पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दोष ना कुणाचा

                 " दोष ना कुणाचा "

" बाईसायेब ! भायर एक जोडपं आलंय कारमदनं ! बाईमानूस जरा घायकुतीला आल्यागत वाटतय्. टायलेटला जावू देता का म्हूण इचारत्यात. काय सांगू त्यास्नी ?
     सखारामने, फार्महाऊसच्या दिवानखान्यात बसलेल्या मालतीस, जाळीच्या दाराबाहेरुन विचारले. मालतीने प्रश्नार्थक नजरेने प्रभाकरकडे पाहताच, त्यांनी किलकिल्या डोळ्यांनी, बंगल्याच्या फाटकाकडे पाहिले. सामान्य वेशभूषेतील, प्रौढ जोडप्यास पाहून त्यांनी मालतीस मूक संमती दिली.
     " बरं ! जा ! त्यांना तुझ्या खोलीत घेऊन जा. आणि वेंधळ्यासारखा इकडे-तिकडे जाऊ नकोस. लक्ष ठेव त्यांच्यावर. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवणं फार महागात पडतं आजकाल." मालतीने सूचना देताच आनंदून सखाराम म्हणाला,
     " भल्या घरची दिसत्यात मानसं. डाक्टर हाय म्हणत हुतं. डाक्टरांच्या गाडीवर असतं तसं, बेरजेचं निसान बी हाय तेंच्या गाडीवर."
     "बरं ! बरं ! आता आणखी अकलेचे तारे तोडू नकोस.
चेहऱ्या-मोहऱ्यावरुन आणि कपड्यांवरुन, माणसांची पारख करण्याचे दिवस नाही उरले आता. त्यांनाही आपल्याच घरावर फुली मारायची होती. भित्यापाठी ब्रह्मराक्षस !" बडबड करत मालतीने पटकन दार बंद करुन घेतले.
     प्रभाकर-मालती किंवा त्यांचा मुलगा व सून, अधून-मधून फार्महाऊसवर राहण्यास यायचे. सखाराम आणि त्याची बायकामुले मात्र तिथेच राहत असत. आजूबाजूला तुरळक वस्ती होती. काही दिवसांपूर्वी जवळच्या एका फार्महाऊसमध्ये, पत्ता विचारण्याच्या निमित्ताने काही चोर आले होते. बंगल्यात बडी आसामी असेल आणि मोठ्ठा डल्ला मारायला मिळेल, या उद्देशाने, ते बंगल्यात घुसले. पण मनासारखं घबाड मिळालं नाही म्हणून नोकरांना बरीच मारहाण करुन ते पळून गेले. त्या प्रसंगाची धास्ती घेतल्याने, मालती-प्रभाकर कुणा आगंतूकाला घरात घेण्यास धजावत नव्हते.
     विधी आटोपताच, सखारामचे आभार मानून, ती अनोळखी दंपत्ती जायला निघाली. प्रभाकरने चष्मा लावून, खिडकीतून हळूच त्यांना पाहिले. त्या उभयतांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले त्यांना. क्षणभर विचार करुन, पायात चपला सरकवत, प्रभाकर दार उघडून बाहेर आले. एव्हाना, ती दोघे, कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली होती. कारचालकाने कार सुरु केली होती. पुढे सरकणाऱ्या गाडीकडे, प्रभाकरने निरखून पाहिले आणि जवळ-जवळ, वीजेचा झटका बसावा तसे ओरडले,
     " मालती ! इकडे ये. अगं ! बघ, कोण येऊन गेलं आपल्या घरी ! देवमाणसं, स्वतःच्या पायांनी चालत आली गं ! पण आपणच करंटे ! ओळखू शकलो नाही त्यांना !"
     प्रभाकरचा हताश स्वर, वातावरणातील शांतता भेदून गेला. पस्तावलेल्या मनाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी, प्रभाकर दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहत होते. गाडीच्या मागील काचेवर ठळक अक्षरात लिहिले होते,
" हेमलकसा "

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
---------------------------------------------------------------------
लेखिका - सौ. जया गाडगे, इंदूर (म.प्र)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू