पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याचा महोत्सव

आयुष्य किती साधं, सरळ नि सोपं. पण ते तितकेच गूढ रहस्य मय व अनाकलनीय. बहुतेक कोणालाही न कळलेलं. आपण आयुष्यभर त्याला समजण्यासाठी किती धडपड करतो, पण शेवटी कळतं कि त्यातलं काहीच आपल्याला उमगलेले नाही. आयुष्यातील दोन मोठ्या घडामोडी म्हणजे आयुष्याची सुरुवात व आयुष्याचा शेवट. या दोन्ही गोष्टी म्हणजे जीवन आणि मृत्यू. एका ठिकाणी मी वाचले होते कि एकदा मृत्यू जीवनाला विचारत होता, "कां रे प्रत्येक जण माझा एवढा व्देष करतो अन् तुझ्यावर एव्हढे प्रेम." जीवन उत्तर देते, " कारण मी एक ' सुंदर असत्य' आहे आणि तू 'दु:खदायक सत्य'. किती खरं आहे हे. जीवन सुंदर असले तरी ते 'असत्यच' आहे, त्यात सुंदरतेचा  केवळ भासच आहे. त्या असत्यात जीवनातील सगळेच भाव प्रेम, अहंकार, व्देष, राग, लोभ, माया सगळं काही भरलेलं आहे. आणि मृत्यू दु:खदायक पण 'सत्य'. कधी कधी मला वाटते कि जीवन सुंदर व मृत्यु दु:खदायक असे कां? जर जीवन असत्य व मृत्यु सत्य असेल तर मग मृत्यूनंच सुंदर असायला हवे. आणि ते तसे असेलही. कोणी ते पाहिलंच नाही त्यामुळे फक्त त्याचे पुरावे नसावे इतकंच. 

       जीवन जगता जगता आम्ही त्यात इतके रमून जातो कि आम्हाला कशाचेही भानच राहत नाही. आणि मग आयुष्याच्या शेवटाला पोचल्यावर आम्हाला जाणवायला लागते कि आमचे तर जगायचेच राहून गेले. जगता जगता इतके वाहवत जातो की आमच्या लक्षातंच  येत नाही कि खरे आयुष्य तर जगायचेच  राहून गेले. आम्ही आमची नोकरी, पगार, दुसऱ्याशी प्रतिस्पर्धा यांत इतके गुरफटून धावत जातो कि, खरं आयुष्यात आम्हाला काय हवे आहे हे स्व:तला विचारुन पहायचे भान पण राहात नाही. मग दुसऱ्याची काय कथा? पण मग या धावण्याच्या शर्यतीतून जेंव्हा बाहेर येऊ तेंव्हा आयुष्यातल्या सत्याचा म्हणजे मृत्यूचा सामना तरी आम्ही करु शकतो का? खरं तर आयुष्यातला प्रत्येक क्षण खूप मोलाचा असतो.  आम्ही ते ठरवायचे असते कि त्या क्षणाचे सोने कसे करायचे. कारण गेलेला प्रत्येक क्षण आयुष्यात परत कधीच येत नसतो. तो क्षण गेल्या नंतर उशिराने आम्हाला जाणवते कि 'अरे आयुष्य तर जगायचेच राहून गेले'. आपण संपूर्ण आयुष्यात फक्त प्रतिस्पर्धा, अहंकार, राग, लोभ, माया, मोह, मत्सर यांनाच कवटाळत राहीलो. खरे आयुष्य जगायचे विसरूनच गेलो. 

       खरं तर आम्हाला "जब जागो तब सवेरा" या उक्ती प्रमाणे त्या नंतर तरी म्हणजे आमच्या उर्वरित आयुष्यात तरी मृत्यूला स्वीकारून जीवनाचा आनंद घेत वाटचाल करायला हवी. आणि मग अश्या वेळी मृत्यू केंव्हाही आला तरी आम्ही त्याचे आनंदाने स्वागत करु शकतो. नाही तर नेमके त्या क्षणी लक्षांत येईल "अरे आपले तर आयुष्यात खूप काही शिकायचे राहून गेले, काही द्यायचे राहून गेले, सर्वांशी मनातले काही बोलायचे राहून गेले, खूप जणांना भेटायचे राहून गेले आणखीही बरंच काही करायचेच राहून गेले. खरं तर जगायचेच राहून गेले. एका नर्स ने आपल्या एका पुस्तकात लिहिले होते कि, " माझी ICU मध्ये ड्युटी गेले २५ वर्षा पासून आहे. तेथे सर्वच जणं जवळ जवळ शेवटच्या क्षणीच येतात. त्यातील ९५ टक्के लोकं  खूप  निराश झालेली असतात. त्यांना आयुष्यात खूप काही करायचे होते व ते सर्वच राहून गेल्याचे दु:ख ते बोलून दाखवत. म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदाने उत्साहाने जगून घ्यावा. म्हणजे मग मृत्यूच्या दु:खदायक असण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्याची भीती तरी कां वाटावी? 

       जीवनातल्या लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्यापेक्षा भविष्यात कधीतरी येणाऱ्या मृत्यू च्या भितीने वर्तमानातल्या  आनंदाला ही आम्ही मुकतो. खरं तर पहिल्या श्वासा बरोबरच मृत्यू ला आम्ही आमंत्रण देतो. तर त्याचा तेंव्हा पासूनच स्वीकार करायला शिकलेच  पाहिजे. आम्हाला आमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला स्वीकार करता आलेच पाहिजे. जो जीवन समजून घेत जगतो त्याला जीवना इतकांच मृत्यूही लोभस वाटतो. व. पु. काळे यांनी एका ठिकाणी लिहिले आहे,  "आयुष्य हे निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो. " किती खरंय हे. चला तर आजपासूनच आपणही या महोत्सवाची सुरवात करु या.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू