पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हिचकी

नैना खूप अस्वस्थतेत शाळेच्या कॉरिडॉर मधल्या बेंचवर बसली होती. इतक्यात शाळेच्या शिपायाने येऊन तिला आत बोलावले असल्याचे सांगितले. नैनाला नेहमीच येणाऱ्या उचक्या आता इंटरव्ह्यूच्या ताणामुळे अजूनच जोरात यायला लागल्या. तिच्या न थांबणाऱ्या उचक्यांमुळे इंटरव्ह्यू पॅनेलवरचे सगळेच चमकले. आणि जेव्हा नैनाला असलेला Tourette Syndrom, जो तिच्या सतत येणाऱ्या उचक्यांचे कारण होता, त्यांना समजला तेव्हा ते सगळे अचंबित झाले. अर्थातच अशी उचक्या देत घशातून वेडेवाकडे आवाज काढणारी शिक्षिका मुलांना कशी बरं शिकवणार ह्या विचाराने त्या सगळ्यांनी नैनाचा इंटरव्ह्यू न घेताच तिला नाकारले. हा नकार जरी नैनाला अनपेक्षित नसला तरीही काही वेळासाठी तिच्या मनावर मळभ आणत तो तिला भूतकाळात घेऊन गेलाच. 


मिस नैना माथूर, MSC BEd केलेली एक अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगी, जिला शिक्षिका आणि फक्त शिक्षिकाच व्हायचं होतं. पण शिक्षिका होण्याच्या स्वप्नाबरोबरच Tourrtte Syndrome हा एक दुर्मिळ पण असाध्य असा एक न्यूरॉलॉजिकल आजारही तिच्या सोबतीला होता. मेंदू मधल्या एका बिघाडामुळे तिला झटका बसल्यासारख्या उचक्या लागायच्या ज्यांच्यावर तिचा कुठलाही ताबा नव्हता. आणि ह्या उचक्या तिला फक्त शिकवण्यासाठीच अडवत होत्या असं नाही तर शिकण्यासाठीही तिला त्या खूप त्रासदायक ठरल्या होत्या. तिच्या उचक्या वर्गातल्या इतर मुलांना विचलीत करतात म्हणून कुठलीच शाळा तिला शिकवायला तयार नव्हती. पण आपली मुलगी पूर्णपणे नॉर्मल आहे आणि तिला सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच प्रवेश मिळायला हवा असा आग्रह धरणारी नैनाची आई तिच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करतच राहिली. एक, दोन करत करत तब्बल १२ शाळांनी नकारघंटा वाजवल्यानंतर शेवटी एक असे प्रिन्सिपल सर नैनाच्या आयुष्यात आले ज्यांनी फक्त स्वतःच तिच्या आजाराला स्विकारले नाही तर संपूर्ण शाळेला तिच्या आजाराला स्विकारत तिला सामान्य वागणूक द्यायला शिकवले. समज आल्यापासून इतरांच्या अगदी स्वतःच्या वडलांच्याही उपेक्षित नजरांचा सामना करत जगत आलेल्या नैनासाठी ते प्रिन्सिपल सर तिचा आदर्श बनले. त्यांनी तिच्या मनात तू फक्त शिकण्यासाठीच नाही तर तुझ्या ह्या syndrom बद्दल आम्हाला शिकवण्यासाठीही योग्य आहेस असं म्हणून तिच्या मनात शिक्षिका होण्याचे बीज रुजवले. आणि मग नैनाने आयुष्यात कधीच हार मानली नाही. मुळातच कुशाग्र बुद्धीमत्ता, तिच्या जोडीला मेहेनत, आईची व भावाची साथ आणि प्रिन्सिपल सरांनी दिलेला आत्मविश्वास. ह्या सगळ्यांच्या जोरावर नैनाने डबल B.Ed. व MSC पूर्ण केले आणि तिच्या नोकरीसाठी शाळांमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. नोकरी मिळतांनाही परत तीच नकारघंटा वाजायला लागली पण नैनाने चिकाटी सोडली नाही. तिच्या वडलांनी ओळखीने आणलेल्या बॅंकेतल्या जॉबची ऑफरही तिने नाकारली आणि ती शाळांमध्ये नोकरी मागण्यासाठी जातच राहिली.


शेवटी तिचे जिथे शिक्षण झाले होते त्याच शाळेतून तिला जॉब ऑफर मिळाली आणि नैनाचा शिक्षिका बनण्याचा प्रवास सुरु झाला. जो अर्थातच अतिशय खडतर होता. 

राईट टू एज्युकेशन ॲक्टमुळे झोपडपट्टीत रहाणारी, कशीबशी म्युनसिपल शाळेत जाणारी व शिकण्यात अजिबात रस नसलेली पण नववीच्या इयत्तेत पोचलेली १४ मुलं ह्या उच्चभ्रू मुलांसाठी असलेल्या हायफाय शाळेत आली होती. ह्या मुलांना स्विकारून त्यांना शिकवायला कोणीही शिक्षक तयार नव्हते. गेल्या सहा महिन्यांत सात शिक्षक येऊन जॉब सोडून गेले होते. अशा एकापेक्षा एक बिलंदर १४ रत्नांची जबाबदारी सोपवण्यासाठीच शाळेने नैनाची निवड केली होती. नैना ह्या मुलांचे आणि ही मुलं नैनाचे भवितव्य ठरवणार होती. कारण जर ही मुलं पास होऊ शकली तरंच नैनाची नोकरी पक्की होणार होती. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नैनाकडे चार महिने आणि अनंत अडचणी होत्या. शाळेतल्या इतर शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आणि ह्या स्पेशल १४ मुलांचा तिला तिच्या उचक्यांसकट स्विकारायला असलेला विरोध,  तिची हरेक प्रकारे केली गेलेली उपेक्षा, मुलांच्या मनातला प्रचंड न्यूनगंड आणि मुख्य म्हणजे आम्हाला ह्या वातावरणात शिकून इथल्या श्रीमंत मुलांसारखे होणे केवळ अशक्य आहे ही मनात खोलवर जाऊन बसलेली अढी. ह्या मुलांना इतके दिवस या शाळेने नाकारले असल्याने त्यांच्यात निर्माण झालेली बंडखोरी आणि परिस्थितीचे चटके सोसत पोटापाण्यासाठी काहीनाकाही काम करत असल्याने शिक्षणाबद्दलची त्यांची अनास्था. हे सगळे अडथळे पार करत नैनाला त्या मुलांना घडवण्याची शर्यत पार करायची होती. जी नैनाने अतिशय सकारात्मकतेने स्विकारली आणि ती कामाला लागली. सुरवातीला मुलांनी इतर शिक्षकांप्रमाणेच नैनालाही पळवून लावण्याकरता खूप प्रयत्न केले. पण तिने चिकाटीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यातल्या प्रत्येकाच्या अंगात असलेले कसब ओळखून त्याला प्रोत्साहन देत, कधी समज देत तर कधी त्यांच्या चुकांची जबाबदारी स्वतःवर घेत नैनाने त्या मुलांना आपलेसे केले. क्लासरुम मधे शिकवण्याची कन्व्हेन्शनल शिक्षण पद्धती सोडून मुलांना बाहेर नेऊन वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके करुन दाखवत तिने मुलांच्या मनातील मॅथ्स , सायन्स बद्दलची भीती घालवली आणि त्या मुलांमधे परिस्थितीवर रडत न बसता काहीतरी करुन दाखवायची जिद्द निर्माण केली. मुलांनीही मग नैनाला पूर्णपणे सहकार्य देत भरपूर मेहेनत केली आणि ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवत त्या शाळेतली प्रतिष्ठीत अशी प्रीफेक्टशीप मिळवली. त्या शाळेतल्या उच्चभ्रू मुलांनी आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनीही मग ह्या १४ मुलांना स्विकारले आणि ती मुलं पुढे जाऊन आयुष्यात खूप यशस्वी झाली. हाडापेराने शिक्षिका असलेल्या नैनाने आयुष्यभर ही विद्यादानाची धुरा सांभाळली आणि अनेक विद्यार्थ्यांची आयुष्यं  घडवली.


प्रिन्सिपल सरांकडून नैनाकडे आणि नैनाकडून ह्या १४ मुलांकडे आलेल्या प्रेरणेचा हा प्रवास आपल्याला सिद्धार्थ म्हलोत्रा दिग्दर्शित हिचकी ह्या चित्रपटात पाहायला मिळतो. राणी मुखर्जीचा अप्रतिम अभिनय चित्रपटाचा गाभा प्रेक्षकांच्या मनापर्यंत सहजरित्या पोहचवतो. तसेच उत्तम मांडणी, दिग्दर्शन आणि सहकलाकारांची तोडीसतोड साथ ह्या जमेच्या बाजूंमुळे हा चित्रपट बराच काळ आपल्या मनात गुंजी घालत राहातो. 


एक ध्येयाने भारलेली, हुशार व कर्तुत्ववान शिक्षिका आपल्या दुर्मिळातल्या दुर्मिळ आजाराने खचून न जाता स्वतःचे आणि शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते. तिचा हा प्रवास बघून आपल्या मनात असणारा शिक्षकांबद्दलचा आदर अजून वृध्दिंगत होतो. मुलांना घडवण्याचा ध्यास असलेला एक उत्तम शिक्षक येणाऱ्या पीढ्या, समाज आणि पर्यायाने देशाला घडवत असतो. अशा सर्व शिक्षकांना मन:पूवर्क नमस्कार. 


शिक्षक दिनाचे औचित्य साधून अमेरिकेतील शिक्षक, लेखक व मोटीव्हेशनल स्पीकर असलेल्या Brad Cohen ह्यांच्या आत्मचरित्रावर बेतलेल्या हिचकी ह्या चित्रपटाचा हा आढावा कसा वाटला ते कमेंटमध्ये जरुर कळवा. 



©® धनश्री दाबके

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू