पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अतिथी देवो भव

               " अतिथि देवो भव "

       " चला ! चला ! लौकर आटपा, पहिलं पर्यटन स्थळ पहाण्यातच किती वेळ घालविला तुम्ही ? अजून आपल्याला "पारो" मधील बरीच स्थळे पहायची आहेत. "
       आमच्या "भूतान" सहलीचा म्होरक्या सर्वांना सूचना देत, बसमध्ये पिटाळत होता.
        दाट धुक्याने व्यापलेल्या, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या, निसर्गरम्य पर्वतांचा सैरसपाटा करुन, सर्वांचे चेहरे खुलले होते. बसजवळ येताक्षणी मात्र सर्वांची गती एकदम थांबली. चेहरे कसनुसे करत, विशेषतः महिलावर्ग, एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला.
       " शीः बाई ! एवढ्या सुंदर वातावरणात फिरुन आलो आणि आता त्या बसमध्ये..... किती घाणेरडा वास येत असेल ?" किळस आल्यासारखा चेहरा करत रेवा बोलली.
       " हो, नं ! मला तर बाई, कुणाला ओकारी करताना पाहूनच शिसारी येते." अनुजाने री ओढली.
       "बरं वाटत नव्हतं, तर यायचंच नाही ना ! सगळ्या आनंदावर विरजण पडलं." इति, शोभना.
       " अगं ! पण त्यात मीनाताईंचा काय दोष ? कुणी मुद्दाम आजारी पडतं का ? आणि हॉटेलवर एकटं सोडलं असतं का त्यांना ? आता चर्चा पूरे. चला, बसा पटापट बसमध्ये." म्हणत विभावरी बसमध्ये चढली आणि पाठोपाठ नाकाला रुमाल लावून बाकी सर्वजणी.
       पहातो तर काय ! बस धुवून, पुसून स्वच्छ झाली होती. अत्तराचा मंद सुगंध दरवळत होता. पण मीनाताई बसमध्ये नव्हत्या. चकार शब्द न बोलता सर्वजण आपापल्या जागी बसले.
       आम्ही खाली उतरलो तेव्हाचा, उलटी झाल्याने मलूल झालेला मीनाताईंचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. गाईडने त्यांची काळजी घेण्याची हामी भरल्यामुळे,आम्ही पर्यटन स्थळ पहाण्यास गेलो खरे पण आता सर्वांची भिरभिरती नजर त्यांना शोधू लागली.
        खिडकीतून बाहेर पाहताच, विरळ धुक्याच्या आवरणाखाली,चक्क भूतानी वेशभूषेतील, ताज्या-तवान्या मीनाताई, एका खुर्चीवर शांतपणे बसलेल्या आढळल्या.
              एक भूतानी मुलगी त्यांची वेणी घालत होती व दुसरी त्यांचे हात-पाय पुसत होती. समोरुन आमचा भूतानी गाईड हातात गरम पेयाचा कप घेऊन येत होता.
        आरशासारख्या स्वच्छ भूतानमधील, निर्मळ मनाचे भूतानी, " अतिथि देवो भव " ची उक्ती चरितार्थ करीत होते
  आणि आमच्या डोळ्यात झणझणीत "अंजन".

**************************************
लेखिका -- जया गाडगे, इंदूर (म.प्र.)

                         

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू