पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पळसाचे निखारे

पळसाचे निखारे

तो भर उन्हात, झपाटल्यासारखा त्या वनराईतून जात होता. ती आता हे गाव सोडून जाणार, हे कळल्यावर मन कसं सैरभैर झालेलं. काही सुचलं नाही, की या वनराईत येऊन बसल्यावर त्याला नेहेमीच शांत वाटायचे, पण आज! आज तर कशामुळे तो अशांत आहे, हे सुद्धा कळत नाहीये.
तशी ती वर्षभरापुर्वीच गावात आली होती. हळू हळू बहरत गेलेली मैत्रीच फक्त, मनात दुसरा काही विचार आलाच नाही. आत्ताही नाहीच, पण मग या मनाची तगमग? तो थांबला, मनात पुन्हा एकदा तिचा विचार आणला आणि स्वत:ला चाचपडून पाहू लागला. तेवढ्यात, त्या झाड़ानी सुरेख शेंदरी रंगाने त्याला आपला कौल दिला. भडक केशरी रंगाची पळसाची फुले अचूक नेम धरुन त्याच्या उघड्या ओंजळीत येऊन पडली. एकट्यात, तो चक्क लाजला, झाड़ाकड़े पाहिले, आणि वाटून गेले, कि आपल्या प्रत्येक बहरलेल्या फुलाच्या रंगाने, ते पळसाचे झाड, त्याला साथ देत आहे.
संध्याकाळची तीच शेंदरी वेळ निवडली त्याने. टोपली भर पळसाची टवटवीत केशरी फुले हातात घेतली. तिच्या घरी परतण्याची वेळ साधली. ती समोर दिसताच ह्र्दयाचे ठोके ऎकू येत होते. पण पुन्हा झाड़ाला आठवून मनाला धीर दिला आणि ती फुले तिच्या समोर ठेवली.
तिच्या प्रश्नार्थक दृष्टीला, याच्या अधीर मनाने आणि आमंत्रक भावांने सार्थक असे उत्तर दिले. क्षणार्धात सगळे कळून चुकल्यावर, हवे ते मिळाल्याचा लाजरा आनंद तिच्या मोहरलेल्या मुखाकृतीत दिसून आला, फुलांचा रंग जणू तिच्या गालाच्या रंगाला एकाकार झाला होता.
तिचा नि:शब्द होकार कळल्यावर आनंदाने भारावून याने झाडाच्या आठवणीने डोळे मिटले. तिने त्याच क्षणी ती सगळी फुले त्याच्यावर उधळून दिली. पळसाचे निखारे, त्यांच्या भावी जीवनाला प्रेमाची साथ देण्यासाठी धगधगत होते.


अंतरा करवड़े
इंदौर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू