पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती ( तिची , माझी अणि तुझी कथा)

 

 

 


 


                 ती ( तिची, माझी आणि तुझी कथा )
                    
 

 

    ती.... ती कधी आई असते तर कधी मुलगी तर कधी सून, कधी आजी, कधी आत्या, काकी, मावशी, पणजी असते. नाती जरी वेगवेगळी असली तरी त्या  सर्वांना सारख्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि ते म्हणजे सहन करणे. तिरस्कार,अपमान, दुजाभाव आणि बरेच काही.
 

      अगदी लहानपणापासूनच बघाना! जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा काही घरात बापाच्या धनाची पेटी म्हणून तिचे स्वागत होते,तर काही घरात जेवायला आणखीन एक तोंड वाढले म्हणून तिला हिणवले जाते किव्हा  तिरस्कारही केला जातो. पण त्याच ठिकानी मुलगा जन्माला आला तर मग काय? बघायलाच नको! त्याचा अगदी उदोउदो होतो आणि मग हीच लाडावलेली मुलं आम्हा मुलींना त्रास देऊ लागतात.
  


        चला आणखी थोडे पुढे जाऊ. जसजशी ती मोठी होऊ लागते तसे तसे, ती आणि तिच्या भावात होणारा भेदभाव तिला कळू लागतो. बाप तर दोघांसाठीही बचत करत असतो पण त्या बचतीची कारणे वेगवेगळी असतात, एकच्या शिक्षणासाठी तर दुसरयाच्या लग्नासाठी .
   
    घरातली सगळी जबाबदारीची कामे घरातली मोठी माणसे कायम मुलांनाच देतात, का तर मुली तेवढ्या सक्षम नसतात म्हणून. आणि जर तिने एखादे  काम  जबरदस्तीने करायला घेतले तर," ए, जरा गप्प बस जागेवर तुला जमणार नाही ते,उगाच हात पाय मोडून घेशील आणि मग तुला कोणी पसंत करणार नाही आयुष्यभर इथेच पडून राहशील." एवढ बोलल्यावर ती आपलं मन मारतच राहते आणि ह्या सगळ्या कडे दुर्लक्ष करत आपलं मन अभ्यासात गुंतवते. ती खूप मन लावून अभ्यास करते काहीतरी बनून दाखवण्यासाठी, आपल्या घराचा आधार बनण्यासाठी पण तेही तिला करू दिले जात नाही.

 

      कधीकधी तिला शिक्षण पण अर्ध्यातच सोडावं लागतं कारण  फार मोठ्या घरातून तिला स्थळ आलेले असतं. एखाद्या मोठ्या श्रीमंत घरातून आपल्या मुलीला स्थळ येणे म्हणजे बापासाठी अभिमानाची गोष्ट असते नाही का? पण  खरच   असलीच  पाहिजे  का?  बरं, त्या ठिकाणी तो मुलगा किंवा त्याच्या घरचे लोक आणि त्यांची वागणूक खरोखरीच चांगली आहे का? याचा कोणीच विचार करत नाही. बरं ते जाऊ द्या सगळ्यात महत्वाच तो मुलगा तिला मनापासून  आवडला आहे का किंवा त्यावेळी तिची खरोखरीच लग्न करण्याची इच्छा आहे का हे सुद्धा तिला कोणी विचारत नाही. ते सगळं घरचेच ठरवतात ना? फक्त पैसा बघून त्यांचे लग्न लावून देतात आणि तिचं शिक्षणाचे स्वप्न उद्ध्वस्त होऊन जाते. ते सगळं ती सहन करते कारण तिला आशा असते, आपल्या बाबांनी जरी मनासारखं करू दिले नाही  निदान नवरा तरी आपले ऐकेल आणि आपले रखडलेलं शिक्षण पूर्ण करू देईल. आपल्या पंखांना बळ देईल पण कसलं काय! तोही त्याच गतानुगतिक मानसिकतेचा असतो.
     " आपल्याकडे खूप पैसा आहे. अजून तुझ्या कमाईवर घर चालवावे लागेल असे दिवस आपल्यावर आलेले नाहीत. आमच्या घराण्यात, घरातील कोणतीही बाई कामासाठी  घराबाहेर जात नाही. " आता अश्या अमसिकते बद्दल कोण  काय बोलणार,  हे सगळं असं आहे तर  ती तेही सहन करते आणि घरालाच आपले विश्व मानू लागते घराची आणि घरातल्यांची काळजी घेते. बघता बघता ती घरातच रुळते आणि आपली स्वप्न विसरून जाते.
    


        आता थोडं  आनखिण पुढे जाऊ, ती आता आई होते. मुलाबाळांचं सगळं करून ती थकून जाते पण तरीही ती ते सर्व  प्रेमाने करतच राहाते. मुलं मोठी होतात आपले शिक्षण पूर्ण करतात आणि नोकरीसाठी घराबाहेर पडतात पण ती मात्र घरातच असते.  पुढे मुलांची लग्न होतात. आता घरात सुना येतात. तिला वाटतं, चला, आपल्या घराला आणखीन आधार होईल आणि थोडा आरामही .

 

        सुना उच्चशिक्षीत असल्याने त्याही तिच्यासारख्या स्वावलंबी होण्याचे स्वप्न घेऊन घरात आलेल्या असतात मग त्यांच्या स्वप्नासाठी ती आपण होऊन त्यांचा आधार बनते. पूर्वी कुणाच्यातरी आधाराची वाट बघणारी ती   आता आपल्या सुनांसाठी खूप मोठी support system बनते. आपल्याला मिळालेल्या एवढ्या मोठ्या आधाराची त्या सुनाही जाण ठेवतात. त्या आपल्या सासूवर जिवापाड प्रेम करतात.
     


       आता तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ सुरू झालेला असतो. तिच्या आयुष्यात नातआणि नातू आलेले असतात. नातवंडे आल्यावर एक गोष्ट मात्र ती आपल्या मनाशी पक्की करते. जे आपल्या बाबतीत झाले ते आपल्या नातवंडांच्या बाबतीत होणार नाही, याची ती काळजी घेते म्हणजे नात आणि नातू यांच्यात ती भेदभाव होऊ देत नाही. त्यांना घरात समानतेची वागणूक मिळेल हे ती कटाक्षाने पाहते.आजही  मुलीचा जन्म झाल्या पासुन तीच बाप पैसे  जमवतो का तर तिच्या लग्नासाठी पण हाच दृष्टिकोन तिने बदलला तिने तिच्या मुलाला पैसे जमवायला सांगितलं  पण ते तिच्या शिक्षणासाठी  तीच्या भविश्यासाठी.
       
      
     आज ती खूष आहे.  समाजातील पारंपरिक मानसिकतेला आपण आपल्या घरातून सुरुवात करून निर्धाराने धक्का देऊ शकलो, याचा तिला अभिमान वाटतो.   

 


      ज्याप्रकारे तिने समाज बदलण्याचा प्रयत्न केला त्या प्रकारे जर प्रत्येक घरात अशी ' ती ' निर्माण झाली तर सगळे विश्वच बदलून जाईल. ती स्वावलंबी होईल, ती   सक्षम होईल, अणि हो सर्वात  महत्त्वाचं, ती आनंदी होइल.


                                          लेखिका ः- विजया कुइगडे.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू