पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पहिला पांडव

        पहिला पांडव 

       आज रेणुकाला आकाश ठेंगणे झाले होते. तिने लिहिलेल्या पहिल्या कादंबरीस " साहित्य अकादमी पुरस्कार " मिळाला होता. माननिय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रासह, पन्नास हजार रुपयांचे बक्षीस स्वीकारताना, तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अंतरंगात विचारांचे काहूर उठले होते. डोळ्यांच्या विहिरी राहून-राहून भरुन येत होत्या.
       सोहळा संपल्यानंतर, आपल्या मुली, जावई, विहिणबाई व धाकटी बहिण शुभा बरोबर ती गहिवरल्या मनाने घरी आली. शेजाऱ्यांनी, स्तुती सुमनांनी भारावून टाकले. अल्पोपहारानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मुली, जावई झोपी गेले. जाग्या उरल्या रेणुका आणि शुभा. लाडाने, रेणुकाच्या गळ्यात हात टाकत शुभा म्हणाली,
     " ताई, आज आई-बाबा हवे होते. कित्ती आनंद झाला असता त्यांना !"
       " हो ना ! आनंदही झाला असता किंवा माझ्या निर्णयामुळे निराशही झाले असते." उसासा सोडत रेणुका उदगारली.
       " असं का म्हणतेस ताई ? एवढ्या आनंदाच्या क्षणी नको तो विषय. आपण तुझ्या कादंबरीबद्धल बोलू. तू या कादंबरीला " पहिला पांडव " नाव का दिलेस गं ? " विषयाला दुसरे वळण देत शुभा बोलली.
       " तुला आठवतं शुभा ! मला लहानपणापासून लिहिण्याचा छंद होता. शाळा-कॉलेजची नियतकालिके व वर्तमानपत्रात माझ्या कथा, कविता छापून आल्या की आई-बाबा, कौतुकाने सर्वांना दाखवत फिरायचे. लेखिका व्हायचं स्वप्न होतं माझं ! पण आई-बाबांच्या, अपघाती जाण्याने, सगळ्या स्वप्नांवर विरजण पडले. काका-काकूंनी जबाबदारी झटकल्याप्रमाणे आपल्या दोघींच्या लग्नाची घाई केली. नशीबाने तुला विवेकसारखा गुणी नवरा मिळाला पण विकास तसा नव्हता. दैवाने,निखारा बांधला होता पदरात माझ्या. मी कितीही प्रय....."
      " घुर्र....घुर्र...." शुभाच्या घोरण्याने दोघींच्या गप्पांची साखळी तुटली. तिच्या अंगावर हलकेच पांघरुण घालून रेणुकाने डोळे मिटले खरे पण निद्रादेवी प्रसन्न होईना. गत काळाच्या घटनांचा चित्रपट, हळूहळू डोळ्यांसमोरून सरकू लागला.
       साधारण रंग-रुप व बेताच्या पगाराची नौकरी करणाऱ्या विकासचा संसार, नेटाने करण्याचा रेणुका सतत प्रयत्न करायची पण त्याच्या डोक्यात कुणीतरी संशयाचे भूत भरुन दिले होते. एवढ्या रुपवान, बुद्धीमान  मुलीने, माझेे स्थळ पसंत केले म्हणजे काही तरी गौडबंगाल आहे, हे खूळ त्याला अस्वस्थ करायचे. रेणुका त्याला प्रेमाने समजावयाचा प्रयत्न करायची. कधी तो समजून घ्यायचा तर कधी त्याच्यातला समंध जास्तच पिसाळायचा.
       त्याच्या अशा विक्षिप्त स्वभावामुळे गावी रहाणारे त्याचे आई-बाबा व लग्न झालेली बहिण पण त्यांच्याकडे यायला इच्छुक नसायचे.
       दिवसभर घरकाम आटोपून थोडे वाचावे, लिहावे वाटले की त्याला दिवे घालविण्याची घाई असायची. जाई-जुईच्या जन्मानंतर तर त्याचा स्वभाव आणखी चिडचिडा झाला.
       एका रात्री, सर्वजण झोपलेले पाहून, रेणुका हळूच उठून बाहेरच्या खोलीत आली. लग्नापूर्वी, तिने एक कादंबरी लिहिली होती. यौवनाच्या उंबरठ्यावर, स्वप्नाच्या हिरवळीवरुन फिरता-फिरता लिहिलेली, एक काल्पनिक प्रणयकथा ! पहिली कादंबरी प्रकाशनास पाठविण्यापूर्वीच, आई-बाबांचे अकाली निधन झाले. आकाशाला गवसणी घालणारे, स्वप्नांचे घरटे खाली कोसळले. गत स्मृतींना, उजाळा देण्याच्या इच्छेने, तिने फाईल उघडली. काही पाने वाचून होतात, तोच विकास उठून बाहेर आला.
       " काय रिकामपणाचे धंदे चालले आहेत, झोपायचे सोडून ? फुकटचा टाईम-पास ! त्यापेक्षा मुलींकडे लक्ष द्या जरा, नाहीतर त्या पण जायच्या, तुमच्याच वळणावर ! "
       असे म्हणून, त्याने रागाने तिची फाईल हिसकावून घेतली. तिला बेडरुममध्ये ढकलून, तो तिची कादंबरी वाचू लागला. भेदरलेल्या शेळीसारखी, ती झोपेचे सोंग घेऊन पडली. डोळा लागतो न् लागतो तोच, कुणीतरी तिची वेणी ओढल्याच्या वेदनांनी ती कळवळून जागी झाली. तो विकासच होता. मुलींची झोपमोड होवू नये म्हणून आपली वेणी, कशीबशी सोडवत ती बाहेर आली. बेडरुमचे दार बाहेरुन बंद करुन, तिच्यावर बुक्क्यांचा प्रहार करत, तो बडबडू लागला,
       " तू लिहिलीस ही कथा ? तू कुठे अनुभव घेतला या प्रेमाचा ? स्वानुभवाशिवाय कुणी असे लिहिणार नाही. नक्कीच तुझे लग्नाआधीचे प्रेम प्रकरण असेल. बोल ! कोण आहे तो ? तुझ्या कथेतील नायिकेप्रमाणे, तुलाही  विवाहापूर्वीचे अपत्य तर नाही ? "
" शी ! काहीही काय बोलता ? ही केवळ काल्पनिक कथा आहे हो ! " त्याचा मार चुकवत, ती काकुळतीला येऊन म्हणाली.
       " काल्पनिक आहे म्हणे ! माझे मित्र मला म्हणतात, काही काळेबेरे असल्याशिवाय, या पांढऱ्या पालीने माझ्यासारख्या माणसाशी लग्न केले नसते. तुझ्या काका-काकूने म्हणूनच तुला घाईघाईने उजवले असेल. तुझे आई-बाबा पण अपघातात गेले की तुझ्या काळ्या करतूतीने, त्यांनी आत्महत्या केली कोण जाणे ? "
        विकासच्या तोंडाचा पट्टा चालू होता. तिला, अधमरी होईपर्यंत, मारुन, आपले पौरुषत्व दाखवून, तो बेडरुममध्ये निघून गेला. त्यानंतर वरचेवर असे घडू लागले. माहेरी जायची वाट नव्हती. मुलींसाठी सर्व अत्याचार सहन करत, बराच अवधि गेला. संसाराची विकासला ओढ नव्हती. नौकरी व आपल्या चांडाळ चौकडी पलीकडे, त्याचे विश्वच नसायचे. काही रास्त मागणी केली तरी,
       " कमवायची अक्कल नाही आणि वायफळ खर्च करायला पाहिजे. एखाद्या कुबेराशी लग्न करायचं होतं ! तसाही मी तुझ्या लायक नाही असं वाटतं ना तुला ! " असे बोलून तो तिची बोलती बंद करायचा.
       नशीबाने मुली चांगल्या शिकल्या. जाईला मुंबईत चांगल्या कंपनीत नौकरी मिळाली. तिच्या ऑफिसमधील सॉफ्टवेअर इंजिनीअर, कुणालने, तिला प्रपोज केले. स्थळ उत्तमच होते.त्याची आई, मुंबई दूरदर्शनच्या खाजगी वाहिनीवर, प्रसारीत होणाऱ्या, मराठी मालिकांची निर्माती होती.
       जाईच्या साखरपुड्यादिवशी कुणालच्या धाकट्या भावाने जुईला पाहिले. त्याला ती खूप आवडली. दोन्ही लग्नाचा बार एकदमच उडाला. विकासची बेताची परिस्थिती पहाता, लग्न मुंबईत पार पडले.
       रेणुकाच्या छातीवरचा मोठ्ठा भार कमी झाला. तिने पुन्हा लेखणी जवळ केली. विकासचा पारा चढत होता पण आता रेणुकाचा घडा पालथा झाला होता. तिला अपमानीत करण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. तिच्या डोळ्यातील करारीपणा पाहून, तिच्यावर हात उगारण्यास, तो कचरु लागला होता पण तिचा मानसिक छळ करण्याचे, नव-नवीन उपाय मात्र शोधत रहायचा.
       काळजावर दगड ठेवून रेणुकाने, कंटाळून एक निग्रह केला. मुलींची साथ होतीच. समाजाची पर्वा न करता, वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. दोघांच्या सहमतीने घटस्फोट झाला. विकासचा अहं डिवचला गेला होता. कोर्टाबाहेर पडताना, तो उपहासाने आपल्या मित्राला म्हणाला,
       " त्या पहा, चालल्या, 'पद्यश्री मालती जोशी' व्हायला. 'खिशात नाही आणा, म्हणे मला बाजीराव म्हणा'. पोरींच्या जीवावर उड्या मारतेय्. चार दिवसात मिजास नाही उतरली तर बघ. "
      त्याच्या निर्रथक बोलण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत रेणुकाने आपली वाट धरली. " पेटीचे धन " झालेल्या तिच्या रचनांना वाचा फोडली, तिच्या विहिणबाईंनी. मालिकांसाठी तर तिच्या कथांची निवड झालीच पण संवाद लेखनासाठीही, रेणुकाला मुंबईला पाचारण करण्यात आले.
       तिच्या साहित्यिक प्रवासाची गाडी चांगलीच रुळावर आली. काही कथा, कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या पण मानाचा तुरा ठरली, तिने लग्नाआधी लिहिलेली, पहिली कादंबरी, "पहिला पांडव "
        विचार करता-करता तिचा डोळा लागला. सकाळी जाग आल्यावर शुभा म्हणाली,
       " ताई ! रात्री ऐकता-ऐकताच मला झोप लागली पण माझी उत्कंठा संपली नाही. सांग ना ! या कादंबरीचे नाव तू " पहिला पांडव " का ठेवलेस ? "
       " शुभा, मी लग्नापूर्वी लिहिलेली ही प्रणयकथा वाचून, विकासने मला पदोपदी छळले. माझे काही प्रेम प्रकरण होते.... मी त्याची प्रतारणा केली... वगैरे घाणेरडे आरोप लावले. माझ्या बाकी कथांना उशीरा का होईना  यश मिळाले पण लग्नाआधी प्रसवलेला, माझा "कर्ण" मात्र उपेक्षित राहिला." एक खोल श्वास घेत ती बोलली,
        " कुंतीचे सर्वच पुत्र जर देवांच्या स्मरणाने झाले मग कर्णावरच अन्याय का ? तिने लग्नानंतर सूर्याचे स्मरण केले असते तर तोच पहिला पांडव म्हणून प्रसिद्ध झाला असता ना ! पण मला अभिमान आहे, मी माझ्या कर्णाला  न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून दिली."
       उशाशी पहुडलेल्या, पहिल्या पांडवाला, मायेने उराशी कवटाळणाऱ्या, रेणुकाच्या चेहऱ्यावर, समाधानाचे तेज चमकत होते आणि कायाकल्प  झालेल्या बहिणीस शुभा एकटक निरखीत होती.

----------------------------------------------------------------------
लेखिका -- सौ. जया गाडगे, इंदूर
      
     

      
      
      

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू