पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

से वा व्र ती

सेवाव्रती



   


    कॉलेजमध्ये गाडी पार्क केली तेव्हा कुठं लक्षात आलं. आज गाडगेबाबाचं स्मृतीदिन, हं ! विसरलोच होतो. आठ दिवसापासून कॉलेजबाहेर असल्यामुळं कामाच्या व्यापात लक्षातही आलं नाही. माझं मन गहिवरून आलं.


    हॉलमध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी विद्यार्थ्यानी पुर्ण केली होती. तसं पाहता कॉलेजात सर्व महापुरूषांची जयंती, स्मृतीदिन व इतर कार्यक्रम विद्यार्थ्याना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळावे म्हणून साजरे केले जातात. आमच्या कॉलेजने चांगलं नाव मिळवलं होतं. त्यामुळच का असेना विद्यार्थीप्रिय कॉलेज आणि आमचा स्टॉपही होता.


    मी दहावर्षापासून या कॉलेजात प्राध्यापक म्हणून रूजू झालो होतो. नेट, पीएचडी होताच कुठलही डोनेशन न देता मला इथली ऑर्डर मिळाली. त्याला कारणही तसच होतं. संस्थापक गाडगेबाबा तथा बहुजनवादी थोर महापुरूषांच्या विचारांचे होते. त्याचं प्रामाणिक व्यक्तिमत्व हेच या विद्यार्थ्याना मिळणारा वारसा होता.


    कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली होती. आज बाहेरचे वक्ते, संस्थापक विचारमंचावर उपस्थित झाली. गाडगेबाबाच्या फोटोकडे बघताच मला नेहमी आनंद व्हायचं. माझं मन फुलून यायचं. कार्यक्रम सुरू झाला. प्रा. मानमोडे यांनी आपल्या प्रखर आदर्श तेजस्वी भाषणातून देव, दैवंवाद, पाप, पुण्य नि वैदिक मनुवादी जीवनाची मान कशी मोडायची याचं विस्तृत चित्रणच केलं होतं.


    ‘दगड बनू नका, दगडात देव शोधण्यापेक्षा आपण माणसं आहोत. माणसासारखं वागा. माणसात देव शोधा. दुसऱ्याच्या टाळूवरील लोणी खात जगणाऱ्या समाजाच्या टाळूवरील लोणी खात आपलं मस्तक, विचार यांना भीती दहशतीत जगायला भाग पाडलं. पर्यायानं आपला बहुजन समाज हया सांस्कृतीक सामाजीक संघर्षात गुंतुन गुलामीत जीवन जगतो आहे. पण ते आपल्याला कळत नाही. आपण विवेकाने यावर विचार करायला हवा. आपला बहुजन वारसा त्यानुरूप आचरण करण्यासाठी जर का गाडगेबाबाचं किर्तन समजून विचार केला तर खऱ्या मानवतावादी जीवनाचं पुरस्कार करणारं आपलं जीवन मातीतही सोनंरूपी भासेल, आणि हिरेरत्ना प्रमाणं आपल्या जीवनात चकाकी येईल, तेज पसरेल. आपल्या विचारांना मुठमाती मिळाली, आपल्या विचारांची गती थांबवण्यात आली. ती गती गाडगेबाबाच्या बहूजनवादी विचारातून मिळवून आता बनावटी नकली विचारांच्या टाळक्यात हाणायला तयार व्हा ! जगदगुरू तुकोबाराय म्हणतात. ‘ भले तरी देवू कासेची लंगोटी ! नाथाळाचे माथा हाणू काटी.!! हाच माणुसकीचा धर्म, आणि हेच आपलं कर्म होय.


    विद्याथ्र्यांनी टाळयांचा गजर केला होता. भाषणाच्या रंगात रंगण्यापेक्षा वैचारीक भावनेत दंग झालेली नवविद्यार्थी पिढी बघून मी गाडगेबाबाच्या प्रतिमेकडे पाहात मी एका आशावादी जीवनाचं स्वप्न बघू लागलो. माझं टाळया वाजवण्याकडेही लक्ष नव्हतं. तसं आता मीही अनेक विचारपिठावरून ओजस्वी भाषण दयायचा. स्वतःच्या कॉलेजात आज मी प्रमुख पाहुणा नव्हतोच की विचारही मांडायचे नव्हते. नुसतं एैकायचं होतं. मी भान हरपून ऐकतच होतो. गाडगेबाबाची वैराग्यमुर्ती माझ्या नयनचक्षूसमोर उभी होती. प्रत्यक्षात माझ्यासमोर जनू गाडगेबाबाचं हात कवटाळून उभे होते. मी त्यांना आलिंगण देत होतो. त्यांनी मला कुशित घेतलं. त्यांच्या कुशित हमसुन रडू लागलो. भाषण पुढं सरकत होतं. आणि मी माझ्या पुर्वजीवनाची ज्योत प्रज्वलीत करून आपल्याच हलाखीची, संघर्षाची कर्मकहाणी आठवीत मागे सरकलो होतो.


    “लोहा पूलाच्या अगदी बाजूले माह्यं फाटक्या-तुटक्या खरड्याचं कच्च्या इटा मातीचं नं टिनाचं खोपट व्हतं. माय, म्या नं लहान पम्या, एकत्र रावाचू. आमच्या खोपाटाच्या बाजुलं दहा बारा आमच्यासारखीच खोपाट, हळूहळू आमच्या सारखं बेवारस, निराधार लोकांनी येथं कब्जा कराले सुरवात केली व्हती. पावसाळयात टपटप थेंबानं सारं खोपाट गळून नुसता चिखल होवाचा. बाजूलेच शहरातल्या लोकाची आणून टाकलेली घाण न कचरा येथं मुन्सिपाल्टी फेकाची. तो सडला की असा वास येवाचं की पांढरपेशे तं  नाक दाबुन बी जगू शकत नोहती. आनं आम्ही उघड्या नाकानं वास घेत रातदिन तेथच रावाचू. ज्यांच्या घरी संडास नाय तेबी तेथं येवून परसाकड कराची. सालं, समज आली तवा कधी मधी टाळक्यात सनक येवाची. फाटक्या जींदगाणीची बरोबरी हया सडलेल्या वासेशी करतांना आमच्या बी आंगाची वास येवाले लागली व्हती. सोताचं जीवन सोताले नोकोसं झालं व्हतं. पण सालं किडक्या भ्रष्ट दुनियेत जगाचं होतं. काही का असेना माय राबराब राबुन जगवत होती. न म्या जगत रायलू.


    समज आली तवा सातवी आठवीत असन, म्या मुन्सिपाल्टीच्या शाळत शिकाचू. मायेनच शाळत नाव घातलं. माय मील मालकाच्या घरी धुनी भांडी कराची, नं आमाले जगवाची. बापानं माहया लहानपणीच जग सोडलं. दारूच्या पुरात डुबून झोपून रावाचा. काम नं धंदा, मायेले तरास होवाचा. बापानं एक दिस मस्त पेली. आनं पाणी नं भेटताच तडफडून जीव गेला. माय म्हणे ‘कपाराचं कुकू गेलं पण मोठं बेस झालं’ नुसतं कटकट आनं भांडण हावेाचं, बाप मस्त तीले माराचाबी. पुढं बाप गेलं नं माय खेड्यात एकाकी पडली. लहानसं खोपडं, दुसऱ्याच्या मजूरीवर पोट बी भराचं नाय. तवा वळखी पाळखीनं आली या शयरात. येथं खोपाटात पुलाच्या आडोशानं रावू लागली. खेड्यापेक्षा इथं तिचं मन रमलं. शयरात रावाची मोठी अडचण, ना घर ना दार तीनं उकीरड्याच्या लोहा पूलाखाली अतिकरमण करून खोपाट उभारलं व्हतं.


    दररोज लोहा पुलावरून धडधड करीत लोकल जावाची. माहयं मनही मोठं धडधड करावाचं. तिच्या शिट्टीच्या आवाजानं आनं तिच्या चाकाच्या घरंगळणाऱ्या, धडधड आवाजानं मन बधीर होण्यापरीस माले नवतेज, उत्साह मिळाचं. दिसातून तीन चारदा जाणारी लोकल वारंवार जावं माहयं जीवनही आसच धावावं, आसं नेहमी वाटे. तीचं नं माहयं कोठलं नातं व्हतं ते कळलच नाय.


    रात्र झाली व्हती. दहाक वाजत आले व्हते. आता शेवटची धडडधड करीत जाणारी लोकल येईल आनं मग रातभर लोहापुल नीरव शांत व्हईल. अगदी पहाटेपर्यंत माहयासारखं.


    आम्ही सप्पा खोपाटात रायणारं लोकं लोहा पुलाच्या खाली निजाचू. कधी मधी चार दोन भटकं लोकबी येत झोपावालं. पुलाच्या खाली ना कायची भिती ना कायची पर्वा. सालं खोपाटापेक्षाही मस्त झोप होवाची. त्या वावभर खोपाटात पाय ताणायलाही जागा होत नव्हती. लोहा पुलाच्या शेजारची झोपडपट्टी हेच आमचं जग आणि हेच त्यातलं जगणं. आमचं सुखदुःख कोणाले सांगाच? नुसतं पोटासाठी राबणं आणि जगायचं म्हणून जगणं व्हतं. माहया मायेले खुप मोठी आशा होती. आज ना उदया आपलं दिस निगतील. आसं नेहमीच म्हणे, राबराब राबण्यानं मायचं हाडगुळ झिजली व्हती. मायेचं पोरायसाठी दिसरात राबण, झिजणं पाहुन आपणबी काहितरी बनावं, चांगलं श्रीमंतायच्या पोरायसारखं शिकुण मोठं सायेब व्हावं आसच वाटे, म्या तसा बोलून दाखवायचो.


‘लई गुणाचं रं पोर माहयं, व्हशील, नक्कीच व्हशील त्या बाबासाहेबासारखं ईद्वान व्हशिल.


    तिचं लाडाचं बोलणं माले धीर देवाचं. नं म्या शाळतल्या अभ्यासात समोर जात व्हतो. पुलाखालच्या लाईटात रात्री अभ्यास कराचू. तवा समधे झोपडपट्टीतले पोरं माहयाकडं आशेनं पाहाची. नायं तं आमच्या झोपडपट्टीतलं पोर मायबापाशी काम कराले जाणं, टिन, टप्पर येचणं, चोऱ्या करणं, उष्ट खरकटं खाण्यासाठी घरोघरी हिंडणं, हमालकाम आनं हाताले भेटल तसं काम करून चार दोन रूपयं कमवाची. आनं त्यातच भाकर तुकडा खात पोटभर पाणी पेत जगावाची. तेल हाय तं तिखट नाय. आणं तिखट हाय तं मिठ नाय. पाण्यालं फोडणी नं भाजीले फव्वा नं तेल पुसत मोठ्या गोडीनं खाणं, आणं उष्ट खरकटं भेटलं तं मोठ्या स्वर्गाचा आनंद घेत ढेकर देवाची. म्या नं पम्या कधी आसं काम केलूच नाही. मायेनं बी आसं काम कराले लावलं नाय.


    मायेनं माले आवाज देल्लं.


‘ आरं लेकरा, येणं रे खावाले, सप्पा झोपलीत न तू अभ्यासच करतस का? आता दहाची लोकल बी येईल पाहय, ये खावून घे, मग कर अभ्यास.’


    मी मायच्या आवाजानं भानावं आलो व्हतो. विचाराची तंद्री चुकली व्हती. समोरून लोकलचा आवाज नं मायचा आवाज एकमेकात मिसळला, लोकल धडधड करीत निघुन गेली. तिच्या वेगानं अंगाला झोंबलेलं वारं मले आनंद देत व्हतं. आंगाचे हातावरील केस उभे झाले व्हते. म्या एकटक तिच्याकडं पायतच रायलू. आनं लोकलच्या आवाजानं हलणाऱ्या खोपाटात मायेकडं गेलो.


    मायेनं ताटात वाढलं व्हतं. म्या हात पॅंटाले पुसतच जेवालं बसलो, ताटात वेगळच जेवण बघुन म्या मायलं ईचारणार तं मायच म्हणली. 


‘झालं का रं अभ्यास, आसं किती वाचतेस,’


‘आवं परीक्षा हाय आता...’


‘पास व्हशिल नं यंदाही...’


‘आवं पास का कुणिबी होते, माले पयला नंबर घेवाचा हाय शाळेत.’


‘आपल्या गरिबाचं कधी नंबर येतं कारं, सप्पा तोंड पाहुनच श्रीमंताच्या लेकरायले नंबर देतेत, सायबाच्या पोराचंबी दरसाली येतेच नं पयला नंबर.’


‘अवं तसं नाय, तो हुशार हाय, आनं त्याले टिवशन बी हाय.’


‘मग तू हुशार नाहिस का रं?’


‘तसं नाय वं पयल्या नंबरसाठी लई अभ्यास करा लागते.’


‘होरे बाबा, पयल्या नंबरनं पास होनं काळ माह्यं काळ, म्या खोपाटात रावून तंगून गेली हाय, नाय चांगलं झोपडं बांधू शकत ना चांगलं जगू बी शकत नाय.’


‘आवं या जागेवं येवढं साल रावाले भेटलं तेच लयी झालं. पुढे पट्टे देणार हाय म्हणे, त्यादिशी कानं कोणता का मंत्री झोपडपट्टीवाल्याले घर बांधुन देणार आसं भाषणात सांगत व्हता म्हणे.’


‘घर बांधुन देईल तं बरच व्हईल बाप्पा, आशीरवाद भेटन त्याले गरिबायचं.’


‘एवढं जेवण कोठलं आणलस वं?’


‘म्या नाही हा पम्याच गेला व्हता, त्या हालमंदी लगन व्हतं. त्यायच्या वरातीत लाईट पकडावाले. तेथच जेवला नं कापडात बांधुन आणलन दोघासाठी, लाईट पकडावालं सप्पा पोरं गेली व्हती.’


    पम्या झोपाले पुलाखाली गेला व्हता. हातात वरातीतलं लाईट पकडून हात दुखत असतीन बिचाऱ्याचे, मायेनं त्याले खावाचं तेल आंगापायास हाताले लावाले देल्लं व्हतं. म्या नं माय त्यानं आणलेलं भात भाजी खावू लागलो.


    दिव्यातलं घासलेट संपत आलं व्हतं. वात मिणमिण करत व्हती. तसं पायता मुन्सिपालटीचं लाईट आमचा उजेड होता. चांगलं पोटभर जेवण झालं व्हतं. हवेच्या गारव्यानं थंडी वाटत व्हती. थंडीनं कुडकुडायला आले व्हते. पम्या वराण्यावर टांगलेली बोतरी घेवून पुलाच्या आडोशानं निजला व्हता. मायेनं भांडे कुंडे घासलं नी ती खोपाटातच निजली. म्या मात्र दररोज पुलाच्या खाली निजाचू. खोपाटात निजाले जागाच व्हत नव्हती. कसे बसे आडवे पाय करण्यापुरती जागा व्हती. पुलाच्या खाली पन्नास लोक झोपतील एवढी जागा नं पुलाचा आडोसा, खाली सिंमेटची फरशी व्हती.


    माले बी आता आळस येवालं लागलं व्हतं. दहापंधरा जन पुलाखाली ढाराढुर झोपली व्हती. फाटक्या तुटक्या बोतऱ्या आंगाले गुंडाळून कशीतरी कड्याक्याच्या थंडीत रात्र काढायची. म्या बी हातपाय पसरून निजलू. पण अभ्यासाच्या ईचारानं झोपच उडून गेली व्हती. म्या पाणी प्याले उठलू. खोपाटात जावून ग्लासभर पाणी पेलू. बाहेर येवून आभाळाकड पाहू लागलो. आभाळात चांदण्या पसरल्या होत्या. चमकत फुलून आलेल्या चांदण्यात मलेबी फुलून जावावं वाटे. पण फुलण्याचे दिस चांदण्यासारखे माले दुरवर दिसत व्हते. आनं आभाळही लांबच लांब राहिलं व्हतं.


   माय, पम्या गाढ झोपेत गुंग झाली व्हती.


    लोहा पुलाच्या बाजुनं गावामंदी आडोशानं जाणारा रस्ता आता एकाकी पडला व्हता. म्या आंगावर हातरून घेवून निजलू. आनं एवढ्यातच एक गाडी येवून थांबली. म्या गाडीच्या आवाजाकडं पाह्यंलं. तिचं लाईट डोळयावर पडून डोळं दिपकायला लागलं. गाडीतनं उंच पुरं धिप्पाड देहाचं माणूस उतरलं व्हतं. त्यायची नजर इकडं तिकडं भिरभिरत व्हती. गाडीच्या मागची कवाडं खोलली नं हातात गठ्ठा घेवून आम्ही निजलू तिकडे येवालं लागले. म्या जागेवरच उठून बसलो. 


‘कोण हाय जी?’ म्या त्यांना म्हणालू, बाकीची सप्पा ढाराढुर झोपली व्हती. माह्या आवाजानं तो माणुसही दचकलं व्हतं.


‘मी तुमच्यासाठी भेट दयायला आलो आहे.’


‘कशाची भेट जी,’


‘काही ब्लॅंकेट, चादर आहेत. तुम्ही उघड्यावर थंडीत कुडकुडत झोपत असतांना मी बघतो. त्यामुळच तुमच्यासाठी समाजसेवा म्हणून ही छोटीशी मदत. आज गाडगेबाबाचं स्मृतीदिन आहे ना !’


    त्यांनी हातातली एक-एक ब्लॅंकेट पम्या आनं निजलेल्या सप्पायच्या आंगावर घातली. म्या त्यायची कृती पायतच रायलू. गाडीच्या लाईटात त्यायचं चेहरा माले माणुसकीतल्या खऱ्या देवाचं रूप वाटत व्हतं. खरा देवच हया जगाले ताराले आला व्हता.


    त्यायची ब्लॅंकेट चादरी टाकुन झाली नं ते माहयाकडं येत त्यायनी माह्या हातात चादर ब्लॅंकेट दिलं. त्यायच्या तेजस्वी चेहऱ्यात ऐक वेगळाच आनंद मले दिसला. माले ब्लॅंकेट देताच ते पाय वळवत गाडीकडं जावू लागले. म्या एकटक त्यायच्या दानशुर सेवेकडं पाह्यंतच रायलू. नं त्या देवाच्या पाया लागाचं रावून गेलं आसं एकदम माले वाटलं. म्या झटकन उभं झालो नं त्यायच्या जवळ जावाले निघलो पण त्या देवमाणसाची गाडी लांबवर गेली व्हती. माहया आवाजही हवेत विरला होता.”


    मी विचाराच्या तंद्रितून टाळयांच्या आवाजामुळं अचानक भानावर आलो, वक्त्याचं ओजस्वी भाषण संपलेलं. पाहुने मंचावरून उठले. आभार प्रदर्शन झालं होतं. मी स्वतःच्या विचारात माझ्या बालपणीच्या घटनात विरघळुन गेलो होतो. पुढिल भाषण मला काहीही लक्षात राहिलं नव्हतं. मंचावर वैराग्यमुर्ती गाडगेबाबाच्या प्रतिमेकडे बघत मी मनातुनच वंदन केलं व्हतं.


    कार्यक्रमात वक्ते छान बोलले होते. विद्याथ्र्यांना जीवन जगण्याचं सार मिळालं होतं. दुपारला मी घरी परतलो. आज मूड छान होता. बायकोनं मार्केटला जावू म्हणून तयारी केली. माझी मुलगीही तयार झाली होती. हॉलच्या भिंतीवर टांगलेल्या सर्व थोर बहुजन महापुरूषांच्या फोटोकडे आज वारंवार नजर जात होती. जिजाऊ, गाडगेबाबाच्या फोटोस छान हार चढवून जिजाऊवंदना केली होती.


‘पप्पा मला की नाही जीन्स, फ्लावर टॉप हवा.’ श्रेया म्हणाली होती.


मुलीनं लाडात केलेली मागणी बघुन मीही कापडं बदलवून त्यांच्यासवे मार्केटला निघालो.


    दोन तास चांगली निरखुन कापडाची खरेदी सुरू होती. वारंवार कापडं खरेदी करतांना माझं पुर्वजीवन मला आठवत होतं. खोपाटात राहतांना फाटकीतुटकी घातलेली कापडं, आपण शिकुण प्राध्यापक झालो. लहान प्रमोदही इंजीनियर झाला होता. आज आई हयात नाही. तीच्या स्वप्नांना मात्र तिलांजलीच मिळाली होती. मला नोकरी मिळताच ती वार्धक्यातील आजारात गेली होती. तीने रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आपल्या मुलाच्या नव्या घरात सुख चैनिनं राहायला मिळालच नाही. मात्र आईने केलेल्या कष्टावरून पुढे छोटसं घर आणि काम करून शिकत आम्ही समाधानाचं जीवन जगत राहिलो होतो.


    आईची आठवण वारंवार येत होती. पहिल्या पगाराचे पैसे तिच्या चरणावर ठेवले होते. चार दिवसातच ती सोडून गेली होती. आणि तिच्या अंतयात्रेला त्याच पैशाचं लुगडं घ्यावं लागलं होतं. माझी पहिली कमाई तिच्या अशी कामात आली. रात्रभर मी विव्हळत होतो. तिच्या आठवणीत रडत होतो. पुढं लग्न झालं. सुनेचं ती तोंडही बघू शकली नाही. प्रमोदही आता कुटूंब जोडून शहरात नोकरी करतो. आईची आठवण मी, पत्नी, श्रेया सदोदीत करीत असतो. आई असती तर ! चार वर्ष जास्त जगली असती तर, पण हया श्रमानं राबराब राबण्यानं ती अशक्त झाली होती. आपले आयुष्य आम्हाला देवून आमच्या जीवनाचं सोनं केलं होतं खरच आई माझ्यासाठी परीस होती. 


‘हं, हे घ्या बिल, झाली सगळी खरेदी,’


    हिच्या आवाजानं मी भानावर आलो, काउन्टरवर बिल दिलं. मी स्वतःसाठी दोन ड्रेस, पत्नीने दोन साड्या, मुलीनेही जीन्स, टॉप आणि सटरफटर बरीचशी महागडी खरेदी केली होती. आम्ही दुकानातुन बाहेर पडलो.


    समोरील तुकोबा चौकात चहानाश्ता घ्यावं म्हणून पायदळच समोर चालत गेलो. चौकात पोहचताच तेथिल मंचावरून कार्यक्रमाचा आवाज येत होता. माझं लक्ष तीकडे गेलं. आम्ही नकळत आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. अरे हं! आज गाडगेबाबाच्या स्मृतीदिनानिमित्य एका मित्र मंडळानं गरिबांना मोफत कापडं वितरण कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमात बरीचशी गर्दी होती. विचारपिठावर वक्ते प्रमुख पाहुणे, भाषण सुरू होतं. आम्ही तिघेही वक्त्याचे भाषण मागे राहुन एैकत होतो. भाषणाचा शेवट होत होता.


‘गाडगेबाबाचं कार्यकर्तुत्व इतकं महान होतं की आपण प्रत्येकांनी एक संकल्प करायला हवा. ग्रामस्वच्छतेसोबतच प्रत्येकांनी गरजूंना वर्षातुन एकतरी कापड दयावं तरच ती खरी माणुसकी होईल. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले....’ या तुकाराम महाराजाच्या वचनागत वागायला हवं. मी माझ्या कुवतीनुरूप जीवनभर गरजूंना देता येईल तेवढं दिलं. मनोभावे सेवा केली. ही बहुजन महापुरूषाची गाडगेबाबाची प्रेरणा, आता शरीर थकलं, मी ही विसावणार आहे. पण आपले हात सबळ आहेत. आपण सर्व मित्रमंडळातील बहुजन गरजूंचे मित्र आहात. असेच कार्य मित्रत्वाच्या नात्यानं जपावे, यशस्वीरित्या आपण पुढे पुढे चालावं. हीच अपेक्षा जय जिजाऊ !’


    वक्त्याचं भाषण संपलं होतं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे निरखुन पाहिलं. त्यांना कुठतरी बघितल्यासारखं वाटत होतं. पण अंदाज येत नव्हता. त्यांच्या हस्ते गरिबांना कापडं वितरण सुरू झालं होतं. ज्यांना जे आवश्यक होतं त्या प्रकारची कापडं भराभरा वितरीत केली जात  होती. अनाथ, गरिब, निराधार, भिकारी साऱ्याची झुंबड उडाली होती. कापडं मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद चांदण्याच्या फुलण्यापेक्षाही निराळाच भासत होता. मी एकटक त्या वक्त्याकडे त्यांनी वितरीत करीत असलेल्या दानशूर हाताकडे वैराग्यमुर्ती गाडगेबाबाच्या प्रतिमेकडे क्रमवार बघतच राहिलो.


    गाडगेबाबाची प्रतिमा जनू माझ्याशी बोलतच होती. मला खुणावत होती. मी हळूहळू मंचाकडे जात होतो. पत्नी आणि श्रेयाही माझ्यामागे येत होती.


    मी गाडगेबाबाच्या प्रतिमेच्या पाया पडलो. पत्नी, मुलगीही माझीच कृती आदराने करीत होती. मंचावरची गर्दी कमी व्हायला लागली. कापडं वितरण अंतिम टप्प्यात आलं होतं. आणि क्षणातच त्या वक्त्यांचा चेहरा माझ्या लक्षात आला होता. मी पत्नीच्या हातातील कापडाची पिशवी घेतली आणि झपाटल्यागत मंचावर चढून ती वक्त्यांच्या हातात भेट दिली.


‘सर, ही माझ्याकडनं आणलेली कापडं गरजूंना आपल्या हातांनी दयावं.’


    ते माझ्याकडे एकटक पाहू लागले. मीही त्यांच्याकडे पाहू लागलो. माझ्या डोळयातून अश्रू ओंघळले होते. त्यांनी कापडं स्वीकारताच मी त्यांच्या पाया पडलो. माझ्या डोळयातील अश्रू त्या दानशूर महात्म्यांच्या पायावर पडले होते. मी त्यांचे पाय धरून हमसुन रडू लागलो. त्यांनी मला आधार देत उठविलं होतं. ते महात्मे माझ्या कृतिकडे बघतच राहिले. सगळी मंडळी माझ्या आचरणाकडे पाहू लागली. 


‘सर ! तुम्ही दिलेल्या ब्लॅंकेटची ऊब आजही माझ्या शरीराला फुलवित असते जी.’


माझं वाक्य एैकताच पत्नी, श्रेया त्या व्यक्तिमत्वाच्या पाया पडली होती. मी गाडगेबाबा नी त्या तेजस्वी व्यक्तिमत्वाकडे पाहातच राहिलो. डोळयातील अश्रूने माझ्या नयना समोर धुसरता पसरली होती. लोहा पुलाखाली काढलेलं सारं जीवन पुनश्च मनपटलावर येत होतं. गाडीतून उतरलेलं व्यक्तिमत्व, गाडीचा आवाज, लाईटचा डोळे दिपवणारा प्रकाश, त्यांनी दिलेली ब्लॅकेट रूपी ऊब, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं, ती गाडी निघुन गेली होती. ती मायही आज हयात नव्हती. पण गरिबी, ते हलाखीचे काढलेले दिवस समाजात कुठल्या ना कुठल्या रूपात मला अजुनही तसेच दिसत होते. ‘सेवाव्रती’  होण्यास्तव मज हाक देत होते.               

  ०००

संजय येरणे,




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू