पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लांडगा

*लांडगा*

 

कोकणातल्या त्या घनदाट अरण्यात खाचा खळग्यांच्या रस्त्यात ॲडव्होकेट रणजीत खोपड्याची मर्सिडीझ जरी चाळीसच्या वर स्पीड पकडू शकली नसली तरी त्यांच्या डोक्यातील विचार मात्र अतिशय भन्नाट वेगाने धावत होते. कुठल्याही परिस्थितीत उद्या ते ईस्माईला सोडवणार होते. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी कुख्यात दशतवादी "ईस्माईल" उद्या सुटणार होता. ९० टक्के पुरावे ईस्माईलच्या विरोधात असताना देखील तो सुटणार होता. आणि ॲडव्होकेट रणजित खोपड्यांच्या काळ्या संपत्तीत अजूनच भर पडणार होती. गुन्हेगारी जगतातील त्यांचा दबदबा अजूनच वाढणार होता.
तशी त्यांची ख्याती जबरदस्त होती. "खून करा आणि माझ्याकडे या" असे त्यांचे गुन्हेगारांना मुळी
आव्हानच होते. .
आता जवळपास वयाच्या पन्नाशीला आलेले अॅडव्होकेट खोपडे गेल्या २५ वर्षात एकही केस हरले नव्हते. तालुका कोर्टापासून सुरुवात करून पार हाय कोर्टापर्यंत त्यांनी मजल मारली होती. ११ ऑगस्ट १९९५ ला ते पहिली केस जिंकले होते. तिथपासून ते आतापर्यंत त्यांनी ओळीने ९९९ केस जिंकल्या होत्या. भल्या भल्या सरकारी वकिलांना त्यांनी ऐन थंडीत घाम फोडला होता. आणि छोटा शकील, बडा राजन, बहीरा डॉन, कुत्र्या तांडेल, ईस्माईल बुटक्या, वरुण चवळी, जावेद इब्राहीम या सारख्या एका पेक्षा एक नराधमांना फाशी पासून वाचविले होते.
खंडोजी खोपड्यांने स्वराज्याच्या पाठीत एकदाच खंजीर खुपसला असेल पण ॲडव्होकेट. रणजित खोपडे आपल्या भारत भूमिच्या पाठीत वारंवार खंजीर खुपसत होते.
त्यांची फी देखील तशीच जबरदस्त होती......खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटकेसाठी फक्त एक कोटी रुपये आणि त्या बदली कुठल्यातरी निष्पाप जीवाला बळीचा बकरा बनविण्यासाठी वेगळे एक कोटी रुपये. कमीत कमी दोनशे निष्पाप व्यक्ती ॲड. खोपड्यांमुळे उगीचच फासावर लटकल्या होत्या. अर्थातच त्या निर्दोष होत्या हे फक्त ॲडव्होकेट खोपड्यांना आणि ज्यांच्या बदली त्यांना फाशी झाली त्या गुन्हेगारांनाच माहिती होते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या घरातील कुटुंबीय देखील त्या व्यक्तींनांच गुन्हेगार समजून तुरुंगात जावून चपला मारून आले होते......या सर्वावर कळस म्हणजे उलट्या काळजाच्या खोपड्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भाई लोकांकडून मिळालेल्या बोनस मधून त्या निर्दोष व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये मदत करून त्यांची सहानुभूतीच मिळवली होती. अशा फाशी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंत्य संस्काराला खोपडे जातीनिशी हजर राहीले होते. आणि त्याला मुठ माती देताना मनातल्या मनात विकट हसले होते. अशा विलक्षण धूर्त खोपड्यांचा फक्त एकच विक पॉईंट होता आणि तो म्हणजे बाई....... खोपड्यांना बाईचा विलक्षण नाद होता. त्याबाबतीत ते सदा नि कदा वखवखलेच होते. मुळात वयाच्या पन्नाशीला येवून देखील ते अजून जेमतेम पस्तीशीचेच वाटायचे. सहा फुट उंची, काळाकभिन्न पण विलक्षण रेखीव चेहरा, जाड मिशी, आणि बांधेसूद शरिरावर पाहताचक्षणी फिदा होणाऱ्या स्त्रियांची त्यांना आयुष्यात कधीच उणीव भासली नव्हती शिवाय आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली अडकलेल्या प्रत्येक कुटुंबाचा त्यांनी वाईट पध्दतीने फायदा करून घेतला होता आपल्या कावळ्यासारख्या नजरेने सतत ते सावज हेरतच असत.
आजदेखील तेच झालं होतं रत्नागिरी कोर्टात आज ते एक मोठी केस जिंकले होते. इस्टेटीसाठी आपल्या सख्या भावाचा आणि बहिणीचा खून केलेला नराधम यशवंत पाटील याला त्यांनी निर्दोष सोडवले होते. साहजिकच यशवंत पाटील यांनी त्यांना फार्महाऊसवर जेवायला बोलवले होते. कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पोहचायचे असल्यामुळे त्यांनी ते आमंत्रण नाकारले होते पण यशवंतरावांच्या पत्नीने मधुराने त्यांना विलक्षण आग्रह केला होता. तिच्या डोळ्यात त्यांना वेगळेच ''आव्हान'' जाणवले होते आणि ते नकार देऊच शकले नव्हते. यशवंतरावाकडून बरोबर रात्री ९ वाजता. निरोप देण्याचे कबूल करून घेऊन वरवरच्या नाराजीने त्यांनी ते आमंत्रण स्विकारले होते.
बरोबर संध्याकाळी सात वाजता त्यांची आणि यशवंतरावांची पार्टी सुरू झाली होती. म्हाताऱ्या यशवंतरावाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायला त्यांना जेमतेम २५ मिनिटे. लागली होती........चतुर मधुराने नोकरांना अगोदरच रजा दिली होती. आणि बरोबर ७:३० वाजता यशवंतरावांची तरुण बायको मधुरा ॲड. रणजित खोपड्यांच्या मिठीत होती.........खाल्या ताटात घाण करण्याच्या आपल्या वृत्तीला जागून खोपड्याने मधुरा चा मनसोक्त उपभोग घेतला होता....... पण मधुरात काहीतरी खास होत येवढं नक्की, कारण ९ वा. निघणाऱ्या खोपड्यांना घड्याळ्यात रात्री १० चे ठोके पडले तरी निघण्याची शुद्ध नव्हती मधुराला पुन्हा पुन्हा उपभोगून देखील त्यांची तृप्तीच होत नव्हती.
पण त्यांचा स्वतःवर पूर्ण संयम होता. आपल्याला उद्या एक हजारावी केस जिंकायचेय याची त्यांना पूर्ण जाणीव होती. काहीही करून सकाळी ७ वा. कमिशनर कडून काही महत्वाचे पेपर्स हस्तगत करायचे होते आणि म्हणूनच त्यांना सकाळी ६:३० चे आत मुंबईला पोहचणे अनिवार्य होते. आणि म्हणूनच घड्याळात १० चे ठोके पडले होते आणि ते भानावर आले. मधुराचे विलक्षण घायाळ करणारे आव्हान नाकारून तिला पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तिचा निरोप घेतला. बेशुद्ध यशवंतरावाकडे बघून छदमी हास्य करून ते निघाले.
यशवंतरावाचे फार्महाऊस हायवे पासून आत जंगलात होते. तिथून हायवेला येण्यासाठी खाचखळग्यांचा निबीड अरण्यातील ४ कि. मी. चा रस्ता पार करावा लागणार होता. त्यांना त्यांची मर्सिडीझ त्या रस्त्यावर अतिशय हळूहळू चालवावी लागत होती.
चारही बाजूनी निबीड जंगल......... रातकीड्यांची कर्कश किरकिर आणि विलक्षण भीषण असा अंधार.....आणि अशा घनदाट जंगलात एकच गाडी...... सर्वसामान्य माणसाच्या हृदयात धडकी भरवण्यासाठी पुरेस वातावरण होत पण उलट्या खोपडीच्या निडर काळजाच्या खोपडेच्या मनात भितीचा लवलेश देखील नव्हता. फक्त खड्ड्यांमुळे त्याला गाडीचा वेग वाढवता येत नव्हता म्हणून येवढ्या आतमध्ये जंगलात फार्महाऊस घेतल्याबद्दल तो यशवंतरावाला मनातल्या मनात शिव्या देत होता.....आणि तेवढ्यात त्याला ते दिसल...... आपल्या लालभडक डोळ्यांनी रस्त्याच्या मधोमध उभ राहून ते त्याच्याकडे रोखून पहात होत गाडीच्या प्रकाशामुळे त्याचे डोळे टिपले होते पण तरीही विलक्षण हिंस्त्र नजरेने ते गाडीकडे पहात होते. गाडीच्या प्रकाशात त्याच्या तोंडातून बाहेर आलेले सुळे स्पष्टपणे दिसत होते. खोपडेनी त्याला ओळखलं ते रानडुक्कर होत...... आणि गाडीवर थेट मुसंडी मारण्याच्या अविर्भावात रस्त्यावर उभं होत.....
पण गाडीत अँडव्होकेट खोपडे होता...... प्रतिस्पर्धेवर मात कशी करायची हे त्याला बरोबर माहिती होतं....... प्रतिस्पर्धी सावध व्हायच्या आत वेगाने हल्ला ही प्रतिस्पर्ध्याला गारद करण्याची पहिली युक्ती आहे हे त्याने जाणले होते....
अवघ्या दोन सेकंदात त्याने गाडीचा ॲक्सीलेटर भयानक वाढवला आणि त्याच वेळेस गाडीचा गिअर बदलला..... तिसऱ्या सेकंदाला त्याची मर्सिडीझ वर उचलली गेली आणि तिचे बॉनेट, सुळे विचकत उभ्या असलेल्या रानडुक्कराच्या कपाळावर जोरदार पणे आदळले. डुक्कर जागीच आडवे झाले..... पण त्या भिंतीसारख्या डुकरावर आदळल्यामुळे मर्सिडीझचा बॅलन्स पूर्णपणे ढासळला.....ती जवळ जवळ एका बाजूला पूर्णपणे कलंडली. पण वकीली सोबत ड्रायव्हींगच परिपूर्ण ज्ञान असलेल्या खोपडेने विलक्षण कौशल्याने गाडी सांभाळली जवळ जवळ ६० डिग्री मध्ये कललेली गाडी शिताफीने सरळ केली..... पण......रानडुकराने आपले काम केले होते त्याच्या डोक्यावर गाडी आदळताना त्याच्या धारदार सुळ्यांनी गाडीचा डावा टायर पूर्णपणे फाटला होता. गाडी तसूभर देखील पुढे सटकू शकत नव्हती.
" झक मारली आणि त्या मधुराच्या नादी लागलो" . खोपडे आता चांगलाच वैतागला होता. त्याला कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६ वाजेपर्यंत, मुंबईला पोहोचायलाच पाहिजे होते. त्याने घड्याळ्यात पाहिले पावणे अकरा वाजले होते. मोबाईलला अजिबात रेंज नव्हती..... पण खोपड्याची खोपडी अजून कामातून गेली नव्हती त्याने गाडीचा मीटर बघितला.....गाडी जवळ जवळ ३ कि.मी. चालली होती...... याचा अर्थ हायवे फक्त १ कि.मी. वर आहे.१० मिनिटात आपण हायवेवर पोहोचू आणि निघून एखादी लक्झरी मिळाली तर निदान ७ वाजेपर्यंत तरी मुंबई गाठता येईल..... त्याच्याकडे टॉर्च नव्हता.... गाडीच्या बाहेर विलक्षण गारवा अंगाला झोंबत होता. रातकिड्यांची भिषण किरकिर अंगावर शहारे आणत होती.... त्यातच त्याला आठवले. यशवंतराव केस जिंकल्यावर सहजच म्हणाले होते आजची अमावस्या मला चांगलीच पावली म्हणायची येवढा धीराचा खोपडे पण थोडासा हादरला होता.....जोर यावा म्हणून त्याने गाडीतून व्हीस्कीची बाटली काढून कोटाच्या खिशात टाकली आणि मोबाईलच्या प्रकाशात तो वाट चालू लागला. बराच वेळ तो चालत होता पण हायवे अजूनही येत नव्हता त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो थोडासा दचकलाच. ... सव्वा अकरा वाजले होते. म्हणजे तो जवळ जवळ पाऊण तास चालत होता पण अद्यापही हायवे लागला नव्हता..... याचाच अर्थ तो वाट चुकला होता.... त्याला दरदरून घाम फुटला धीर येण्यासाठी त्याने कोटाच्या खिशातून बाटली काढून व्हीस्कीचा जोरदार सिप मारला. त्याला जरा तरतरी आली. त्याने रात्रीच्या अंधारात जंगलात वाट चुकवणाऱ्या चकव्याची गोष्ट वाचली होती. ती आठवली आणि त्याला पुन्हा एकदा शिरशिरी भरली पण दुसऱ्याच क्षणी तो नविन जोमाने चालू लागला.......
वीस पावले पुढे गेल्यावर लांबून त्याला ग्रामपंचायतीचा मिणमिणारा दिवा दिसला. घरे दिसू लागली आणि त्याला पुन्हा धीर आला नक्कीच तो कोणत्यातरी गावाजवळ आला होता. अतिशय वेगाने चालत तो गावाजवळ आला.....त्याला काहीतरी ओळखीचं वाटू लागलं..... गावच्या सीमैवर मोठा फलक होता.
*जांभुळदरी* *ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे*. बोर्ड वाचला आणि तो खदखदा हासला. जांभुळदरी हे त्याच्या पहिल्या बायकोच गाव होतं. इथूनच त्याच्या वकीली कारकिर्दीला सुरुवात झाली होती. या गावातूनच त्याच्या विजय गाथेला सुरुवात झाली होती.
आणि त्याला एकदम आठवलं, रत्नागिरी व्हाया जांभुळदरी मार्गे मुंबई अशी बस रात्री १२ वाजता जांभुळदरीला येते...... सासरी आला की सासरहून ९ च्या बसने जातो म्हणून सांगून गावातल्या नखरेल चांदणीकडे ३ तास घालवून कितीतरी वेळा धावतपळत त्याने रात्री बाराची बस पकडली होती. चांदणीच्या विचाराने त्याला एकदम प्रफुल्लीत वाटल उत्साहाने त्याने पुन्हा एकदा खिशातून बाटली काढून जोरदार सिप मारली.
त्याने घड्याळात पाहिले ११:३० झाले होते. गावातील स्टॅड गावच्या पलीकडच्या टोकाला होता.....दहा मिनिटात तो तिथपर्यंत पोहोचू शकला असता.......त्याने चालायला सुरुवात केली. त्याला वातावरण विलक्षण असा बर्फाळ गारवा जाणवला.....त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं..लांबवर कुठेतरी जोरदार कोल्हेकुई ऐकू येत होती.
वाटेत त्याला चांदणीचा घर लागलं चांदणी चक्क दरवाज्यात उभी होती. जशी काही त्याचीच वाट पाहत होती. तिच्या गेल्या २० वर्षात काहीही बदल झालेला दिसत नव्हता. नखरेल बदामी डोळे, रसरशीत मादक ओठ आणि डौलदार बांधा. चांदणी आहे तशीच होती. "याना वकील साहेब आत" तिने त्याला आत बोलावले. तिला नाही म्हणणे त्याला जीवावर आले पण "बाराची" बस त्याला खुणवत होती.
फक्त तिच्या रसरशीत ओठांचे चुंबन घ्यायचे म्हणून त्याने तिला मिठी मारली आणि तिचा विलक्षण बर्फाळ स्पर्श त्याला जाणवला. त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेतले ते ओठ अतिशय थंडगार होते. त्या वेळेस त्याच्या नाकात असह्य दुर्गंधी शिरली आणि चांदणीचा आपल्या पाठीवरचा हात अतिशय कडक होतं असल्याचे त्याला जाणवले विलक्षण त्वेषाने त्याने तिला लांब भिरकावले आणि तो पळतच सुटला.
हा.....हा.....हा.....कितीतरी वेळ पाठीमागून हासण्याचा जोरदार आवाज येत होता. खोपडे आता मात्र पार घाबरला होता. काय चाललय त्याला कळत नव्हतं आणि त्याने समोर पाटी बघितली जांभूळदरी बस स्थानक आणि त्याला हायसे वाटले पुन्हा एकदा त्याने व्हीस्कीची बाटली काढली. होती नव्हती तेवढी व्हीस्की नरड्यात ओतली त्याला जरा बरे वाटले.
त्याने आजूबाजूला पाहिले बरोबर त्या स्थानकासमोर जांभूळदरीचे स्मशान होते....
स्मशानाचा दरवाजा करकर वाजत होता....... स्मशानात चिता पेटली होती. मागून कुठेतरी कोल्हेकुई कानावर येत होती. पुन्हा एकदा शहारून त्याने बसस्थानकाकडे पाहिले स्थानकावरच मधोमध शेकोटी पेटवून एक व्यक्ती पाठमोरी शेकत बसली होती. तिच्या डोक्यावर फेल्ट हॅट होती पूर्ण अंगावर शाल होती. त्या व्यक्तीने गुढग्यात मान खुपसली होती.
त्या व्यक्तीकडे बघून खोपडेला थोडा धीर आला. घड्याळात पावणे बारा वाजले होते. अजून बस यायला १५ मिनिटे बाकी होती.
ती १५ मिनिटे देखील एकट्याला त्या बस स्थानकावर घालवणे खोपडेला जीवावर आले होते. त्यामुळे कोणीतरी सोबतीला आहे म्हटल्यावर त्याला बरे वाटले.
हळूहळू तो त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि त्याला मागे उभे राहूनच त्याने विचारले 'शेवटची' मुंबई बस गेली का हो !
'खोपडे साहेब' बस यायला अजून वेळ आहे त्या व्यक्तीने उत्तर दिले.
खोपडे चांगलाच हादरला 'तुम्हाला माझे नाव कसे माहीती !
ती व्यक्ती शाली मधून हसली. अहो खोपडे साहेब तुमचे नाव कोणाला माहिती नाही अहो तुम्ही येवढे प्रसिद्ध वकील ९९९ केस जिंकणारे वकील
खोपड्यांना जरा बरे वाटले.....रात्री बारा वाजता आपल्या ओळखीचा वाटसरू भेटला म्हणून त्यांना स्वतःचाच अभिमान वाटला.
तेवढ्यात त्या वाटसरूने त्याच्यावर बॉम्बच टाकला 'साहेब तुम्ही नेहमी चांदणीला भेटून रात्री बाराची बस पकडताना? माहिती आहे मला.....
अरे तुला कसं माहीती ?
ती तर २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ?
'साहेब मला सगळ माहिती आहे'
'साहेब तुमची पहिली बायको याच गावची ना ?
अरे तुला कसं माहीती ?
'साहेब......ते तर आख्या जगाला माहीती आहे' ?
पण साहेब आख्या जगाला माहिती नसलेली एक गोष्ट मला माहिती आहे.
काय ? खोपडे आता भयंकर घाबरले होते.
साहेब......तुम्ही तुमच्या बायकोला जाळलत...... चांदणी सोबत चाललेले तुमचे प्रेमाचे चाळे तुमच्या बायकोला पसंत नव्हते म्हणून तुम्ही तिला रॉकेल ओतून.......तोंडात बोळे कोंबून जीवंत जाळलत......आणि आळ
घेतलात तिच्या सख्ख्या भावावर म्हणजेच तुमच्या मेव्हण्यावर 'मेव्हणा दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागायचा' तुमच्या बायकोने त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला म्हणून मेव्हण्यानेच बायकोला रॉकेल ओतून पेटवले. अशी तुम्ही बोंबाबोंब केलीत 'वहिनीला जाळणारा नराधम भाऊ' अशी त्याची प्रतिमा कोर्टासमोर तुम्ही उभी केलीत आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तीच तुमच्या आयुष्यातील जिंकलेली पहिली केस होती. तुमच्या वकिली कारकिर्दीची सुरुवात होती......
'पण तुला हे सगळं कसं माहीती ? खोपडे विलक्षण हादरले होते'.
कारण खोपडे साहेब फाशीची सजा झालेला तो अभागी भाऊ मीच आहे. गेली अनेक वर्षे तुमच्या शोधात भटकत आहे...
"पण तू तर कधीच मेला होतास ?" तुझ्या प्रेताला मी माझ्या हाताने अग्नी दिला होता.......
'मी कुठे म्हणतोय मी जिवंत आहे ?
शाल पांघरलेल्या व्यक्तीने अंगावरची शाल भिरकावून दिली होती. फेल्ट हॅट फेकून दिली होती......
आणि दात विचकत एक सांगाडा खोपडयांच्या दिशेने सरकत होता..... त्याचे हात स्मशानाच्या दिशेकडे ईशारा करत होते......
खोपड्यांनी घाबरून स्मशानाकडे पाहिले..... स्मशानाचा दरवाजा करकर वाजत होता. वायूवेगाने काही लांडगे दात विचकत त्यांच्या दिशेने येत होते.
त्यांच्या मागोमाग त्यांची रॉकेलने पेटलेली पत्नी येत होती.
खोपडयांनी गावाकडे पळ काढायचा प्रयत्न केला आणि अचानक त्यांना आठवले.
१९ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात जांभुळदरी गाव आख्खे उध्वस्त झाले होते...... गावातील १०० % रहिवाशी जमिनीत गाडले गेले होते.....
त्यांना गावातील बर्फाळ वातावरणाचे भयानक दुर्गधीचे आणि चांदणीचे रहस्य उलगडले.
त्यांनी जोरदार किंकाळी फोडली लांडग्याने त्यांच्या मानेचा लचका तोडला होता
खोपडे नामक लांडग्याचे अस्तित्व संपले होते. 

* या कथेचे कथानक आणि व्यक्तीरेखांची नावे पूर्णपणे काल्पनिक असून काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा*


            © *नितीन प्रधान*
                "*रोहा रायगड*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू