पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पहाटेचं स्वप्न

॥ श्री ॥

केविनला आज नंदूची खूपच आठवण होती. प्रत्येकवेळी ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच केविन नंदूसाठी केक आणि एखादी छानशी गिफ्ट घेऊन जायचा. खरंतर त्याला आज शाळेतल्या अख्ख्या गॅंगची आठवण येत होती. मयूर, तन्वी, अमीना, संजू आणि वरद सगळ्यांची छान गट्टी होती. मात्र शाळेत बेंचवर त्याच्या शेजारीच बसणारा नंदू त्याचा खास दोस्त होता. केजीपासूनच सगळे सोबत शिकत होते. सहा वर्षांची त्यांची मैत्री होती. मात्र ह्यावर्षी देशभरात लॉकडाऊन झाला आणि नऊ महिन्यांत एकदाही ह्या मित्रमंडळाची भेट झाली नव्हती.

बऱ्याच विषयांच्या टीचर व्हिडिओ पाठवायच्या आणि होमवर्क द्यायच्या. मग दोन तीन दिवसांनी एखादा ऑनलाईन क्लास व्हायचा. पण त्यात सगळे दिसायचेच असं काही नाही. कधी कुणी मिसना डाऊट विचारत असेल तर ते चेहरे दिसायचे. पण त्यांच्याशी काही बोलता यायचं नाही. क्लास डिस्टर्ब होतो म्हणून मिस रागवायच्या. पण बाकी सगळे कधी ना कधी एकमेकांना स्क्रीनवर दिसले तरी होते. नंदू मात्र एकदाही दिसला नव्हता. त्यांच्याच शाळेत मदतनीस असणाऱ्या जयामावशींचा तो मुलगा! पण तो शाळेला अनदी नीटनेटक्या कपड्यात यायचा. त्याचं हॅंडरायटिंग तर इतकं सुंदर होतं कि केविन कित्येकदा आपल्या नव्या नोटबुकवर त्याच्याकडूनच नाव लिहून घ्यायचा आणि त्या नावाभोवती नंदू सुंदर डिझाईनही काढून द्यायचा.

केविनला ड्रॉइंग काही जमायचं नाही, म्हणून तो कधीकधी नाराज व्हायचा. मग नंदू त्याला म्हणायचा, ‘तुला चित्रं काढायला न का येईना, पण तू ऱ्हाईम्स किती सुंदर म्हणतोस. मला ऐकतच राहावंसं वाटतं. तुझा आवाज कित्ती गोड आहे!’ आणि मग वहीवर नाव घालून झालं कि तो केविनला म्हणायचा, ‘आता तू मला एक मस्त ऱ्हाईम म्हणून दाखव.’ अशी त्यांची सुंदर फ्रेंडशिप होती. कधीकधी बोलता बोलता नंदू सांगायचा कि, त्याचे बाबा बांधकामावर गवंडी म्हणून काम करतात, त्यांचीही चित्रकला खूप चांगली आहे. पण ते खूप श्रीमंत नाहीत. कधीकधी त्यांच्याकडं जेवायला फक्त थोडासा भात असतो, कधीतरी त्याची आई त्याच्यासाठी पोळीही करायची. पण रोज सगळं जेवण असायचंच असं नाही.

नंदूची लहान बहीण आजारी असल्यानं त्यांना तिला सारखं डॉक्टरांकडे घेऊन जायला लागायचं. क्वचित कधीतरी त्याचे बाबा दारू पिऊन यायचे. मग त्याच्या आई-बाबांचं मोठं भांडण व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे बाबा आईला ‘चुकलं माझं’ असं म्हणून परत कामावर जायचे. त्याच्या झोपडीसमोर एक छानसं लाल पेरूचं झाड होतं. जेव्हां त्यावर पेरू लागून पिकायचे त्यावेळी नंदू पहिला पेरू केविनसाठी घेऊन यायचा. शाळेत आल्याआल्याच तो केविनला ‘हे बघ गंमत’ असं म्हणत दप्तरात लपवलेला तो पेरू दाखवायचा. मित्राच्या आपल्यावरच्या प्रेमानं केविनला खूप आनंद व्हायचा आणि कधी एकदा मधली सुट्टी होते आणि दोघं मिळून तो पेरू खाऊ असं होऊन जायचं.

एरवी केविन नंदूसाठी चॉकलेट, चिप्स, बिस्कीटं असं घेऊन जायचा. पण शाळेत असे पदार्थ आणायला फार परवानगी नसायची. मग कधीकधी केविन कुणाचं लक्ष नाही असं बघून चॉकलेटची छोटीशी पिशवी हळूच नंदूच्या दप्तरात ठेवून द्यायचा आणि त्याला म्हणायचा, ‘घरी गेल्यावर बहिणीसोबत खा तू!’ ‘पण तुला?’ असं नंदूनं विचारल्यावर तो सांगायचा, ‘माझ्याघरी फ्रीजमधे भरपूर चॉकलेट्स आहेत, मी त्यातली खाईन.’ मग फ्रिज कसा थंडगार असतो, दार उघडल्यावर त्यातून कशी गार हवा येते, त्यात बर्फ कसा तयार होतो हे सगळं केविन त्याला सांगायचा. मग नंदू म्हणायचा, ‘मी खूप अभ्यास करून मोठा झालो कि मोठं घर विकत घेऊन त्यात फ्रीज, टीव्ही असं सगळंही घेईन. मग केविन त्याला म्हणायचा, ‘नंदू, तू आमच्या बिल्डिंगमधेच फ्लॅट घे म्हणजे आपल्याला एकत्र खेळता येईल.’ ‘बरं, तसंच करूया’ असं नंदू म्हणाला कि दोघांचं बरंच स्वप्नरंजन चालायचं.

यावर्षी मात्र ख्रिसमसची भेट आणि केक, चॉकलेट असं काहीच नंदूला देता येणार नाही म्हणून केविन खूप खट्टू झाला होता. त्याला नंदूची फार म्हणजे फार आठवण येत होती. आता नंदू कुठं असेल? तो परत शाळेत येईल ना? कि गावाकडं निघून गेला असेल? ह्या विचारानं त्याला रडू फुटायला लागलं होतं. आपलं रडू कुणाला दिसू नये म्हणून तो ‘झोप आली मला खूप’ असं म्हणून त्याच्या छोट्याशा बेडरूममधे येत पटकन पांघरुणात शिरला. उद्याच तर ख्रिसमस आहे, पण नंदूला काही देता येणार नाही ह्या विचारानं त्याला आणखी रडू यायला लागलं. पांघरुणात हंदके देऊन त्यानं खूप रडून घेतलं आणि मग त्याला एकदम सांताबाबाची आठवण झाली. तो लहान मुलांना हवं ते देतो असं त्याच्या ग्रॅनीनं त्याला सांगितलं होतं. त्याला पटकन मोठी युक्ती सुचली.

पांघरुणानंच स्वत:चे डोळे पुसत केविन उठून बसला आणि डोळे मिटून सांताला प्रार्थना करू लागला, ‘सांता, लवकरच आमचं स्कूल सुरू होऊदे, पहिल्यासारखे आम्ही सगळे रोज एकमेकांना भेटू असं कर काहीतरी. त्या दुष्ट कोरोनाला पळवून लाव. मला नंदूची खूप आठवण येते. नंदूला अगदी हॅप्पी ठेव. त्याच्या आईबाबांना खूप पैसे मिळूदेत. म्हणजे नंदूलाही रोज छानछान पदार्थ खायला मिळतील आणि आम्ही मोठे होऊ तेव्हां आमच्याच बिल्डिंगमधेच नंदूचंही घर होऊदे म्हणजे आम्ही दोघं गप्पा मारत, धमाल करत एकत्रच ऑफिसला जाऊ.’ नंदूसाठी सांताकडं अशी मोठाली यादी मागतमागत त्यांच्या भेटीचं स्वप्नरंजन करत केविन कधी आडवा झाला आणि कधी झोप लागली हे त्यालाही कळलंच नाही. पण ‘थॅंक्यू सांता, थॅन्क्यू सो मच... माझ्या नंदूला सुखात ठेवण्यासाठी लव्ह यू!’ असं म्हणत तो पहाटे जेव्हां जागा झाला तेव्हां तर त्याच्यासमोर कुणीच नव्हतं.

दोन मिनिटांनी कय झालं हे त्याच्या लक्षात येऊन तो आणखी आनंदला. सांता त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाला होता, ‘आता लवकरच तुझं स्कूल सुरू होणार आहे आणि तुला नंदूही भेटणार आहे. पण एक लक्षात ठेव, मित्र भेटले नाहीत म्हणूनच ते आपल्यासाठी किती महत्वाचे असतात ते कळलं किनई तुला? तर आता इथून पुढं सगळ्यांनीच एकमेकांशी प्रेमानं राहायचं. मित्रांशिवाय आपण आनंदी राहू शकत नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असा माझा तुला आशीर्वाद आहे. मे गॉड ब्लेस यू, माय चाईल्ड! लवकरात लवकर तुझी आणि नंदूची भेट घडून येईल. काळजी करू नको.’ ह्यावर आनंदून मोठ्यानं ‘थॅंक्यू संता’ म्हणताना केविनला जाग आली होती.

डोळे उघडताच समोरच्या त्याच्या छोट्या टेबलवरच्या छोट्याशा घड्याळात चार वाजलेले त्याला दिसले. ते बघून तर केविन खूपच आनंदला. कारण नंदूनं त्याला एकदा सांगितलं होतं कि, ‘त्याची गावाकडची आजी म्हणजे त्याची ग्रॅनी म्हणते कि, पहाटेची स्वप्नं अगदी खरी होतात!’ आणि कुठलीच ग्रॅनी कध्धीच खोटं बोलत नाही ह्यावर केविनचा विश्वास होता. सांताविषयी अतीव कृतज्ञ भाव घेऊन केविननं डोळे मिटले. आता तो मनातल्या मनात त्याच्या आणि नंदूच्या भेटीची स्वप्नं रंगवू लागला.

©आसावरी केळकर-वाईकर, चेन्नई

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू