पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कुंडली

                     कुंडली



                   (एक)


          आमचंही एकमेकांना भेटण्याचं ठिकाण.मध्यवर्ती बगीचा.  एका बेंचवर मी बसलेलो.अनघाची वाट पाहत. ती अजून आली नव्हती.

        इथली आमची भेट अविस्मरणीय असायची. एकमेकांचा सहवास, हवेहवेसे वाटणारे क्षण, स्वप्नांचा आराखडा बांधला जारचा. सगळे क्षण धुंद आणि अविस्मरणीय.संपू नये असे वाटणारे.बगीचा म्हणजे फुलं आणि प्रेम  बहरण्याचं एक ठिकाण.

     मी एका कार्पोरेट कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर होतो. पॅकेज चांगलं होतं.  डायरेक्टर बोर्ड माझ्यावर खुश होते. त्यामुळे कदाचित चिफ प्रोडक्शन मँनेजरचं प्रमोशन मिळणार होते. आमची गावात पंधरा एकर बागायती जमीन व बंगला होता. उत्पन्न भरपूर होतं.पण इथं राहिलो व इथलेच झालो.

       अनघा आयुष्यात आली. ती  माझ्या आयुष्यात कधी कुठे  भेटली आठवत नाही पण नंतर कळले की मी तिच्यामध्ये गुंतत चाललोय.

    मी ऑफिसमध्ये असताना ती सतत फोन करायची.  मी तिला कडक शब्दात बोलायचा,

   " मी ऑफिसमध्ये मजा मारत नाही."

   " सॉरी, आठवण झाली म्हणून काँल केला."

   " मला खूप काम असते."

   " तुझं काम झाल्यावर तूच कॉल कर."

       ती श्रीमंत घराण्यातील मुलगी होती. श्रीमंत घराण्यातली म्हणून अहंकार नव्हता.एक साधी, सरळ, प्रामाणिक मुलगी. थोडी पापभिरू. घरचं वातावरण धार्मिक. कदाचित हेच कारण असेल प्रेमात पडायला. महत्वाचं म्हणजे ती सुसंस्कृत होती.

      आमचं प्रकरण दोन्ही घरात माहिती होतं. कुणाचाही विरोध नव्हता.आमचं भेटणं, फिरणं चालू होतं. आमच्या घराला  पण आध्यात्मिक परंपरा होती. थोर संत परमपूज्य आत्मानंद  बापू  यांच्या विचारांचा प्रभाव होता. आमच्या घरातल्या सर्वांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती. आम्ही सर्वजण मी आणि माझे आई बाबा  बापूनी दिलेल्या मार्गाने जातो. नेहमी साधना करतो.  मी खूपच भाग्यवान. कारण माता-पिता धार्मिक व गुरु उच्च दर्जाचे मिळाले. पत्नी पण अशीच मिळावी हीच माझी अपेक्षा होती  आणि आणि अनघा  आमच्या विचारांना  साजेशी होती .


      मोबाईलवर व्हाट्सअप अपडेट करण्यात व्यस्त होतो.काही रिपोर्ट पेंडींग होते.काही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या लोकांना मी मुद्दाम जास्त काम देउन रिपोर्ट मागवत होतो.एवढ्यात आवाज आला,

       "  शिशिर, सॉरी वेळ झाला."

       " मी जाब नाही विचारला, बैस."

       " ट्रॅफिकमध्ये  अडकले."

       " पण मी चिडलो नाही."

       " असं कसं? इतका वेळ थांबलास?"

       " मग मी वैतागायला हवंच का?"

       "नाही."

        " मी माझं काम करत समोर बाकड्यावर जे काकी बसलेत नां त्यांना आँबझर्व करत होतो. या वयात सुद्धा कसं नवीन लग्न झाल्यासारखं वावरतात. कदाचित अत्यंत सुखी जोडप असेल!"

       " खराय, येणाऱ्या प्रसंगाची तर तडजोड केली तर दुःखाचे कारण उरत नाही."

       " मला पण त्याच अपेक्षा आहेत."

     तिनं येताना आईस्क्रीम आणली होती. नेहमीच महागडी आईस्क्रीम आणायची. एक कप मला दिला. मी अधाशाप्रमाणे खायला सुरुवात केली. ती पण खाणार एवढ्यात एक फाटक्या कपड्यातला लहान मुलगा आशाळभूतपणे येऊन पाहू लागला. अनघाने त्याला बोलावले व कप  हातात दिला. तो मुलगा इतका खुश झाला तो कप घेऊन पसार झाला.त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अनघा पण खूष झाली.

       " आता तुला नको का?"

       " आहे ना! आपण अर्धा खाऊ. त्या मुलाच्या चेहर्‍यावर समाधान पाहून मला खूप आनंद वाटला."

        मला तिची कल्पना जबरदस्त आवडली. मी अर्धवट खाल्लेला कप तिच्याकडे सुपूर्त केला.


        " अनघा, एकदा वाटतंय व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. कुठलीही अडचण नाही.कुठलीही तक्रार नाही. कदाचित आपल्या मैत्रीला दृष्ट करणार नाही ना?"

      " दृष्ट लागली तर लागली. मैत्री सांभाळणारे आपण आहोत नां, मग आपल्यावर वाईट नजर टाकणारे कोण?"

     " असं नाहीये. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. आपलं वर्तमान चांगला, भूतकाळ चांगला पण भविष्यकाळ चांगला येईलच असं सांगता येत नाही."

     " कशाला पुढच्या गोष्टी करतोस? भविष्यकाळाच्या घटनेसाठी आपला वर्तमान खराब करायचा कां?"

     " नाही, पण एक मनाला भिती चिकटून राहते."

     " जसं होईल तसं होईल!काहीही चिंता करू नकोस.कितीही अडचणी आल्या तरीआपलं प्रेम कधीही कमी होणार नाही."

      मनाला वाटणाऱी अनामिक भिती मी बोलून दाखवली. पण अनघा ठाम राहिली. तिचा आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. मला पण हेच हवं होत.अनघा खंबीर मनाची होती.धीट होती.

      बराच वेळ झाला.  बऱ्याच गप्पा  झाल्या आणि मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.


    मी सुट्टी घेतली.

    परमपूज्य बापू आज घरी येणार होते.अशा संतांचे घरी येणे म्हणजे भाग्याचा दिवस. आई-बाबा खूश होते. बापूंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. बापू कधीही कोणाच्या घरी खात नव्हते. आम्ही मात्र त्यांच्याकरता गावठी गायीच्या दुधाची सोय केली होती.ते गाईचे दूध घ्यायचे. बाकी हार घालणे, पुष्पगुच्छ वगैरे सोपस्कार त्यांना आवडायचे नाहीत. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने यांच्या स्वागत करायचा. आई-बाबांच्या चेहऱ्यावर आनंद अवर्णनीय होता.

      अकरा वाजताच बापूंचे आगमन झाले. पांढरा नेहरू शर्ट, पांढरी विजार, डोक्यावर चंदेरी केस, गोर्या मुखावर प्रसन्नता. एक विलक्षण तेज होते त्यांच्या नजरेत. धारदार नजर. त्यांच्या नजरेत नजर  मिसळली तर कोणीही त्यांचा  व्हायचाच.

      बापू खुर्चीवर बसले. बाबांनी नमस्कार केला. आईने केला. मग मी उठलो.  त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांचा प्रसन्न चेहरा पाहिला आणि मला खूप बरं वाटलं. त्यांनी प्रेमानं पाठीवरून हात फिरवला.

     " आयुष्यात मोठे व्हायचे ते पैशाने किंवा अधिकाराने नाही. सत्त्वगुणांने  मोठे व्हायचे.  साधना कर. साधनेने पुण्य जमा होते."

      " हो बापू, तुम्ही दिलेली साधना न चुकता करतोः"

     " खूपच छान.ऐकून बरं वाटलं. मला तुमच्या सारख्या तरुणांकडून ह्याच अपेक्षा  की तुम्ही जागृती करा. लोकांना मार्गाला लावा. लोकांमध्ये सात्विकता रुजली पाहिजे. सत्वगुणामध्ये वाढ झाली पाहिजे."

     आम्ही तिघे जण त्यांच्या पायापाशी बसलो. बरीच चर्चा झाली.मग बाबा बोलले,

     " बापू ,शिशिरचं लग्न करायचं आहे."

     " हो का?काही हरकत नाही. त्याची कुंडली आहे का? असेल तर दाखवा."

     बापूंचं वैशिष्ट्य म्हणजे कोणाची पत्रिका बघायची असेल तर ते दिवसातून एकच बघत. एकदा पत्रिका बघितली की मग कोणाचीही पत्रिका बघत नव्हते. आणि पत्रिका बघितल्या तर त्यांचे अंदाज शंभर टक्के खरे ठरायचे.आतापर्यंत कधी त्यामध्ये बदल झाला नव्हता. कधीच खोटे ठरले नव्हते. बापूंचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.

     बापूनी पत्रिका हातात घेतली.  सगळ्या पत्रिकेवरुन नजर फिरवली.मग डोळे मिटले आणि बोलले,

     " वाहवा! भाग्यस्थानात गुरु आणि चंद्राची युती.खूप छान.तु विद्वान आहेसच,अध्यात्मिक प्रगती पण चांगली. सप्तम स्थानावरून असं समजतं की द्विभार्या योग आहे."

     आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पहात राहिलो. कुणाला काही समजेना. बापू हसले व बोलले,

     " दोन लग्नं संभवतात."

     " म्हणजे?आम्हाला काही कळेना."

     " आता त्याचं लग्न औट घटकेचे  ठरेल कदाचित! दोघांचे एकमेकांशी पटणार नाही.दोन वर्षात विभक्त व्हाल. किंवा अशा काही घटना घडतील जेणेकरून  हा दोन वर्षानंतर परत  एकटाच राहील."

     " खरं की काय?"

     "आपण जे सुखदुःख भोगतो हे पूर्व कर्माचं फलीत  आहे.भविष्य म्हणजे पूर्व कर्माच्या बऱ्यावाईट कर्माचं फलित आहे त्यामुळे त्याला नाकरून चालत नाही. त्याला स्वीकारावंच लागतं. मग ते कितीही कटू असो."

    " यावर उपाय काय."

    " आपली साधना वाढवायची जेणेकरून ह्या चक्रातून कायमचं बाहेर पडता येईल. साधनेनं प्रारब्ध शुद्ध होतं.पुढे होणाऱ्या वाईट घटना टळू शकतात."

   " मग लग्न करायचे का नाही?"

   " तुम्ही तुमची जबाबदार कर्म करत राहा. फळ तुम्हाला मिळणारच आहे. त्याला सुंदर पत्नी मिळेल, ती श्रीमंत असेल, तिचा नाव 'अ' या अक्षराने सुरू होणार असेल! पण ती तुमच्या घरांमध्ये सामावून जाते की नाही हे माहित नाही.  पण मला जे दिसते ते मी सांगितले."

     नंतर काही बापू शांत बसले. मग ते बोलले,

    " चिंता करू नको. काही काळ कसोटीचा असला तरी सगळं चांगलं होणार आहे. मी जी भाकिते सांगितली ती नव्यानव टक्के खरी आहेत. कदाचित एक टक्का असेल की हे बदलू शकेल सुद्धा! पण नव्यानऊ आणी एक यामध्ये खूपच फरक आहे. एक काम करा,लग्न स्वाती नक्षत्रावरच करा.साधना वाढवा.फरक पडू शकेल."

    माझ्या डोक्यात कोणीतरी घण घालावे तसं झालं. मी निराश झालो.मनामध्ये जी अनामिक भीती वाटत होती ती खरी ठरणार होती. आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट तरी लागणार होती.

    " शिशिर, नाराज झालास."

    " नाही बापू"

    " सत्य कटू असतं पण ते सत्य असतं."


     बापू निघून गेले. पण मी विचारात पडलो. आई-बाबांना पण परिस्थिती समजली. बापूंच्या भाकितानुसार सुंदर दिसणारी,श्रीमंत  घराण्यातली  व 'अ' अध्याक्षरानुसार  नाव असलेली  मुलगी म्हणजे 'अनघा.'

    म्हणजे मी अनघाबरोबर लग्न केलं तर दोन वर्षांमध्ये आम्ही विभक्त होणार होतो! बापरे! किती कठीण आहे! अनघा बरोबर लग्न केलं तर आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या प्रेमाला तिलांजली द्यावी लागणार होती. मला ते नको होतं.मला हे प्रेम आयुष्यभर टिकवून ठेवायचे होते. पण ही अशी वागू शकेल का कि जेणेकरून आम्ही दोन वर्षांमध्ये विभक्त होऊ. असं कसं होईल?

    त्यापेक्षा केलं तर!

   आपल्या प्रेमाला विसरून जायचं.

   प्रेम केलं ना ते सूक्ष्म रुपात आपल्या मनामध्ये ठेवायचं. आयुष्यभर मनामध्येच राहू द्यायचं. कटू होऊन एकमेकाला दोष देत वेगळं होण्यापेक्षा विरहाच्या दुःखाने वेगळं होणं बरं! नाहीतरी काय शेवटी दुःख पदरी पडणार आहेच ना!

    आता निर्णय सांगायचा.जड अंतकरणाने सांगायचा.ती चिडेल, रडेल, ओरडेल.काही हरकत नाही.

   आई-बाबांना माझा निर्णय सांगितला. त्यांना पण खूप वाईट वाटले.बाबा म्हणाले,

    "नियतीची काही वेगळीच इच्छा असेल!"


   आमचं भेटण्याचे नेहमीचे ठिकाण. 

   मी तिची वाट पाहत बसलो होतो.पण भेटण्यात उत्साह नव्हता,आकर्षण नव्हतं. कदाचित ही आमची शेवटची भेट होऊ शकेल!

     ती आली.उत्साहाचं बोलणं नाही, रागावणं नाही, चिडणं नाही. काही तरी अंतर असल्यासारखं.तिचा चेहरा उतरला होता.नाराज होती.

    " शिशिर, एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे."

   " मनातलं बोललीस. मला पण हेच सांगायचय."

   " माझी आजी आजारी आहे रे!खूप म्हणजे खूप प्रेम करते माझ्यावर. डॉक्टर म्हणतात एक महिन्यापेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. तिची इच्छा आहे माझं लग्न होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा. "

   " मी जे सांगणार आहे ते त्याहीपेक्षा दाहक आहे. कदाचित तू सहन करू शकणार नाहीस."

    " असं काय आहे जे सत्यापेक्षा मोठं आहे? मला माहित आहे तु काय सांगणार आहेस. नेहमीचंच रडगाणं.हे असं झालं तर ते तसं झालं तर!"

    " ऐकून घे,  काल बापू घरी आले होते.त्यांनी माझी पत्रिका बघितली.त्यांनी तुझं वर्णन सांगितलं आणि असं सांगितलं की आपण दोन वर्षांमध्ये विभक्त होऊ."

   " तुझा काय विचार आहे?'

   " बापूंची वाक्य म्हणजे काळया दगडावरची रेघ. कधी खोटं खरं करू शकत नाही."

    " आपले विचार एवढे  जुळतात की कदाचित बापू कुंडली बघायला चुकले असतील! मला पटत नाही."

    " पण विषाची परीक्षा कशाला बघायची."

    " तुझा काय विचार आहे?"

    " बस, आपण इथेच थांबायचं. दोन वर्षात एकमेकांना दोष देऊन दूर होण्यापेक्षा प्रेमानं विभक्त होऊ .आपला प्रवास संपला. आयुष्यातल्या प्रवासात आपली कधी भेट होईल न होईल.पण समजून घे.आपण एकमेकाला विसरणं शक्य नाही म्हणून आपल्या प्रेमाचा वीस्फोट करण्यापेक्षा प्रेम आपल्या मधून मनामध्ये सूक्ष्म रुपात साठवण बरं."

     " आपली भांडणं होतील?"

     " पटत नाही मला,पण पत्रिका असं सांगते.  विभक्त होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं! कदाचित निर्माण होत असावं!"

      " ठीक आहे,मला हे अपेक्षित नव्हतं. पण.."

      " मला समजून घे अनघा."

      " ठीक आहे. चालेल. बापूंचे शब्द म्हणजे शब्द. ते बदलू शकत नाहीत ते मला माहित आहे. मोठ्या मनाने आपण दोघही आताच विभक्त होऊ. बाय."

     ती उठली आणि चालू लागलीसुद्धा. मी थांबवायचा प्रयत्न केला नाही .तिने मागे वळून बघितले नाही. तिची छबी शेवटचं नजरेमध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

 

                    (दोन)


    बाबांना समाजात आदराचे स्थान असल्याने त्यांना  खूप मान होता. मोठमोठे लोक त्यांच्या संंपर्कात असतात. नेत्यापासून श्रीमंत व्यक्ती पर्यंत त्याचे मित्र होते. त्यांच्या एका मित्रांनी श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचं स्थळ आणलं.

    वैशिष्ट्य म्हणजे ती मुलगी सुंदर होती,तीचं नाव अक्षया.

     बापूनी सांगितलेल्या भाकिताचा प्रत्यय आला होता.

    आई-बाबा पण समाधानी झाले. मी ठरवले, कुठलेही वाद न होता, कुठलीही तक्रार न होता संसार करायचा.  कधीही  वादाचे  प्रसंग येऊ द्यायचे नाहीत.

    अक्षया लग्न झाल्यावर खुश होती. मी पण मनात विचार केला, पत्रिकेतले अंदाज चुकले तरी बरे होईल. नव्यान्नव टक्के खरं,एक टक्का बदलण्याचा.म्हणजे त्या एक टक्कयामध्ये मध्ये आपण आलो तर खूप चांगले होईल. 

  अक्षया श्रीमंत घरातली, त्यामुळे एक लाडावलेली मुलगी होती. खर्च अफाट करायची. मैत्रिणी भरपूर होत्या.अत्यंत  स्वैर असं वागणं होतं.

    पहिल्यांदा अंदाज नसतो घरातल्या माणसांची कसे वागावे याचा,पण ती हळूहळू मार्गावर येईल.स्त्री जर समजूतदार असेल तर कुठल्याही व्यक्तीशी एकरुप होते.

   आमचा घराणं धार्मिक होतं. पण धर्मांध नव्हतं.घरात सगळ्या गोष्टी शास्त्रानुसार चालायच्या.कर्मकांड शास्त्रानुसार व्हायचं. आमची आई आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये सुद्धा येत नव्हती.जेवताना श्लोक म्हणल्याशिवाय जेवायचं नाही. बाहेरून येताना पायावर पाणी घेऊनच घरात प्रवेश करायचा. शास्त्र पाळलं जायचं.

       येणारी मुलगी जर अशा धार्मिक घराण्यातली  असेल तर ती घरात लवकर समरस झाली असती.अनघा घरामध्ये रुळली असती, पण अक्षयला मात्र कठीण जाणार होतं. आईचं मत होतं आपण जे नीतीनीयम पाळतो ते सुनेनं तंतोतंत नाही पाळले तरी चालतील,पण एक चांगली गृहिणी म्हणून तिनं घर सांभाळावं,आपले ऋणानुबंध सांभाळावेत, वाढवावेत.

     अक्षया या घरात आली तेव्हा थोडी भेदरली होती. घरची श्रीमंती.त्यामुळे बेफिकीर होती. स्वैर विचारांची होती. तिच्या बाबांनी तिला महागडी कार भेट दिली होती. मैत्रीणी भरपूर होत्या. त्याच्याबरोबर फिरणं असायचं.तिला  घरचे सोपस्कार माहीत नव्हते.सतत हातात मोबाइल आणि त्यावर फिरणारी बोटं असंच द्रश्य दिसायचं.

      मला तिच्या सगळ्या सवयी माहीत होईतोपर्यंत थोडीशी तडजोड करावी लागणार होती. तिला तिच्या चुका सांगून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा लागणार होतां.शेवटी संसार सुखाचा करणं आपल्या हातात असतं.दोन माणसांची मतं भिन्न होतात तेव्हा  वाद होतात.नंतर भांडण. भांडण होतात कारण त्या दोघांपैकी कोणीही मागे हटत नाही. कमीपणा वाटत असतो. त्यातल्या एकानं  माघार घेऊन दुसऱ्याच्या विचाराशी तडजोड  केली तर कधी भांडण होण्याचा  संभव येत नाही. माणूस सुखी होतो.त्याला चुका समजतात. मला वाटत नाही की आमचे वाद होतील! मी सगळं सांभाळून घेईन. तिच्या चुका असतील तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि एक ना एक दिवस ती या घराची होईल.

    

      तिला घरामध्ये समरस व्हायला वेळ लागणार होता.  एकेक गोष्ट लक्षात यायला लागली. तिला किचनमध्ये काही येत नव्हते. घरातले शिष्टाचार माहिती नव्हते. वडिलधार्‍यांची कसे वागले पाहिजे याची माहिती नव्हती. पण मला खात्री होती की एक ना एक दिवस ती वळणावर येईल आणि घराची होईल.

    एक दिवस संध्याकाळी झोपताना  ती बोलली,

   "कठीण आहे सगळं!" 

   "काय झालं ?'

    "काही नाही. मला काही समजत नाही.  ह्या घरात माझा टिकाव लागणार नाही .माझ्या मनासारखं काही होत नाही ."

   "  काय पाहिजे तुला?'

   " मिळणार तर नाहीच  पण विनाकारण त्रास होईल." 

   "अक्षया, ऐकून घे,काही दिवस तुला त्रास होईल  पण नंतर चांगलंच होईल."

    " चांगलं  का वाईट? कठीण आहे सगळं."

     ती अबोल झाली.माझ्या कुठल्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही.पण एवढंच जाणवलं की ती आपल्या स्वभावाची समरस होत नाही. ती घुसमटतेय.

    हा पहिला घाव होता.

    तिच्या मनाचा अंदाज लागत नव्हता.प्रत्येक गोष्टींमध्ये मी तिच्याशी तडजोड करत होतो. तिचं असं वागणं आई बाबांना पण पटत नव्हतं. पण ते बोलत नव्हते. तिचं इथलं वागण एकदम स्वैर होतं. ती घरात आईला मदत करायची नाही.मनमोकळेपणाने बोलायची नाही.आई सकाळी चहाचा कप तिच्या हातात ठेवायची तेव्हा माझं काळीज तुटायचं.

    बापूनी सांगितलं होतं पत्नीबरोबर एकमत होणार नाही. त्यांच्या अंदाजाप्रमाणे हा प्रवास चालू होता.आईबाबा तिला खूप समजवायचे पण तिच्या डोक्यात जायचं नाही. ती आई बाबाना प्रत्युतर करायची.आई पण शांत बसायची.

 

    अंनघाचं  लग्न झालं पण तिने मला एका शब्दानेही सांगीतलं नाही. फोन सुद्धा केला नाही. तिला फोन केला तर लागायचं नाही.कदाचित नंबर ब्लॉक केलेला असावा! एके दिवशी मित्राच्या मोबाईल वरून तिला कॉल केला. तिने उचलला, "हॅलो.. हॅलो मी शिशिर.."

      " शिशिर, तु माझ्याशी बोलायचा अधिकार गमावला आहेस, परत कॉल करू नको. आता आपले संबंध तुटलेले आहेत.मी परस्त्री आहे."

     " ऐक तरी काय म्हणतो.."

     " सॉरी …"

      तिनं फोन ठेवला.

       

  एक दिवस अक्षया बोलली,

   " तुझे आई-बाबां खूप पुराणातले वाटतात. जग पुढे गेलंय पण हे बदलायला तयार नाहीत. हे परत मागच्या काळातच वावरतात. कां बदलत नाही स्वतःला?"

    " बदलायचं म्हणजे काय करायचं?"

    " अरे, काय दिवसभर बापू बापू करतात. आम्ही घरात नसतो कां? माझे बाबा कसे कपडे घालतात, कसे वागतात, किती मित्र आहेत त्यांचे समजत नाही त्यांना?"

    "हे बघ, माझे आई-बाबा असेच दिसतील, असेच राहतील.त्यांनी काय करायचं, काय नाही करायचं हे तू सांगायची गरज नाही.आमचं घर एक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ,त्यांच्या संस्कारावर चालू आहे. आमच्या घरावर त्यांची नजर आहे. त्यामुळे यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नको.पण हेच विचार तुसुद्धा आत्मसात  केलं तर बरं होईल."

    " मला  अजिबात पटत नाही.परवा दादाच्या वाढदिवसाला आमच्या घरी सर्वांना जेवणाचं निमंत्रण होतं.तुमच्या घरचे हाँटेलात खात नाहीत म्हणून घरीच कार्यक्रम होता. पण जेवले नाहीत."

    "अगं,माझे आई बाबा बाहेर काही खात नाहीत. आणी तुमच्या घरी तर मांसाहार बनतो नां!म्हणून.."

    "आमच्या घरच्यांना वाईट वाटलं. हे वागणं अपमानास्पद होतं.सर्वांच्याबरोबर डिनर शेअर केलं असतं तर काय बिघडलं असतं?"

    "काही तत्वं असतात.पण त्यामुळं अपमान कसा होईल? तु थोडं जाणून घे, त्यांना आत्मसात करून घे. तुझे पण कल्याण होईल."

    " खुळचट कल्पना, सगळ्या अंधश्रद्धा आहेत."

    "आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत."

    " कसले फालतू विचार."

    " श्रध्दा, अंधश्रद्धा यात फरक आहे ."

    " माझ्या एका मैत्रिणीने तिचे सासू सासरे असे जुने विचाराचे असल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवले."

    "  माझे आई बाबा म्हणजे माझ्याकरता देव आहेत.परत हा विचारही मनात आणू नकोस."

     या घटनेनंतर मात्र मी आणि ती दुरावत चाललो. माझी घालमेल आई-बाबांना बघवत नव्हती.अशावेळी साधना करण्यात जास्त वेळ घालवतो. शांत वाटायचे.

    आमच्यातलं अंतर वाढत होतं.अक्षयाच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता.ती अजून तशीच वागत होती. मला वाटतं की तिच्यात काहीही फरक पडणार नाही. आमचं पटणारच नाही.कदाचित बापू सांगतात ते खरं होणार असेल! अक्षयाचा एकच विचार. तो म्हणजे घटस्फोट.

     

     आई तिला चहा घेऊन गेली.तिनं मौन राहून असंतोष पुकारला  होता.आईनं विचारलं,

    " कां रे बाळा,नाराज का?"

    " काही नाही, माझ्या आयुष्याची वाटच चूकली. मला मनासारखं माहेर मिळालं नाही."

    " आमचं काही चुकतंय का?"

    " नाही चुकत. मलाच काय समजेनास झालय."

    

      एक दिवस बापू घरी आले. आम्ही त्यांच्या पायावर डोके ठेवले. बराच वार्तालाप झाला आणि बापूनी विचारले,

    " सुनबाई कुठे दिसत नाही?"

    मी तिला आतून बोलून आलो. तिला सांगितला नमस्कार करायचा. मग तिने बापूंना नमस्कार केला. 

     " कसं काय चाललंय अक्षया?"

    बापूने आपला नाव घेतल्यानंतर ती चपापली,

     " ठीक चाललंल बापू."

     " छान! असेच राहा. आता आई बाबांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी तुमचीच आहे.त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून सगळं आत्मसात करून घ्या.नशीबानं चांगली माणसं मिळाली तुम्हाला. तुमचं कल्याण आहे."

    बापू निघून गेले.

    पण त्या दिवसापासून अक्षया पूर्णपणे बदलून गेली.जणू काय बापूनी जादूची कांडी फिरवली. ती स्वतःच्या चुका सुधारू लागली. आई-बाबांशी प्रेमाने वागू लागली. माझ्याशी चांगले वागू लागली.  विचार होता घटस्फोट देण्याचा तो बदलू लागला.  बापूं सांगत होते तसं सगळं घडत गेलं तर एक टक्क्यातील भविष्य घडण्याची पण शक्यता होती.तसं घडलं तर चांगलंच.

     तिनं आता किचन ताब्यात घेतलं. आईला काम करू द्यायची नाही.बाबाला काय हवे-नको ते बघायची. खूप म्हणजे खूपच बदल झाला होता. ती घरातली झाली होती.आमची झाली होती. पूर्णपणे झाली होती.

    आमचं दोघांच फिरणं होत होतं.कधी एखादी छोटीशी ट्रिप,कधी एखादा पिक्चर,कधी शाँपींग.

   मी सुखावत चाललो.अगदी अनघा असावी असंच वागत होती.बापूंच्या विषयी तिच्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला होता. माझ्या मनासारखं घडंत होतं. आता लग्न होउन दोन वर्षे व्हायला फक्त एक महिना शिल्लक होता. दोन वर्षात  एकमेकांचा दुरावा हे भाकीत खोटे ठरणार होते.

    

   मी कंपनीतून लवकर घरी आलो. तिनं माझं हसून स्वागत केलं.ती चहा छान करायची.मला म्हटली,

   " मी आज माहेरी जाते.चंद्र म्हणजे आमच्या शेजारील मुलगा,त्याचा वाढदिवस आहे. हवंतर आई बाबांना विचारून जाते."

   " काही हरकत नाही. मी बोलेन त्यांना."

    "लौकर ये."

    "हो.मला पण तुझ्याशिवाय करमत नाही."

   ती गेली. तिने बॅग घेतली आणि गाडी मध्ये जाऊन बसली. तिने हात हलवला. गाडी गेटच्या बाहेर पडेतोपर्यंत मी पहात होतो.

    मी मात्र सुखावलो होतो. सगळं बदलत चाललं होतं. आई-बाबा पण समाधानी होते.एक दिवस बापू  घरात येतील, ते आमचं घर बघून खूप खूप समाधानी होतील याची खात्री होती. कारण दोन वर्षात आम्ही विभक्त होऊ हा अंदाज खोटा होणार होता.बापूना पण आनंद झाला असता. आम्ही आता आयुष्यभर एकत्र रहाणार होतो.

     आई आली. तिनं विचारलं,

      "अक्षया कुठे गेली?"

      " आपल्या घरी गेली. उद्या येईल."

      " असू दे .राहू दे .आणि दोन दिवस राहिली तरी चालेल. बरेच दिवस नाही गेली घराकडे.

      लग्नापासून झालेल्या एक घटना आठवत होतो. पहिल्यांदा तिचा स्वैराचार .नंतर आमच्यावर  टाकलेला मौन बहिष्कार. अबोल राहून केलेला. आणि नंतर घरात सून म्हणून वावरताना घराने केलेला तिचा स्वीकार.

   सगळे बदल अनपेक्षित होते. जिला घटस्फोट ध्यायचा विचार केला होता तिचाच प्रेमानं स्विकार केला होता.

   मोबाईलची घंटी वाजली.अनोळखी नंबर होता. मी मोबाईल उचलला.

    "हॅलो ,आपण शिशिर कां?"

    "हो. शिशिरच बोलतोय."

     "सॉरी, एक वाईट बातमी आहे.आपली पत्नी अक्षया हीचा अपघात झाला आणि ती म्रत झाली आहे."

     बापरे!एवढी भयानक बातमी! क्षणभर मला काहीच सुचेना.डोक धरून खाली बसलो. ते बघून आई आली,घाबरत बोलली,

       " काय झालं रे बाळा?"

       "आई, अक्षया गेली."


                 (तीन)


     अक्षया गेली. एक मोठी जखम झाली.

      बापूंचे अंदाज खरे ठरले.

      परत एक पोकळी निर्माण झाली.सरळ जाणार्या आमच्या रस्त्याला आणि किती वळणे आणि किती अडथळे मिळतात. पण बापूंचा हा पण अंदाज होता की माझे दुसरे लग्न होईल! पण माझा विचार होता की परत दुसरे लग्न करायचं नाही. काहीही झालं तरी. एखादा अंदाज चुकू शकतो सुद्धा काही सांगता येत नाही.

   हल्ली आईला घरातलं व्हायचं नाही.  आई स्वयंपाक स्व:ता करायची. मला कुक ठेऊ दिला नाही.दुसऱ्याने केलेलं तिला आवडायचं  नाही. आम्ही तिला खूप समजवायचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती.

       तिला पूर्वीपासूनच कष्ट होते. मी एकटाच.बहीण नव्हती. त्यामुळे सगळे एकटीच करायची. कधी त्रागा नाही. कधी नाराजी नाही.

      एक दिवस ती बोलली,

     " घरात सून यायला पाहिजे."

      परत तोच विचार जो मला नको होता. परत लग्न, परत संसार, परत आपल्या विचाराशी सहमत न होणाऱ्या मुलीशी  संसार. नको ते पारतंत्र्य नको .

       दोन घाव मनावर बसले होते. पहिला घाव अनघाला सोडण्याचा. दुसरा अक्षयाचा.आता थांबायला हवं.

   " आई, मी तुला मदत करतो, पण मला लग्न नको."

   " सगळ्या मुली सारख्याच नसतात."

   " पण लग्न नावाच्या शब्दाची  भिती वाटते."

   " काही नाही. सगळे निट होईल.बापूनी अंदाज केले होते ना तुझं दुसर लग्न होईल म्हणून."

   " मला खोटे ठरवायचं."

   " त्यांचं कसं खोटं होईल? आमच्यानंतर तुझं कसं व्हायचं? तुला कोण सांभाळणार? शेवटपर्यंत बायको म्हणजे मोठा आधार असतो. शेवटपर्यंत प्रत्येक सुख दुःखात ती भागीदार असते."

    " मला आता कुठली मुलगी मिळेल?"

    " मिळेल ना! अजून तरुण आहेत ना!"

   कधी कधी अनघाची आठवण यायची. ती सुखात आहे असं ऐकायला मिळालं.आणखी काय हवं? एक सुखी संसाराची कल्पना हवेतच विरली होती.


    मला चिफ प्रोडक्शन मॅनेजरचे प्रमोशन मिळाले. सँलरी वाढली.डायरेक्टर बोर्डाने माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली. आई-बाबाना बातमी सांगायची. आई-बाबा किती खुश होतील! मिठाई घेतली. मिठाई घेऊनच आईला बातमी सांगायची.

      माझा प्रसन्न चेहरा पाहून आईबापांना प्रसन्न वाटले. त्यांचा चेहर्‍यावरचा आनंद बघून मला पण छान वाटलं. मी बॉक्स उघडला. महाराजांच्यापुढे ठेवला. नंतर त्यातला पहिला पेढा काढला. आईला चारणार तेवढ्यात आईने आपल्या जवळचा पेढा  मला भरला.

    "काय हे आई!माझ्या अगोदर ही बातमी तुला समजली?"

     " वा! म्हणजे तुला पण समजलं वाटतं?"

     " हो, मला समजलं म्हणजे काय? मला तर पहिल्यांदा समजलं पाहिजे. डायरेक्टर बोर्डाचा निर्णय आजच झाला."

     " कशाबद्दल बोलतोस?"

     " माझ्या प्रमोशन बाबत. मी चिफ झालो."

    " वा!वा! काय आजचा दिवस! एक धक्के बसत आहेत."

    " तुला काय म्हणायचंय?"

    " अरे,तुझ्यासाठी मुलगी आलीय.चांगली आहे.पण ती घटस्फोटित आहे."

    " परत घटस्फोटित मुलीशी लग्न करायचं?"

    " मग काय झालं?  ती काय स्त्री नसते का?"

    " ती चांगली वागत नसेल म्हणूनच तिला घटस्फोट मिळाला असेल ना!"

    " असं काही नाही.नवरा व्यसनी निघाला. मारहाण पण करायचा.दोघांचे विचार पटत नव्हते.मग घटस्फोट. काय तिचा दोष? समाजात अनेक मुली चांगल्या असतात. नवरा चांगला नसेल तर काय होईल? बघू आपण.स्थळ चांगलं आहे."

     " आई स्वारी, मला लग्न करायचं नाही. नाही म्हणजे नाही.आयुष्यभर असाच राहीन.''


      मी खंबीर झालो.मनाची तयारी केली. आईला समजायचं. आपण लग्न करायचं नाही. लग्न ह्या गोष्टीविषयी मला खूप तिटकारा होता.

     लग्न व्हायच्या अगोदर हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. निर्णय चुकतात आणि नंतर पश्चाताप होतो. अनघा आयुष्यात आली.खरंतर तिच्या व्यतिरिक्त मला दुसऱ्या मुलीचा विचार येतच नव्हता.लग्न अपघातानं झालं.

    पण आता लग्न करायचं नाही.

    "शिशिर,आजच मुलीकडले येणार आहेत "

   " सॉरी, मी नाही थांबणार."

   " असं का रे? आम्ही काय तुझं वाईट करणार आहोत का? झाले गेले विसरून जा. संसार करून  सुखी हो.तुम्ही दोघे जण एकत्र थांबा. एकमेकांचे विचार पटतात का बघा.मग आपण ठरवू."

   आईच्या समाधानासाठी मी तयार झालो. ठरवले. भेटायचं आणि आपले विचार पटत नाहीत, आपल्याला मुलगी पसंत नाही असं सांगायचं. म्हणजे आईपण नाराज होणार नाही."

    मी ठरवलं.लग्न करायचं नाही. आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळायचं. नंतर बापूंच्या आश्रमाचा कारभार स्वीकारायचा आणि तिथंच राहायचं.

    आई म्हटली "तु तयार होउन ये. दोन खुर्च्या गँलरीत ठेवल्यात.तुम्ही दोघं तिथंच बसा.नंतर आम्हाला तुमचा निर्णय सांगा.तुमच्या मनाविरुद्ध आम्ही जाणार नाही. वेळ झालीय, येतील ते आता."

    बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.

    मी माझ्या रूममध्ये आलो.मंडळी बाहेर बसली. बोलाचाली, हास्यकल्लोळ चालला. मी त्यात नव्हतो. मी एकटाच होतो.

    बाबा आले.त्यानी मुलगीला गँलरीमघ्ये थांबवून घेतलं होतं.

   " शिशिर,मुलीला बघून घे.एकमेकाशी बोला.विचार पटतात का पहा.मग सांगा.काळजी करु नकोस."

    मुलगी गँलरीत बसली होती. मी नाराजीने गेलो.एक सोपस्कार म्हणून बोलायचं ठरवलं.नकार ठरलेला होताच.

   मी तिच्याकडे पाहिलं नाही. खाल मान घालून बसलो.

    "बोलायचं नाही कां?"

    आवाज ओळखीचा वाटला. मी तिच्याकडे पाहिलं आणि चाट  पडलो. खूप मोठा धक्का बसला. मी आनंदाने बेहोश झालो आणी ओरडलो,

    " अनघा तू…"

    " आवडले नाही का?"

    " नाही, पण  हे कसं काय?"

    " आपलं एकत्र यायचं होत नां!"

    " चल ..आपण खाली जाऊ.मी तयार आहे."

   तिचा हात हातात घेतला व आम्ही खाली चाललो.अगदी मनात कुठलाही किंतू न ठेवता.अगदी समाधानानं.

    बापूंनी सांगितलेले कुंडलीतले सगळे अंदाज ठरले होते.



   मुरलीधर देवर्डेकर

      ????????






     

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू