पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चपराक

चपराक "         

       तालुक्याचे कोर्ट आज खचाखच भरले होते. जवळच्या गावातील बापूशेठ वाणी, म्हणजे श्रीमंत आसामी ! त्याचा मुलगा मोहनशेठ, एक नंबरचा उनाडटप्पू आणि टवाळखोर मुलगा. दिवसभर कुचाळक्या करणे, शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची टिंगल करणे, गावभर उंडारणे, हाच त्याचा धंदा ! त्याने, शाळकरी रुपावर, बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार, रुपाच्या आईने म्हणजे, सगुणाने केली होती. कोर्टात खटला दाखल झाला होता.
        आरोपीच्या पिंजऱ्यात बेरडपणे उभ्या असलेल्या मोहनशेठविरुध्द, भोळ्या-भाबड्या, रुपाने घाबरत-बिचकत साक्ष दिली. तिच्या आईला, सगुणाला, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलाविण्यात आले. रुपयाच्या मोठ्या नाण्याएवढ्या कुंकाभोवती, भंडाराचा मळवट भरलेली सगुणा पिंजऱ्यात उभी राहिली. आरोपीच्या वकीलांनी तिची उलटतपासणी सुरु केली.
       " बाई ! तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, तुमच्या पतीचे नाव आणि ते काय कामधंदा करतात, ते थोडक्यात सांगा."
       " म्या सगुणा गडवाले. धन्याचं नाव खंडेराव. आमी हितं गडावरच रहातु. आमचं मालक समद्याची रखवाली करत्यात." पतीविषयी मोठ्या अभिमानाने आणि निर्भिडपणे सगुणा बोलली.
       " हं ! म्हणजे रखवालदार आहेत तुमचे यजमान. तुम्ही काही कामधंदा करता ? " वकीलांनी विचारले.
       " आवं ! मुरळी हाये म्या. हातात घाटी वाजवत, वाघ्याच्या संबळ आन् तुणतुण्यासंगट, जागरन-गोंधळाची गानी म्हणतो आमी."
       " बरं, तुमचे आई-वडील कुठे रहातात ? "
       " पत्या नाही बा ! ल्हानपनी खंडोबाच्या पायरीव टाकून, लंपास झालं त्ये. हितल्या वाघ्यानीच संबाळलं आन्  लगीन करून टाकलं माजं खंडोबाशी. त्यो खंडोबा देवच माझा धनी. साळत जानाऱ्या दोन लेकी हायेत माज्या. मास्तर म्हणत्यात लई हुसार हायेत पोरी माज्या."
       " खंडोबाशी लग्न झालं म्हणता ! मग तुम्हाला मुली कशा झाल्या ?.... हं ! म्हणून तुम्ही तुमच्या मुलींच्या वडिलांचं नाव, खंडेराव गडवाले लावता होय ? "
वकील साहेब खटला जिंकल्याच्या आवेशात, मिस्कीलपणे बोलू लागले.
       " जज्ज साहेब, ह्या बाईंच्या चारित्र्याची कल्पना आपण करु शकता. माझ्या सज्जन अशीलावर, खोटे आरोप करतेय यांची मुलगी. खाण तशी माती. म्हणे, देव यांचा धनी ! बाई ! खरं-खरं सांगा, तुमच्या मुलींचे वडील कोण आहेत ? "
वकील साहेबांनी अशी कुचेष्टा करताच, सगुणाच्या रागाचा पारा अनावर झाला.
       "ओ, वकीलसायेब ! त्ये मला काय इचारता ? त्या चावडीवरल्या तलाट्याला, ह्या सरपंचाला, न्हाई तर ह्या पुजाऱ्याला इचारा की ! आनी ह्यो निलाजरा वानी बी त्येतलाच ! देवदास्यांस्नी सोत्ताची मालमत्ता समजून बाटवायचं आन् लेकरांला नाव द्याचं म्हणलं की शेपटी घालायची." 
           आपल्या इरकली साडीचा पदर, खांद्याभोवती घट्ट आवळून, 'प्रतिष्ठीत' गावकऱ्यांकडे बोट दाखवित, सगुणा फुत्कारली.
       खटल्याचा निकाल, तालेवारीच्या जोरावर, एकतर्फी लागणार, याची खात्री असलेल्या, गावकऱ्यांच्या माना आता शरमेने खाली झाल्या. संतापाने पेटलेल्या सगुणाचा आक्रोश कोर्टात घुमू लागला,
        " जजसायेब, आत्तापातूर, म्या मुक्या जनावरावानी, लई सोसलं ह्या गावगुंडांचं पण माझ्या अश्राप पोरी न्हाय सोसनार. माय जीत्ती हाय त्येंची. गरीबाला अब्रु नसती का मायबाप ? साळंत जाता-येता ह्यो मुडदा म्होनशेट, माझ्या लेकीची छेड काडतो, तिच्या अंगचटीला येतो. म्होट्यात म्होट्टी सजा द्या हेला, जजसायेब, न्हाईतं.....न्हाइतं....आता फाशी झाली तरी बेत्तर पण.....
ह्या उंडग्याचा न्याव म्याच करील."

----------------------------------------------- लेखिका - सौ. जया गाडगे, इंदूर                    


 


                              

 


                              

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू