पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शपथ

                       शपथ


               

    



         सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रतिक्षालयात तो आणि ती थांबले होते. डॉक्टरांच्या बोलावण्याची वाट पाहत, डॉक्टर आरव गिरकर यांच्याकडे नंबर लावला होता. 

   डॉक्टर आरव गिरकर एक नामांकित  तज्ञ होते. ह्या अगोदर त्यांची बऱ्याच वेळा भेट झाली होती. त्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या.त्यामध्ये सोनोग्राफी, सिटीस्कॅन वगैरे होतं. हॉस्पिटलमध्ये या सोयी नसल्यानं बाहेरून त्यात करून आणावा लागत होत्या.

   ते दोघे जण बसले होते. जवळ सगळे रिपोर्ट होते. लक्ष होतं कधी आपले नाव पुकारले जाईल. थोडी चिंता, थोडसं भय मनात होतंच.

  प्रतीक्षालयात बसलेल्या प्रत्येकाच्या  नजरेत चिंता होती. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रस्त होते. हॉस्पिटल मध्ये पाच वेगळे डॉक्टर कार्यरत होते.प्रत्येकाची वेगळी स्पेशालिटी होती. त्यामुळे तशी गर्दी होती.

   डॉक्टर आरव त्यांचा कामात एकदम तरबेज. कित्येक  गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या होत्या.त्यांचा हात फिरला की आजार रोग्याला सोडून पळून जायचा.शहरात त्याचा हात धरणारा कोणी नव्हता.

   गर्दी कमी होत नव्हती. वाढत नव्हती. एखादा पेशंट आत गेला की नवीन पेशंट यायचा. प्रतीक्षालय थांबायचा.

   " आणि किती वेळ लागेल?" तिने त्याला विचारलं,

   " आता आपलाच नंबर आहे."

   ती शांत,

  " त्रास होतोय का?"

  " नाही,नाही, असं काही नाही."


  तो आणि ती दोघांचा संसार. अत्यंत खडतर, अत्यंत परीश्रमाचा, अत्यंत विश्वासाचा. एकमेकावर दोघांचा खूपच विश्वास होता.

    अलीकडे तिला त्रास होऊ लागला. सुरुवातीला पोटात दुखणे, हळूहळू वाढत चालले होते. प्रथम त्याने तिला सांगितलं नाही पण नंतर त्रास होऊ लागला. त्याने ओळखले की तिला काहीतरी त्रास होतोय. खूपदा विचारल्यावर  मग तिने आपल्या व्याधिविषयी सांगितलं.

   प्रथम फॅमिली डॉक्टरला दाखवलं. औषधांचा काही उपयोग होत नव्हता. त्यांनी उच्चशिक्षित डॉक्टरना  दाखवण्याचा सल्ला दिला.

   त्यांनी स्पेशलिस्टना  दाखवले. त्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्या.रिपोर्टनुसार  जठरामध्ये एक गाठ वाढत होती. ते काढून घेणं भाग होतं.

    तीन डॉक्टर झाले. त्यांचा खर्चाचा आकडा पाहून तो भेदरून गेला. आवाक्याबाहेरचा खर्च होता. मग त्याला कोणीतरी सल्ला दिला.डॉक्टर अरव गिरकर यांचं नाव सांगितलं.सगळे रिपोर्ट घेऊन दवाखान्यात आला होता.

    त्याचं नाव पुकारलं गेलं.

    तो तिच्यासह आत आला.डॉक्टरनी  सगळे रिपोर्ट बघीतले. शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मग तो मांसल भाग टेस्ट करावा लागणार होता. कॅन्सर असेल तर मग आणखी गुंतागुंत वाढणार होती. कँन्सर  नसावा असं डॉक्टरांनासुद्धा वाटत होतं

  " मग कधी करायचं ऑपरेशन?"

  त्यानं तिच्याकडे बघितलं. मग हळू आवाजात बोलला.

  " सर, पैशाची जोडणी करायला तर पाहिजे. किती खर्च  येईल?"

  "खर्च जास्त आहेच.पण मी तुमचे जास्त पैसे घेणार नाही. माझे पैसे कमी करीन.तुम्हाला स्वस्त सुविधा मिळावी म्हणून मी प्रयत्न करतो. तरीपण सव्वा लाखापर्यंत खर्च येइल."

   " बरोबर आहे. इतर ठिकाणी मला खूप पैसे सांगितले".

  " हो ना?आणि ऑपरेशनच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. सगळं माझं मी बघून घेईन. बघा लवकर ऑपरेशन करून घ्या."

   " हो, पुढच्या आठवड्यात."

  " काही हरकत नाही. कारण त्यानंतर मी खूप बिझी असणार आहे"

  " कुठे बाहेर जाणार आहात कां?"

  " नाही, इथेच आहे. कोर्टामध्ये एक काम आहे. खोटी साक्ष द्यावी असा काही खल प्रव्रतिच्या मंडळीचा माझ्यावर दबाव आहे. पण मी घाबरत नाही. मी कधी सत्य सोडणार नाही. कारण सत्याचाच नेहमी विजय होत असतो. म्हणून सांगतो त्यापूर्वी ऑपरेशन करून घेऊया.पण एक सांगतो, कुठलीही चिंता करू नका.तिस ते चाळीस मिनिटाचं आँपरेशन असेल. सहजासहजी होऊन जाईल."

  " चालेल साहेब, अत्यंत आभारी आहे."

  दोघेही उठले.



      तो आणि ती. 

      दोघांचं कुटुंब. दोघांव्यतिरिक्त कोणी नव्हतं.त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिला थोडा जरी त्रास झाला तर त्याला सहन व्हायचं . तिच्या डोळ्यातलं अश्रू तो कधी बघू शकत नव्हता. एवढा कठोर काळजाचा तो पण तिच्या नजरेत म्रदू व्हायचा.

    तो एक फुटकळ  गुंडगिरी करणारा होता. एका गुंडांच्या टोळक्यात  काम काम करत होता. एकदम भडक डोक्याचा होता. तिरसट होता.

   एकदा  शेजाऱ्याने पाणी दारात सोडलं म्हणून रागाच्या भरात त्याला उचलून आपटला.  शेजार्याचा हात मोडला. पोलीस कंप्लेंट  झाली. नंतर त्यांला  थोडी शिक्षा पण झाली. पण इथून तो बदलला. बाहेर आल्यानंतर त्याच्या गुंडगीरीचा प्रवास चालू झाला. त्याला गुंडांची साथ मिळाली होती .आता त्याला त्या वस्तीतल्या भाईनं आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं आणि मग तो दहशत माजवू लागला.

   वडील लहानपणीच गेलेले. एकटी आई होती. तिने पण आपल्या पोराचं कर्तत्व बघून डोळे मिटून घेतले.

   तो पोरका झाला पण त्याच्या मध्ये काहीही फरक पडत नव्हता.असाच होता. कोरड्या चेहर्याचा, डोळ्यात जरब, हातात ताकत होती.  कित्येक नातेवाइकांनी  सांगून पाहिले आणि सोडून दिले. हा काही बदलला नाही. तो आणि त्याची गॅंग हे त्याचं कुटुंब झाले.

   त्याचं लग्न झालं आणि मग संसार सुरू झाला.

   त्याला ती खूप आवडायची. ती दिसायला देखणी  वगैरे काही नव्हती पण बरी होती. पण मनापासून केलेला प्रेमाला दिखाव्याची गरज नसते.दोघांचा एकमेकांवर विश्वास होता.त्या विश्वासावर संसार उभा होता.

    तो गुंडगिरी करतोय, मारामारी करतोय हे तिला माहीत होतं.पण मनानं खूप चांगला होता. भला होता. नाहीतर सभ्य दिसणारे लोक किती कपटी असतात हे तिला माहीत होत.पण तिला हे काम आवडायच नाही. तिने त्याला खूप वेळा समजून सांगितले पण काही फरक नव्हता.मग त्यान मनावर घेतलं. हे काम सोडायचं . आता प्रामाणिकपणे काम करायचं.  मिळेल ते काम करायचं.  किती पण कष्ट पडते तरी हरकत नाही,कष्टाच्या पैशानं घर चालवायचं.

   पण तो योग येत नव्हता. आजचं उद्यावर ढकललं जात होतं. भाईच्या गँगमध्ये नेहमी काम असायचे. कुणाची उधारी  वसूल करायची,कुठला भाडेकरू उठवायचा, कोणाचा हात पाय मोडायचा.

   संसार काटकसरीचा होता. सुविधा कसल्या त्या नव्हत्या. पण होता तो एकमेकांवरचा विश्वास. पोलीस तरी नेहमी घरी यायचे.त्याला पकडून न्यायचे. कधी कस्टडीत ठेवायचे. कधीकधी तो जखमी होऊन यायचा. हातापायात,तोंडावर पट्टी बांधलेली असायची.पंधरा दिवस घरीच बसायचं आणि जखमा वाळल्या की मग परत येरे माझ्या मागल्या.

   तिलाही हे नको होतं.

   तिने त्याला सांगितले की हे सोडायला हवं. खूप झाले गुंडगिरी करणे. आता नको. आता इथून पुढे प्रामाणिकपणाचं आयुष्य जगायचं, कष्टानं जगायचं. हवं  तर आपण त्याला मदत करायची.आणि तिनं त्याच्याकडून शपथ घेतली. परत अशी कामं न करण्याचं वचन घेतलं.

   एका मालगाडीवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला बऱ्यापैकी पैसे मिळायचे.सुखानं चाललं.

   आता आणि एक मोठी अडचण आली.

   लग्नाला पाच वर्ष झाली पण मूल होत नव्हतं.

  दोघांनाही मूल हवं होतं. घरात कोणी रांगणारं असावं,दुडूदुडू पळणार असावं, रडणारं असावं, प्रेमळ असावं, आपलं असावं, आपल्या रक्ताचं असावं, आपल्या बाहुपाशात शांत निद्रा घेणारं असावं.

    अपेक्षा होत्या पण पूर्ण होत नव्हत्या.

   दवाखान्यात जाणं, टेस्ट करणे हे त्यांना पसंत नव्हतं. कारण स्पष्ट झाल्यानंतर कोणात तरी दोष असणार होता. मग एकाच्या मनात न्यूनगंड व दुसऱ्याच्या मनात नकारात्मकता.  मग कदाचित अंतर वाढणार होतं, दुरावा निर्माण होणार होता आणि हेच दोघांना नको होतं. कदाचित एकमेकांवरचा विश्वास कमी होणार होता. म्हणून हे रहस्य होते रहस्य असावं असं त्या दोघांचे मत. झाकली मुठ सव्वा लाखाची.


  आता हे आजारपण. कदाचित जीवघेणं ठरणार होतं. पैशाची सोय होत नव्हती .नशिबाने डॉक्टर आरव गिरकरांच्यासारखे देव भेटले पण पैशाचं काय? त्याची गुंड मित्र मंडळी होती  पण  संध्याकाळी पैसे भेटले की दुसऱ्या दिवशी खिसा रिकामा.

   आणि मग निकमांचा  फोन आला.त्याला माहिती होत असल काम सोडलंय तरी पण फोन केलाच. निकम म्हणजे गुंडांचा गुंड.पैसे देऊन काम करून घेणारे एक मोठा गुंड. एक खून करायचा होता.

    सुपारी निकमानी घेतली होती. त्यातलेच  थोडे पैसे त्याला देऊन तो  पैसे वसूल करणार होता. पण एका दमात दोन लाख मिळतात म्हणून हा तयार झाला आणि मग तिला त्याने दिलेल्या शपथीचा विसर पडला. कधी कोणाला हात लावायचा नाही, कधी कोणाला मारायचं नाही अशी शपथ त्याने तिला दिली होती आणि ती न तोडण्याचे वचन दिले होते.

    म्हणून तिची क्षमा मागायची. काय करायचं? तिच्यासाठी तर करते ना सगळ? आता ती शपथ तोडायची काही क्षणांकरता.

  

    ज्याला मारायचे तो कोणीतरी बडी असामी होती. त्याचं नाव, पत्ता वगैरे काहीही माहीत नव्हतं. पण एक मोटरसायकलस्वार जो दुचाकी चालवण्यात तरबेज आहे तो बरोबर होता. तो ती व्यक्ती दाखवणार होता. त्याला एक लोड केलेले पिस्तूल देण्यात आले होते. जर टारगेट एका गोळीत नाही झालं तर पूर्ण पिस्तूल खाली करण्याची मुभा होती. नंतर ते पिस्तूल परत द्यायचं होतं.

    मरणारी व्यक्ती कोणी का असेना पण मारायचं होतं. त्यापैकी बरेच लोक निरपराध असतात, प्रामाणिक असतात, कर्तव्यदक्ष असतात, कर्तव्यकठोर असतात. लालचावलेल्या ह्या पापाच्या चिखलात लोळणाऱ्या तकलादू यंत्रणेला अशी कर्तव्यतत्पर लोक नको असतात. त्यावेळी त्याला जन्मातून उठवायचं हा निर्णय यंत्रणेत असतो आणि आपल्यासारखे पैशाला लालचालवलेले लोक त्यांना जन्मातून उठवतांत.

    खरतर सुरुवातीला त्याला लोक घाबरायचे. त्याला पण बरं वाटायचं.हेच भय गुंडांना मोठे करण्यासाठी पुरेसं असतं.मग त्याचा अहंकार उन्मळून यायचा.आणि कुणाला मारलं की त्याच्या चित्कारात  मन बेफाम व्हायचं.एक नशा होती. एक धुंदी होती.अशा अवस्थेत त्याला  अत्यंत आनंद वाटायचा, सुख वाटायचं.

    आता मरणार्‍या किंवा मार खाणार्यांच्या मनातला भाव बघितला  की थंड पडायचा. त्याला पश्चाताप व्यायचा. 


   आज शप्पथ मोडायची होती.त्यांनं ठरवलं.आजचं काम शेवटचं.एक मर्डर करायचा. मग पैसे मिळाले दवाखान्यात जायचं.आँपरेशन करायचं. तिथून पुढं सामान्य आयुष्य जगायचे.कुणाला त्रास द्यायचा नाही.

    त्यामुळे त्यानं आपण काय करतोय याचा  तिला थांगपत्ताही लागू दिला नाही. कदाचित नाराज झाली असती, आडकाठी केली असती,आरडाओरड केली असती.बायकांचे अश्रू सगळ्यात अवघड असतात!

    सात वाजले. अंधार पडू लागला. आज एक मृत्यू होणार होता. त्याने पिस्तूल खिशात घातले. काही वेळात  सँडी येणार होता. तो एक निष्णात मोटरसायकलस्वार होता. मोटरसायकल मारण्यात वाकबगार होता.वार्याच्या वेगानं बाइक मारायचा.

   दारात मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला. तो बाहेर पडला. सँडीच्या पाठीमागे बसला.सँडीनं बाइक सुसाट सोडली.

    " कोण रे?कोणाला  मारायचं?"

    " माहीत नाही बाबा, मोबाईल वर इंफॉर्मेशन मिळणार आहे.बघु काय होत ते."

    सँडी बेफान गाडी सोडायचा. त्याला पकडनं कुठल्याही यंत्रणेला शक्य नव्हतं. एका चौकात त्यांनं बाजूला गाडी थांबवली. अंधार पडू लागला होता. खांबावरचे प्रखर लाईट उजळत होते. अंधार तर सर्वांनाच हवा असतो. निसर्ग नियमात बसत नाही ती सगळी पापकर्म अंधारात होतात. कारण अंधार चेहरे झाकून ठेवतो. मग दिवसाच्या उजेडात कुणाला समजत नाही की हाच तो पापकर्मी  होता.

     सँडीनं त्याला विचारलं,ऐ

   " काय रे? काय अडचणीत आहेस का?"

   " हो ना, ठरवलं होतं ह्या  फंदात पडायचं नाही."

   " अरे यार, हा धंदाच वाईट. एकदा पडला आजन्म संभाळावा लागतो. मरेपर्यंत आपण ह्यातून बाहेर पडत नाही. साधे पोलिससुद्धा  गिधाडासारखे टोचून टोचून खातात. माणसं संशयाने बघतात. चांगले आयुष्य जगायचं म्हटलं तरी पण जगता येत नाही."

    " माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे म्हणून!नाही तर.!"

    " हो का?खर्च जास्त असणार!"

    " तीच अडचण आहे बाबा!"

    " काय सालं नशिब.. कुत्र्यासारखे जिनं.. हे साले  ऑर्डर देणारे मजेत असतांत. मजेत जगतात. आपल्याकडे कुत्र्यासारखा तुकडा फेकतात. आणि काय कुठलं चांगलं काम करतोय आपण?  निरपराधांना त्रास देणं हे काम सोपं वाटलं तर तसं सोपं नाहीये ते !"

    " सँडी सोड आत्ता, परत काम करणार नाही."

    " वाल्याकोळी होणार आहेस का?"

    " नाही, आम्हाला भेटायला राम येणार आहे थोडाच? इथं आम्हाला हराम भेटतात सगळे.आणी सँडी, मी बायकोला वचन दिलंय..परत काम करणार नाही."

    " नशीबवान आहे गड्या, कोणीतरी तुला चांगलं सांगत असतं. कोणीतरी प्रेमाचं असतं .आमचं बघ गड्या..एकदम बेवारशासारखं..कोणीही नाही.. न आगे ना पिछे.."

    " नाही कसं? मै हु ना तेरे पीछे!"

    दोघेही मनसोक्तपणे हसली.आणी मग सँडीच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईल उचलला. पलिकडून इन्फॉर्मेशन मिळत होतं,

     " पांढरी स्कोडा ...एम एच झिरो वन डी एस वन-टू-वन-फाईव्ह.. गाडीत माणूस एकटाच आहे."

     दोघेही सावध झाले. फार वाट पहावी लागली नाही.

     पांढरी स्कोडा त्यांच्या समोरून पास झाली. नंबर तोच होता. सँडीनं गाडी स्टार्ट केली व पाठलाग सुरू केला. मोटरसायकल गाडीच्या पाठीमागे नेली. आता दोन्ही गाड्यांमध्ये फारसं तर नव्हतं. गाडीमध्ये चालकाव्यतिरीक्त कोणीच नव्हते.ड्रायव्हरच्या ठिकाणी जो व्यक्ती बसलेला होता, त्याला उडवायचं होतं.

    दोघेही सावध होते. त्यांनं हातात पिस्तुल घेतली.

    काही अंतरावर सिग्नल होता. स्कोडा सिग्नल जवळ थांबली. सँडीने मोटर सायकल पुढे घेतली. आता तो आणि स्कोडा चालक एका रेषेत आले होते.

    स्कोडाच्या चालकाचा  चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण त्याला त्याचा काही फायदा वा तोटा नव्हता. गोळी पिस्तूलातून  उडणार होती व त्या माणसाचा वेध घेणार होती. मग तो कोणीही असो..

      वे ऑन व्हायला बारा सेकंद होते. हळूहळू सेकंद कमी होऊ लागले दहा….पाच...तिन..

      आणि मग गोळी सुटली त्या चालकाच्या डोक्यात शिरली. तो तत्काळ गतप्राण झाला. पिस्तुलाचं काम संपलं होतं.टार्गेट पूर्ण झालं होतं. ह्या दोघांचे काम संपलं होतं. आता निघायला होतं.

    सँडिनं गाडी स्टार्ट केली व सुसाट सोडली. कोणीही त्याचा पाठलाग करू शकत नव्हतं.


      ती त्याचीच वाट पाहत होती.

    " उद्या जायचं ना दवाखान्यात?"

    "हो...जायचं."

    " पैशाचं काय केलं?"

    " झाली व्यवस्था."

    ती समाधानानं हसली.  त्यांनं काहीतरी करून पैसे उभे केले असणार याची तिला खात्री होती. आणि आपली शपथ तो मोडणार नाही याची तिला खात्री होती.


   नेहमीपेक्षा लवकर उठून तिने सगळं आटपलं. तोही उठला होता. आज  ऍडमिट, उद्या ऑपरेशन.. मग सगळं ठीक होईल. तिच्या चेहर्‍यावरचे वेदनेचे क्षण असणार नसतील कदाचित!

   तो उठला.पेपर घेतला. अधाशाप्रमाणे वाचू लागला.

   पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी होती. तो बातमी वाचू लागला. आणि क्षणात त्याचे भाव बदलले. तो सटपटला. त्याचा हात थरथरु लागला. चेहर्यावर

धर्मबिंदु साचले. त्याला काही सुचेना.आपण कोसळून पडतोय काय असं त्याला वाटू लागलं. त्यांनं घाबरत घाबरत बातमी वाचायला सुरुवात केली.

    " डॉक्टर आरव  गिरकर यांची निर्घण हत्या."


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू