पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुखाशी गट्टी करोना

॥ श्री ॥

#सुखाशी गट्टी ‘करो’ना! #८१
©आसावरी केळकर-वाईकर

मागच्या लेखात किल्लाबांधणीचीच इतकी धांदल उडाली कि बाकी सगळंच राहून गेलं आणि खऱ्याखुऱ्या दिवाळीच्या व इतर काही धांदलीत लिहायला बसायला आठवडा उजाडला. तर दिवाळीची सुट्टी म्हणजे नुसती किल्ल्याची धमालच असं नसायचं. अनेक अद्भुतरम्य गोष्टींनी सजलेला तो एक मोठा सोहळा असायचा. किल्ला बांधला गेल्यापासून त्यावर चित्रं मांडून तो सजवण्याचा दिवाळीचा दिवस येईतोवर मधे खूप काही घडायचं. घरातल्या सगळ्यांसाठी नवीन कपड्यांची खरेदी व्हायची. असा आवर्जून सण साजरा करणं, ही फार वेगळी गोष्ट असायची आणि त्यातला आनंदही अवर्णनीय असायचा. कपडे खरेदी करताना सुरुवातीला ‘चॉईस’ची काही भानगड नसायची, मात्र शिंगं फुटायचं वय आलं कि आईसोबत खडाजंगी व्हायला लागायची. आपल्याला ‘एलेगन्ट’ वाटणारा रंग आईला अगदीच ‘मंद’ वाटायचा आणि आईला ‘उठावदार’ वाटणारा रंग आपल्या डोळ्यांना एकदम ‘भडक्क’ दिसायचा. आपल्याला फॅशनेबल वाटणारं काही आईला ‘पोतेरं’ वाटायचं आणि आईला ‘सुंदर’ वाटणार काही आपल्याला अगदीच ‘गबाळं’ दिसेलसं वाटायचं. शेवटी वाद सोडवताना कात्रीत अडकलेले वडील ‘घालणार कोण आहे त्यांच्या सोयीनं घ्या’ असा संतुलित विचार मांडायचे तेव्हां जग जिंकल्यासारखं वाटायचं, पण बऱ्याचदा परत ‘ते काहीही सांगूदेत, पण कसलातरी अवतार केलेलं मुळीच चालणार नाही’ म्हणत बहुतांशी घरांत आयांच्याच मतानुसार खरेदी व्हायची. आपली मुलगी टीनेजमधे आल्यावर त्याकाळच्या मुलींना आपल्या आईची भूमिका नीटच समजते! असो!

हळूहळू आपल्या आणि आजूबाजूच्याही सर्वच घरांतून फराळाच्या पदार्थांचे खमंग वास दरवळायला सुरुवात व्हायची. पदार्थ तयार झाल्यावर देवापुढं नैवेद्य दाखवून ‘चव’ ओक्के आहे ना हे पाहायचं जबाबदारीचं काम आम्हा वानरसेनेकडं असायचं. त्यादिवशी लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळ्या, चिरोटा, करंजी ह्यापैकी जो पदार्थ तयार झालेला असेल तो आईनं-आजीनं वाटीत घालून दिल्यावर भर्रकन देवापुढं ठेवायचा, कुणीकडून डोळे मिटले न मिटले करत देवाला हात जोडायचे आणि ‘दाखवला नैवेद्य’ म्हणत दुसरी रिकामी वाटी घेऊन आई-आजीसमोर उभं राहायचं. ‘नीट मंडल काढून त्यावर ठेवलीस ना वाटी? आणि वाटीभोवती पाणी नीट फिरवलं कि निम्मं वाटीतच सांडलं?’ ह्या प्रश्नाचं उत्तर गोड हसून द्यायचं. चाणाक्ष आई-आजीला त्या हसण्यातून आपण कसा नैवेद्य दाखवला असेल ते कळायचं आणि त्यांचे मोठे झालेले डोळे बघत आपण निमूटपणे हातातली वाटी खाली ठेवून देवाला पद्धतशीर नैवेद्य दाखवण्याचा सोपस्कार पार पाडून येत विजयी मुद्रेनं पुन्हा ती खाली ठेवलेली रिकामी वाटी उचलायची आणि त्यात मिळालेल्या ताज्या पदार्थाचा बोकाणा भरून रसनातृप्तीचं सुख अनुभवायचं.

मात्र हे सुख असं सहजी लाभायचं नाही. शाळेत दिला गेलेला त्यादिवशीचा ‘दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास’ उरकला असेल तरच ती नैवेद्याची वाटी हाती लागायची. अनेक प्रकारचे आनंद लगडलेल्या ह्या दिवाळीच्या परमसुखाला आपलीच दृष्ट लागू नये म्हणूनच कि काय, रोज किमान दहा ओळींचं शुद्धलेखन, वयोमानानुसार एक ते दहा किंवा अकरा ते वीस किंवा एकवीस ते तीस पाढे दहा वेळा काढणं, रोज एक निबंध लिहिणं, सुट्टीत दैनंदिनी लिहिणं, सुट्टीत गावाला जाणार असल्यास प्रवासवर्णन लिहिणं वगैरे शत्रू शाळेतल्या शिक्षकांनी अंगावर सोडलेले असायचे. मास्तरांच्या किंवा मास्तरीण बाईंच्या ‘क्रिएटिविटी’नुसार ह्यात मनाचे श्लोक, गीतापठणापासून दिलेल्या कसल्याशा विषयावर भाषण लिहून मग ते पाठही करण्यापर्यंत काहीही असायचं. मात्र खिडकीतून दिसणाऱ्या आपण स्वत:च्या हातांनी बांधलेल्या देखण्या किल्ल्याकडं पाहात हे सगळं झेलायला हुरूप यायचा आणि सगळं उरकून किल्ल्यापाशी लवकरात लवकर पोचायच्या स्वप्नानं ह्या गोष्टींना गतीही यायची.

घाईघाईत उरकायचा म्हणून केलेल्या अभ्यासात अक्षर फराटेदार आलं तर ते पान सरळ टरकावण्याइतके निष्ठूर पालक आमच्यापर्यंत सगळ्या पिढ्यांना लाभले, म्हणूनच आता ‘हस्ताक्षर सुधारण्यासाठी’ कुणी पोर क्लासला जातंय हे ऐकते तेव्हां मला त्या सशाचं काळीज लाभलेल्या पालकांविषयी लैच कुतुहल वाटतं. आमच्यावेळी शत्रूचं मुंडकं उडवून एका दमात त्याची कटकट खलास केल्यासारखं एकदा पान टरकवायचं कि मामला खलास असं धोरण असायचं. पुढच्या वेळी पोरं मान मोडून नीटच अक्षर काढायची. मास्तरांनी पान फाडलं, कानफाडीत वाजवली, चोपल्यावर पाठीवर वळ उठले, पट्ट्या खाऊन हात लाल झाले म्हणून आमच्या पालकांनी कधीच मोर्चा नेला नाही. किंबहुना मास्तरांचं सत्कृत्य घरी कळायचंच नाही कारण आपले आदरणीय पालक मास्तरांच्या असल्या प्रयत्नांना तन्मयतेनं साथ देणार आणि उलट घरी आणखी मोठा सत्कारसमारंभ व्हायचीच खात्री असायची. त्यामुळं मास्तरांना लगेचच नीट ‘मोत्या’सारखं अक्षर काढून दाखवून शांत करणं हा एकच श्रेयस्कर मार्ग होता! आज एखाद्यानं कॅलक्युलेटर हुडकायच्या आत क्षणात एखादा हिशोब करता येतो, ‘वाव, सच अ ब्युटिफुल हॅन्डरायटिंग’ अशी कमेंट मिळते, ‘तुमच्या मुलांचे संस्कृत उच्चार इतके स्पष्ट कसे काय?’असं मुलांचेच शिक्षक म्हणातात तेव्हां मनभर आनंद दाटून येत असतो पण ह्याच्या श्रेयनामावलीत खरंतर आमचे निधड्या छातीचे पालक आणि मास्तरच!

तर, ऐन दिवाळीच्या सुरम्य वातावरणातही हे संस्कार करून घेण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय नसायचाच. मात्र एकदा अभ्यास पार पडला कि दिवस मग आपलाच अशी अवस्था असायची. दिवाळीआधी घराची संपूर्ण स्वच्छता, फराळाचा घाट, त्यात ज्या आयाही नोकरी करत त्यांच्या रजेच्या किंवा सुट्टीच्या गणितात बसवावी लागणारी धामधुमयुक्त समीकरणं ह्यात आम्हा पोरांना खाणं आणि अभ्यास झाला कि देवालाच सोडलेलं असायचं. मग सगळे मावळे आपले किल्ल्यापाशी जमायचे. रोज उठून नव्या कल्पना लढवून त्यात आणखी काहीतरी जोडकाम करणं, उगवून येणारे कोंब निरखणं, किल्ल्यावर पाणी मारणं, ढासळलेला एखादा बुरूज, माची वेळीच लिंपून किल्ला सुरक्षित करणं ह्यात दिवस कसा संपायचा कळायचंच नाही. मधेअधे वाड्यातल्या एखाद्या काकूंना ऐनवेळी एखादा पदार्थ कमी पडला तर आणून दे, अनपेक्षित कुणी पाहुणेरावळे आले तर पाहुण्याच्या कॅटॅगिरीनुसार आईनं दिलेले पैसे घेऊन चहाला जास्तीच्या दुधापासून, सोबत द्यायला पेढे कलाकंद ते ओटी भरण्यासाठीच्या नारळापर्यंत काहीही आणावं लागायचं. एकूण सगळी मौज असायची.

एकदाचा प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस उजाडायचा. थंडीला सुरुवात झालेली असायची. गारठ्यातच भल्या पहाटे आम्ही उठेतोवर तुळशीपाशी, दाराशी ओळीनं आणि घरातल्या प्रत्येक खोलीत, माडीवर सगळीकडं पणत्या लागलेल्या असायच्या. उठताक्षणी त्या दिवल्या डोळ्यात साठवताना मन तेजाळून जायचं. तोंड धुवून येईतोवर पाटाभोवती रांगोळी घालून तबकात निरांजनं तेवत असायची. औक्षण झालं कि वाटीतल्या सुगंधी तेलाचे जमिनीवर तीन ठिपके काढले जायचे आणि दुसऱ्या वाटीतल्या उटण्यासोबत आई-आजीकडून छान अंग रगडलं जायचं. त्यानंतर मोरीत कडकडीत पाण्याचे शास्त्राचे दोन तांबे तरी आई डोक्यावर घालायची आणि एकदाची अंघोळ उरकून नवीन कपड्यांत सजलो कि सगळेजण आपापलं सैन्य घेऊन किल्ल्याकडं कूच करायचं. तिथं ठेवायला पणत्या मिळायच्या आणि त्या प्रकाशात शिवाजी महाराज ऐटबाजपणे गडावर स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर मात्र मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणं सहिष्णुतेनं सगळ्यांनाच किल्ल्यावर कुठं ना कुठं स्थान मिळायचंच. कुणाला ना म्हणून नसायची. पणत्यांच्या उजेडात चित्रांमुळं जिवंत झालेला तो किल्ला निरखताना अक्षरश: धन्यधन्य वाटायचं. क्षणभर आपण रायगडावर महाराजांसमोर उभे आहोत असं वाटून त्यांना मनोमन मुजराही केला जायचा. ते भारावलेपण ही अनुभवायचीच गोष्ट!

थोडं मोठं झाल्यावर अंगणात रांगोळी घालण्याचं काम मुलींकडं यायचं. दिवाळीतल्या रांगोळ्या अगदी खास, अनेक रंगांनी सजलेल्या! त्यातही सुरुवातीला एकाच जागी बसून हात लांबवून संपूर्ण रांगोळी काढायला जमायचं नाही. मग रांगोळीच्या दिशेत तीनशे साठ अंशात फिरल्यावर थट्टा केली जायची, रांगोळी काढायची गती कमी असायची तर ‘आजच्या दिवसात होतीये रांगोळी कि भाऊबीजेलाच पूर्ण होणार?’ अशी मस्करी व्हायची, कधी एखादा आकार नीट जमला नाही तर ‘फुलाची मान का वाकडी झालीये बरं?’ किंवा ‘पणतीला असा बाक का आलाय?’ वगैरे शेरे हसतहसत मारले जायचे. मग रोजच रांगोळीचं काम करावं लागून वर्षाभरात एक्स्पर्ट झालो कि पुढच्या वर्षापासून रांगोळी पूर्ण होताहोता ‘तायडीची रांगोळी बघ ये आधी’ असे कौतुकोद्गार वाट्याला आले कि मोठा सन्मान झाल्यासारखं वाटायचं. रंगसंगती जमवण्याची कलाही अशा प्रयोगांतूनच साधली जायची. आजूबाजूच्या घरांसमोरच्या रांगोळ्या मुद्दाम बघून यायची ऑर्डर असायची, जेणेकरून त्यातून चांगल्या चार गोष्टी मनात रुजाव्या.

मग देवाला जाऊन येणं हे कंपलसरी असायचं. आम्ही पोरं गड सजवेतोवर घरातल्या सगळ्यांचंच आवरून देवाची पूजा वगैरेही झालेली असायची. थोडं उजाडायलाही लागलेलं असायचं. मग घरातले सगळेजण देवाला जाऊन यायचो आणि आल्यावर फराळावर ताव मारून पुन्हा किल्ल्याकडं कूच हाच कार्यक्रम असायचा. त्यातच आईची फराळाची ताटं भरून झाली कि ती शेजारी-पाजारी देऊन येणं हे पण मोठं काम असायचं. तशीच शेजारून आपल्याकडंही अशी चवदार ताटं आली कि त्यातले आवडीचे पदार्थ फस्त करायचं हे तर योग्य वेळेतच साध्य करण्याचं काम!
ह्याबाबतीत एक गोष्ट आठवते जेव्हां दिवाळीसाठी आम्ही आजोळी कऱ्हाडला जायचो तेव्हां गल्लीतल्या पोरांसोबत किल्ल्याची मजा तशीच असायची, पण आणखी एक प्रथा होती. सातच्या आत आम्ही घरातले सगळेजण देवाला जाऊन परत यायचो आणि सात वाजता परीटकाका म्हणून आजोबांचे एक मित्र त्यांच्या संपूर्ण परिवारासह घरी यायचे. मग त्यांना आधी कापडचोपड, फराळ द्यायचा आणि मगच घरातल्यांनी खायचं. आजी-आजोबा सांगायचे कि, पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती कि आपल्या समाजव्यवस्थेनुसार तथाकथित कनिष्ठ वर्गियांचा आपण मानपान करायचा. तो त्यांचा मानाचा दिवस, मगच आपण घरातल्यांनी खायचं-प्यायचं. मला ह्या प्रथेतल्या वरिष्ठ-कनिष्ठपणाच्या भेदाकडे लक्ष देण्यापेक्षा कामानुसार निर्मिलेल्या समाजव्यवस्थेत एकमेकांप्रती जपली जाणारी बांधिलकी अक्षरश: भुरळ घालायची.

मला आठवतंय कि आम्हा मुलांनासुद्धा हे कुटुंब येऊन त्यांचा मानपान होईतोवर फराळ मिळायचा नाही. हाही संस्काराचाच एक मोठा भाग! संयम, प्रत्येकाच्याच कामाचं महत्व जाणणं, त्याप्रती जाणीव ठेवणं, दानत राखणं असे किती संस्कार ह्या एका गोष्टीतून संक्रमित होत असतील! ह्या कुंटुंबाकडे कधी गेलेलं मला आठवत नाही कारण आमचं फक्त सुट्टीतच जाणं व्हायचं, आम्ही कऱ्हाडात स्थायिक नव्हतो. मात्र इतक्या वर्षांचे संबंध त्यांनीही इतके मानले होते कि माझ्या लग्नाला पोस्टानं पाठवलेल्या पत्रिकेच्या आमंत्रणावर ते संपूर्ण कुटुंब कऱ्हाडहून आलं होतं. खरंतर, तोवर माझे आजोबा हयात नव्हते त्यामुळं आजीही काकाकडं आली होती, कराडात कुणीच नव्हतं. ते दिनकर परीटकाकाही म्हातारे झाले होते. तरीही बाळाकृष्णदादांच्या (माझे आजोबा) नातीचं लग्न म्हणून उत्साहानं सगळे आले होते आणि दिनकरकाकांना मी नमस्कार केल्यावर त्यांचे डोळे भरून आले होते. समाजात सुव्यवस्था, बांधिलकी, शांतता अशी जाणिवेनं घडणाऱ्या गोष्टींतून, जपल्या जाणाऱ्या संबंधांतून राहात असावी, गटातटाच्या राजकारणानं नव्हे!

कितीतरी वर्षांनी आज परत मी आमच्या कऱ्हाडच्या वाड्याच्या सोप्यावर जाऊन पोहोचले. टोपी घातलेल्या आजोबांनी आणि नऊवारी साडी-नथीतल्या आजीनं औक्षणासहित केलेला तो मानपान अंत:चक्षूंना लख्ख दिसला. आजूबाजूला आई-पपा-काका-आत्या, आम्ही सगळी भावंडं सगळे उभे असलेलो दिसलो आणि डोळे भरून आले. आपल्याकडच्या प्रथांमधे दडलेला अर्थ हा शब्दांत बांधण्यापलीकडचा आणि अनुभूतीनं जाणण्याचा आहे, माणसातलं माणूसपण राखणारा आहे, प्रत्येक कामाचं महत्व जाणण्याचा आणि मानण्याचा आहे. प्रत्येकाचा मान ठेवणारा आहे. आज काळ खूप बदलला आहे, खरंतर चांगल्या अर्थानं... त्याकाळी कनिष्ठ समजल्या वर्गातही शिक्षणाची ओढ रुजते आहे. मात्र, त्यासोबत घाणेरडं राजकारण साधण्यासाठी मनामनांमधे पेरलं जाणारं विष समाज ‘सुशिक्षीत’ होण्यात अडसर ठरतंय आणि बांधिलकी नामशेष होत माणसाचं जगणं आतून पोखरत चाललंय! त्यापेक्षा पूर्वीचं शिक्षणाशिवायही प्रत्येक माणसाचं सन्मानानं जगणं काय वाईट होतं!
ही दीपावली सर्वार्थाने वेगळेपण ल्यायलेली... पणत्यांची आरास नाही करता आली तरी चालेल, मात्र प्रत्येकाची आत्मज्योत उजळून यावी. त्या प्रकाशात खऱ्या अर्थानं निर्मळ असणाऱ्या अंतरंगाचं दर्शन आपलं आपल्यालाच घडावं आणि माणसातलं माणूसपण परत येऊन अवघी वसुंधरा सतेज व्हावी, हेच त्या जगन्नियंत्याला साकडं!

- आसावरी केळकर-वाईकर २१/११/२०२०
#आली माझ्या घरी ही दिवाळी....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू