पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अंदमान यात्रा वृत्तांत

अंदमान यात्रा वृत्तांत
================

मनाला भुरळ घालणा-या "अंदमान " च्या निसर्ग सौंदर्याबद्दल, तिथल्या निळ्याशार समुद्राबद्दल जस बरच काही वाचलेल होतं तसच बरच काही ऐकलेल सुध्दा होतं आणि याच " अंदमान " बेटांचा वापर इंग्रजांकडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणा-या स्वातंत्र्यवीरांना दिल्या जाणा-या काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी एक छळ छावणी म्हणून केला जात होता ही माहिती सुध्दा अगदी शाळेत शिकत होतो तेंव्हापासूनच होती.
" ने मजसी ने, परत मात्रुभूमीला,
सागरा प्राण तळमळला....!"
अशी दिलेली आर्त हाक, अथांग अशा पसरलेल्या निळ्याशार सागराकडे व्यक्त केलेली तळमळ दाखविणारी कविता ही शाळेत असतांना जशी शिकवली जायची तसेच " जयोस्तुते " हे स्वतंत्रता देवीचे स्तोत्र देखील शिकवले जात होते. इतकेच नाही तर मी माध्यमिक शाळेत शिकत असतांना " माझी जन्मठेप " हे स्वातंत्र्यवीरांचे आत्मचरित्र सुध्दा माझ्या आजीने माझ्याकडून वाचून घेतले होते आणि म्हणूनच एकदा अंदमानला फिरायला जाऊत असं आमचं कधीपासून चाललं होतं, पण त्याला मुहूर्त मात्र काही सापडत नव्हता आणि " अंदमान येथे मंडळाचे आगामी म्हणजे ७० वे वार्षिक अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली तर आपण उपस्थित राहणार का ?" अशी प्रतिसाद चाचपणी मा. प्रमुख कार्यवाह, बृह्नमहाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांचेकडून केली गेली तेंव्हा मात्र माझ्या मनात खूप दिवसांपासून असलेल्या "या" अंदमानला जाण्याच्या विचाराने प्रचंड उचल खाल्ली आणि क्षणाचाही विलंब न लावता मी आमचा होकार कळवला.

काही दिवसातच रीतसर फॉर्म भरुन आणि अधिवेशन शुल्क म्हणून एका ठराविक रकमेचा चेक मंडळाकडे जमा करण्याची सूचना केली गेली व त्याप्रमाणे आमची नाव नोंदणी झाली. ६, ७, ८ व ९ जानेवारी, २०२० हे चार दिवस अंदमान दर्शन यात्रा व १० जानेवारी, २०२० ला अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारण सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

दरम्यानच्या काळात आवश्यक त्या सूचना मंडळाकडून दिल्या जात होत्याच, पैकी मंडळाच्या एका सूचनेनुसार अंदमानची एक चित्र असलेली बँग, कँप, प्रतिनिधी बँच, लगेज बँग टँग आणि "माझं अंदमान" हे मराठी भाषेतील एक पुस्तक इत्यादि वस्तू हातात पडल्या, तेंव्हाच हे अधिवेशन 'एक ऐतिहासिक' अधिवेशन ठरणार याची मनोमन खात्री पटली.

चार दिवस अंदमान यात्रा, पाचव्या दिवशी अधिवेशन व सहाव्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात असा आमचा हा अंदमानचा कार्यक्रम ex-पोर्ट ब्लेअर असा ठरलेला होता त्यामुळे सर्वांना पोर्ट ब्लेअर पर्यंत पोहोचणे व पोर्ट ब्लेअर पासून घरी परतण्याची आपापली व्यवस्था करावी लागणार होती.

आमच्या कार्यक्रमानुसार आम्ही दिनांक ६ जानेवारी, २०२० रोजी सकाळी ७ वाजता " स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ, पोर्ट ब्लेअर येथे उतरलो तेंव्हा कँप्टन निलेश यांच्या टीमने आमचे स्वागत करुन एका स्पेशल कारने आम्हाला आमच्या हॉटेलवर नेऊन सोडले.नाश्ता, चहा पाणी वगैरे झाल्यावर दुपारी जेवणानंतर सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी जायचे आहे असे सांगितले गेले म्हणून थोडा आराम केला व नंतर सगळी तयारी करुन ठरलेल्या वेळी जेवायला खाली उतरलो. जेवण झाल्यानंतर सर्वजण एका बसने जेलसाठी रवाना झालो. जातांना रस्त्यात थांबून हार-फुले घेतली व सर्वात आधी जेलसमोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जेलमध्ये प्रवेश केला.

जेल कसला देशभक्तीने भारलेल्या सावरकर प्रेमींसाठी तर ते एक पवित्र असे मंदिरच होते म्हणून प्रवेशद्वार ओलांडून जातांना हात जोडून मनोभावे वंदन केले, नमस्कार केला व आतमध्ये प्रवेश घेतला. जेलचा अर्ध्याहून जास्त भाग आज पडून गेला असला तरी जो काय भाग उरला आहे, उभा आहे तो सुध्दा अतिशय भव्य आणि विस्तीर्ण आहे.

जेलची रचना बघून तर इंग्रजांचे विचारही किती क्रूर होते याची जाणीव झाली. दोन भाऊ एकाच जेलमध्ये असूनही त्याची कल्पना दोघांनाही दोन वर्षे नसावी यातच जेलची निर्मिती करतांना वापरलेली " क्रूर कल्पकता " लक्षात आली आणि ब्रिटीश शासकांबद्दल मनात असलेल्या तिरस्कारात अजून काही अंशी भर पडली.

इंग्रजांच्या कृरतेचा अजून एक नमुना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या कोठडीत ठेवलेले होते तिच्या अगदी बरोबर खालीच फाशी घर बांधलेले होते, ज्याला जहूबाजूने भींती तर होत्या पण वरुन छत नव्हते, जेणे करुन एखाद्या कैद्याला फाशी देत असतांना होणा-या यातना सावरकरांबरोबरच इतर कैद्यांना दिसाव्यात व त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण व्हावे अशी ही रचना केलेली दिसून आली.

फिरत फिरत एका विंगच्या दुस-या मजल्यावर सगळ्यात शेवटी, दोन दोन लोखंडी दरवाजे असलेल्या एका कोठडीसमोर येऊन पोहोचलो आणि कोठडीवर बाहेरच्या बाजूने असलेली पाटी वाचली, " सावरकर कोठडी " अन् सर्वांगावरुन सरसरुन काटा उभा राहिला. जर आजही इथे ही परिस्थिती आहे तर सावरकर शिक्षा भोगत असतील त्यावेळी काय परिस्थिती असेल ? असा विचार मनात येऊन गेला. तशाच अवस्थेत कोठडीचे दर्शन घेतले, सावरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या त्या भूमीला हात टेकवून नमस्कार केला व खिन्न मनाने बाहेर पडलो.

कोठडी बाहेर मार्गिकेमध्ये गृपचे सर्व सदस्य दोन्ही बाजूला एका रांगेत उभे राहिलो व सावरकरांच्या " जयोस्तुते " या स्वतंत्रता स्तोत्राचे सामुहिक गायन करुन सावरकरांना अभिवादन केल्यानंतर तशाच जड मनाने तिथून निघालो कारण जेलला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी वाढतच चालली होती.

जेलच्या टेरेसवर जाऊन मागे असलेल्या निळ्याशार समुद्राकडे पाहिले तेंव्हा मनात विचार आला की, " कृरकर्मा जेलर ब्लेअरने दिलेल्या यातना सहन करत करत मरण पत्करलेल्या किती क्रांतीकारकांचे मृतदेह या समुद्रात सामावलेले असतील नाही ?"

आता संध्याकाळ होऊ लागली होती व रात्री होणा-या " ध्वनी - प्रकाश " कार्यक्रमासाठी सर्वांना जेलबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या जाऊ लागल्या म्हणून आम्ही बाहेर पडलो व तिथे चहाचा आस्वाद घेतला.

चहापाना नंतर पुन्हा एकदा " ध्वनी - प्रकाश " कार्यक्रमासाठी जेलमध्ये प्रवेश केला व आपल्या निर्धारित आसानावर बसून हा मन पिळवटून टाकणारा, अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडून दिल्या गेलेल्या यातनांची एक झलक दाखवणारा व ऐकवणारा हा कार्यक्रम पाहून तर मन एकदम सुन्न झाले. काही वेळानंतर कार्यक्रम संपल्यामुळे तिथून निघालो आणि बसने हॉटेलमध्ये पोहोचलो.

पुढील तीन दिवसात आम्ही कधी क्रुझने तर कधी बोटीने प्रवास करत हँवलॉक बेटावरील राधानगर हे सुंदर समुद्र किनारा असलेले बीच पाहिले. बाराटांग बेटावर जातांना 'जारावा' आदिवासींंच्या राखीव जंगलातून प्रवास केला व रस्त्याच्या बाजूला उभे असलेले 'जारावा' आदिवासी देखील पाहिले, बाराटांग जेट्टीवरुन स्पीड बोटीने प्रवास करत खाडीवर असलेले मँनग्रोव्हज जंगल बघत बघत तिथे असलेल्या चुनखडीच्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुफा पाहिल्या. नॉर्थ बे आयलंड येथे समुद्र स्नान, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतला व व्हायपर आयलंडला भेट देऊन तिथले फाशीघर देखील पाहून आलो.

अंदमानला आम्ही केलेल्या प्रवासा दरम्यान नजरेत भरेल अशी एक गोष्ट म्हणजे कुठेही प्लास्टिक कागद किंवा प्लास्टिक बाटल्या पडलेल्या आहेत असे दिसून आले नाही, शिवाय इथे फक्त दोन लिटर पाण्याची बाटलीच मिळते त्यापेक्षा लहान आकाराच्या बाटल्यांवर सरकारने बंदी घातली आहे असे आम्हाला सांगितले गेले, अर्थातच त्यामुळे बाटल्यांचा संखेवर सुध्दा नियंत्रण ठेवणे सोपे झाले.

आणि आता आला आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला असा दिवस आणि तो म्हणजे अधिवेशनाचा दिवस. यासाठी सर्वजण पारंपरिक भारतीय पोषाखात हजर राहिलो. सर्व महिलांनी भगव्या/केशरी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या तर पुरुष मंडळी शर्ट-पायजामा अशा वेषात जेल बाहेर असलेल्या स्वा.सावरकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमा झालो होतो. स्वा.सावरकरांच्या पुतळ्याला मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले व जोशपूर्ण घोषणाबाजी करत आमची " स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन पदयात्रा " सुरु झाली. ही पदयात्रा जेलपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ. आंबेडकर सभागृहापर्यंत गेली व त्यानंतर घोषणाबाजी करतच सभागृहात दाखल झाली.

मंडळाचे सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, अंदमान महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि कँप्टन निलेश गायकवाड आदि मंडळी व्यासपीठावर उपस्थित झाल्यानंतर दीपप्रज्वलन आणि "वंदे मातरम् " च्या सामुहिक गायनाने अधिवेशनास सुरुवात झाली.उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले व अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करणा-या मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांचा या वेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अंदमान मंडळाचे अध्यक्ष श्री पाटील तसेच काही क्रांतीकारकांचे वारसदार, जे आजही अंदमानातच स्थायिक आहेत यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे मनोगत देखील ऐकायला मिळाले.
आपल्या मनोगतात त्या पैकी एकाने सांगितले की, अंदमान म्हणजे एक ' मिनी भारतच ' आहे कारण इथे सगळ्याच राज्यांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, हिंदी हीच इथली भाषा आहे व इथे आंतरप्रांतीय विवाह हे सर्रासपणे होतात त्यामुळे आमच्याकडे जातीयवाद, प्रांतवाद हे विषय कधीही नसतात, उलट दिसून येते ते फक्त देशप्रेम व स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असलेली निस्सीम भक्ती...!
या अधिवेशन उदघाटन सत्रानंतर भोजन अवकाश ठेवला होता. अतिशय साधे पण गरम गरम जेवण, गरम पुरी,पनीर-स्वीट कॉर्न भाजी तर अफलातून कॉम्बिनेशन होते आणि खीर सुध्दा मनाला व पोटाला पूर्ण समाधान देणारी अशीच होती.
भोजन अवकाशानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. विषय पत्रिकेनुसार एक एक विषय प्रमुख कार्यवाह मांडत गेले व उपस्थित सभासदांनी त्यास मंजुरी दिली.काही ठिकाणी सभासदांनी काही स्पष्टीकरण मागितले, सूचना केल्या व दुरुस्त्या सुचविल्या व पदाधिका-यांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर, सूचना स्वीकारल्या गेल्यानंतर व दुरुस्त्या करण्याची हमी दिल्यानंतर संबंधित विषय मंजूर करण्यात आले. एकंदरीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व्यवस्थित पार पडली व चहापाणी अवकाश घेण्यात आला.
चहापानानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार दर्शविणारा " महाकवी सावरकर " नावाचा सावरकरांच्या कविता आणि गीतांचा भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आला. सावरकरांनी लावणी तसेच शायरी लिहिली आहे हे हा कार्यक्रम ऐकूनच आम्हाला कळाले. धनश्री लेले यांच्या ओघवत्या निवेदनात सादर झालेल्या या कर्णमधुर संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकून घेतली होती.
कार्यक्रमाची सांगता झाल्यावर कँप्टन निलेश यांच्या शिस्तबध्द नियोजनाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला व त्यांच्या त्या शिस्तीनुसारच सावरकरांच्या कविता उराशी कवटाळत आम्ही बसने आमच्या हॉटेलमध्ये परतलो.
अंदमानच्या या आणि अशाच अविस्मरणीय आठवणी मनात जपतच आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
असे हे " स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन अधिवेशन " अंदमान आणि सावरकर यांच्या आठवणींमुळे कायमचे स्मरणात राहील हे मात्र नक्की... !

" वंदे मातरम् "

दिवाकर मधुकर चौकेकर,
आजीवन सभासद क्रमांक : ४४२६,
गांधीनगर ( गुजरात )
मोबाईल क्रमांक : ९७२३७ १७०४७.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू