पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आनंद वनातला आनंद यात्री

 

रसिक वाचकांनो,
पद्मगंधा प्रतिष्ठानने अनेक महनीय व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन पद्मगंधा स्वतः सन्मानित झाली आहे.

**आनंदवनातला आनंद यात्री--बाबाआमटे**

आंतरराष्ट्रीय किर्तीचे, पद्मविभूषण,आणि मॅगेसेसे पुरस्काराने सन्मानित, "आनंदवन" कुष्ठधामचे निर्माते मा.बाबा
आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचं ठरवलं आणि त्यांना पोस्टकार्ड पाठवलं . लगेचच साधनाताईंचा फोन आला
"ते पुरस्कार स्विकारतील परंतु ते येऊ शकणार नाही तेव्हा आनंदवनात येऊन पुरस्कार द्यावा लागेल .
चंद्रपूर ,वरोरा जवळच असल्याने प्रत्यक्ष त्यांना भेटावं म्हणून मी आणि माझी बहिण आम्ही दोघी गेलो.
साधना ताईंनी स्वागत करत म्हटलं " तुम्ही दोन मिनिटं त्यांना भेटू शकता,त्यांना अजिबात ऐकू येणार नाही "
त्यांना भेटायला मोठी रांग होती खरंच दोनच मिनिटात लोक परतत होते .
आम्हीही गेलो .बोलायचा प्रश्न नव्हता. आम्ही आत गेलो. ते स्ट्रेचर सारख्या उंच बेडवर झोपलेले होते , कमालीचे थकलेले होते पण चेहरा प्रसन्न, हास्य प्रसन्न होतं. दोघींनी नमस्कार केला. आमचं आमंत्रण त्यांनी स्विकारल्याचं सांगितलं . आम्ही परत फिरणार तोच त्यांनी बसण्याची खूण केली . आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली . हिंदी, मराठी ,इंग्रजी साहित्य, कविता , आणि कादंब-या यार ते बोलत होते वाटलं नव्हतं ते बोलतील म्हणून . गंगेचा अखंड ,अबाध प्रवाह गतीमान असावा तसे ते बोलत होते.
साधनाताई तीनदा येऊन गेलेल्या . अखेर आम्ही उठलो .मी नमस्कार केला . त्यांनी माझे भारावून जाऊन नमस्कारासाठी जोडलेले दोन्ही हात हातात घेतले . माझ्या डोळ्यात पाणी आलं तसं त्यांच्या डोळ्यातही . ही अनुभूती वेगळीच होती . बाहेर पडल्यावर बहिण म्हणाली,"वाटलं, आता कॅमेरा हवा होता."
दोनच महिन्यांनी पुरस्कार देण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठानची चाळीस आणि स्थानिक
काही लेखक मंडळी सत्कार करायला आनंदवनात पोहचलो .
संपूर्ण आनंदवन दाखवून आणल्यावर बाबांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे म्हणाले ." तुमचा कार्यक्रम तुम्ही सुरू करा हॉल मधे .बाबांना केवळ दोन मिनिटं आणू तेव्हा कार्यक्रम थांबवून त्यांचा सत्कार करावा ."
आम्हाला त्यांची कल्पना अगोदरच होती . मा. देवपुजारी. मा. पंकज चांदे, मा.वि. स. जोग. अशी सारी मंडळी व्यासपीठावर होती .
दीपप्रज्ज्वलन झालं . प्रास्तविक करण्यासाठी मी उभी राहिले . चारही वाक्यं झाली नाहीत तोच बाबांना फिरत्या पलंगावर आणण्यात आलं . त्यांची तब्येत बरी नव्हतीच . ते आले तसे व्यासपीठावरून सारेच खाली आले . त्यांचा सन्मान केला.
मी विचारलं खुणेनी "बोलाल थोडं?"
"त्यासाठीच आलोय" त्यांचा आवाज स्पष्ट होता.
आमचा व्यासपीठावरचा कार्यक्रम आता संपला होता. आम्ही श्रोता आणि ते वक्ता झाले होते . ते म्हणाले
" आयुष्याची संध्याकाळ गडद होत चालली असतांनाच विदर्भातल्या पद्मगंधाच्या चाळीस, पन्नास लेखकांनी इथे येऊन माझा केलेला हा सत्कार पहिलाच आणि कदाचित शेवटचा ही असेल . एखाद्या साहित्य संस्थेनी केलेला हा सत्कार पहिलाच म्हणून मला वाटलं बोलावं मनातलं जाता जाता सांगून टाकावं.
सूर्यास्त होत असतांनाच,सूर्यानी मागे डोकावून पहावं तसं मी जेव्हा बघतो, तेव्हा मला दिसतो कवितेचा निवांत प्रदेश. जिथे काळ मी रमत होतो . फुलांच्या प्रदेशातही मी रमलो . निसर्गानी मला वेडही लावलं पण माझं आंतरिक नातं जुळलं ते व्यथा ,वेदना , एकाकीपण , समाज बहिष्कृत लोकांशी.
स्वत: च्या कोषात मला मला मग राहणं जमलं नाही . वेदनांशी मी एकरूप झालो . वेदना माझी सखी झाली. तुम्ही कधीही कल्पना केली नसेल असं इथलं जीवन आहे
परंतु आज मी आनंदी आहे.माझ्या अंतरंगात कमालीचा आनंद मी आज सांगणार आहे .आणि मी जे आनंदाने मनमोर होऊन सर्वांना सांगतोय आणि ते तुम्हाला ही आनंदित करतंय हे मला दिसतंय .आनंद देणं खरंतर सहज असतं तो आनंदआपण शब्दातूनही देतो ,कॄतीतूनही देऊ शकतो. परंतु मनात इच्छा हवी .
मला खुप पुरस्कार मिळाले, त्या, त्या वेळी आनंदही झाला .पण तो क्षण संपला की, पुन्हा अस्वस्थ व्हायचं मग माझ्या मनात काविता फुलायची.
ललित शब्दात मनाचं आकाश नक्षत्रांनी भरून जायचं . कवितेची गंगोत्री मनातून समाज हितासाठी प्रवाहित व्हायची
तुम्ही सारे लेखक आहात , शब्दांची किमया तुम्हाला माहित आहे .
रोज मी नव्याने जगतो. तुम्ही ही जगून पहा. मनात चांदणं फुलतं,मी रोज आनंदाचं गीत लिहीतो आनंदवनात. मग सा-या आसमंतातून सप्तसूर उमटतात ., नाद प्रतिध्वनित होतात .आणि निराकाराचा प्रदेश डोळ्यासमोर साकार होत असतांनाच ते अभिमंत्रित आनंदाचे आवर्त मला पुन्हा पुन्हा कवेत घेतात."

त्यांनी मग एकामागून एक तीन कविता म्हटल्या. कधी तरी त्यांचा आवाज चांगला असावा. अंतरीच्या भावना व्यक्त करायला आवाजच हवा असं नाही.
त्यांच्या बोलण्यात कमालीचा स्नेह होता.त्यांना दिसत असावा, जीवनातल्या सीमे पलिकडचा प्रदेश.ते प्रसन्न होते.
" आजवर इथे एकेकटे अनेक नेते, कलाकार , साहित्यीक, सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले, परंतु चाळीस लेखकांनी एकत्र नागपूरहून येऊन केलेला सत्कार शब्दातीत आहे, भारावणारा आहे.
मी तुमच्यासह दिवस आनंदात
घालवला असता,परंतु आता सा-यालाच खुप उशीर झालाय."
ते अचानक बोलतांना थांबले.दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार केला . सारंच निशब्द झालं होतं.
त्यांचा फिरता पलंग नेतांना त्यांचे डोळे भरून आल्याचं जाणवलं.
पंचवीस मिनिटांच्या त्यांच्या बोलण्यात काय नव्हतं? आनंदवनाच्या कणाकणात मी कसा सामावलोय हे सांगितलं, कवितांच्या प्रदेशात , लावण्यमयी निसर्गाच्या प्रदेशात रमल्याचं सांगितलं. त्यांच्या भाषणात होता जीवनाभूतीचा सारांश,वेदनांचा आलेख ,समाजमनाची जाणीव, स्वकार्य निष्ठा, आमच्या विषयीचं अगत्य, शब्दही किती सात्त्विक , सुंदर,गतीमान ,उर्जावान असू शकतात,यांची प्रचिती आली .
ते गेल्यावर पुढच्या कार्यक्रमाला काहीही अर्थ नव्हता.
तिथून परततांना वाटलं आपल्याही जीवनाचा सुंदर आलेख आपल्या जीवनाच्या संध्याकाळी लिहीता आला पाहिजे .. मन भारावून गेलं होतं, . आनंदवनात दिसलेल्यात्यांच्या पदमुद्रांनी .

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू