पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सैलानी

सैलानी....

.

नांदेड जिल्ह्यातील ते छोटसं गाव , जेमतेम शे-पाचशे घराची वस्ती. गावाच्या मधोमध सुधाकर पाटलांचा वाडा मोठ्या डौलाने उभा होता. सुधाकर पाटील म्हणजे मोठी आसामी, गावचे पोलीस पाटील, शेती-वाडी भरपुर ,दोन मुले, सुना व नातवंडांनी भरलेला परीवार. घरात सुबत्ता, संपन्नता व अधिकाराचे पद असले तरी त्याचा गर्व म्हणून नाही. सर्वांना नेहमी मदतीसाठी तयार असलेले, व मनमिळाऊ सुधाकरराव व तेवढीच प्रेमळ साधीसुधी व सुस्वभावी त्यांची पत्नी लिलाबाई .  ऊभयतांच्या ह्या स्वभावामुळे गावात सर्वांना त्यांच्या विषयी नेहमीच आदर वाटायचा. त्यातही दोन्ही मुलं हे निर्व्यसनी , कष्टाळु , आज्ञाधारक व सुनासुध्दा तशाच त्यामुळे संपुर्ण गावसाठी हा परीवार आदर्श होता. हनुमान मंदीराच्या शेजारीच जनु राजा दशरथाचा राजवाडा येथे वसला की काय असे वाटायचे गावाला.

लिलाबाई व सुधाकररावांचा संसार छान बहरला होता,कशाचीच कमतरता नव्हती. धान्य, पैसा अडका, दागदागिने, काही म्हणता काहीच कमी नव्हते. सर्व सुख हात जोडुन ऊभे होते, वड्यात लक्ष्मी पाणी भरत होती . ह्याच दोघांनाही समाधान होतं.दोघांनी मोठ्या कष्टाने हा संसार फुलवला होता. वडीलोपार्जित कोरडवाहू शेती व पडक्या वाड्यात सुरु झालेला हा संसार एवढ्या लांब मजल मारेल ह्याचा दोघांनी कधी विचारही केला नव्हता. गावात एकटे सुधाकरराव हेच पदवीधर असल्याने ध्यानीमनी नसताना पोलीस पाटीलकी मिळाली , त्यामुळ थोडफार का होईना मानधनाचे हमी उत्पन्न सुरु झाले. अधिकार पद मिळाल्यामुळे शासनाच्या योजनेतुन शेतात विहिर मिळवता आली, शेतीत पाणी आल्यामुळं शेतीचे उत्पन्न वाढले अन् पाहता पाहता सुबत्ता आली. सुदैवाने मुलंही चांगली निघाले , आई वडीलांचा कष्टाचा वारसा त्यांनी पुढे चालवला व त्यातून आज नंदनवन फुलल होतं. भूतकाळातील आठवणींनी आजही दोघांचा स्वर कातर होतो, अन्  वर्तमानकाळामुळ ऊर अभिमानाने भरून येतो अशी दोघांचीही अवस्था.

             गावात मान असला तरी उभयतांच्या प्रगतीमुळे उगाच मत्सर करणारे ही होतेच. सुनांच्या व मुलांच्या मनात लिलाबाई बद्दल वा सुधाकररावांबद्दल नकारात्मक भाव निर्माण करण्याचा , भावाभावात भांडण लावण्याचा , व घरात फुट पाडण्याचा प्रयत्न करणारांची पण कमी नव्हती. पण लिलाबाई जेवढ्या मायाळु तेवढ्याच कणखर होत्या त्यामुळेच कुणाचीही डाळ शिजत नव्हती. अनेकांचे प्रयत्न त्यांनी चातुर्याने हाणून पाडले होते, मायेने व हुशारी ने घरातील वाद घरातच सोडवले होते. मुलं व सुनाही समजदार होते, सुधाकरराव गावातील सर्वांचे वाद सोडवतात , अन् आपल्याच घरातला  वाद बाहेर गेला तर लोक काय म्हणतील? ह्याची त्यांना जाणीव होती, म्हणुन सगळं सुरळीत सुरू होत. मोठी सुन गोकुळा थोडी खाष्ट होती , पण लिलाबाईंनी मोठ्या हुशारीने तीला मात द्यायच्या प्रसंगी कठोर शब्द बोलायच्या त्यामुळे ती शांत राहायची . तुलनेने लहानी सुन मिना समजुतदारीने वागायची त्यामुळं बरेचदा वाद वाढत नसत. लिलाबाईंना सर्व ज्ञात होत, म्हणुनच त्या धाकट्या सुनेला थोड झुकत माप द्यायच्या  अन् नेमक्या ह्याच एका बाबीमुळं मोठ्या सुनेचा लिलाबाईंवर राग असायचा, पण त्यांच्यापुढे तीच काहीच चालायच नाही . शिवाय आपला नवरा ,आईशी वाद घालतो पण तोही आईच्या शब्दाबाहेर नाही हे तीला चांगल माहिती होतं , तसा अनुभव तीनं कित्येकदा घेतला होता, त्यामुळे शांत राहण्याशिवाय तीच्याकडे पर्याय नव्हता;  तरीही तीच्या मनात राग खदखदत रहायचा. लिलाबाईंना हे जाणवल तरी त्या दुर्लक्ष करायच्या. एकंदरीत सर्व सुरळीत सुरू होत, दृष्ट लागण्याजोग सुख लिलाबाईंना मिळत होत,अन् काळ पुढे सरकत होता.

                   त्यादिवशी सकाळपासूनच लिलाबाईंचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आज काहीतरी वेगळं घडणार असं त्यांना सारखं वाटत होत . वरवर त्यांची सगळी कामं रोजच्या सारखीच सुरू होती, पण त्या आज अबोल झाल्या होत्या ही बाब कुणाच्याही नजरेतुन सुटलेली नव्हती.

आज पोलीस पाटलांचीच तक्रार पंचायतीत का ? ह्या सुधाकररावांच्या थट्टेच्या प्रश्नावर ,

नाही हो,  आज का काय माहिती  पण करमतच नाही , कशातच लक्ष लागत नाही ! एवढेच उत्तर देउन त्या थांबल्या.

अग जरा देवघरात बसुन एखादी माळ जास्त ओढ, बरं वाटेल , सुधाकररावांचा सल्ला, हो बघते प्रयत्न करून ! असं म्हणून लिलाबाई देवघराकडे गेल्या . आता पर्यंत संसाराचा गाडा ओढतांना वयाची साठी कधी उलटली हे त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं, पण मुल-सुना कर्ती झाल्यानंतर त्या देवध्यानात लागल्या होत्या, त्यामुळेच सुधाकररावांचा सल्ला त्यांना मानवला होता.बराचवेळ देवघरात बसुन असतांना धाकटा मुलगा दिनकर त्यांना जेवणासाठी बोलवायला आला , तेंव्हा त्यांच्या लक्षात आले ,आज सुधाकरराव तालुक्याच्या गावला जणार होते.

ह्यांच जेवन झालं का ? लिलाबाईंनी गोकुळाला विचारलं खरं , पण उत्तर दिलं सुधाकररावांनी , नाही म्हंटलं गावची पाटलीन उपाशीपोटी असतांना आमची काय बिशाद ? ह्यावर वाड्यातुन पुन्हा एकदा सुखाचा तो मंजुळ ध्वनी बाहेर आला, व सर्व हसतच जेवायला बसली. दोन्ही नातु दोन्ही बाजूस घेऊन लिलाबाई जेवत होत्या.त्या एकदम म्हणाल्या

अहो मी काय म्हणते , पुढच्या महीन्यात सैलानीची यात्रा आहे, आपल्या गावातले बरेचजण जातात दरवर्षी, मोठी यात्रा असते म्हणे ती , आपण जायचं का ?

आपला शेतीचा पसारा मोठा, घरातले कारभारी परवानगी देतील तर जाउया !, असं म्हणून सुधाकररावांनी गजानन, व दिनकर ह्या आपल्या मुलांकडे पहात सुनांकडे एक कटाक्ष टाकला. आपल्या छत्तीस वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आपले आई वडील कुठे बाहेर जाण्याचा विचार करतांना दिसल्यमुळे, हो या जाउन ! आमची काय हरकत असणार आहे ?चार दिवस घेऊया धकवुन ! असं म्हणत गजानन परवानगी देऊन मोकळा झाला , बाकी सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं पण गोकुळा काहीच बोलली नाही हे लिलाबाई व मीनाच्या लक्षात आलं होतं. तीच्याकडे दुर्लक्ष करून जाण्याचा निर्णय पक्का झाला होता, पुढील तयारीची चर्चा उद्या सकाळी करु आता मला ऊशिर होतोय असं म्हणत सुधाकरराव उठल्यामुळं सर्वांनी आपापली जेवणं उरकली व जो तो आपापल्या कामाला लागले. लिलाबाईंना अजुनही प्रसन्न वाटत नव्हते, दोन्ही सुना आपापल्या कामात होत्या, थोड बाहेर चक्कर मारुन आल्यावर बरं वाटेल असा विचार करून त्या शेजारच्या मैत्रिणीकडे जाउन आल्या होत्या, पण कुठेच करमत नव्हतं , दिवस पुढे सरकत नव्हता .काय करावे हे त्यांना सुचत नव्हते, थोडा विरंगुळा म्हणून त्या नातवाला खेळवत बसल्या होता ,दुपारचे तीन वाजले असतील जेमतेम , तेवढ्यात दिनकर धापा टाकत आला, त्याच अंग घामाने भिजलं होतं ,  आई... आई ...बाबा... बाबा... ह्या व्यतीरीक्त तोंडातुन शब्द निघत नव्हता, स्वर रडवेला होता. काहीतरी अघटित घडलंय हे लिलाबाईंच्या लक्षात आलं होतं, पण नेमकं काय हे त्यांना कळत नव्हतं, त्या त्याला धिर देत विचारण्याचा प्रयत्न करत होत्या पण तो काहीच सांगण्याच्या अवस्थेत नव्हता. घरातले सगळेच गोंधळले होते ,सर्व त्याच्या भोवती जमा होते, भय,काळजी,व ऊत्सुकता ह्या तीन्ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या ,  काय झालं कुणाला कळत नव्हतं , अन् दिनकर बोलत नव्हता , तो फक्त रडत होता . हा सगळा गोंधळ वाड्यात सुरू असताना अचानक गावचे उपसरपंच व त्यांच्या सोबत एकदोन जन वाड्यात आले , सगळी परिस्थिती लक्षात घेऊन उपसरपंच साहेबराव पाटील सर्वांना धिर देत बोलते झाले,

दिनकर!, अरे शांत हो! , आता तुम्हीच असं वागलं तर कसं होणार, आईकडे पहा !

साहेबराव काका काय झालंं ? हे असं का करताहेत ? ..

मिनाच्या प्रश्नावर सर्वांकडे पहात साहेबराव सांगायला लागले .. आज सकाळी तालुक्याच्या गावला जायला निघालेल्या सुधाकररावांच्या गाडीला अपघात झाला होता, तालुक्याच्या गावापासून पाच की.मी. अंतरावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत बस कोसळली, चालकाव्यतिरीक्त कुणीच वाचलं नव्हतं,आपल्या गावातुन त्या गाडीत फक्त सुधाकररावच होते . , अपघात असल्यामुळे पोलिसांची कारवाई व शवविच्छेदन होवुन मृतदेह घरी आनण्यासाठी गजानन , सरपंच भगवान पाटील, व गावातील काही मंडळी तालुक्याला गेले होते. साहेबरावांचा प्रत्येक शब्द सर्वांच्याच कानात उकळत्या तेलासारखा पडत होता, एक क्षण सर्वत्र स्तब्धता झाली, अन क्षणात वाड्यात एकच हलकल्लोळ झाला होता, लिलाबाईंचं नंदनवन उध्वस्त झालं होतं, त्यांच्या मुखातून दुखाःवेगान बाहेर पडणाऱ्या त्या हंबरड्यानं शेजारच्या मंदिरातला संकटमोचनही थरारला होता .अश्रुंना खंड नव्हता, लिलाबाईंसह कुटुंबाचा आधारवड गेला होता, अश्रुंनी वाडा वाहुन जातो की काय अशी अवस्था वाड्यात होती . तर वाड्याच्या बाहेर गावातील लोकं सुन्न मनान उभी होती, संपुर्ण गाव हळहळला होता , खिन्न होता, कोणी कुणाशी काय बोलावं ? कुणालाच सुचत नव्हतं, सर्वत्र निशब्द शांतता होती,सुधाकरराव जातांना सर्वांचे शब्द सोबत घेऊन गेले जणू, अशी अवस्था होती.

             सर्व कार्यवाही पुर्ण होवुन मृतदेह घरी आणायला पाच वाजले होते, तोपर्यंत सर्व आप्तेष्ट आलेले होते, गावातील व पंचक्रोशीतील परीचीतांची वाड्याबाहेर गर्दी झाली होती . शवविच्छेदन झालेल असल्याने सुधाकररावांचा चेहरा तेवढाच उघडा होता, त्या शांत चेहऱ्याकडे लिलाबाई थिजल्या नजरेनं पहात होत्या. चाळीस वर्षांपासूनची सोबत सोडुन सुधाकरराव निघुन गेले होते, भुतकाळातील आठवणींनी लिलाबाईंचा हुंदका दाटुन येत होता, सुधाकररावांचा चेहरा त्यांना अखेरचा दिसत होता . सुधाकररावांकडे एकटक पहात लिलाबाई खिन्न बसल्या होत्या. हातातला चुडा काढला, कपाळाचं कुंकू पुसलं, गळ्यातील मंगळसूत्र काढलं तरी त्यांना कशाचच भान नव्हतं , त्यांचा पृथ्वी मोलाचा दागिना नियतीनं कायमचा हिरावून घेतला होता. अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पडले होते, प्रत्येक जन लिलाबाईंना धिर देण्याचा प्रयत्न करत होता , पण त्यांच्या अश्रुंना खंड नव्हता. माणसांच्या गर्दीत त्या एकाकी झाल्या होत्या. त्याच अवस्थेत त्यांनी दहाव, तेरावं पार पडलं, हळूहळू सर्व पाहुणे निघुन गेले होते, आता मात्र लिलाबाईंची अवस्था फार बिकट झाली.वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सुधाकररावांची आठवण होती, त्यांच्या आठवण आली नाही असा एकही क्षण नव्हता,लिलाबाईंना  एकाकी पडल्या सारखं वाटायला लागलं.  शरीरप्रकृती उत्तम असली तरी मनाने त्या खचल्या होत्या .

             लिलाबाई आता तासनतास देवघरात बसुन असायच्या, संसारत त्यांना आजिबात रस उरला नव्हता. थोडफार नातवंडामध्ये त्या रमायच्या , बाकी वेळ देवघर व जप , त्यातही सुधाकररावांची आठवण झाली की किती किती वेळ डोळ्यातल्या अश्रुंना खंड नसायचा. अनेकांनी समजावले पण त्या फक्त ऐकून घेत, प्रतिक्रिया देत नव्हत्या पण बदलही होत नव्हता, पाहता पाहता दोन वर्षे निघून गेली , पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. दोन्ही मुलं, व धाकटी सुन मिना चिंतेत होते, पण स्वतः चा मोठेपणाचा तोरा गाजवायला मिळतो म्हणून गोकुळा मात्र मजेत होती . लिलाबाईंकडे लक्ष द्यायला तीला वेळच नव्हता. उलट त्यांच्या ह्या अवस्थेचा फायदा घेऊन घरातील सर्व सुत्रे आपल्या हातात कशी घेता येतील ? ह्या विचारात ती गुंग होती. ह्यामुळं घरातील वातावरण बिघडायला सुरुवात झाली होती , कुरबुरी वाढल्या होत्या . गोकुळाच्या फटकळ व अहंकारी स्वभावाने , मिनाच्या मनातल्या समजुतदारीवर मात करून त्याठिकाणी स्त्री सुलभ ईर्षा जागृत केली होती , दिवसेंदिवस वादाचं प्रमाण वाढतच होतं.

ह्यामुळेच गजानन व गोकुळामध्ये वारंवार वाद व्हायला लागले.  उगाच वड्यात रणांगण नको म्हणत अखेर सुधाकर पाटलांचा वाडा दुभंगला होता . वाटण्या झाल्या तरी सर्व स्थावर मालमत्ता आई आहे तोपर्यंत आईच्याच नावावर ठेवण्याचा निर्णय दोनही भावांनी एकमताने घेतला होता ,आईने कुणाकडे कधी रहायला जायचे, व किती दिवस रहायचे हे ठरवण्याचे स्वतंत्र लिलाबाईंना होते,  फक्त वाद नको म्हणून सर्वांनी नाराजीतच वेगळं होणे स्विकारले होते. ह्या निर्णयामुळे गोकुळा फक्त खुश होती , पण मालमत्ता लिलाबाईंच्याच नावावर राहणार हे ऐकून तीच्याही आनंदावर विरजण पडलं होतं, अन् तीच्या मनातला लिलाबाई बद्दल चा राग अजुनच वाढला होता , पण गजानन काहीच बोलत नसल्याने तीची पंचाईत झाली होती , त्यामुळे ती शांत आहे, असे भासवत असली तरी तीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. गोकुळा , मीना व लिलाबाईंशी वारंवार वाद घलायची, कधिकधि उगाच टोमणे मारायची, दिनकरच्या मुलांचा राग करायची . ह्या तीच्या वागण्याला गजनन ही कंटाळायचा , त्यातुन दोघांची भांडणं विकोपाला जायची, शेवटी लिलाबाई मध्यस्थी करुन गजानन ला शांत करत. हा प्रकार वारंवार व्हायचा , नेहमीच डोक्याला ताप नको असे म्हणत गजानन बाहेरच जास्त रहायचा . गोकुळाच्या वागण्याचा त्याला मनस्ताप व्हायचा, त्यातुन तो व्यसनाकडे झुकला होता . त्याचं व्यसनाचं प्रमाण वाढतच होतं , पण आईचा धाक कायम होता ,त्यामुळे वरवर तरी सर्व सुरळीत सुरु होतं . ह्या विरुद्ध दिनकर चा संसार मात्र सुरळीत होता , दोघंही सर्वांना धरुन चालायचे, समजुतदारीने वागायचे , त्यामुळे लिलाबाई दिनकरकडेच जास्त रहात . असे पाच सहा वर्ष निघुन गेली. सुधाकररावांच्या जाण्याने लिलाबाईंना झालेली जखम अजुनही ओलीच होती , अन् ती तशीच राहणार होती शेवटपर्यंत....!

          त्यादिवशी सुधाकररावांच्या वर्षश्राध्दाचे विधी व भोजन आटोपून सर्व ओसरीवर बसले होते. सर्व त्यांच्या ऐकेक आठवणी सांगत होते . लिलाबाईसुध्दा छान रमल्या होत्या, बरेच दिवसांनी त्यांना एवढे प्रसन्न पाहुन मुलंही आईजवळच बसुन होती, वाड्याला बऱ्याच दिवसांनी सुखाची चाहूल लागली होती. गोकुळाही मुळ स्वभाव बाजुला सारुन सगळ्यांमधे बसली होती , गप्पात सहभागी होती . अचानक काहीतरी आठवल्यासारखं गोकुळा बोलायला लागली,  'आई'! बाबांना अन् तुम्हाला सैलानीला जायची ईच्छा होती ना ?  मग आपण सर्वांनी मिळुन जायचे का ह्या वर्षी ? 

लिलाबाईंनी चमकुन तीच्याकडे पाहिले, त्यादिवशी पण हाच विषय होता , अन् आजही पुन्हा...... , त्या क्षणभर बावरल्या , अन् दुसऱ्या क्षणी , आता माझे काय काम ? मी घरीच देवदेव करते, त्यांच्या सोबत जाण्याची हौस होती , ती देवाने कायमचीच फेडली ! आता नको , तुम्ही या जाउन !  असे म्हणून विषय टाळायचा प्रयत्न केला . पण दिनकर व मिना दोघांचाही आग्रह सुरुच होता, गजाननही म्हणाला आई ! बाबा नाही तरी किमान तुला देवदर्शनासाठी नेण्याचं पुण्य घडु दे ना आम्हाला ! ह्यावर लिलाबाई निरुत्तर होत्या, थोड अनिच्छेनेच त्या हो म्हणाल्या . वडील गेल्यापासून घराबाहेर न पडलेली आई तयार झालेली पाहून मुलांना आनंद झाला होता . पण एक अडचण होती, नेमकं त्यादरम्यान मिनाच्या बहिणीचं लग्न होतं  , त्यामुळे दिनकर व मिना घरीच थांबणार होते , लिलाबाई , गजानन, व गोकुळा ह्यांच्या सोबत जाणार असे ठरले होते .होळीच्या नंतर पंचमीला सैलानीला संदल मिरवणूक असते, त्याच्या  आदल्या दिवशी घरुन निघायचे , संदलचे दर्शन घेवून एक दिवस तेथेच राहुटीत रहायचे, यात्रा पहायची , व दुसऱ्या दिवशी परत निघायचे , असा बेत ठरला होता . यात्रेत सर्वच महाग भेटेल ह्या अंदाजाने सर्व चिजवस्तु सोबत न्यायच्या ठरल्या .  सर्व आनंदाने जाण्याची तयारी करण्यात गुंगून गेले . महीना केंव्हा संपला कुणालाही कळले नाही,होळी साजरी झाली अन् जाण्याचा दिवस उगवला . जाण्याचा टप्पा लांबचा असल्याने , जाण्यासाठी दिनकरच्या परीचयातुन शेजारच्या गावातील गाडी ठरवलेली होती. सोबत गावातील आनखी तीन कुटुंब होती.  दोन्ही सुनांनी तयारी केलेली होती, त्यानुसार सामान गाडीत भरून दिले , मिना स्वतः जाणार नव्हती, पण त्या तीचा व दिनकर चा उत्साह विशेष होता, गडीत ठरल्याप्रमाणे सर्व वस्तू ठेवल्या की नाही हे तीने तीनदा तपासले होते . दिनकरने ड्रायव्हरला , हळु जा, शांतपणे गाडी चालव हे तिनतिनदा निक्षून सांगितले , अन् ठरल्याप्रमाणे गाडी लिलाबाईंना घेऊन सैलानीकडे निघाली.

          गाडीच्या वेगातच लिलाबाईंचे विचारचक्र सुरु झाले, सुधाकररावांच्या आठवणींभोवती त्याफिरायला लागल्या, आतापर्यंत त्यांनी सुधाकररावांशिवाय प्रवास केलेलाच नव्हता, त्यामुळे ती उणीव त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पण मुलांना वाईट वाटेल ह्या विचाराने त्या चेहऱ्यावर न दाखवता शांत होत्या , हि बाब गजाननच्या लक्षात आली होती, त्यामुळे तो वेगवेगळ्या विषयांवर बोलुन, आईला खुलवण्याचा प्रयत्न करत होता . हे लक्षात आल्यामुळे कदाचित लिलाबाई त्याला मधून मधून प्रतिसाद देत होत्या, प्रवास व्यवस्थित सुरू होता. मधे दोनतीन वेळा गजानन च्या मोबाईल नंबर वर दिनकर व मिनाचा फोन येउन गेला. पुर्ण दिवभर प्रवास करत सायंकाळी सहाच्या दरम्यान सर्व सैलानीला पोहचले. यात्रेला गर्दी अलोट होती, गर्दीची चाहुल रस्त्यानेच लागली होती . वाहणांची वर्दळ गर्दीचा अंदाज सांगत होती.  एस.टी. बसेसची संख्या, मालवहु वाहणे, व त्यामुळें रस्त्यावर उडालेली धुळ ह्यामुळे प्रवासाचा शिण जाणवत होता . यात्रापरीसराच्या सुरुवातीला च एका मारोती मंदिराच्या जवळ ड्रायव्हरने गाडी उभी केली . भाउ, ईथेच कुठतरी राहुट्या ठोका, म्हणजे जातांना गर्दीतुन निघनं सोपं जाईल, गाडी पुढे जाउच देत नाही, असे म्हणून त्याने सर्वांना उतरण्याची सुचना दिली. सर्वांनी मिळुन मंदिर परिसरात राहुट्या उभारल्या , व रात्रीचे जेवण सोबत करून सर्व आपापल्या राहुटीत झोपी गेले. दिवसभर प्रवासात सर्वच थकले होते , त्यामुळे वाहनांचे आवाज, धुळ ह्या कशाचाच परीणाम झोप लागण्यावर झाला नाही.

                 दुसऱ्या दिवशी सकाळी जेवन झाल्यावर सैलानी बाबाच्या दर्ग्यात दर्शनासाठी चालले होते. आतापर्यंत तालुक्याच्या गावाबाहेर जग न पाहीलेल्या लिलाबाईंना यात्रेचं मोठं अप्रुप वाटत होतं . वाहनांची संख्या, मानसांच्या गर्दीची रांग, हजारोंच्या संख्येने राहुट्या, नजर फिरवावी तिकडे नुसती गर्दी अन् गर्दी, सारंच नवीन होतं.त्या थोड्या गांगरून गेल्या होत्या, हरवण्याची भितीने त्या गोकुळा किंवा गजानन चा हात धरून च गर्दीतुन वाट काढत चालल्या होत्या.लाखोंची गर्दी, हिंदू - मुस्लिम समुदायाचे लोकं, दोन्हींच्या संकरातून निर्माण झालेली उपासणा पध्दती , फिरणारे व झुलणारे मनोरूग्न,  मोफत पाणी पुरवठा करणारे व पाणी विकणारे सुध्दा, मोठमोठ्या हॉटेल, मनोरंजनाची साधनं, जिवनावष्यक वस्तुंपासुन तर चैनीच्या वस्तूंपर्यंत साऱ्याच वस्तुंची दुकान, सारच त्यांच्यासाठी नविन होतं, अगम्य होतं, म्हणून सारं डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत त्या चालल्या होत्या. दर्शन करून सारे राहुट्यांपर्यत पोहचले, गर्दी वाढतच होती, दुपारचे जेवण करुन काहीजन  आराम करत होते , तर कुणी मुलांना घेऊन यात्रेत फेरफटका मारायला गेले होते. लिलाबाई थोडावेळ मंदिरात जाऊन बसल्या होत्या,  तेथे त्यांना मंदिर ज्यांच्या शेतात होते ते समाधान पाटील भेटले, त्यांच्याकडून संदल मिरवणुकीबद्दल बरीच माहिती मिळाली होती.

बराचवेळ मंदिरात घालवून, सायंकाळ झालेली पाहून, लिलाबाई राहुटीत परतल्या . मिळालेली माहिती जेवतांना सर्वांना लिलाबाईंनी सांगितली, त्यानुसार सकाळी संदलचे दर्शन घ्यावे, व पुन्हा एकदा सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु करायचा हे नियोजन करुन सर्व झोपले.

     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वजन संदलच्या दर्शनासाठी निघाले, ऊद जाळल्याचा वास सर्वत्र दरवळत होता , ढोल ताशांचे आवाज , गर्दीचा गोंगाट, दर्शनासाठी सर्वत्र धावपळ सुरू होती, त्यारात्री दरवर्षी प्रमाणे सैलानी परीसर झोपलाच नव्हता. गर्दी क्षणोक्षणी वाढतच होती, संदल मिरवणूक जशी जशी जवळ येत होती, तसतसा गोंगाट वाढत होता, कुणाचा शब्द कुणाला ऐकू येत नव्हता, त्या गोंधळात लिलाबाई कधी गोकुळा तर कधी गजानन चा हात धरून चालल्या होत्या. कसेबसे दर्शन घेऊन सर्वजन गर्दीतुन बाहेर पडले,तोपर्यंत सकाळचे सात वाजले होते. सर्वजन दर्ग्याच्या दिशेने निघाले, एवढ्यात कसलातरी गोंगाट ऐकू आला, त्या दिशेने नजर फिरवेपर्यंत दुसरी कडून एक मोठा माणसांचा जथ्था धावत येतांना दिसला.

भागो...!.भागो..!     .दंगल हो रही है...!   भागो.....!.ह्या आरोळ्यांनी सर्व वातावरण भयकंपित झाले होते,एकच हलकल्लोळ उडाला, जो तो आपापल्या जिवाच्या भितीने वाट दिसेल तीकडे धावत होता. किंकाळ्या, आरोळ्यांनी आसमंत भरून गेले होते, कुणाला कशाचीच शुध्द नव्हती, फक्त किंकाळ्या व धावपळ, भय व आतंक ह्यांचच साम्राज्य , ह्या सर्व धावपळीत लिलाबाईंचा हात गोकुळा च्या हातातून सुटला, धावता धावता कशाततरी पाय अडकुन त्या पडल्या,गोकुळा धावत होती, लिलाबाईंनी तीला आवाज दिला, पण धावण्याच्या वेगामुळे तीच अंतर वाढलं होत, आजुबाजुच्या गोंधळात तीच्यापर्यंत आवाज पोहचलाच नाही, कशाबशा अडखळत त्या उठल्या , ज्या दिशेने सर्व गेले त्या दिशेने त्या निघाल्या , एका वळणापर्यंत त्या पोहचल्या खऱ्या पण पुढे काय ? ओळखीचं कुणीच दिसत नव्हतं, कुणीकडे जावं सुचत नव्हतं, आजुबाजुला गोंधळ सुरुच होता, सोबतची मंडळी सुटलीच होती, जीव वाचविणेही आवष्यक होते, वेळ कमी होता पडताना पायाला लागल्याने धावणे शक्य नव्हते, शेवटी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला एका बाजूला मोठ्या झाडाचा आडोसा घेउन लिलाबाई लपल्या, वातावरण शांत झाल्यावर मारोती मंदिर विचारात विचारात जाऊ असं त्यांनी ठरवलं. दरम्यान आपली आई दिसत नाही म्हणून गजानन सोबतच्या दोघांना घेऊन शोधायला आला खरा , पण झाडामागे लपलेली आई कुणालाच दिसली नाही , ना त्या गर्दीत आईला आपला मुलगा ओळखला गेला. गोंधळ वाढतच होता , एवढ्यात पोलिसांची गाडी शांततेच आवाहन करत गर्दीत फिरुन गेली. पण त्याकडेही कुणाचंच लक्ष नव्हतं, लिलाबाई जीव मुठीत धरून झाडामागे लपल्या होत्या , ते वडाचं झाडच त्यांच्यासाठी आता संकटमोचन होतं, बराच वेळ गेला, धावपळ पळापळ अजूनही सुरुच होती. पुन्हा पोलीस आले, ह्यावेळी शांततेच आवाहन नव्हतं, तर यात्रा परीसर सोडण्याबाबत सुचना होत्या, त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली . काय करावं हे लिलाबाईंना सुचत नव्हतं.त्या तिथेच बसुन होत्या, जागा सुरक्षित होती, त्यांना रस्ता दिसत होता, पण इतरांना त्या सहजासहजी दिसत नव्हत्या.  एवढ्यात त्यांना गोकुळा दिसली, त्या धडपडत झाडामागुन पुढे आल्या,त्यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला,  आवाज पोहचत नव्हता , दोघींमध्ये अंतर बरंच होतं,त्यांनी हातवारे केले, पण गोकुळाच लक्षच नव्हतं , इशारे सुरुच होते, दोन क्षण दोघींची नजरभेट झाली, त्यांनी हाताने येण्यासाठी सुचवले, पण गोकुळा पाठमोरी होउन चालायला लागली, त्यांनी आवाज देण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करून पाहीलाखरा, पण आवाज पोहचुनही उपयोग नाही हे त्यांना कळून चुकलं होत. त्या तशाच धडपडत पुन्हा झाडामागे जाउन बसल्या, आपलं कुणीतरी भेटेल ह्या आशेने आतापर्यंत रस्त्यावर नजर लावून बसलेल्या लिलाबाई, दोन्ही पायात तोंड खुपसुन ओक्साबोक्शी रडायला लागल्या, आपल्या सुनेनं नेमक आत्ताच वैर साधलं ह्याच त्यांना वाईट वाटत होतं . ती आता कुणालाही ह्या दिशेने येउ देणार नाही , हे ही त्यांना कळुन चुकलं होतं . फाल्गुनाच्या भर उन्हात त्यांच्या समोर काळाकुट्ट अंधार दाटला होता ! कदाचित कधीही न संपण्यासाठी .

            सकाळपासून पोटात अन्न नाही, पायाला दुखापत झालेली, बाहेर निघावं तर जीवाची भिती,ह्या अवस्थेत लिलाबाई चार पाच तास झाडामागे बसुन होत्या . आता बरीच शांतता झाली होती , गर्दी ओसरली होती , धावपळ थांबली होती, आता बाहेर पडण्यास हरकत नाही असा विचार करून त्या उठल्या.  पोलिसांनी यात्रापरीसर सोडण्याचं सांगितले तरी आपला आपला मुलगा आपल्याला घेतल्याशिवाय जाणार नाही हा आईचा विश्वास होता. मारोती मंदिर विचारात विचारात त्या तिथे पोहचल्या,पण तिथे कुणीच नव्हतं, राहुटीची जागादेखील ओळखणे शक्य नव्हते. आजुबाजुला एकही राहुटी नाही की हॉटेल किंवा दुकान नाही . त्यांनी यात्रा परीसरावर एक नजर फिरवली, सर्व निरव शांतता होती. आतामात्र लिलाबाई हादरल्या होत्या, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते, अनेक प्रश्नांचा गोंधळ डोक्यात सुरु झाला.काय करावे ? कुठे जावे ? कुणाला मदत मागावी ? असे कसे सगळे मला सोडुन निघून गेले ? सुनेचं जाऊं देत पण माझा मुलगा ? तो ही गेला ! ह्याला काय म्हणावं ? की तो थांबला असेल ? वाट पहावी का थोडा वेळ येथेच ? ह्या सर्व प्रश्नांचा भडीमार त्या उपाशी शरीराला सहन झाला नाही, त्या भोवळ येउन तिथेच कोसळल्या . अरे ! ही तर काल आपल्याशी गप्पा मारणारी आज्जी , ही ईथे अशी का पडली ? असे म्हणून समाधान पाटील पाणी घेऊन आले , त्यांनी लिलाबाईंच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्यांना शुध्दीवर आणले , प्यायला पाणी दिले, लिलाबाईंना थोड शांत झालेल पाहून त्यांनी विचारले, आज्जी काय झाले?तुमच्या सोबतचे कुठे गेले ? ईथे का अशा पडल्या होत्या? डोळ्याच्या ओल्या कडा पदराने टिपून लिलाबाई कातर स्वरात म्हणाल्या, काय माहिती बाबा कुठे गेले !मी दंगलीत हरवले, ईथे येउन पहाते तर कुणीच नाही. सकाळपासून उपाशी आहे , म्हणून जरा चक्कर आली !बाकी काही नाही ! समाधान पाटलांचा जन्मच पिंपळगावचा, शेती सैलानी दर्ग्यापासुन जवळ, त्यामुळं हा प्रकार त्यांनी नवीन नव्हता.  घरातील वयोवृद्ध व्यक्तींना किंवा मनोरुग्णांना  यात्रेच्या निमित्ताने आणून तिथेच सोडून जाणारे अनेक उदाहरणे त्यांनी आपल्या बालपणापासून आजपर्यंत पाहीले होते त्यामुळे लिलाबाईंना धीर देत त्यांनी आपल्या नोकराला घरुन काही खायला आणायला पाठवले . लिलाबाईंना पोटात अन्न गेल्यावर थोडी तरतरी आलेली पाहुन समाधान पाटील सांगायला लागले. आज्जी, काल रात्री आमच्या पिंपळगावच्या एका पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाचा  कुणीतरी शेतात खून केला, दरवर्षी यात्रा कालावधीत अशा घटना घडतात, पण ह्यावर्षी गावातील तरुण मारला गेल्यामुळे गावकरी भडकले, सैलानी यात्रेत आलेल्या कुणा गुन्हेगारांच हे कृत्य असावं अशी शंका आल्याने, ही यात्रा नकोच ह्या भावनेतून यात्रेवर हल्ला करुन सर्वांना हकलून द्यावे ह्या विचारात काही तरुण मंडळींनी यात्रेत येउन यात्रेकरूंना मारझोड केली , त्यातून सर्व गोंधळाला सुरुवात झाली, शेवटी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन, व जिवित हाणी नको म्हणून पोलीस व प्रशासनाने यात्रेकरूंना हा परिसर सोडून जाण्यासाठी सांंगितले, काही लोक पाच दहा किलोमीटरवर थांबलेले आहेत, कदाचित तुमच्या सोबतचे लोकही असतील , थोडं वातावरण निवळलं की येतील , तोपर्यंत तुम्हाला वाटल्यास येथेच मंदिराच्या आवारात रहा, फक्त घाण होउ नका देउ , अन् मंदिराच्या पायरीवर झोपले तर चालेल ,आत झोपू नका.ठिक आहे माझी पण जेवायची वेळ झाली मी निघतो.असे म्हणून समाधान पाटील घरी गेले.

          रात्र बरीच झाली होती, सगळीकडे शांतता होती. लिलाबाई खुप थकल्या होता, पायाची जखम ठणकत होती, मानसिक ताण बराच पडला होता, लिलाबाईंना झोप केंव्हा लागली त्यांना कळले ही नाही. सकाळी त्यांना जाग आली तीच मुळी कुत्र्याच्या भुंकण्याने, मंदिर परिसरात कुणीतरी नवीन येउन झोपलयं हे समाधान पाटलांच्या कुत्र्याला मुळीच सहन झाले नव्हते, त्यामुळे तो लिलाबाईंवर भुंकत होता. लिलाबाई हळूच उठल्या, त्यांनी सभोवती एक नजर फिरवली, त्यांना कालचा सगळा घटनाक्रम आठवला, शेजारच्या हौदावरच त्यांनी चेहऱ्यावर पाणी मारलं, थोडावेळ तिथेच बसून त्या शेजारच्या घराकडे निघाल्या, कुठे काही मदत मिळेल का याची चौकशी करून पाहु म्हणून त्या फाटक उघडणार तेवठ्यात , ऐ बाई ईकडं काय ? तुमचा सैलानी तीकडे , चल निघ ईथुन, असे म्हणत समाधान पाटलाची आई त्यांच्या कडे हातात काठी घेऊन धावली. तेवढ्यात आई, अगं काल मी सांगत होतो ती हीच म्हतारी असं म्हणत समाधान पाटील बाहेर आले. मग तीचा काय पाहुनचार करतो आता ? असं म्हणत आई माघारी गेली . काय आज्जी ?  काय म्हणता ? असे विचारात समाधान पाटील पुढे आले . काही नाही, कुठे काही मदत मिळेल का विचारायचे होते ! ... लिलाबाई ; आज्जी तुम्ही ना समोर जा, तिथे पोलीस चौकी आहे, तिथे चौकशी करा ते करतील तुम्हाला मदत, अन् नेहमी नेहमी येउन आम्हाला त्रास देउ नका, तुम्हाला वाटले तर मंदिर परिसरात रहात जा , काही शिळंपातं उरलं तर देत जाउ तुम्हाला पण त्रास नका देउ, जा आता . एवढं बोलुन समाधान पाटील घरात गेले. पदराने आपले डोळे पुसत लिलाबाई पोलीस चौकीच्या दिशेने चालायला लागल्या .

           मनात विचारांच काहुर माजलं होतं. आपल्या वाड्याचं  वैभव आठवत होतं, परीवार आठवत होता, सुधाकररावांच्या सोबत खाललेले ते सोन्याचे घास आठवत होते , अन् ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर समाधान पाटलांच शिळपातं देउ म्हणणार वाक्य मनाला ओरबडत होतं.पायाची जखम दुखत होती, चालणं अवघड होत अन् आवष्यकही. लिलाबाई कशाबशा पोलीस चौकीपर्यंत पोहचल्या, बाहेर शिपाई ऊभा होता, थोडंसं घाबरत त्या पुढे झाल्या , दादा ! मी यात्रेत हरवले होते ,  दंगलीमुळं घरचे निघुन गेले, काही मदत मिळेल काय ? घाबरतच त्यांनी त्या शिपायाला विचारले. निर्विकार चेहऱ्याने त्या शिपायाने लिलाबाईंकडे पाहिले, अन् तो दरडावून बोलला, ए म्हतारे , आम्हाला काय काम धंदा नाही का ? कुणाकुणाला मदत करायची ? तुमच्या घरचे तुम्हाला ईकडे सोडुन देतात अन् आमच्या डोक्याला ताप ! काही मदत बिदत नाही, चल निघ ईथुन ! एवढं बोलून तो निघून गेला. लिलाबाई तिथेच उभ्या होत्या, डोक्यातले विचार थांबत नव्हते , काय करावे सुचत नव्हते, आतापर्यंत सगळ्या गावाला मदत करणाऱ्या लिलाबाई याचक बनून पोलीस चौकीच्या प्रांगणात उभ्या होत्या. त्या मागे वळणावर तोच , आज्जी कुठल्या तुम्ही ? काय मदत हवी तुम्हांला ? असं विचारणारा मंजुळ स्वर त्यांच्या कानावर पडला . त्यांच्या मागे पंचविशीतली एक तरुणी उभी होती . तीच्या कपड्यावरुन ती पोलीस असल्याचं लिलाबाईंना लक्षात आलं. त्यातरुणीला आपली सर्व हकिकत सांगुन लिलाबाई म्हणाल्या , अशी कहाणी आहे माझी, म्हंटल ईथे काही मदत मिळते का पहावे म्हणून आले होते. लिलाबाईंच कथन ऐकून घेतल्यावर तीनं एक वही समोर घेतली , त्यात काहीतरी शोधल्यावर ती म्हणाली, आज्जी, तुमच्या नावाची हरवल्याची तक्रारच नाही येथे, तुमची ईच्छा असेल  तर तुम्ही नोंदवु शकता . तीचं बोलणं संपत न संपतं की लगेच बाजुच्या खुर्चीत बसलेले एक अधिकारी बोलले, अहो शर्मा बाई, काही काम नाही का ?म्हतारी जड झाली असेल घरी,म्हणून आणून सोडले असेल, तुम्ही कशाला मागे लावून घेताय ? तक्रार नोंदवली नाही ना , मग जाउ द्या की ! कशाला उगाच भानगडी? तुमची तक्रार नाही, मग आम्ही काय मदत करणार ? जा आज्जी तुम्ही , तक्रार आली तर कळवु तुम्हाला ! वरीष्ठांच्या उत्तरावर शर्मा बाई चुप बसल्या, लिलाबाई सुध्दा उठुन चालायला लागल्या. मदतीची आशा संपली होती, कुठे जावे कळत नव्हते . यात्रेत चोरी होउ नये म्हणून अंगावरचं सोनं घरीच ठेवलं होतं, नातवांसाठी यात्रेतुन काही घ्यावे ह्या आशेने चार पैसे जवळ होते, पण तेही संपले होते , नातवांसाठी घेतलेला खेळ घेऊन मुलगा व सुन निघून गेले होते. नाही म्हणायला जवळ पन्नास एक रुपये होते, तेवढ्यात काय होणार घरी कसे जावे ? कुणी येईल का आपल्याला शोधायला ? पण आता घरी जावे की नाही ?का वागले असतील असे आपल्याशी ?काय चुकलं आपलं ?असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात होते ;ह्या विचारातच लिलाबाई चालत चालत बसस्थानकापर्यंत कशा आल्या त्यांना कळलेच नाही. त्या थकल्या होत्या शरीराने व मनानेही. तिथेच एका हॉटेलमध्ये चहा घेतल्यावर त्यांना थोड बरं वाटलं, काही मदतीसाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहीला पण व्यर्थ, त्या लोकांना हा प्रकार नेहमीचा असल्याने कुणीच लक्ष देत नव्हते. बराचवेळ प्रयत्न करून थकल्यावर लिलाबाई मारोती मंदिराच्या परिसरात आल्या,  त्या संकटमोचकाकडे कितीतरी वेळ एकटक पहात बसल्या, अन् स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्या तिथेच शेजारच्या चिंचेच्या झाडाखाली झोपल्या.

      ईकडे गजानन व गोकुळा घरी पोहचले होते, आई हरवल्याची बातमी ऐकून दिनकर व मिना अस्वस्थ होते, त्यांनी खाजगीत गजानन व गोकुळाला अनेक दुषणे दिली होती . आपली आई कोणत्या परिस्थितीत असेल याचा अंदाज त्यांना येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दिनकर व मिना दुचाकीवरून सैलानीला हजर झाले, गजानन ने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सगळीकडे लिलाबाईंना शोधले, पण लिलाबाई मदत शोधायला पिंपळगावला गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट झालीच नाही. दिवसभर संपूर्ण यात्रापरीसर नजरेखालून घातल्यावर शेवटी पोलीस चौकीत तक्रार दाखल करून दोघेही माघारी आले होते. दर महिन्यात दिनकर येउन पोलीस चौकित चौकशी करून जात होता, पण प्रत्येक वेळी त्याची लिलाबाईंशी भेट होत नव्हती ती नव्हतीच, सैलानी बाबाच्या मनात काय चाललय कुणालाच कळत नव्हतं. आई सापडावी म्हणून सैलानी बाबाला नवस बोलत होता, पण उपयोग होत नव्हता.  देव पावत नव्हता, आई भेटत नव्हती, अगदी शवागारही पाहून झाले होते, पण लिलाबाईंबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.हा क्रम वर्ष दोन वर्ष सुरू होता, आता आई भेटेल ही आशा दिनकर व मिनाने सोडून दिली होती, पण सैलानी बाबा आईला सुखरुप ठेवेल ही आशा मनात कायम होती . कालोघात लिलाबाई नसल्याची सवय सर्वांना झाली होती, पण दिनकरचं मन ऐकायला तयार नव्हतं, तो मधुन मधून सैलानीला चक्कर मारतच होता, आपल्या आईला शोधत होता. बाकी सगळे आपापल्या संसारात गुंग होते.काळ पुढे पुढे सरकत होता.

          ईकडे लिलाबाईंनी समाधान पाटलांच्या सांगण्याप्रमाणे मंदिराच्या मागच्या बाजूला सरकारी जमिनीवर स्वतःची झोपडी उभारली होती. आजुबाजुच्यागावातून मिळेल ती भिक्षा घेउन जगणं सुरु होतं . अंगावर लज्जारक्षणापुरतेच कपडे होते, त्यामुळे काही टारगट मुलांनी त्यांच नाव माधुरी करून टाकलं होतं, हे त्यांच्या दृष्टीने चांगलच होतं, सगळीच ओळख पुसल्या गेली होती, त्यामुळे भुतकाळातील गोष्टींचा उल्लेखही नव्हता अन् आठवणही नव्हती.कधी कुणाचा महाप्रसाद असला तर तिथे पोटभर खायचे,नाहीतर कोण्याही गावात जायचं, पिठ मागुन आणायचं, बाजुच्या टेकडीवरून काड्या जमा करून तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करायचा, मारोती मंदिराची स्वच्छता करायची, अन् झोपडीत रहायचं, लिलाबाई उर्फ माधुरीचं आयुष्य असं सुरू होतं . कुणाची भांडण नाही की कटकट नाही , वेळ मिळेल तेंव्हा मंदिरात जाउन बसायची, कुठे फिरली तरी ही माधुरी खायला मागण्या पलिकडे कुणाशी काहीच बोलत नव्हती. फारफार तर "कुणाचच नाही कुएणी , जय बाबा सैलानी " एवढच म्हणत पळत सुटायची ती थेट झोपडीत किंवा मंदिरात जाऊन थांबायची. नाही म्हणायला समाधान पाटलांशी गप्पा मारायची, भुतकाळ सांगायची , पण ते ही क्वचितच ,नाहीतर गप्पच.बोलणार तरी कुणाला अन् काय ? हा मोठाच प्रश्न होता , घरून कुणी शोधायला येईल ही आशा मावळली होती . मनातलं दुःख ऐकायला त्या पाषाणाच्यामुर्ती शिवाय कुणीच नव्हतं.त्यामुळे वेड पांघरूण रहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते . वेडेपणाच्या बुरख्खाआड सगळच झाकलं होत , लाज, शरम, भुतकाळ अन् मनातले दुःख सुध्दा. म्हणूनच स्वच्छंदी जगणं शक्य होतं, नाही तर मनात ज्वालामुखी होता,पण त्यावर वेडेपणाचं बुच्चन लावून माधुरी खऱ्या अर्थानं सैलानी झाली होती. पाहता पाहता वर्षे लोटली, आतापर्यंत माधुरीला सर्वच ओळखायला लागले होते, वेडी असली तरी निरुपद्रवी आहे, हे सर्वांना माहीत झालं होतं.त्यामुळं खायला तरी निदान भरपूर भेटायचं, कुणी जुने कपडे द्यायचं, कुणीतरी मध्येच शेतात कामाला बोलवायचं, मोबदला म्हणून थोडे पैसे मिळायचे ,ते झोपडीत सुरक्षित ठेवायची,आला दिवस असा चालला होता .दरवर्षी यात्रा यायची यात्रेचे दिवस जवळ आले की माधुरी अस्वस्थ असायची, तासनतास झोपडी बाहेर किंवा मंदिरात बसून असायची, गावातली माणसं यात्रेत येतील, भेटतील ह्या आशेन यात्राभर फिरत असायची, पण कुणीही भेटत नव्हते.यात्रा संपली की माधुरी आपल्या झोपडीत रडत बसायची, दिवस दिवस बाहेरही यायची नाही. समाधान पाटलांच्या आईशी तीची आता चांगली ओळख झाली होती, शेवटी त्यांनी समजावले की , मंदिरात जाऊन बसायची, एक दोन दिवसांत पुन्हा पुर्ववत वागायची .

आता पुन्हा यात्रा जवळ आली होती, दरवर्षी प्रमाणे माधुरी मंदिरात बसली होती . काय माधुरीबाई आलं का कोणी ? असं विचारुन समाधान पाटलांची आई मंदिराच्या पायरीवर बसली. कशाचं कुणी येतय, म्हतारी मेली म्हणून सगळी जमीन नावावर करुन घेतली असेल ,आता त्यांना काय गरज ? माझे लेकरं नाही तिथं सुनांना काय दोष ? शेवटी आपलं नशीब ! एवढं बोलून माधुरी तिथून उठून चालायला लागली. ती जेमतेम दहा विस पावलं अंतर गेली असेल नसेल, तोच दोन दुचाकीवरून विशीतले चार मुलं येउन उभी राहिली. समाधान पाटलांची आई तिथेच बसुन होती. त्यातला एक मुलगा पुढे झाला , आज्जी ! आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलोय , पाच वर्षापूर्वी यात्रेत दंगलीत माझी आज्जी हरवली होती, तीला शोधायला ! हा पहा फोटो, तुम्हाला दिसली का कधी इथे ? असे म्हणून त्याने लिलाबाईंचा फोटो त्यांच्या हातात दिला. त्या फोटोकडे ती सत्तरी पार केलेली वृध्दा एकटक पहातच राहिली. काय बोलावं तीला कळतच नव्हतं . फोटोतली स्त्री सधन घरातली दिसत होती, अंगावर दागदागिने भरपूर होते, महागडे जरी काठाचे नउवार पातळ नेसली होती, चेहऱ्यावर तेज होतं, चेहरा ओळखीचा वाटत होता, पण लक्षात येत नव्हतं . अन् अचानक त्या किंचाळल्या, ए माधुरी ! हे बघ कोण आलयं ! ईकडे ये लवकर ! तो आवाज ऐकून माधुरी वळली,ती फार लांब गेलीच नव्हती, ती धावतच तिथे आली, आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून समाधान पाटील पण धावतच आले . काय झालं बाई ? का बोलावलं ? हा प्रश्न विचारतच माधुरीनं शेजारी उभ्या मुलांकडे पाहिलं , त्यातल्या एका मुलाकडे बघून ती स्तभ्ध झाली, लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलेला तो मुलगा तीनं बरोबर ओळखला होता, ती त्याच्याकडे बघतच राहिली. दोनक्षण तसेच गेले असतील अन् अचानक माधुरी आक्रमक झाली, एकाएकी ती दिसेल ते त्या मुलांच्या दिशेने भिरकवायला लागली , डोळ्यातुन रागमिश्रीत अश्रू वहात होते, तोंडाचा पट्टा सुरू झाला, आज आठवण आली का रे तुम्हाला ?एवढे दिवस नाही आला जिवंत की मेली पहायला ! आता कशाला आले ?एक ना अनेक प्रश्न होते, तो तरुण भांबावून गेला होता, काय होतयं त्याला कळत नव्हते, ही अर्धनग्न वेडी म्हतारी असे का करतेय हे त्याला कळत नव्हते, माधुरीचा हात अन् तोंडाचा पट्टा सुरूच होते.त्या मुलाने तीला निट पाहिलेच नव्हतं, आता त्यानं तीला ओळखलं होतं, तो धिटाईनं समोर येत म्हणाला , आज्जी ! आमचं चुकलं , पण मी तुला न्यायला आलोय चल माझ्यासोबत घरी . त्याच्या ह्या वाक्यावर माधुरी अधिक चवताळली, सगळं ओरबाडून घेतलं तुम्ही  माझं ! आता आणखी काय हवयं ? थांब ! असं म्हणून माधुरी झोपडीकडे धावली , ती काय करते हे पहायला समाधान पाटीलही तीच्या मागेच गेले. झोपडीत माधुरीनं तीच्या गोधडीखाली उकरून एक डबा बाहेर काढला , बाहेर आणून त्या मुलाच्या अंगावर तो डबा फेकत ती म्हणाली.. हे पण घेऊन जा !जा घेऊन ! पण आता मी यायची नाही !. तो डबा त्या मुलाच्या डोक्यावर लागला होता . तो कसाबसा सावरुन उभा होता , हा सगळाच अनुभव त्याला नविन होता, अकल्पित होता . समाधान पाटलांची आईनं माधुरीला हात धरून एका ठिकाणी बसवलं. पाणी देउन शांत केलं, तो पर्यंत त्या मुलाने कुणालातरी फोन लावला, काका ! काका ! आज्जी सापडली ! तुम्ही लवकर या ! हो !मी ईथेच थांबतो !तुम्ही या लवकर ! एवढंच फोनवर बोलुन तो माधुरीकडे वळून म्हणाला काका येईलचं संध्याकाळ पर्यंत, तो सेलु पर्यंत आलाय , मी थांबतो ईथेच ! माधुरी काहीच बोलली नाही, ती फक्त रडत होती , समाधान पाटलांची आई तीला घरात घेऊन गेली, समाधान पाटीलांनी त्यामुलांच्या चहापानाची व्यवस्था केली, माधुरीने  आक्रमक होउन पुन्हा त्यांच्यावर हल्ला करु नये म्हणून ते त्या मुलांसोबत तीथेच बसले.त्यांनी त्या मुलांची विचारपूस केली, तो गजानन चा मोठा मुलगा होता, यात्रेच्या काळात व्यवस्थित दर्शन होत नाही म्हणून गावातले काही लोक परवा दर्शनासाठी आले होते, त्यातल्या एकाने लिलाबाईंना ओळखले होते. पण त्यांचा एकुणच अवतार पाहुन त्या वेड्या झाल्यात व आपणावर हल्ला करतील ह्या भितीने तो काहीच बोलला नव्हता पण गावात आल्यानंतर त्यान दिनकरला सांगितले, त्यानुसार रात्रीच मित्रांसोबत गजानन चा मोठा मुलगा येउन पोहचला होता , दिनकर बसने सकाळी निघाला होता. तो मुलगा लिलाबाई हरवल्यानंतरची एकेक घटना समाधान पाटलांना सांगत होता.

लिलाबाई हरवल्याची तक्रार दाखल करून दिनकर घरी आल्यावर गजानन, गोकुळा व दिनकर यांच्यात। मोठा वाद झाला होता, गोष्टी मारामारी पर्यंत गेल्या होत्या. गावातल्या जाणत्यांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला होता . दिनकरच्या चकरा सुरुच होत्या, तो प्रत्येकवेळी परत आला की वाद व्हायचे . छोट्या छोट्या कुरबुरी सुरुच रहात. त्यात भर म्हणून गजाननचं व्यसन वाढलं होतं त्यामुळे वाद आणखी वाढत . त्यातच लिलाबाईंच्या मृत्युची नोंद करून शेती व मालमत्ता वाटुन घेण्याचा प्रस्ताव गोकुळाने पुढे केला होता, त्यामुळे आधीच दोघांवर चिडलेला दिनकर आणखीनच भडकला होता. पण आपल्या आई बाबांच चुकतय ही बाब गजाननच्या मुलाच्या लक्षात येत होती, त्यामुळे तो चुलत्यासोबत होता. दोघा चुलत्या पुतण्याचं पटतही होतं. त्यामुळे गोकुळाचा प्रयत्न दोघांनी मिळून हाणून पाडला होता . त्यारागामुळे तीने मुलाला घराबाहेर काढला होता, तो काका काकुकडे रहात होता. काकाने आज्जीला शोधन्यासाठी केलेले प्रयत्न त्याला ठाऊक होते अन् म्हणूनच बातमी मिळताच तो मित्रांसोबत तातडीने निघाला होता. मुलांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर, त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देउन समाधान पाटील उठले, तुमच्या जेवनाची तयारी करतो, तुमचे काका आले की सांगा , असे सांगून ते तयारी करायला निघून गेले. घरी माधुरी त्यांच्या आईजवळच बसलेली होती, वागण्या बोलण्यातली आक्रमकता कमी झाली असली तरी मनातलं शल्य डोळ्यातून गालावर अखंड ओघळत होतं. मुलांनी सांगितलेल्या सर्व घटना त्यांनी माधुरीला सांगितल्या, तीनं घरी परत जावं म्हणून दोघं मायलेक माधुरीची समजुत काढत होते . ती बोलत काहीच नव्हती , पण ती तयार होईल असं दोघांनाही वाटत होत.

एवढ्यात बाहेरच फाटक वाजलं, काका काकु आले हे सांगायला तो मुलगा आला होता, समाधान पाटलांनी त्यांना घरीच बोलावून घेतलं.दोघही घरात आले. माधुरी आतापर्यंत बरीच शांत झाली होती. दिनकर घरात आल्या आल्या आईच्या गळ्यात पडुन रडत होता, काय बोलावं हे त्याला उमगतच नव्हतं. मिनाही सासूची अवस्था पाहून रडत होती. दोघांच्या डोळ्यातले अश्रू नातवानं सांगितलेल्या घटनांच्या सत्यतेची साक्ष देत होते. समाधान पाटील व त्यांची आई भरल्या डोळ्यानं तो भावनिक सोहळा डोळ्यात साठवत होते. दिनकर व मिनाच्या अश्रुंमध्ये माधुरीची ओळख वाहुन चालली होती, वेडेपणाचं बुच्चन विरघळून गेलं होतं, लिलाबाईंचा पुनर्जन्म होत होता.  जेवणाचं वाढलयं चला जेवायला ह्या समाधान पाटलांच्या पत्नीन दिलेल्या आवाजाने सारे भानावर आले. जेवतांनाही विषय सुरुच होता, लिलाबाई काही घरी जायला तयार नव्हत्या. शेवटी साऱ्यांनी समजावल्यावर त्या तयार झाल्या पण गजानन व गोकुळा कडे जाणार नाही ह्या अटींवर . तो पर्यंत बरीच रात्र झाली होती.त्यामुळे आज रात्री ईथेच मुक्काम करावा, रात्री पाहुनचार करून उद्या सकाळी निघन्याचा समाधान पाटलांचा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला होता. दरम्यान आज्जीनं रागाच्या भरात अंगावर फेकलेला डबा नातवानं उघडला होता , त्यात पैसे होते, सर्व रक्कम विस हजाराच्याघरात होती. त्याही परिस्थितीत लिलाबाईंनी साठवलेल्या त्या रकमेचं सर्वांना कौतुक वाटलं.लिलाबाईंची झोपडीसुध्दा सर्व जाउन पाहून आले होते.दुसऱ्या कुणाला कामात येईल म्हणत दिनकरला त्यांनी ती तोडु दिली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी सैलानी बाबाचे दर्शन घेतले, ज्या मारोतीरायानं ह्या संकटात निभावून नेलं त्या मारोतीसमोर डोकं टेकवून लिलाबाई घरी जायला निघाल्या होत्या. लिलाबाईंना घरी जाण्यासाठी समाधान पाटलांनी गावातील गाडी भाड्याने मिळवून दिली. गाडी घेऊन गाडीवाला हजर। होता. समाधान पाटलांच्या आईने लिलाबाईंना साडीचोळी केली होती . प्रसंग भावनिक होता, सर्वांना आपापल्या अश्रुंवर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं, पाटील परीवारही साश्रु नयनांनी लिलाबाईंना निरोप देत होता. घरी जड झालेले अनेकांना यात्रेत सोडलेले त्यांनी पाहिले होते, पण घरी परत जाण्याच्या एकमेव उदाहरणाचे ते साक्षीदार होते. लिलाबाई गाडीत बसल्यावर गाडी सुरू झाली, पुनर्भेटीच आश्वासन देऊन गाडीत बसुन लिलाबाई निघाल्या. गाडी सुसाट वेगानं धुळ उडवत निघाली. अनेक आठवणी, त्या रस्त्यावरच्या ठिकानांवर झालेले मानापमान ह्यांचा धुरळा माधुरीच्या मनात होता तर आपल्या मानसांमध्ये कशाचीही शाश्वती नसतांना आपण परत चाललोय ह्या विचारात लिलाबाईंच मन आनंदानं सैलानी झालं होतं.......

 

©® दिपक सुर्यकांत जोशी

चिखली, जि. बुलढाणा

9011044693

8530944693

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू