पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राजधर्म

                     राजधर्म



  अरण्यातल्या त्या तलावाच्या काठाला हवेली बांधायची. मनात आलं ही जंगलात शिकार करायची. दोन, तीन दिवस  वास्तव्य करायचं,रात्री मैफिली रंगवायच्या आणि मग परतायचं  अशी राजाची कल्पना होती.

     राजानं मंत्रिमंडळासमवेत चर्चा केली आणि मंत्र्यांना जंगलात पाठवले. तलावाकडेची उंच झाडं तोडून त्या ठिकाणी अवाढव्य महाल बांधायचा. सेवकांच्यासाठी  छोटी घरं बांधायची आणि तलावाकाठी सुंदर बगीचा करायचा असं फर्मान सोडलं

    सगळा लवाजमा जंगलात पोहोचला. विस्तीर्ण तलाव, स्वच्छ पाणी.कमळाचे ताटवे, विहार करणारे राजहंस. किती सुंदर वातावरण! बाजूची मोठमोठी झाडे तोडावी  लागणार होती.जमीन साफ करता करून मग महाल बनवावा लागणार होता. काही अंतरावर सेवकासाठी घरे असणार होती. शांत असणारे वन गजबजणार होते.

    मंत्री प्रसन्नतेनं पहात होता. सुंदर, प्रसन्न वन. आणि अचानक एका ठिकाणी त्याची दृष्टी कडमडली.

    एका मोठ्या वृक्षाखाली खाली एकदम जुनाट पार.झाडाच्या पारंब्या खालपर्यंत आलेल्या. जणू छोटी गुहाच  झाली होती आणि त्यात एक तपस्वी बसलेला.

    मंत्री पुढे गेला.

   तपस्वीच्या  अंगावर लंगोटीव्यतिरिक्त काहीही कपडे नव्हते. कमरेपर्यंत दाढी, पारंब्याप्रमाणे जटा, अंगाला भस्म. समाधीत बसला होता.

   सगळेजण साधूजवळ गेले,

   साधू महाराज समाधीतून बाहेर आले.त्यांनी डोळे उघडले. एक माकड उड्या मारत साधू जवळ आले त्या माकडाने दोन फळे साधूच्या हातात दिली आणि परत झाडावर जाऊन बसले. साधूनं ती फळं खाल्ली व साधू ताजेतवाने झाले.

    मंत्री साधूला म्हणाले,

   " आपण कधीपासून राहता इथं.? "

   " तीन तपं झाली."

   " मग आपण खाता, झोपता कुठे?"

   " इथेच.थंडी..पाऊस.. ऊन.. इथेच असतो.कुठेही जात नाही.सकाळीच तलावावर स्नानाला जातो एवढेच.माझे मित्र माझ्या पोटाची सोय करतात."

   " भीती वाटत नाही?"

   " भीती वाटायला ही काय मानवी वस्ती आहे का?"

   " नाही प्राण्यांची.. सर्पांची.."

   " अजिबात नाही. सगळे माझे मित्र आहेत.तुमचं काय प्रयोजन?"

   " आम्ही राजाचे सेवक. महाराजांना इथं तलावाकाठी महाल बांधायचा आहे."

  " कशाला? राजाच्या शानशौकीला? त्या मूर्ख राजाला काही अक्कल आहे का? एवढं सगळं जंगल तोडणार,प्राण्यांची कतल करणार. असले ऐदी राजे तुम्हाला मानवतातच कसे?"

   आपल्या राजाचा अपमान एका सेवकाला सहन झाला नाही. तो साधूंच्या जवळ गेला आणि म्हणला

   " मी हा राजाचा अपमान सहन करणार नाही."

   " अरे,मग मी निसर्गाच्या र्हासाचा अपमान का सहन करु?"

  मंत्री पुढे झाला आणि विनयानं म्हणाला,

   " महाराज काय मत आपले?"

   " मी असं काहीही करू देणार नाही. जा, तुम्ही राजाला सांगा."

   सगळेजण नाराज होऊन परतले.

 

   राजा एकदम भडकला. आपल्या योजनेवर कोणीतरी पाणी पाडते याचा त्याला राग आला.त्यानं फर्मान सोडलं,

   " त्याला आत्ता माझ्या समोर हजर करा. कैद करा. कुठल्याही परिस्थितीत."

  "  महाराज, शक्य नाही ते."

  " कारण नको,परिणाम हवाय."

  राजाचा आवाज वाढला.सगळे हतबल झाले.परत सगळे जंगलात आले ते साधूमहाराज ध्यानस्थ बसले होते.

   सगळा लवाजमा त्यांच्यासमोर उभा राहिला. साधुनी विचारलं,

  " काय? तुमचा राजा घाबरला काय?"

  " नाही महाराज, तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल,हा हुकूम आहे."

  " मी कुणाचा हुकूम मानत नाही. कित्येक वर्षापासून मी इथं राहातोय. राजाला सांगा. भेटायला बोलवा."

   " महाराज ,आम्हाला जबरदस्ती करण्यासाठी भाग पाडू नका."

   " कसली जबरदस्ती?"

   " आम्ही तुम्हाला कैद करू."

   " अरे मूर्खांनो, तुम्ही स्वतःच कैद झालेला आहात. या कैदेतून तुम्ही बाहेर पडू शकतच नाही.आम्ही स्वैर आहोत परमात्म्याच्या नामस्मरणात. आम्हाला कोणीही पकडू शकत नाही."

    दोन रानगट शिपाई पुढे झाले. साधूला हात लावणार एवढ्यात डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. एकापाठोपाठ एक. साधू हसले व बोलले,

   " हे माझं सैन्य.  पटकन निघून जा. नाही तर मी नंतर काहीही करू शकणार नाही."

  सगळे सैनिक हवालदिल झाले. त्यानी माघार घेतली.

 

  आता मात्र राजा  चवताळला. त्याचा अहंकार दाबला  होता. तो चिडून बोलला,

   " बिनकामाचे सगळे, चला मी येतो."

  ते साधुमहाराज ध्यानस्थ बसले होते .

   राजाने तलवार उचलली,

   " निरपराधांना मारू नये हा एक नियम तुला माहीत नाही कां? तुमच्या राज्यांमध्ये असेच कारभार चालतात का?"

   " राजाचा हुकूम न पाळणारा हा गुन्हेगार असतो."

   " कोण राजा? तू राजा आहेस? स्वतःला विचारून बघ.  अरे,तु एक फालतू माणूस आहेस. एका श्वानाएवढी किंमत आहे तुझी. कोण आहेस तू? स्वतःच्या ऐषोआरामा करता जंगलाचा नाश आणि प्राण्यांची कत्तल करणार्या  राजा, जरा जनतेकडे बघ.राजधर्म पाळ.त्यांची सेवा कर."

   " ऐsss, बंद कर तुझी टकळी. तुझ्यासमोर राजा ऊभा आहे कळत नाही का तुला?"

   "  माझा राजा ब्रम्हांडाचा राजा आहे.मी फक्त त्यालाच मानतो."

    राजांनी तलवार घेऊन साधूच्या अंगावर धावला.

   " तुझे निर्जीव शस्त्र मला काहीही करू शकणार नाही. माझी शस्त्रं अजून पाहिली नाहीस. अरे मुर्खा,जागा हो.शेजारचा शत्रू तुझ्यावर चाल करून येतोय. निष्पाप जीवांचा बळी घेतलाय त्यांनी.तुझ्या राजवाड्यात येतील. राणीला,राजकुमाराना पकडून नेतील,अत्याचार करतील,कत्तल करतील आणि तू अजून झोपेतच.  चैनीसाठी निसर्गाचा ऱ्हास करू इच्छितोस. डोळे उघड. राज्यात फिर.राजधर्म पाळ. जागा हो राजा जागा हो... नाहीतर तुझा नाश निश्चितच होणार आहे."

   राजा क्षणभर थरारला. तलवार मनात ठेवली.

   " महाराज  दया करा. आम्हाला सूचना द्या.. आम्हाला मार्ग दाखवा."

    " शाब्बास.. तु राजा झालास ते पूर्वाश्रमीच्या संस्कारामुळे. आता परत भोगामध्ये अडकू नकोस. साधुसंताना  थारा दे. राजा म्हणून काम करत असताना परमेश्वराची नामस्मरण कर.. तुला चांगले दिवस येतील आणि तुझे प्रारब्ध शुद्ध होईल."

   राजा नतमस्तक झाला आणि साधुनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.



मुरलीधर देवर्डेकर

९४२३२७५२५२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू