पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दूसरी बाजू

                

" दुसरी बाजू "

डिसेंबर महिन्यातील कडाक्याचे थंडीचे दिवस ! जिल्ह्याच्या ठिकाणी, एक साहित्यिक मेळावा असल्याने, तिकडे जाण्यासाठी, साहित्यिकांचा एक समूह, रेल्वेने प्रवास करीत होता. हसत-खेळत, गप्पांची मैफील चांगलीच रंगली होती. पुढच्या स्थानकावर, पिवळ्या रंगाचा, हुड असलेला, थंडीचा कोट व डोळ्यांवर मोठा चष्मा लावलेली, एक तरुणी, हातात लहानशी बैग घेऊन डब्यात चढली. हो, तरुणीच असावी ती ! किमान तिच्या आधुनिक पेहराव्यावरुन तरी तसेच वाटत होते.आपला तिकीट क्रमांक तपासून, ती थेट तिसऱ्या बर्थवर जावून बसली.
किंचितही वेळ न दवडता, तिने बैगमधून एक इंग्रजी कादंबरी काढली आणि वाचण्यात गुंग झाली. गाडीला अकस्मात, हलकासा धक्का लागल्याने, तिच्या हातून पुस्तक खाली पडले. गप्पा मारत बसलेल्या मंडळीतील, एकाने ते पुस्तक तिला देताच, चेहऱ्यावर गोड स्मित आणून ती "थैक्यू" म्हणाली आणि वाचण्यात अशी दंग झाली, जणू आज हे पुस्तक वाचून संपवायचा, चंगच बांधला असावा.
आता खालच्या गप्पांचा रोख बदलला. तिच्या बर्थकडे पाहून, खुसपूस सुरु झाली.
" मी काय म्हणत होतो कुरतडकर साहेब, आजच्या पिढीला, आपल्या मातृभाषेबद्धल आपुलकी राहिलीच नाही हो ! अहो, पु.ल., व.पु., वि.स., फडके, देसाई, शिरवाडकर, शिवाजी सावंतांपासून ते नेमाडेंपर्यंत कमी मराठी साहित्यिक होऊन गेले का ! आजन्म पुरेल एवढं महान साहित्य सोडून, आजच्या तरुण-तरुणींना इंग्रची वाचायचे फॅडच लागले आहे." त्यांच्या बोलण्याची री ओढत कुरतडकर म्हणाले,
" अगदी लाख मोलाचे बोलला तुम्ही पाटील साहेब, अहो, कित्येकांना इंग्रजी फारशी कळतही नसेल पण हौस मात्र इंग्रची पुस्तकं घेऊन मिरवायची." पाटील साहेबांच्या बोलण्यास मम म्हणत, ऐरणकर साहेब बोटाने वरती खुणावत कुजबुजले,
" आता हेच पाहा ना ! अमृताते पैजा जिंकणारी, आपली मायमराठी सोडून, केवढ्या ऐटीत आंग्ल साहित्यवाचन चाललंय ! मी म्हणतो, आपल्या मायबोलीतील साहित्य वाचायची लाज वाटते का हो ह्यांना ! आपली भाषा ऱ्हासाच्या मार्गावर आहे, याचं मुख्य कारण ही नवी पिढीच आहे."
" मी तर बाई ! त्या आस्था चौधरींची प्रचंड प्रशंसक झाले आहे. किती लालित्यपूर्ण लिखाण आहे त्यांचं ! इतिहासाचा केवढा दांडगा अभ्यास !  त्यांचा सत्कार, हेच यावेळच्या मेळाव्याचे विशेष आकर्षण आहे." शैलाताईंचे उदगार ऐकून कोठारीसाहेब बोलले.
" शैलाताई, मी तुमच्या मतांशी शंभर टक्के सहमत आहे. अहो, या बाईंचे लेखन सर्वांपेक्षा, हटकून वेगळेच असते. व्यथा तरी कुणाची मांडावी ! उर्मिला, अश्वत्थामा, यशोधरा, राधेचा वृद्ध पती अनय.....अशा नवीन पात्रांना हात घालणे महाधाडसाचे काम ! किती सखोल अभ्यास आणि प्रवाही भाषा !  " उर्मिलेची लक्ष्मणरेषा " कादंबरी वाचताना, राहून-राहून डोळे भरुन येत होते माझे. "  भळभळणारी जखम " वाचून तर अश्वत्थाम्याबद्धल कणव वाटू लागली. महाभारत ही त्याचीही शोकांतिका आहे असे जाणवले. ह्या नवीन पिढीने असे दर्जेदार साहित्य वाचायला हवे म्हणजे आपला इतिहास किती वैविध्यपूर्ण आहे हे कळेल."
गप्पांनी चर्चेचे शिखर गाठले आणि गाडीने गंतव्य स्थान ! आपापले सामान घेऊन सर्वजण फलाटावर उतरले. थंडीने इथे मात्र पोबारा केला होता. तिसऱ्या बर्थवर बसलेल्या तरुणीने, कोट काढून बैगेत टाकला. केस नीटनेटके करुन ती खाली उतरली. साहित्यिकांच्या समूहाजवळून ती पुढे निघून गेली. मंडळीतील एकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाऊले भराभर उचलत ते तिच्याजवळ येऊन म्हणाले,
" माफ करा मॅडम.... पण मी चुकत नसेल तर, आपण ...." त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच, नमस्काराच्या मुद्रेत हात जोडीत, ती नम्रतेने म्हणाली,      " मी, आस्था चौधरी " ----------------------------------------------------------------------- लेखिका - सौ. जया गाडगे, इंदूर (म.प्र.)          

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू