पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाबूमामा

     बाबूमामा

 

     मुरलीधर देवर्डेकर.

 

     मला एकूण सहा जण मामा आणि दोन मावशा. मी सर्वात मोठा असल्याने माझे सर्वजण लाड करायचे.माझं आजोळ कोल्हापूरला.रविवार पेठेत भुईगल्लीला मामांच घर.आजोळ कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मामाचे घर.

      आमच्याच गावात मामांची थोडी शेती होती. गावात त्यांच्या मावशीचं पण घरं होतं. मोठे चौघे  आपापल्या व्यापात असल्यामुळे त्यांचं येणं व्हायचं नाही.मग बाबूमामा (नाना)किंवा जेन्यामामा (तात्या)यांचे वरचेवर येणे-जाणे असायचे.गावी आले तर  मावशीच्या घरी उतरत.त्यांच्या घरी राहत.

    बाबूमामा आले की मग आमची शाळेला दांडी. दोन दिवस त्यांच्या बरोबर राहायचं. त्यांची पाठ सोडायची नाही. त्यांच्याबरोबर सगळीकडे फिरायचं. गावातली माणसं पण कौतुकानं बघायची. आमचा कोण वर्गमित्र भेटला तर विचारायचे," कोण रे हे?"

    " माझे मामा आहेत."

    " म्हणून शाळेला दांडी मारलीस होय?"

   मग मामांच्या बरोबर फीरायचं. कधी नदीच्या काठाला, कधीकधी गैबीला, कधी डोंगराकडे तर कधी जांभूळ काट्यात. दोन दिवस कसे सरायचे समजायचं नाही. मग मी घरी गेलो की आक्का(आई) विचारायची, 

     "कुठे होतास रे?शाळेला गेला नाहीस?"

     " अगं बाबूमामा आलाय."

      मग तिच्या डोळ्यात पाणी तरळायचं.आपली भावंडे आपल्या गावात येतात पण आपल्या घरी येऊ शकत नाहीत,भेटू शकत नाहीत याचं तिला खूप वाईट वाटायचं. कधीतरी गावात भेट झाली तर दोघं मनसोक्त बोलून घ्यायची.

   मामा मग नवीन नवीन गोष्टी सांगायचे.नविन चित्रपट बघितला असेल तर त्याची स्टोरी सांगायचे. कधी मोटार मामाने बसून पन्हाळ्याला गेलो होतो त्याची कथा सांगायचे. मला त्यावेळी सजीव-निर्जीव गोष्टीत मामा असा संबोध करायची सवय होती .उदाहरणात हत्ती मामा, उंट मामा, मोटार मामा, रेल्वे मामा.

    दोन दिवस भरकन जायचे. मग मामा ना एसटीच्या स्टॉप पर्यंत सोडवायला जायचं. हा स्टॉप गांवापासून दोन किलोमीटर अंतरावर होता.

    तो शुक्रवार होता.मामा कोल्हापूरला चालले होते.मी त्यांच्याबरोबर बस स्टॉप वर गेलो होतो.त्यावेळी बसगाड्यांची रेलचेल नव्हती.तासाला  एखादी गाडी यायची. थांब्यावर पिक अपशेड होते. तिथे मी गप्पा मारत बसलो होतो. वेळ झाला होता. मामांना म्हटलं मी," येतो आता."

      बस थांब्यापासून मुख्य रस्ता गावात गेला होता. अर्धा किलोमीटर अंतरावर एक रुईचं झाड होते. विचार केला. उद्या शनिवार आहे. रुईची पानं काढून उद्या मारुतीला हार करायचा.मग  पानं काढली प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली आणि  मार्गस्थ झालो. पण एक लक्षात आलं की मघापासून एक ही बस कोल्हापूरला गेलेली दिसली नाही. वेळ होता खूप. घरात जाऊन तरी काय करायचे असा विचार करून परत बस थांब्यावर गेलो. पिकअप शेडमध्ये मामा गाडीची वाट पाहत उभे होते.

     मी परत आल्याचे पाहताच त्यांनी डोळ्याला रुमाल लावला आणि हमसून हमसून रडू लागले. मी फार गंभीर झालो. मामाना पण आपल्या या अवस्थेबद्दल वाईट वाटत असावं. बराच वेळ त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.

    काही क्षणात बस येताना दिसली.मामानी माझ्या केसातून हात फिरवला. तोंडातून शब्द फुटत नव्हते.तसेच बोलले 

       " येतो.परत लवकर येतो."

    क्षणार्धात गाडी मार्गस्थ झाली. मी गाडीकडे पहात उभा होतो. गाडी नजरेआड होईपर्यंत.

     आज मामानी  सत्तरी पार केलीय. कानानी आपलं काम सोडलंय पण मामा अजून आहे तसेच आहेत.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू