पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गल्लत

पाच वेळा कॉल कट करुनही श्रेया थांबेचना तेव्हा जराशा  नाराजीनेच सगळ्यांना 'Excuse me' म्हणत नंदिनी मीटींग मधून बाहेर आली आणि तिने कॉल घेतला.


"आई सॉरी ग. मला माहीती आहे तुझी खूप खूप महत्वाची मीटींग सुरु आहे पण ही आजी बघ ना ऐकतच नाहीये. घे बोल तिच्याशीच." म्हणून श्रेयाने सुधाताईंना फोन दिला.


"अगं नंदिनी, ही तुमची अति सुधारीत लेक बघ काही सुचू देतच नाहीये मला. तुला माहित आहे ना गणपती बसल्या शिवाय मी हरतालिकेचा उपास सोडत नाही कधीच. पण हीची मगाच पासून भुणभुण चाललीये नुसती. आधीच तू घरी नाहीस आज आणि नेमका गुरुजींनाही यायला उशीर होतोय. फक्त थोडसं डोकं दुखतय काय म्हणाले ही लगेच सुरुच झाली. कशाला ही व्रतवैकल्य आणि उपास तापास वगैरे वगैरे. हीचं ऐकून हे आणि हीचा शहाणा बाबाही हीचीच बाजू घेऊन लगेच आत्ताच उपास सोड म्हणून माझं दुखणारं डोकंही खातायत. शेवटी म्हंटले तुलाच कॉल करावा. सांग तूच काहीतरी हिला आता."


श्रेया वर्सेस सुधाताई. लगेच नंदिनी मधली सिच्युएशनल  मॅनेजर जागी झाली आणि तिने भराभर प्रसंगाची सुत्रं हातात घेतली. सुधाताईंना थंड दुधाबरोबर नेहमीची पित्ताची गोळी घ्या म्हणून सुचवले आणि श्रेयाला आता आजीला त्रास होणार नाही म्हणून समजावले. दोघींमधे तह करुन देत नंदिनीने कॉल संपवला आणि परत मीटींग मधे गेली. 


आजी आणि नातीमधल्या अशा कारगीलची जरी सवय असली तरी त्यांच्या आजच्या ह्या चकमकीचा ताण कदाचित नंदीनीच्या  चेहऱ्यावर दिसत असावा कारण ती परत आल्यावर साहेबांनी "एनी प्रॉब्लेम नंदीनी ?" असं काळजीने विचारले. 


"नो सर, नथींग सिरियस." म्हणून नंदीनी कामाला लागली.


लंच ब्रेकमधे सर म्हणाले " I know, गणपती बसतात तुझ्या घरी आणि तुला इथे यावं लागलय आज. पण हा क्लायंट घोड्यावरच असतो नेहमी. काहीच ऐकून घेत नाही. आणि फक्त तूच हे डील आणि हा क्लायंट मॅनेज करु शकतेस. त्यामुळे तुला आज ह्या मीटींगला बोल्यावण्याशिवाय काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. And see now the things are back on the track. I am glad you managed to be here even today. Good work. Keep it up" 


" Thank you Sir " म्हणत नंदीनीने श्रेयाला कॉल केला.


बाप्पाची पूजा, नवैद्य, आरती सगळं यथासांग पार पडलं होतं आणि सगळेजण जेवायला बसत होते. फोनवरच बाप्पांचे दर्शन घेऊन नंदीनीने कॅंटीनकडे मोर्चा वळवला. 


आई, श्रेया आणि त्यात भर म्हणून आता हा क्लायंट. सगळ्यांना मीच हवी. तूच करु जाणे म्हणत सगळे मला झाडावर चढवतात. आणि मीही त्यांचं ऐकून घेते. तशी आईंची कोणावरच कशाची सक्ती नसते. मला इतक्या वर्षात त्यांनी कधी कुठला उपास किंवा पूजा कर असं म्हंटले नाही . पण त्या स्वतः मात्र सगळे सणवार श्रद्धेने करतात. श्रावणातली व्रतवैकल्ये, पूजा, उपास आणि हे गौरी गणपती तर त्यांचे फार लाडके. हरतालिकेचा उपास जरा जास्तच जिव्हाळ्याचा. मी स्वतः कधी केला नाही पण आईंच्या श्रद्धेमुळे आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या आनंदामुळे हे कशाला आणि ते कशाला असे प्रश्नही मला कधी पडले नाहीत. पण ही श्रेया मुळातच आगाऊ. देव जर फक्त भक्तीचा भुकेला असतो तर हे उपासतापास कशाला म्हणून भांडते. आणि आता कॉलेजला जायला लागल्यापासून तर जरा जास्तच आगावपणा करतेय. आज तिला समजावतेच. 


शेवटी एकदाचा ऑफिसचा दिवस संपला आणि नंदीनी घरी आली. आज बाप्पांच्या आगमनाने घरात प्रसन्नता होती. गणपती बाप्पा श्रेयाचा लहानपणापासूनच आवडता आणि घरात गौरी गणपती असल्याने त्याची सवयही. त्यामुळे श्रेया आनंदात होती. नंदीनी आल्यावर  लगेच तिच्यासाठी चहा करायला ती आत पळाली. किती गुणी पोर आहे ही पण कधी कधी उगीचच हट्टाला पेटते आणि वाद घालते. आत्ता बाईसाहेबांचा मूड चांगला आहे तर लगेच तिच्याशी बोलावं म्हणून नंदिनी तिच्या मागोमाग स्वैपाकघरात गेली.


"कशी झाली पूजा? व्यवस्थित ना? खूप मदत केलीस ना आजीला? शहाणं बाळं माझं" म्हणून नंदीनीने तिला जवळ घेतलं. 


"पूजा नेहमीप्रमाणेच छान झाली ग. मोदक पण मस्त झाले. तू म्हणतेस ना नेवैद्याचा स्वैपाक नेहमी छानच होतो, ते खरय."


"हो ग. त्याचं कारण आपली त्यामागची भावना. मनापासून केलेली कुठलीही गोष्ट चांगलीच होते. मग ते मोदक असोत नाहीतर उपास. जे आपण मनापासून करतो त्याचा आपल्याला त्रास नाहीच होत कधी."


"हो. मला वाटलंच  होत तू आल्याआल्या हा विषय काढशीलच. आई मला ना खरंच फार आश्चर्य वाटतं तुझ्या वागण्याचं. एका MNC मधे इतकी वर्ष वरच्या पोस्टवर काम करूनही तू आजीच्या ह्या उपास तापासांवर विश्वास ठेवतेस? आई जग कुठे चाललय आणि आपण अजूनही तिथेच. माणसांतला देव बघायचे सोडून ही व्रतं आणि उपास करतोय." श्रेया उसळून म्हणाली. 


"हो ग. खरंय. जग पुढे जातय आणि जगाबरोबर मीही. रोज नवनवीन टेक्नॉलॉजी वापरतेय. त्यातल्या काही डेव्हलप करायलाही हातभार लावतेय आणि तरी हरतालिकेच्या व्रतावरही विश्वास ठेवतेय. कारण मी ह्या दोन गोष्टींची गल्लत करत नाही कधीच. मुळात ही व्रतवैकल्ये, उपास, सणवार आणि प्रथा ह्या देवाकरता नसतातच कधी. त्या आपल्यासाठी असतात. ह्या प्रथा आपल्यावर संस्कार करत असतात जे कधीच आऊटडेटेड होत नाहीत. फक्त आपल्याला त्यामागचा अर्थ आणि शास्त्र समजले पाहिजे. शंकराशी लग्न व्हावे म्हणून पार्वतीने हे व्रत तिच्या सखीला बरोबर घेऊन केले. मला ह्या हरतालिका, स्वतःचे आणि मैत्रीणींना आधार देत त्यांचेही निर्णय स्वातंत्र्य जपायला शिकवतात. तसंच वाळूच्या आणि पत्रीच्या निमित्ताने निसर्गाच्या जवळ जाऊन आरोग्य जपायला शिकवतात. त्यांनी केलेली शिवाची कडक उपासना सयंम आणि चिकाटी शिकवते. तर हा उपास कडक असल्याने तो पुढच्या दहा दिवसांत बाप्पांच्या नेवैद्यानिमित्त खाल्ल्या जाणाऱ्या गोडाधोडासाठी आपल्या हेल्थला तयार करत असतो असं माझं शास्त्र सांगते. मी स्वतः जरी करत नसले तरी ह्या उपासाचा अर्थ मी असा घेते आणि मग मला तो आजीने केल्यावर पटतो. आधी हवा तसा नवरा मिळावा म्हणून आणि तो मिळाल्यानंतरही आयुष्यभर हा उपास करणारी तुझी आजी मला कमिटमेंटचे महत्व शिकवते. आता वयोमानानुसार आजीने सुद्धा कडक उपास धरायचे सोडून दिलय. म्हणजे त्याही काही आंधळेपणाने सणवार फॉलो करत नाहीत तर समजून उमजून त्यात काळानुसार बदल करतच करतायेत. हा आता कधीतरी होतो त्यांना त्रास पण त्यावर आता आपल्याकडे औषधं आहेत. मग उगीच त्यांना विरोध करुन त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा? तूच म्हणतेस ना की तू माणसातल्या देवाला महत्व देतेस. मग मीही तेच तर करतेय. आईंची श्रद्धा जपतेय. घरात शांतता, समाधान नांदावे म्हणून हे सणवार असतात. जे चारच दिवस असतात आणि सिंबॉलिक असतात. खरंतर वर्षातले ३६५ दिवस माणूसकीच्या नात्याने आपल्याला शक्य आहे तितकी सगळी मदत इतरांना करता यायला हवी. म्हणजे खरोखरीच माणसांतला देव आपल्याला दिसतो असं म्हणता येईल. पण आपल्या मॉडर्न विचारांना प्रथांना विरोध करुनच माणसातला देव आठवतो. जसं की कुळाचार, पूजा, धार्मिक विधी करतांनाच आपल्याला गरीबांसाठीचा दानधर्म आठवतो. नवरात्रीत देवीची ओटी भरतांनाच आपल्याला आजूबाजूच्या गरीब स्त्रिया दिसू लागतात. मग आपण म्हणतो मी देवीच्या देवळात न जाता गरीबांना मदत करते. गरीबांना मदत करणे ही तर चांगलीच गोष्ट आहे. ती नेहमीच करावी आणि प्रथांमागचा उद्देश आणि सायन्स समजून घेऊन डोळसपणे त्याही फॉलो कराव्या व आपले समाधान जपावे असं आपलं माझं गणित आहे. माणूसकीच्या नात्याने इतरांना मदत करण्यासाठी मला सणांची गरज लागत नाही आणि आईंच्या श्रद्धेवर अविश्वास दाखवून मी कधी त्यांना सणासुदीला दुखवतही नाही." नंदीनीचा हा लांबलचक डोस ऐकून श्रेया विचारात पडली.


मग नंदीनीच पुढे म्हणाली " जरा जास्तच रीॲक्ट झाले  का ग मी? पण आज तुला नुसतंच मोठ्यांचे ऐकावे असं सांगून हा विषय न आटोपता मी तुला सविस्तरपणे माझी ह्यामागची विचारसरणी सांगितली. कारण तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. तुला नाराज करुन त्या हरतालिका थोडीच पावणार मला. आता तुला माझ्या वागण्याचं आश्चर्य वाटायला नको आणि आजीबद्दल कुठला आकसही तुझ्या मनात नको. चलो इस बात पे एक चाय हो जाये."


"हो आई. समजले मला तुझे विचार आणि पटलेही. आता नाही भांडणार मी आजीशी ह्यावरुन. तू धन्य आहेस माते." म्हणून श्रेयाने चहा गाळायला घेतला.


आणि आतापासून श्रेया कुठल्याही प्रथेबद्दल स्टॅंड घेतांना सारासार विचार नक्कीच करेल ह्या खात्रीने नंदीनी निर्धास्त झाली.

 

©® धनश्री दाबके 



 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू