पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावी

               सावी



      आकाशात काळेभोर ढग पावसाचा घनघोर वर्षाव करत हळूहळू पुढे हरकत होते. अखंड कोसळणाऱ्या जलधारा विसावा घेत नव्हत्या. पावसानं रौद्र रुप धारण केल होतं.सगळीकडं पाणीच पाणी झालं होत. रस्त्यावर सगळीकडे पाणी भरुन वाहत होतं.पाऊस जराही उसंत घेत नव्हता.एखादा काळा कुट्ट राक्षसच वायुवेगाने सरकत होता.हाहाःकार माजवत होता.

        पावसाच्या मुसळधार धारा कोसळतात. मनाच्या कोपर्यात जाऊन मनाला ओलेचिंब करतात. मन घायाळ झालंय.त्याला सावरणार कोण?कदाचित पाऊस थांबेलही.पण मनातला पाऊस कसा थांबणार? 

      मी असा पळतोय.शत्रुच्या गोटात जाऊन मुसंडी मारल्यासारखा.

   सावीसाठी मी पळत होतो.एकदाच मला तिला डोळेभरुन पहायचं होतं.सावी चालली होती.. दुर चालली होती.

   पावसाचा जोर वाढलाय.पावसाच्या बचावा करता माझ्याकडे काहीही साधन नाही.मी छत्री, रेनकोट घेतला नव्हता. मी मग तसाच पळतोय.  पावसाला न जुमानता. सगळी कपडे भिजलेली. सारं शरीर ओलेचिंब झालेलं.

    पावसाला पण अशावेळी फावलं होतं.ज्यावेळी सावीचे विचार येतात  तेव्हा  निसर्गसुद्धा  अडथळा आणतो.  संकटे आली म्हणजे एकापाठोपाठ येतात. खरेतर जे आपल्या नशिबातच नाही त्याला निसर्ग तरी काय करणार! निसर्गाला सुद्धा विरोध करायचा असतो.  जणू तो निसर्गच पावसाच्या रुपात सांगतो.'सावी तुझ्यासाठी नाही.. सावी तुझी नाही.'

    मी मात्र दूर पळतोय.मी सावीसाठी पळतोय. मनाला सत्य आवडत नाही कारण ते सत्य कठोर आहे.सत्य स्विकारायची तयारी नाही.

    वेगाने वाहणारा वारा सर्वांगाला झोपतोय. दगड,गोटे अनवाणी पायाला टोचतात. काटे  पायाचे वेध घेतात. पायातल्या रक्ताने आपली तहान भागवतात. मरणप्राय वेदना होतात. पण हे सर्व स्पर्श फुलाचे समजून मी पळतोय.  वेदनांची जाणीव नाही. जखमांची उणीव नाही.मी फक्त पळतोय.कशाची फिकीर नाही. एवढंच काय, अग्नीतून  जरी जावं लागलं असतं तरी सुद्धा फूले समजून गेलो असतो.

   जिथं माझं हृदयच घायाळ  झालय तिथं  त्या वेदनांचा काय मला त्रास? वाटत खरंच माझ्यातला मनू मेलाय.

   एक कठोर सत्य.. सावी माझ्यापासून दूर चालली  होती. हे गाव सोडून..घर सोडून...मला सोडून... कायमची दूर चालली  होती.एकदा..एकदाच मला भेटायचंय.

    तिला आठवत नसतील का बालपणीचे दिवस? मनूचा सहवास..एकत्र केलेला अभ्यास.. त्या स्वप्नांचा चोळामोळा करताना तिला काहीच कसं वाटलं नसेल!


   असाच पाऊस कोसळायचा.आम्ही भिजत ,डबक्यातल्या पाण्यात नाचत घरची वाट पकडायची. पावसात भिजण्याचा आम्हाला वेगळाच आनंद मिळायचा.पावसात नाचताना आनंदाचे भारते यायचे. सावीला पण पाउस आवडायचा. बराच वेळ पावसात भिजलं की थंडी वाजायची.मग घरी जायचं.शिव्या खात खात कपडे बदलायची आणि मग चुलीच्या पुढ्यात बसायचं.


   ते क्षण नुसते नजरेसमोर आले की अंगावर सरसरून काटा उभा राहतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग अनुभवायचा प्रयत्न करतो. पण प्रसंग भूतकाळातले.. मनानेच अनुभवायचे  आणि मग समाधानी व्हायचे. मनातला मोर पिसारा किती फुलवला तरी तो मनातच राहातो.

      ह्या पावसात आणि त्या पावसात खूपच फरक. तो पाऊस कोमल फुलांचा स्पर्श वाटायचा. त्या पावसाच्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलायचे. त्या सुखद स्पर्शाला सावीचा सहवास असायचा. तिच्या स्पर्शाने प्रत्येक थेंब मोती व्हायचा.मनामनात झगमगायचा.

    आणि हा पाऊस!

    हा पाऊस माझा वैरी आहे.  हा पाऊसआमची ताटातूट करतोय,मला झिडकारून लावतोय. पण मी त्याला दाद देत नाही. ते पाहून पाहून त्याला अधिकच चेव चढतोय. पण माझं खंबीर मन मला पाठिंबा देतय.. शाब्बास मनू शाब्बास ...कोणाच्याही विरोधाला अजिबात घाबरु नको. सर्व अडथळे मोडून टाक. एकदा  भेट.. एकदा डोळ्यात साठवून ठेव..


    माझं बालपण मोरपंखानं स्पर्श केलेलं.सुगंधी क्षणानी भारलेल. आणि त्याला एकच कारण ते म्हणजे सावी. सावी आमच्या घरा शेजारची  मुलगी. माझ्याच वर्गातली.तिने कधी आमच्या मनामध्ये स्थान केले कळलंच नाही.नंतर  हृदयात विराजमान झाली.

    आम्ही एका वर्गात शिकत होतो. सावीचे वडील एक गरीब शेतकरी  होते.अशिक्षित होते. माझ्या बाबांच्यामुळे सावी शिकू लागली.ती  मुळातच हुशार होती. तिच्या जवळपास कोणीही जाऊ शकत नव्हते.

    मी त्या वर्षी  परीक्षेत नापास झालो. खूप अभ्यास करून आणि पेपर चांगले लिहून सुद्धा मी नापास कसा झालो हे समजत नव्हते. प्रथमच अपयश वाट्याला येत होते. पराभवाचा डोंगर कोसळला होता. अपेक्षाभंग झाला होता.मी सैरभैर होऊन गेलो होतो.अपयशाचे शल्य सहन न होऊन ते डोळ्याकडून अश्रूवाटे बाहेर पडत होत.बाबांच्या तोंडाची पट्टी सकाळपासून चालू होती. सर्वांच्या तोंडची मुक्ताफळं खात कोपऱ्यात बसलो होतो. आईनंसुद्धा चार गोड शब्द बोलून समाधान केलं नव्हतं. रडून रडून डोळे सुजायची वेळ आली होती.

    आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सावी आणि मी एकमेकाला अंतरणार होतो. ती पुढल्या वर्गात जाणार होती. मी त्याच वर्गात थांबणार होतो. आमची ताटातूट होणार होती.

     ती नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली. तिला माझ्याविषयी माहीत नव्हतं. आमच्या गल्लीत एक पद्धत होती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पास झालं की  प्रत्येकाच्या घरात जाऊन वडीलधाऱ्यांना नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेऊन यायचा. तो एक आनंदोत्सवात होता.

     सावी नाचत नाचत पेढ्यांची पुडी घेऊन आली.

    "मनु..  ए  मनु...कुठे आहेस?"

    मी तिला दिसलो नाही.  एका कोपऱ्यात बसून मुसमुसून रडत होतो.

    " काकू, कुठे आहे मनू?"

    " बसलाय कोपऱ्यात."

    " काय झालं?"

    " दिवे लावलेत ना!"

    "म्हणजे काय काकू.?"

    "नापास झालाय."

    " नापास झालाय? मला कसं समजलं नाही?"

      मी तिला दिसलो. ती माझ्या जवळ आली.

    " चल तोंड उघड. माझा पेढा पहिला पेढा तुला."

     मी नाराजीने तोंड वर केले. माझे डोळे पाण्याने डबडबले तिला दिसले. तशी ती हिरमुसली,

  ." काय रे, कोण बोललं कां? असा कसा नापास झालास? पेपर तरी चांगले गेले होते ना? बर ठिक आहे ..नापास तर नापास. काही आभाळ नाही कोसळलं.पण  नाराज होऊ नकोस.  अपयश यायचंच. त्याशिवाय आपल्या चुका आपल्याला कशा समजायच्या? अपयश येणे पण चांगलं असतं. एकदा नापास झालास म्हणून काय आयुष्यभर नापास होणार नाहीस. चल घे पेढा , नाराज होऊ नकोस."

    "वाईट वाटतं. आणि आपली तर ताटातूट होणार यावेळी.तु एका वर्गात, मी दुसर्या वर्गात."

    " एवढंच ना! मग ऐक.मी पण शाळा ह्या वर्षी शाळेत जात नाही."

    " काय सांगतेस सावी, नको.. असं नको करू. तू शिक. तु हुषार आहेस. माझ्यासाठी तू मागे राहू नकोस."

     " मला पण तू शाळेत दिसला नाहीस तर शाळेला गेल्यासारखं वाटतच नाही. मी आई बाबांना सांगून यावर्षी शाळा बंद करते. पुढच्या वर्षी शाळेमध्ये दाखल होईन."

    " नको सावी, असं करू नको."

    एवढ्यात माझ्या शाळेतले चार मित्र घरी आले त्यांनी आईला सांगितले,

    " काकू, मनू कुठे आहे?"

    " आहे. बसलाय कोपर्‍यात.नापास झालाय तो."

    " नाही काकू, तो चांगल्या मार्काने पास झालाय. निकाल वाचतांना त्याचं नाव चुकून आलं नाही. म्हणून तो नापास झाला असं समजून घरी आला.नंतर सरांना आपली चूक समजली. ते पण ओशाळून गेलेत. आता सर पण येतील घरी."

     मी खूप आनंदित झालो. सावी पण खुश झाली. एवढ्यात सर घरी आले,

    " माफ करा ताई, आमची चूक झाली आणि मनोज हे नाव कसे वगळले  काही समजत नाही. पण चूक आमची होती आणि तो चांगल्या मार्काने पास झाला आहे."

     आणि मग एकच जल्लोष.मी उठलो. सरांच्या पाया पडलो.आईच्या पाया पडलो.आईनं मला जवळ घेतले,

    " मला वाटतच होतं माझा मनू कधीही नापास होणार नाही.काहीतरी चूक असावी!"

     " आम्हालाही आता असं वाटतंय. पण आमची चूक झाली. मनोज आता पेढे वाट."

    नंतर आम्ही सगळे मित्र आनंदाने नाचू लागलो आणि सावी कौतुकाने बघत होती. पण एक गोष्ट माझ्या मनात बसली. माझ्यासाठी ती एक वर्ष थांबायला तयार झाली होती. म्हणजे माझा विरह तिलाही सहन होत नव्हता.

        आणि एक मित्र होता आमचा.सुरेश.आमची तिघांची गट्टी. आम्ही तिघे आमच्या घरामध्ये एकत्र अभ्यासाला बसत होतो. खूप मजा यायची. अभ्यास करता करता एकमेकाला हुमाण सांगायचे. कधीतरी गोष्टी सांगायच्या. मग त्या गोष्टी मध्ये सावी रमून जायची. तिला कधी पेन नसायचा. मी माझ्याजवळचा पेन तिला  द्यायचा आणि मग घरात सांगायच पेन हरवला. सावीसाठी तेवढेच खोटं बोलत होतो. पण त्यामुळे तिला मदत व्हायची.तिला कधी काही कमी पडलं तर मी द्यायचा. आईला सांगायचं. आई पण मदत करायची. खूप छान चाललं होतं.नंतर सुरेश दुसऱ्या गावाला गेला आणि दुसऱ्या शाळेमध्ये जाऊ लागला. नंतर आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि सावीनं कितीतरी दिवस रडत काढले. त्याला विसरणं शक्यच नव्हतं. पण एक मित्र गेल्यामुळे आमची मैत्री अधिकच घनिष्ट झाली.


     आमच गाव लहान.आडवळणी.कसल्या सोई नाहीत. रस्ते नाहीत. पण निसर्गान भरभरून दिलंय.गावाच्या एका बाजूला सदाहरित जंगल. त्यातुन आवखळपणे फेसाळत सरपटणारा ओढा.जंगलाच्या पायथ्याशी कोंदणात ऊठून दिसणारं शिवमंदिर. आणि नजरेच्या शिमेपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती. 

     आमच्या गावात फक्त प्राथमिक शिक्षण घेता येत होतं. माध्यमिक शिक्षणासाठी दूर जावं लागतं होतं. आमच्या गावावरून चार किलोमीटरवर वर हे हायस्कूल होतं. हायस्कूलमध्ये आम्ही प्रवेश घेतला. मी, माझे सहकारी आणि सावी.

     सावीला पुढे शिकण्यासाठी घरातून विरोध झाला पण आमच्या आई-बाबांनी समजावून सांगितल्यानंतर ती तयार झाली. आणि बरोबर मी होतो त्यामुळे काही अडचण नव्हती. शिवाय ती हुशार होती. तिला आतापासूनच कामात जखडून ठेवणे हा प्रकार आम्हालाही बरा वाटला नव्हता. तिच्या बुद्धिमत्तेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे होता.

    शाळा सुरू झाली आणि आमचा सहवास वाढत चालला. कधी कसं समजत नाही की आम्ही एकमेकात गुंतत चाललो.

    आमची निखळ मैत्री होती. कुठलाही भेदभाव नव्हता. सहवास वाढत होता. सावी खूप गोड मुलगी होती.खुप छान बोलायची. मला आवडायचं. त्यामुळे मी तिच्या मध्ये गुंतत चाललो होतो.शुद्ध मैत्री. निखळ विश्वास. कुठलाही पडदा नव्हता. प्रेम वगैरे गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. कधीतरी राजा राणीच्या गोष्टी ऐकताना मी राजा आणि ती  राणी व्हायची.

     शाळा सुटली की रमत-गमत यायचं.कधी इतर मित्र असायचे,कधी नसायचे. संपूर्ण डोंगराळ भाग. निसर्गातले सगळे अलंकार परीधान केलेली आमची भुमी. शाळा सुटली की गावच्या हद्दीपर्यंत येईल तोपर्यंत सूर्य बिंब क्षितीजावर टेकलेलं असायचं. आसमंत सुवर्ण प्रकाशाने न्हाऊन निघालेला असायचा. वाटेत  भला मोठा वटवृक्ष लागायचा. त्याच्या पारंब्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या होत्या. मी दोन पारंब्या एकत्र करून बांधायचा. त्याचा झोपाळा तयार व्हायचा. मग आपलं दप्तर एका दगडावर  ठेवून ती झोपाळ्यावर बसायची. मी तिला झोका ध्यायचा. ती आनंदी व्हायची. मला समाधान वाटायचं. तिला हसताना बघून, तिला खुश बघून मी पण खुश व्हायचा.

     बंदूकीतून सुटणार्‍या गोळीप्रमाणे काळ सरकत होता. बालपणीचे सुखी,आनंदी दिवस पुढे सरखत होते. आमच्यासाठी थांबायला तयार नव्हते. माध्यमिक शिक्षण म्हणजे बालपण आणि तरूणपण यांच्यामधला एक अक्ष असतो.बालपण थांबते व तिथून तरुणपण सुरू होतो तो काळ मध्ये माध्यमिक शिक्षणाचा काळ. आणि याच सीमेवर आम्ही वावरत होतो, बेधुंद होत होतो. निखळ मैत्री आणि शुद्ध प्रेम. बेरजेनं अंक वाढतात. आमची मैत्री पण वाढत चालली होती.

    माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं.आम्हा दोघांनाही चांगले मार्क मिळाले. तिने शाळेमध्ये पहिला क्रमांक काढला होता. तिच्या घरचे पुढे शिकवायला तयार नव्हते. मी मात्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आलो.घरापासून दूर, नातेवाईका पासून दूर, गावापासून दूर आणि सावीपासून दूर.

   गाव सोडायला नको वाटत होतं पण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं म्हणून उच्च शिक्षणासाठी शहरात आलो. गाव सोडताना पाय उचलत नव्हता. पुढे शिकायला पण नको वाटत होतं. निरोप घेताना सावी गहीवरली. तिच्या डोळ्यातून पाणी हातात नव्हतं.अगोदर मित्राची ताटातूट आणि आता सावीची. बालपणीची मैत्री अतूट असते. नंतर आयुष्यात अनेक मित्र भेटतील पण बालपणीची मैत्री कधी तुटायची नाही. बालपणीची मैत्री एका रुपेरी धाग्याने बांधलेली असते आणि तो धागा अतूट असतो.

     नवीन आयुष्य सुरू झालं. बाल्यावस्था संपली होती. तरुणावस्था चालू झाली होती. कॉलेज, नवीन मित्र, होस्टेल यामध्ये दिवस जात होते. सुरुवात बरी वाटली पण नंतर सर्वांची आठवण येऊ लागली.

    सुट्टी कधी पडते , घरी कधी जातो इकडं लक्ष असायचं. 

    सुट्टी पडली की गावाकडे जायचं . सर्वांना भेटायचं. खुप आनंद वाटायचा. आई मग गोडाधोडाचे पदार्थ करायची. सगळे मित्र भेटायला यायचे.  सगळे मित्र गेले की मी सावीच्या घरात जायचा.सावी  खूष व्हायची. माझ्याबरोबर गप्पा मारायची. मी तिला तिकडच्या  आठवणी सांगायचा. कॉलेज ,अभ्यास याविषयी चर्चा चालायची. नवीन कथा, नवीन प्रसंग सांगायची. ते सांगत असताना तिच्या चेहर्‍यावर कौतुक पसरायचं. विस्मयाने ती ऐकत असायची. असं वाटायचं  हे क्षण संपू नयेत. मी असे तोपर्यंत सावी आमचं घर सोडायची नाही.

    

    काँलेजला नवीन नवीन अनुभव मिळायचे. एकदम शहरी वातावरण. कधीकधी एखादा चित्रपट बघायचा.कधी हिंदी, कधी  इंग्रजी.  फारसं इंग्रजी समजलं नाही तरी चित्रपट बघताना बर वाटायचं.हळूहळू मला कळू लागले की मी आता तरुणावस्थेच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक तरूणात माझं रुपांतर झालय.


    असाच पाऊस पडायचा.

    खूप खूप बरसायचा. नद्या, नाले तुडुंब भरून गेलेली असायची.  थंडगार वारा अंगावर शिरशिरी आणायचा.

    शेतातली कामं सुरु असायची त्यामुळे घरी कोणी नसायचं. माझ्याही आणि सावीच्याही.ती एकटीच घरी असायची.कधीकधी मी तिला पुस्तके वाचायला द्यायचा.

     मी पावसात भिजत भिजत तर त्यांच्या घरी जायचा. घराभोवती  मेंदीचे कुंपन होते. जणू हिरवी  भिंतच. पलीकडलं काहीही दिसायचं नाही.

   मी पावसात भिजत त्यांच्या परसात जायचा. माझी कपडे पूर्ण बसलेली असायची. पावसाचे तुषार झेलत मी तिच्या दारात उभा.ती पळत यायची व हसत हसत माझ्याकडे पाहायची.

    " असा काय लहान मुलासारखा भिजतोस? सर्दी होईल ना! आजारी पडशील ना विनाकारण."

    " काही हरकत नाही. चालेल.चार दिवस मुक्काम वाढेल. तुझा सहवास मिळेल."

    ती काही बोलायची नाही. शांत उभी राहायची. येणाऱ्या वाऱ्याने तिच्या बटा हलत राहायच्या.

   " ये,  आगोदर आत ये. भिजू नको."

   " मी तर भिजायला आलोय."

   " लहान आहेस का?"

   " तस समज.आणि पावसात भिजायला लहान व्हाव लागतं  का?"

   "  भिजायचं असेल तर शेताकडे जात जा काम करायला.  म्हणजे शेतातली  काम पण होतील आणि थोडं भिजायला पण होईल.मनसोक्त भिजून घे."

   " मला तर इथंच भिजायचय."

   " काय करायचं ते कर."

   " तू पण ये ना पावसात भिजायला."

   " नाही बाबा, तुझ तु भिज  नाहीतर आत तरी ये."

   " मी इथेच थांबणार."

   मी तिचा हात धरुन तिला पावसात ओढायचा.ती काहीश्या नाराजीनेच बाहेर पडायची. तिला पाहून पावसाला चेव चढायचा.  खूप जोराने पाऊस कोसळायचा.  पावसाचे टपोरे थेंब झेलण्यात वेगळाच आनंद वाटायचा. सावीच्या सहवासात तासनतास पावसात भिजावसं वाटायचं.थंडीनं अंग शहारून जायच.पण ते क्षण हवेहवेसे वाटायचे. अंगावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांची फुले व्हायची.

   कपडे भिजून  अंगाला चिकटवून बसायचे.सावीचं हे  पावसातलं सौंदर्य मला आकृष्ट करायचं. मी धुंद होऊन तिच्याकडे पाहायचा. तिच्यातला बदल पाहायचा.कळीचं फुलात रुपांतर व्हायला लागलं होत.किती मोठी झाली सावी.तरुण झाली. किती सुंदर दिसते!

   मी तिच्याकडे पाहत राहायचा.

   " काय पाहतोस?"

   " इथं तुला पाहण्याशिवाय दुसरं काही आहे कां?"

   " मी जाते."

   मी तिचा हात पकडायचा. तिचा स्पर्श हवाहवासा वाटायचा. ती हात सोडून घेण्याचा प्रयत्न करायची.

   " सोड नाहीतर मोठ्या ओरडेन."

   " काही हरकत नाही."

   ती हात सोडुन हात पळायची. मी पण तिच्या पाठोपाठ जायचा.

     " मनू आत येऊ नको रे."

     "कां बर?"

     " कपडे बदलायचे आहेत."

    मी बाहेरच थांबायचा. ती कपडे बदलून यायची आणि मग टॉवेल घेऊन माझे केस  पुसायची.

   " किती केस वाढलेत रे."

   " अगं फॅशन आहे. मी काय डोक्याचा गोटा करून कॉलेजला जाऊ का?"

  " असुदे,असुदे, चांगला दिसतोस."

  आणि मग बराच वेळ आमचं संभाषण चालायचं.

   कॉलेजला आलं की ती माझ्या नजरेसमोरून 

हलायची  नाही.सतत दिसायची. मला समजू लागले की मी तिच्या प्रेमात पडलोय.तिच्यात गुंतत चाललोय. आतापर्यंत तिचा सहवास झाला.निखळ मैत्र. पण प्रेम म्हणजे काय आहे हे मला समजू लागलं.आता तरुणपणात प्रवेश करताना मला कळू लागले की मी तिच्याकडे आकृष्ट झालोय. मला ती हवीय. पत्नी म्हणून हवीय. आयुष्याचा जोडीदार म्हणून हवीय.

     मी कधी तिला बोलून दाखवलं नव्हतं. पण समजत होतं की तिला पण माझा लळा लागलाय. ती पण माझ्यावर आकृष्ट झालीय. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला लागलय. तिला पण मी हवाय, कदाचित जोडीदार म्हणून सुद्धा. तिला सांगितलं नाही. पण काही काही गोष्टी न सांगता समजतात.  नजरेत दिसतं सगळं.

  

     सावी आता दूर चालली होती. खूप खूप दूर.

     माझ्यापासून दूर ..गावापासून दूर.. कधी परत माझ्या आयुष्यात न डोकावण्यासाठी. दुसऱ्यांचा संसार सजवण्यासाठी.

     काय चुकलं होतं, काय चुकत होतं काही समजत नाही.

     खरच का ती विसरून जाईल मला? माझी आठवण झाल्यावर ती हळवी होणार नाही कां? डोळ्यांच्या कडा ओलावणार  नाहीत का? ही  जखम आयुष्यभर ओलीच राहणार आहे का? तिच्या स्पर्शाने आठवणींच्या वेदना असह्य होणार आहेत का? किती प्रश्न आहेत.. आणि  उत्तरं मिळणार नाहीत कदाचित.

    खरच नियती क्रुर आहे का? तिला अजिबात दयामाया नाही का? तिला दोन घायाळ प्रेमिकांची मन दिसली नाहीत का? जर ताटातूट व्हायची असेल तर एकत्र येण्याचा घाट कशासाठी? सुरुवातीला मैत्री,नंतर प्रेम आणि आता ताटातूट. हा कसला कर्मयोग?

       सावीचे लग्न झाले होते. त्यासाठी आतापर्यंत एकत्र असलेल्या आमच्या दोन घरात फाटाफूट झाली होती. ज्यावर मी माझा हक्क सांगत होतो ते शरीर मनासहं  दुसऱ्याचे झाले होते.


     दोष माझा नव्हता किंवा तिचाही  नव्हता.सावीनं आपलं मनोगत कधीही व्यक्त केलं नव्हतं. ती कधीही कुणालाही बोलली नव्हती.पण आईला आमच्यासंबंधात समजू लागलं होत.

       काल संध्याकाळी काँलेजवरून होस्टेलवर आलो तेव्हा मित्रांनी पत्र दिले. ती पत्र सावीने पाठवले होते.सावी अशी वरचेवर पत्र पाठवायची. ख्यालीखुशाली कळवायची.तिच्या पत्राची मी वाट पाहायचा.

      सावीचं पत्र म्हटल्यानंतर मी पटकन फोडलं. कधी एकदा वाचतो  असं झालं होतं. तारीख बघितली तर ती पंधरा दिवसापूर्वीची होती.बापरे! म्हणजे मला ते पत्र पंधरा दिवसांनी मिळालं. काहीतरी अडचण झाली असेल पत्र इथपर्यंत यायला. ठीक आहे पण सावीचं पत्र म्हटल्यानंतर माझ्या करता आनंदात आनंद होता.

      तिचं अखेरचं पत्र होतं  चाबकाचे फटकारे झेलणाऱ्या माणसासारखी मनाची स्थिती झालेली होती. मी थरथरत्या हातानं,विस्कळलेल्या मनानं  पत्र वाचायला घेतलं.

       मनू,

       माणसांची स्वप्न कधीही पूर्ण न होण्यासाठी असतात का रे? आयुष्यात इथपर्यंत एवढं पळत पळत आलो की कधी तुला मनातलं सांगावं सुद्धा वाटलं नाही आणि तू ही काही बोलला  नाहीस.असंच वाटू लागलं आपली  स्वप्न ही स्वप्नंच असतात.उभी केली ,विरून गेली. सत्य आहे ते मी सांगते.मन बळकट करून वाच.

     माझं लग्न ठरलंय.मुंबईला असलेल्या  एका चाकरमान्यांशी. या आठवड्यात लग्न होणार आहे. मी विरोध केला पण माझं कोणी मनावर घेत नाही. आणि दरम्यान आपल्या दोन्ही घराण्यात  वाद झालेत. भांडणं झालीत.दोन्ही घरे एकमेकांचे वैरी झाली.

   तू काय करणार आहेस?

   माझी खूप इच्छा होती की माझं लग्न तुझ्याशीच व्हावं.कारण तू माझा चांगला मित्र आहेस. आपण मनाने, विचारांने  एक आहोत . त्यामुळे येणारे प्रसंग कटू  आपल्या धैर्याला पाहून  फुले बरसतील. मला खूप तुझ्याशी बोलायचं होतं.पण धाडस होत नव्हतं.  विचार करायची आज बोलू, उद्या बोलु.  पण आज अचानक माझं लग्न ठरलं  आणि  माझी  स्वप्नं  विरून गेली. आपण  निखळ मैत्री केली  पण मनातला कधीही बोललो नाही .

      काय ते ठरव.

      तुला विसरू शकत नाही. कधीही विसरणार नाही. तो झोपाळा विसरणार नाही. ते पावसातले ओलेचिंब  दिवस  विसरणार नाही. कधीही विसरणार नाही. मी जेथे जाईन ते  सर्व घेऊनच.

      कदाचित तुझी कधीच न होऊ  शकणारी,

       सावी.


      एव्हाना तिचं  लग्न होऊन गेलं.

      मी  धावत आलो. तिचं लग्न झालं होतं.

     मी आलो.मी घरात बॅग ठेवली. आईने विचारलं,

    " आज अचानक?"

    " होय आई, कंटाळा आला म्हणून."

    " समजलं मला."

    "सावीचं लग्न झालं?"

    " हो झालं ना! आता ती  गेली पण?"

    " गेली? कुठे गेली?"

    " मुंबईला. आपल्या नवऱ्याबरोबर. आत्ता अर्धा तास झाला.आणि हो तू जाऊ नकोस.त्यांच्यात आणि आपल्यात वाद झालेत. तुझ्या बाबांना आवडणार नाही."

    " आई एकदा भेटलो असतो."

   "अरे बाळा, तुला भेटणार नाही.विनाकारण वाद होतील."

    " अग आई, परत भेटणार नाही ती. जाऊन येतो."

     मी बाहेर पडलो. पाऊस धो धो पडत होता. गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत होते. मला कशाची भीती नव्हती. सावीच्या आई-बाबांचे  आमच्या घरच्यांशी भांडण झाले. मी कुठे भांडलो त्यांच्याशी? मी त्यांच्याशी चांगलंच बोलणार. गोड बोलणार.

      मी तसाच चाललो. धावत ,पळत, धडपडत.

      इथून चार किलोमीटरवर बस थांबा होता. कधीतरी बस यायची. मी पळत चाललो. एक कच्ची पायवाट.  त्या पायवाटेने चाललो.कारण मुख्य रस्त्याने गेल्यानंतर अंतर वाढणार होते. ह्या रस्त्याने अंतर कमी होत होतं.

    मी सावीच्या मनाची कल्पना केली. तिने माझी वाट पाहिली असेल! मनू येईल. मग आपल्याला काही तरी दिलासा मिळेल! काहीतरी वेगळे होईल! वाद मिटतील! मनू  आपल्या बरोबर लग्न करील! आपला संसार होईल! वाट पाहून पाहून तिचे डोळे सुजले असतील! आपली  अनुपस्थिती पाहून तिला वाटत असेल की मी मैत्री विसरलो.आणि ती नाराजीने लागणार तयार झाली असेल!

     कोण सांगणार हा दैवयोग आहे म्हणून? राजा राणी फक्त गोष्टीतच असतात.  गोष्टीतून बाहेर पडायला राजा-राणीला सुद्धा खूप अशक्य. बस एक वेळा तिला शेवटचं बघायचं.स्वप्नांच्या चोळामोळा झालेल्या लगद्याकडे पहायचं. फक्त एकदाच.

    पाऊस कोसळतोय. मी आकांताने पळतोय. ठेच लागली. अंगठा रक्तबंबाळ झाला. अंगातलं त्राण गेल्यासारखं वाटलं. कोसळता कोसळता एका झाडानं आधार दिला. पारंबीला धरून  मटकन खाली बसलो. रक्त वाहत होतं.थांबून उपयोग नव्हता. 

      पारंबीला धरून उभा राहिलो.पाहिले तर तिच पारंबी, ज्या पारंबीचा मी झोपाळा करून सावीला झोके द्यायचा. कोणीतरी निर्दयीपणे तोडल्यामुळे फार आखुड झाली होती. पावसातचे पाणी गळत होते.माझ्या डोळ्यात पाणी भरले. पावसाच्या पाण्याशी एकरूप झाले. मन भरून आले. स्वतः जखमी होऊन सुद्धा आमच्या प्रेमाच्या साक्षीदारांनी मला आधार दिला होता. आमची ताटातूट झाली म्हणून त्यालाही वाईट वाटलं असावं कदाचित.चालण्याचा वेग मंदावला. लंगडत लंगडत चालू लागलो.

    एक छोटीशी टेकडी आणि रस्त्याकडे जाणारी अरुंद पायवाट. अंतर कमी होतं पण पाऊस कमी होत नव्हता.

      माझं लक्ष गेलं तेव्हा चार-पाच लोक त्या वाटेवरून छत्रीच्या आधाराने चालताना दिसत होते. आणि  त्यातच एक होती सावी.

     तरीपण अंतर खूपच होतं

     हाक मारावी का तिला? पण बाकीचे लोक काय म्हणतील? त्यात तिचा नवरा असेल, त्याला काय वाटेल? 

    आता सहन होणार नाही.

    मी माझ्याच विचारात. अचानक माझा पाय बाजूला गेला.कोलमडून पडलो. टेकडीवरून घसरून खाली आलो.अंगाला खरचटले .कपडे फाटली. रक्त वाहू लागले. चडफडत उभारायचा प्रयत्न करू लागलो.परत तोल गेला. खाली कोसळलो.सर्वांग गळून गेल्यासारखे वाटले.

    उभं राहण अशक्य होतं चाललेल.  अशक्य होतं सगळं. अंग ठणकत होतं. पळायचा प्रयत्न करतो पण कुठं पळायचं.पळणं पण नशीबात नाही. धिम्यागतीने चालता सुद्धा येत नव्हतं. शरीरात त्रास संपल्यासारखं वाटत होतं.

      तो बस थांबा आणि कोल्हापूरला गेलेला रस्ता आता स्पष्ट दिसत होता. एव्हाना ते लोक त्या थांब्याजवळ पोहोचले होते.

      माझ्या चालण्याला वेग येईना. पाऊल ठणकत होते. चिखलात रुतून बसत होते.जखम भळभळत होती.

     अचानक वरून बस येताना दिसली. थांब्याजवळ थांबलेली दिसली.

     माझा मनोधैर्य खचले.मी शक्य तेवढ्या वेगाने पळण्याचा प्रयत्न केला.  बस हलली.पुढे जातांना दिसली.वेगानं कोल्हापूरच्या दिशेला जाऊ लागली.  थांब्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हते.दोन छत्र्या परत येतांना दिसल्या.

      कसाबसा उभा राहिलो.डोळ्यातलं पाणी पावसापेक्षा वेगाने वाहत होतं आणि बस वेगाने पुढे सरकत होती.

      नियतीन माझी ही इच्छा पूर्ण केली नाही.

      तुटल्या फुटल्या मनानं, दुथडी भरून चाललेल्या अंतकरणाने वेगाने जाणाऱ्या त्या बस कडे किती वेळ पाहत होतो.

    

मुरलीधर देवर्डेकर

कोल्हापूर

९४२३२७५२५२

    




    


   

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू