पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शांतता आणि शांती

*ललित लेख*

*शांतता आणि शांती*

21 सप्टेंबरला नुकताच शांतता दिन पार पडला. पार पडला म्हणजे फार कुठे काही साजरा झाला नाही. "होऊन गेला" असं म्हणू हवं तर!आता ते म्हटलं ...
..आणि माझ्या डोळ्यासमोर "सायलेन्स प्लीज"चा बोर्ड एकसारखा झळकू लागला ऐकू लागला असे बोर्ड अनेक ठिकाणी असतात म्हणजे तेथे शांतता राखणे अभिप्रेत असते. उदाहरणार्थ.. प्रामुख्याने सायलेन्स झोन म्हणजेच.. हॉस्पिटल्स, छोटी क्लिनिक्स तर आहेतच पण देवळे, चर्च,गुरुद्वारा, प्रार्थनास्थळे,म्युझियम्स इत्यादी सुद्धा शांतता राखण्याची ठिकाणे असतात.

देवळांमध्ये देवाजवळ शांततेने जायचे असते.देवासमोर ध्यान लावून बसायचे असते. तिथे "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" म्हंटले तरी वाचाळपणा अपेक्षित नसतोच मुळी!

तसेच कोर्ट! कोर्टामध्ये शांततेची गरज असते. बाहेरच्या बाजूला तसेच आत खटला चालू असलेल्या ठिकाणी पण बाकी कोणीही आवाज करायचा नसतो. दोन वकील आणि साक्षीदार यांनी कोर्टाने आज्ञा दिल्यावरच बोलणे अभिप्रेत असते.

डॉक्टरांच्या दवाखान्यात "सायलेन्स प्लीज"असे लिहिलेले सिस्टरचे चित्र, तोंडावर बोट ठेवून, आपल्याला शांतता राखायला सांगत असते.

रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी पाट्या असतात. "नो हॉर्न झोन" सुद्धा असतो. अशा ठिकाणांच्या आसपास गोंधळ, गडबड, गोंगाट अभिप्रेत नाही. गंमत म्हणजे कधीकधी ट्रकसारख्या वाहनाच्या मागे
'नो हॉर्न' असे लिहिलेले दिसते. तेव्हा हा विनोद नाही ना?असे वाटत रहाते. कारण तेच वाहन स्वतः असह्य आवाज करीत आणि धूर सोडीत जात असते.
तरुण मुले, कॉलेज कुमार बिनासायलेन्सर स्कुटी, मोटरसायकली दामटत जातात. तेंव्हा रस्त्यावरची माणसे दचकून, घाबरुन साईडला उभी रहातात.

प्रेक्षागृह, नाट्यगृह, सिनेमागृह यात शांतता अभिप्रेत असतेच. पण प्रेक्षक किती मुर्दाडपणे तोंड आणि मोबाईल चालवत राहतात. शेवटी गंभीर नाटकाच्या वेळी कलाकार ..आधी कळकळीची विनंती करतो.तरीही त्रास थांबला नाहीतर चिडतो.विचारतो..."आम्ही प्रयोग थांबवू का?" यावर त्या नटालाच आम्ही उद्धट म्हणतो.त्यात दोष कुणाचा?
नटाचा की...आपला? ही वेळच का येऊ द्यायची?तिथे शांतता महत्वाचीच.नाही का?
माणसांनी घरात, घराबाहेर रस्त्यावरती,नळावर, सार्वजनिक ठिकाणी भांडण केले नाही असे कधी घडले आहे काय? असे घडत नाही कारण देवाने मानवाला नुसते खायला तोंड दिले नाही.व्यक्त होण्यासाठी वाणी दिली.माणसाच्या
मनाची
मूळ प्रवृत्तीच चंचल, आणि अशांत! शांत रहाणे म्हणजे सजाच की!

लहानपणी शाळेच्या वर्गात गोंगाट वाढला की बाई पुढची दहा मिनिटे... हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसायला सांगतात.मग स्वत: पण तसेच बसून दाखवावे लागते बाईंना!
बाईंना तशाच अवस्थेत ठेऊन मुले लगेचच चुळबुळ करु लागतात आधी गालातल्या गालात खुदुखुदु आणि मग हळूहळू फिशीफिशी ..खदाखदा करीत खळखळाट आणि मग गोंगाटच सुरु!..बाई ध्यानस्थच!

शांत राहणे हे लहानपणी जितके अवघड असते तितके किंवा त्यापेक्षाही मोठेपणी जास्त अवघड अवघड असते. बोलायचे नाही असे जर सांगितले तर ते शक्य होईल काय?

समजा मौनव्रत धारण केले तरी माणूस गप्प बसू शकत नाही. निदान अगदी समजा देवाची पोथी वाचत असेल तर काहीतरी खाणाखुणा करून डोळे वटारून,
रागावून येन केन प्रकारेण तो आपले मौनातही जिभेवर आलेले, शब्द पोटात लोटत सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करेल.निदान शेजारचे पळी भांडे तरी वाजवून स्वत:ची दखल घ्यायला लावेल. सिनियर सिटीझन्स नेहमी असे वागत असतात.

एक आजी तर आपल्या देवघरातल्या पाटाशेजारी छोटे पॅड आणि पेन घेऊनच पोथी वाचायला बसतात.कारण संसारातून मन काही निघत नाही.मग या अशा मौनव्रताचा काय उपयोग?.
.
बोलता येत नसेल तरी प्राणी पक्षीसुध्दा विशिष्ठ वेळी काहीना काही आवाज काढून.. आपले म्हणणे दुसऱ्यासमोर मांडतात.एकंदर काय खरी शांतता मिळणे या जगात तसे अवघडच काम आहे. सामान्य माणसे काय करू शकतात तर आपल्या घरात शांती ठेवू शकतात. घरात शांती असणे म्हणजे मने जुळलेली असणे. कुटुंबाला सुखी ठेवायचे असेल तर घरात शांती नांदावी. त्यासाठी सगळ्यांना जे आहे त्यात समाधानी राहता आलं पाहिजे.पण तेच जमत नाही माणूस पैशासाठी स्वतःची इतकी दमछाक करून घेतो की शांती त्यांच्यापासून कैक कोस लांब गेलेली असते.

माणसाला झोप लागते तेव्हा तो शांत वाटतो.पण ती झाली शारीरिक विश्रांती! पण.…. देह जरी शांत वाटला तरी त्यामध्ये एक मन असते ते अस्वस्थच असेल तर मग जागे झाल्यावर त्याच्यातला जमदग्नी जागा होत असेल,इतरांची शांती भंग करीत असेल तर तेथे शांती वाऱ्यालाही उभी रहाणार नाही.
वरकरणी शांतते पेक्षा शांती आतून आली पाहिजे कारण शांतीचे निवासस्थान म्हणजे आपले मन तिथे शांतीचा वास असला पाहिजे तरच माणूस शांत राहू शकतो.

मनःशांती श्रेष्ठ हे योगी मंडळींनी सांगितले. संतांनी सांगितले. आणि मानसशास्त्रज्ञांनी सुध्दा सांगितले आहे.

मनःशांती ही सीमेवरच्या शांतते प्रमाणे शांतता करार करून मिळेल का?

ज्ञानेश्वर महाराजांनी खरंतर विश्वशांतीचा संदेश दिला सगळ्या विश्वाला सुख लाभू दे अशी त्यांनी प्रार्थना केली पण संत ज्ञानेश्वरांना अपेक्षित होती ती खरी शांती जगाला फारशी मिळालीच नाही.
शांती ही आत्मिक शांती म्हणजे देहात असूनही मनाला शांत वाटले पाहिजे. म्हणजे देहाच्या कोणत्याही अवस्थेत समाधानी असणे संतांनी फार महत्त्वाचे म्हणून सांगितले आहे.संत तुकाराम महाराज म्हणतात...
*शांतीची वसती तेथे खुंटे काळगती!*
म्हणजे शांती असेल तेथे काळही खुंटतो,नतमस्तक होतो.
दया क्षमा शांती तेथे देवाची वसती!हे खरेच आहे.म्हणून अध्यात्मिक शांतीच श्रेयस्कर हे संतवचन!!


आयुष्यात शांती पैशाने विकत घेता येत नाही.आजूबाजूचा विचारांचा गोंगाट थांबला पाहिजे.भोवतालच्या गोंगाटापासून दूर जावेसे वाटते.तेंव्हा तो माणूस बाहेर शांती च्या शोधात निघतो. त्याला अगदी हिमालयात निघून जावेसे वाटते पण शांती स्वतःच्या जवळ असताना हिमालयात जाण्याची गरजच काय?..?
पण कधी कशी गंमत होते. पहा. कधीतरी त्याला उलटे वाटू शकते. समजा रोजचा रहदारीच्या रस्त्यातला,घरातला गोंगाट थांबला. सुखात असूनही त्याला अस्वस्थ वाटू लागते.म्हणजे शांतता त्याला बोचू लागते.ती तो उपभोगू शकत नाही. शांतता खायला उठते म्हणतात, तसे झाले तर?....
त्याचे यथार्थ वर्णन कवी गुरु ठाकूर यांनी केले आहे. कवितेचे शिर्षक आहे...*सोसवेना शांतता*

"*गोठला अंधार झाले मन
भितीचा काजवा
सोसवेना शांतता कल्लोळ थोडा वाढवा*"

तर याउलट कधीकधी निशब्द शांतता.. आपल्याशी बोलू लागते.. आणि ती शांतता आपण आनंदाने ऐकू,अनुभवू शकतो.तिथे शब्देविण संवाद ऐकू येतो.जो परमशांतीची अनुभूती देतो.ही शांती तोच ऐकू शकतो ज्याचे मन आणि आत्मा शांत असतात.तिथे शांतीच्या शोधाची खटपट थांबते असे म्हणता येईल.

लेखिका..
शांता लागू.. पणजी गोवा.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू