पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पृथ्वीचे प्रेमगीत-रसग्रहण

..जे न देखे कवी..

मराठी बातम्या ऐकता ऐकता कुसुमाग्रजांच नाव आले तसे मी कान टवकारले. बातमी होती,"शास्त्रज्ञांना अवकाशात एक नवा तारा दिसला असून त्याला एका भारतीय शास्त्रज्ञाच्या सूचनेनुसार
कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे."
बातमी ऐकली आणि वाटलं,"किती योग्य व्यक्तीचं नाव मिळालं बरं या ता-याला! त्या ता-याच्या सौंदर्यात कुसुमाग्रज नावान आणखीनच भर पडली असेल."
मनाच्या नभांगणात अनेक आठवणी साकार होत गेल्या. प्रकर्षाने आठवले ते कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत.
काँलेजमधले ते मंतरलेले दिवस आणि त्यातच विशाखा मधील ती कुसुमाग्रजांची कविता,"पृथ्वीचे प्रेमगीत"त्यात त्यानी विज्ञान आणि कल्पनाविलास यांची इतकी सुरेख सांगड घातली आहे की आपण विचार करताना दंग होऊन जातो.
आपली गृहमाला ही सत्य. पृथ्वी सूर्याभोवती
फिरते हे आणखीन एक सत्य .हे सत्य कायम ठेवून पृथ्वी आणि सूर्य यांची विफल प्रेमकहाणी कुसुमाग्रजानी या कवितेत साकार केली आहे.सूर्यालाच आपला प्रियकर मानून त्याच्या कक्षेत धावत त्याच्या प्रेमाची याचना करणारी पृथ्वी पण तिची सतत उपेक्षा करणारा तेजोमय रवी,पृथ्वीसाठी वेडावलेले इतर प्रेमी,मग त्यात केस पिंजारून मध्येच उगवून तिच्या प्रेमाची याचना करणारा पिसाट धूमकेतू,, तिच्याशी प्रेमाचा अनुनय करतांना आपच लाजून लाल होणारा लाजरा मंगळ,तिनं नकार दिल्यावर ऋषींच्या कुळीत संन्यस्त वृत्तीने जाऊन बसणारा ध्रुव आणि या सर्वांच्या याचनेकडे निग्रहाने पाठ फिरवून सूर्याने आव्हेरल तरी ,"नको क्षुद्र श्रूंगार तो दुर्बलांचा ,तुझी दूरता त्याहूनी साहवे." असे निग्रहाने सूर्याला बजावून सांगणारी त्याची प्रेमिका पृथ्वी !!
आज बातमी ऐकलीआणि मनाच्या पाणवठ्यावर पुन्हा जुन्या आठवणी साकार झाल्या. वाटलं,या ता-याला ज्यानं कुसुमाग्रज तारा हे नाव देण्याची सूचना केली असेल तो शास्त्रज्ञ किती रसिक असेल नाही! नेहमीच म्हंटलं जातं,'जे द न देखे रवी ,ते देखे कवी.," पण कवीच्या दृष्टीपलीकडे आणखी एक दृष्टी असते
रसिकाची.तो तर कवीपेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे पहात असतो. नाहीतर एरव्ही पृथ्वीचे आकाशातील गृहमालेशी नाते जोडताना कुसुमाग्रजांना
तरी वाटले असेल काय,की आपलेही नाव अवकाशातील एका ता-याशी कधी तरी जोडले जाल म्हणून? अशी रसिक पावती जगातील कुठल्या तरी कवीला मिळाली असल काय? या दृष्टीने पाहिल्यास कुसुमाग्रज भाग्यवान खरे!


_रेखा मिरजकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू