पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दही

गणेश चतुर्थी असल्याने घराला भल्या पहाटेच जाग आलेली. दोघही लेक आज स्वतःहून लवकर आंघोळी करुन तयार होते. अहोंची पूजेला बसायची तयारी आणि माझी स्वैपाकघरात लगबग सुरु होती. एकीकडे स्वैपाक आणि दुसरीकडे पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करत होते. सगळं तयार होतं. आता फक्त पंचामृतासाठीची पाच अमृतं हवी होती. त्यासाठी तूप, साखर, मध वाटीत घेतले आणि दूध व दही घेण्यासाठी फ्रीज उघडला. दूधाचा कॅन समोरच होता पण काही केल्या दह्याचा डबा काही सापडेना. इथे शेक्सपियरच्या देशात तसंही विरजण लावून दही लागत नाही. त्यामुळे सुपर मार्केट मधे मिळणाऱ्या प्रोसेस्ड योगर्टलाच दही मानून घेण्याची सवय झालीये. तर असं हे प्रोसेस्ड दही, तेही चांगले किलोभर, आम्ही कालच तर घेऊन आलो होतो. आक्खा फ्रीझ आणि ओटा धुंडाळला पण दही काही मिळेना. काल आणल्यावर कुठे ठेवले हेही आठवेना. आणलं तर नक्कीच होतं. माझ्या धांदरटपणाचा  अजून एक किस्सा घडू घातला होता . पण आता काही इलाज नव्हता.


मग आवाजात जमेल तितका गोडवा ओतत लेकाला हाक मारली. त्यानेही माझा चेंज ऑफ व्हॉइस ओळखून आई काही आणायचय का असंच डायरेक्ट विचारलं आणि काम सोप्पं झालं. हो रे दही आणायचंय आत्ता लगेच हे सांगितल्यावर तो म्हणाला हो जातो मी. उद्या बाबांना आवडणारा दही वडा करायचाय ना मग मोठाच डबा आणतो म्हणून तो बाहेरही पडला. कधी मधी त्याच्या अंगात येणारा बबड्या आज आत्ता आला नाही आणि तो सांगता क्षणी दही आणायला गेला म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला. 


माझ्या नवऱ्याचा जन्म गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीचा. त्यामुळे तिथीनुसार वाढदिवस नेहमीच आणि तारखेनुसारचा बर्थडेही बऱ्याचदा घरातल्या गणपती बाप्पां सोबतच पार पडतो. ह्यावर्षीही तर दोन्ही एकापाठोपाठ होते. त्यामुळे बाप्पां बरोबरच दोन दिवस नवरोबांच्या प्रसन्न्तेचीही काळजी घ्यायची होती. आणि आता बिचाऱ्या मुलांना कशाला वगळायचं. त्यामुळे प्रत्येकाचीच वेगवेगळी डिमांड पूर्ण करणारे मेन्यू प्लॅन्ड होते. खूप काळजीपूर्वक सामानाची यादी बनवून काल शॉपिंगही केले होते. पण सगळं आठवणीने आणूनही शेवटी दह्याने घात केलाच. 

लेकाने पटकन मदत करुन वेळ सावरुन घेतल्याने कसलाही खोळंबा न होता पूजा, नेवैद्य, आरती सगळं यथासांग पार पडलं आणि बाप्पा घरात विराजमान झाले. झालं गेलं विसरुन पुढे जावं ही शिकवण अगदी मनापासून आत्मसात केलेली असल्याने मी ते दही प्रकरण विसरूनही गेले. 


वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळ संध्याकाळचा बाप्पांचा प्रसाद, आरती आणि नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ करण्यात दिवस भराभर पुढे सरकला. संध्याकाळी ओवाळण्याची आणि केक कापण्याची वेळ झाली. छानपैकी तयार होऊन मी कपाटातून त्याला गिफ्ट म्हणून आणलेल्या परफ्यूमची पिशवी बाहेर काढली आणि मला माझे हरवलेले दही सापडले. 


काल खरेदी करुन आल्यावर नवऱ्याला कळू नये म्हणून मी घाईघाईने गिफ्टची पिशवी आत येऊन कपाटात लपवली होती. दही आणि परफ्यूम दोन्ही एकाच पिशवीत ठेवल्याने हा गोंधळ झाला होता. आता काळजी दह्याची नव्हती पण परफ्यूमची होती कारण सेंटेड योगर्ट चालून जाईल पण योगर्ट फ्लेवर्ड सेंट कसं वाटलं असतं वाढदिवसाला.. तेही नवऱ्याच्या.. 


पण ह्यावेळी कधी नव्हे ते इथल्या ढगाळ हवेने आणि उन्हाळ्यातल्याही थंडीने मला साथ दिली होती आणि दह्याने दोन रात्री फ्रीझ ऐवजी कपाटात काढूनही फारसा गोंधळ घातला नव्हता. 

मग वाढदिवस छान साजरा झाला आणि दहीही जागेवर गेले. 


काय करणार? जसा देश तशा अडचणी.

  

आपल्याकडे कसं दह्याने स्वतःहूनच मी कपाटात आहे असा टाहो फोडला असता आंबट वासाने. पण इथे? मुळातच थंड असलेले दही अजूनच शांत आणि निर्विकार होऊन गेलेलं. एक्सप्रेशन्स नाहीतच मुळी... अगदी इथल्या माणसांसारख्या..त्यात आता माझी काय चूक?


असो.. फारसा गाजावाजा न होता मी केलेला अजून एक गोंधळ मार्गी लागला. मी आपली त्यातच खूष.


©® धनश्री दाबके


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू