पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अधिकस्य अधिकम् फलम्

*ललित लेख*

*अधिकस्य अधिकम् फलम्!* ....

कधीही कॅलेंडरपाशी गेले की पान उलटून पहाणे सवयीचे होऊन जाते.तितक्याच सहजपणे
मी कॅलेंडर चाळत होते. अन् वाटलं....
आता भाद्रपद महिना संपत आला म्हणजे पुढे नवरात्रच असणार.पण प्रत्यक्षात पाहते तर, नवरात्राच्या ऐवजी अधिकमास असलेला अश्विन महिना दिसला. आणि..
मग अधिक महिन्याबद्दलच माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले.अधिक का बरं असा मध्येच येत असेल?.. बारा ऐवजी तेरावा महिना?..?

याचे कारण चांद्रमासाचे 355 दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी आणि भारतीय सौर वर्ष मात्र 365 दिवसांचे असते. म्हणजे प्रतिवर्षी अगदी गणितानुसार जवळ जवळ अकरा दिवस
चांद्रमासात सौरवर्षापेक्षा कमी असतात. हा अकरा दिवसांचा फरक भरून काढून दोन्ही मध्ये मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर बत्तीस महिने आणि सोळा दिवसांनी एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. चैत्र ते अश्विन या सात महिन्यांपैकी एखादा अधिक महिना असतो. हे खगोलशास्त्रीय गणिताचा व्यवहारात मेळ बसावा, एकवाक्यता यावी म्हणून सोयीस्कर व सोपे केलेले वर्षाचे गणित आहे.
या काळात सूर्याची गतीही मंद असते असे म्हणतात. तफावतीचे अवघड गणित सोपे करण्यासाठी अधिक महिना असा उपयोगी पडतो.
अशी तफावतीशी तडजोड आपण आयुष्यात कितिदा तरी करीत असतो नाही का?
आपल्या आयुष्यात तर नवग्रहांपेक्षाही कोण कोण येत असतं कोणी सुख देते तर कोणी दु:ख! त्या सगळ्यांशी स्वत:ला जोडत समजावत आपण मार्गक्रमण करीत असतो.तडजोडीचा मार्ग काढत कधी अधिक तर कधी उण्याचे जीवनाचे
अंकगणित जमवीत असतो. तसाच हा अधिक महिना नव्हे का?गणिताने जमवलेला!

तसेही जावईबापूंना मात्र अधिक महिन्यात परंपरेने खास मान दिला आहे बरं का!
"जामातो दशामग्रह:" असे गमतीने म्हंटले जाते.
पण खरं तर जावई हा नेहमी लाडकाअसतो.आणि अशा जावयासाठी अधिक महिन्यात वाण देण्याची प्रथा होती आणि अजूनही आहे. जावयाच्या सासुबाई अगदी ही गोष्ट आवडीने करतात. जावयाकरीता पूर्वी अनारसे घरी करून ताटात घालून वाण दिले जाई.अनारशांची संख्या सुध्दा ठरलेली म्हणजे तेहत्तीस!पण तेहत्तीस नाही म्हणायचे.तीस तीन म्हणायचे यात पण बेरजेचे गणित असावे. तीस अधिक तीन तेहत्तीस असे मोजायचे. ऐपतीप्रमाणे ताट चांदीचे की स्टील, पितळी हे गौण आहे. त्यात अनारसे घालून दिप ठेऊन दान करतात.जावयाला दान देणे,अधिकवाण देणे म्हणजे अधिक पुण्य अशी समजूत आहे. म्हणजे बाकी काय कसे कशाचे त्याला महत्त्व नाही. छीद्र असलेला,जाळी पडलेला पदार्थ अनारसे,म्हैसूरपाक किंवा नसेल काही गोड तरी चालते.ते होममेड पाहिजेत असेही नाही. विकत का होईना पण सासूने आनंदाने देणे महत्त्वाचे! शेवटी हे सारे कौतुक जावयाआडून लेकीसाठीच तर नसते का?
जावईबापू खूष तर लेक खूष आणि लेक खूष तर सगळे माहेर खूष नव्हे काय? सगळे जे आनंददायी असेल ते पारंपारिक रितीभातीतून घ्यायला काहीच हरकत नसावी. आता त्यात सक्ती नसतेच मुळी! मनाला आवडले तर करावे की! नाही पटले तर सोडून द्यावे!

असा सगळा अधिकाचा महिमा परंपरेने महत्वाचा असला तरी....

अधिक म्हणजे बेरीज म्हणजे एकावर एक! एकात एक मिसळणे, वाढणे,आता अधिक अधिकचा अतिरेक झाला तर म्हणजेच जर ओव्हरडोस पडला तर मात्र सगळी कामे बिघडतात. एखादी गोष्ट अती झाली, म्हणजेच जरुरीपेक्षा जास्त झाली की बेरजेचेही गणित बिघडते.कारण भरपूरचाही पूर आला तर चांगले ते वाहून जाते.मग समाधान रहात नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होण्याने, नुसतेच बेरजेचे आकडे वाढवण्याने गोष्टी फलद्रूप ठरत नाहीत.अति सर्वत्र वर्जयेत्!

वस्तू किती घ्याव्यात आपल्याला त्याचा उपयोग आहे का?लागलं प्रदर्शन की करा खरेदी...दिसला मॉल की करा शॉपिंग!
कपडे तर अगणित.. मग सेम साडी आपल्या वॉर्डरोब मधे आहे.. हेही विसरायचं?? हे अतीच नाही का होत?

मुलंबाळं लाडाचीच त्यांना तरी का कमी करावं?...
मुलांचे अती लाड केले की त्याची किंमत राहत नाही त्यांना. खेळण्यांनी खोली भरली तरी मुलांना समाधान नसते.
एकदा तर एका सामान्य मध्यमवर्गीय घरात सुद्धा सहावीतील मुलाच्या क्रिकेटच्या दहा-बारा बॅटस् असतात हे मी बघितलं.आश्चर्य वाटलं पण त्याला सचिन व्हायचं असतं ना!..एकदा सचीनने जाहिरात केलेली बॅट घ्यायची. मग दुसऱ्यावेळी धोनीने सही केलेली बॅट घ्यायची.अशा अनेक बॅटस् धूळ खात पडून असतात कारण यावर्षी त्याला फूटबॉल खेळायचा असतो.क्रिकेटवरुन मन उडालं बाळराजांचं!अशा लाडावलेल्या मुलांना मग खेळणी, कपडे,शूज,पुस्तके कशाचीच पर्वा रहात नाही.

अशा वेळी कोणत्याही मौल्यवान गोष्टींचे महत्त्व मुलांना राहत नाही. जास्त मिळालं की त्याची अवज्ञा होते म्हणतात ना? ते आठवते...

"अती परिचयात् अवज्ञा
संतत गमनात् अनादरो भवती ll
मलये भिल्लपुरंध्री
चंदन तरुकाष्ठमिंधनम् कुरुते ll"

म्हणजे मलय पर्वतावरील भिल्ल सुंदरीला पर्वतावरच्या चंदनाचे अप्रूप कसे काय वाटणार? म्हणून अतिपरिचयामुळे चंदनाची सुध्दा अवज्ञा होते.कारण चंदन रोजच उपलब्ध असते तिला! ती चुलीत पण सरपण म्हणून बिनधास्त चंदनाचा वापर करते.
म्हणून जरुरीपेक्षा खूप जास्त अधिकाधिक मिळत राहिले तर वस्तूंचे मोल वाटेनासे होते.

लग्नसमारंभात नुसता भरमसाठ पैशाचा अपव्यय दिसतो. श्रीमंती दाखवण्याची नुसती चढाओढ लागलेली असते.
हे पण अतिरेक आवरायला हवेत आता!
आता लग्नात,इतर समारंभात होणारी अन्नाची अथवा पैशांची नासाडी या देशात आता तरी परवडणार नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसा करोना पसरलाय अगांतुकपणे!
पण त्याच कारोनाने सर्व बाबतीत आपल्याला अतीरेकातून वठणीवर आणायचं ठरवलंय!
फास्ट फूड,स्ट्रीट फूड,मौज मजा सगळ्याच्या बेभानपणाचा अतिरेकच आपण केला होता असे म्हणावे लागते. चौरस आहाराकडे,तसेच
स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.पण आता थोडी प्रत्येकामध्ये नवी जाणीव झाली आहे.माणूस जागा झाला आहे. पौष्टिक,घरचे, आणि गरमच खायचे आहे. हे आरोग्यासाठी माणूस स्वत:ला समजावून देऊ लागला आहे... हेही नसे थोडके!

नुकतीच अधिकमासातील एका साहित्यिक उपक्रमाची माहिती ऐकली. त्याचा संदर्भ मला येथे नमूद करावासा वाटत आहे.....

जावयाच्या त्या तीस तीन च्या वाणाच्या प्रथेचा धागा पकडून, त्याला आधुनिक स्वरुप देणारा रत्नागिरी आर्ट सर्कलचा एक उपक्रम कानावर आला. त्याचे नाव आहे..
*तीस-तीन वाचन वसा!*
रसिकांना दर्जेदार पुस्तकाच्या वाचनाचे वाण या निमित्ताने आर्ट सर्कलद्वारे देण्यात येत आहे.
नव्याने प्रकाशित झालेली नव्या लेखकांची तीस पुस्तके आणि तीन बालसाहित्यातील पुस्तके अशा एकूण तेहत्तीस पुस्तकांच्या काही भागांचे अभिवाचन पूर्ण महिनाभर ठराविक वेळी ऑनलाईन करण्यात येणार आहे.किती छान ना? अधिकाची अभिनव कल्पना !
पुस्तक वाचनाचा आळस असलेल्या लोकांनी निवडक साहित्याच्या अभिवाचनाच्या श्रवणभक्तीचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?
नुसत्या अभिवाचनाच्या श्रवणाने अपार आनंद मिळत असेल तर हे वाण अवश्य स्विकारावे.कारण हेच खरे सकारात्मक वाण नाही का?
या उपक्रमात मला अधिकाची सकारात्मक जाणीव दिसते आहे.

प्रत्येकामध्ये अशी जाणीव जितकी वाढत जाईल तितके चांगलेच रिझल्टस् मिळतील नाही का?
अधिक ऐश्वर्य, आधुनिकतेचा देखावा यापेक्षा...

सकारात्मक अधिक्य नक्कीच श्रेयस्कर असते.
अधिक मन लावून काम केले तर अधिक उत्तम ध्येय प्राप्ती होते.अधिक कष्ट केले तर अधिक फळ मिळते. उत्तम कार्य केले तर त्याची अधिक चांगली फळे चाखायला मिळतील.अधिक चांगले पेराल तर अधिक चांगले उगवेल!
अशा अर्थानेच म्हटले जाते की...
*"अधिकस्य अधिकम् फलम्!"* तेच यथार्थ नव्हे काय??

लेखिका..
शांता लागू..पणजी गोवा.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू