पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी लाडकी छकुली

घरकुल खेळता खेळता, घर सजवायला लागली,

                       माझी लाडकी सासरी निघाली।


तिच्या मऊ मऊ गालांचे स्पर्श, बोटांना अजूनही जाणवतात

    माझी शीळ ऐकून तिच्या हसण्याचे स्वर,

वाऱ्यावर मला ऐकू येतात

    आणि ती म्हणते " मी मोठी झाली"

                        माझी लाडकी सासरी निघाली ।


रोज एकच खेळ, मी लपायचे

    आणि तिने पटकन शोधून काढायचे,

आणि ती समोर दिसत असून ही,

    मी 'कुठं गेली, कुठं गेली' म्हणत रहायचे,

मला धप्पीस देऊन चालली

                      माझी लाडकी सासरी निघाली।


शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह

    आणि परत आल्यावर, न जाण्याचा प्रण,

कारण - बाईंना काही येत नाही,

    ती म्हणते 'काऊ' म्हणजे 'गाय' म्हण

काऊ-चिऊ च्या विश्वातून ती अत्ताच बाहेर आली

                        माझी लाडकी सासरी निघाली।


दुडू - दुडू पावलांनी चालत,

    हातात पाण्याचा पेला भरून,

मला पाणी देण्याच्या प्रयत्नात,

    हात-पाय, फ्रॉक स्वतः चे भिजवून

उरलेली दोन घोट अमृताची केली 

                          माझी लाडकी सासरी निघाली।


बे-एकं-बे ते एम.बी.ए.

    वेळ कसा सरला ते कळलं नाही,

जग बदललं, तू मोठी झाली,

    पण मला कसं कळलं नाही

माझ्या मनी तू अजून आहे बनूनि 'छकुली'

                            माझी लाडकी सासरी निघाली।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू