिक / मानसिक सपोर्ट सिस्टीम उभारु शकलो तर हा स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकेल. आपण पुढे केलेल्या मदतीच्या एका हाताला इतरांना मदत करणारे अनेक हात जोडले जातील आणि ही सपोर्ट सिस्टीम अजून बळकट होईल ह्यात तीळमात्रही शका नाही. फक्त त्यासाठीची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. तेव्हा कोरोना नियमांच्या बंधनांत राहूनही मनातल्या सकारात्मकतेने आपल्यांना आधार देत साजरा करुया यंदाचा स्वातंत्र्य दिवस.

भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!


©® धनश्री दाबके


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू