पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नसते उद्योग


                         सते उद्योग

                       ===========

 


मी पाचव्या इयत्तेत होतो तेंव्हाची गोष्ट आहे ही.जगप्रसिध्द अशा अजिंठा लेण्या जिथे आहेत त्या अजिंठा गावात माझ्या वडिलांची हेडमास्तर म्हणून त्याकाळात बदली झालेली होती. 


अजिंठा गावात सराई म्हणून प्रसिध्द असलेल्या ऐतिहासिक संकुलात आमची शाळा होती. शाळेतील बहुतांश शिक्षक  सुध्दा या सराईतच रहात असत. शाळेसमोरच भव्य असे खेळाचे मैदान  होते आणि महत्त्वाचे म्हणजे अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता देखील या सराईमधूनच जात असे.भरपूर खोल्या व खूप मोठे व मोकळे असे मैदान आमच्या शाळेसाठी उपलब्ध होते, तसेच दोन शिफ्ट शाळेची पध्दत निदान तोपर्यंत तरी सुरु झाली नव्हती म्हणून सकाळी १० ते संध्याकाळी ४ या काळात आमच्या शाळेचे वर्ग चालायचे आणि ४ वाजेपासून ५ वाजेपर्यंत संपूर्ण शाळा या मैदानावर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यात मग्न असायची. 


शाळेतील जवळ जवळ सगळेच शिक्षक या सराईतच रहात असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर मुलांनी एकत्र खेळणे, एकत्रच फिरायला जाणे इत्यादि कार्यक्रम ही नित्याचीच बाब झालेली होती.दररोज संध्याकाळी सर्व ज्येष्ठ मंडळी फिरायला निघाली, की त्यांच्या पाठोपाठ आमची ज्युनिअर मित्रांची टोळी पण फिरायला निघायची व अजिंठा लेण्यांकडे जाणा-या रस्त्यावर साधारणपणे दीड-दोन  किलोमीटर दूर गेलो की तिथेच थोडावेळ चक्क सडकेवर बसून काही बैठे खेळ खेळून मग ही मोठी मंडळी परत येतांना दिसली की आम्ही सुध्दा घरी परत यायला निघायचो.


असेच एक दिवस फिरायला गेलो असता आज अजून थोडे लांब जाऊत असे सर्वांनी मिळून ठरवले व नेहमीपेक्षा थोडे दूर जाऊन बसलो. 


तिथे जवळच जास्त उंच नसलेले एक झाड दिसले व त्यावर काही हिरव्या  रंगाची फळे लागलेली दिसली व मग आमच्यापैकीच कुणीतरी हे बिब्याचे झाड असल्याचे व ही हिरव्या रंगाची फळे म्हणजे कच्चे बिबे असल्याचे सांगितले. 


एवढ्यात कुणीतरी ह्या बिब्यांमधून गोडंबी निघते अशी अतिशय "मौलिक" अशी माहिती पुरविली आणि मग काय मागचा पुढचा काही एक विचार न करता काही जण त्या बसक्या झाडावर चढले आणि केवळ काही क्षणातच चांगली टोपलीभर हिरवी फळे तोडून आणली व आमच्यासमोर टाकली. 


आम्ही अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या या सडकेवर नेहमी असेच बसायचो कारण त्याकाळी तिथून जाणा-या वाहनांची संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकीच असायची.    


सडकेच्या बाजूलाच डांबरीकरण आणि रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आणून ठेवलेले खडीचे ढिगारे पडलेले होते आणि ते बघून तोडून आणलेली ही फळे या खडीच्या दगडांनी ठेचून काढायची एक भन्नाट कल्पना आमच्या पैकी कुणाच्या तरी डोक्यातून निघाली आणि क्षणाचाही विलंब न लावता या कल्पनेवर अंमलबजावणी सुध्दा सुरु झाली. 


सगळ्यांनी थोडे थोडे बिबे वाटून घेतले. लहान मुली सागरगोटे खेळतांना बसतात त्याप्रमाणे पाय लांब करुन आम्ही सगळे बसलो. सडकेवर बिबा ठेवायचा आणि हातात असलेल्या  दगडाने तो ठेचायचा असा आमचा उद्योग सुरु झाला. बिब्यामधून गोडंबी तर काही निघाली नाहीच पण काही तरी रस मात्र नक्की निघत होता. इतकेच नव्हे तर तो रस आमच्या सगळ्यांच्या अंगावर देखील उडत होता पण खेळण्याच्या नादात कुणालाही काहीही कळाले नाही. 


सगळे बिबे फोडून झाल्यावर आणि ज्येष्ठ मंडळी दूरवर येतांना दिसल्यावर आम्ही पण घराकडे निघालो. घरी जाऊन हातपाय धुऊन रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे झोपी गेलो. 


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मात्र माझ्या दोनही मांड्यांवर तसेच हातांवर बरेचसे फोड आलेले दिसून आले. काही ठिकाणी काळे डाग पडले होते तर काही जागी आगही होत आहे असे लक्षात आले म्हणून मी आईला दाखवले तर काहीतरी उभरले असल्याचे तिच्या लक्षात आले व  म्हणून काल आम्ही काय काय उद्योग  केलं याची चौकशी सुरु झाली. 


शेवटी बोलता बोलता काल आम्ही भरपूर प्रमाणात बिबे दगडाने ठेचल्याची कबुली दिली व मग सगळीच धावपळ सुरु झाली. शेजारी राहणा-या इतर मित्रांकडे चौकशी केल्यावर त्यांना सुध्दा असाच त्रास कमी जास्त प्रमाणात झाला असल्याचे कळाले, पण सर्वात जास्त त्रास मलाच झाला असल्याचे लक्षात आले आणि त्याचे कारणही कळून चुकले आणि ते म्हणजे एक तर मी सर्वात लहान होतो व मीच एकटा काय तो हाफ पँट घालत असल्याने सगळ्यात जास्त बिबा माझ्या अंगावरच उभरला होता. 


मग डॉक्टरांचे औषध, मलम तसेच जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेले सर्व प्रकारचे उपचार माझ्यावर सुरु झाले व काही दिवसातच मी पूर्णपणे बरा झालो. उपचार तर झाले पण त्याबरोबरच परत असे "नसते उद्योग" न करण्याची सख्त   ताकीदही मिळाली. 


परिणामतः या घटनेनंतर बिब्याचे झाड दूर अंतरावर जरी दिसले तरी मी त्याच्या पासून चार हात दुरुनच चालायला लागलो अन् घरात देखील एखादा बिबा पाहिला तरी मी घाबरुन दूर पळून पळायला  लागलो. 

 


दिवाकर चौकेकर , गांधीनगर (गुजरात)
मोबाईल  : 9723717047.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू