पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रहदारी संगीत

रहदारी संगीत

ले.©सौ. पूनम राजेंद्र अरणकले. 

दादरमधल्या गजबजत्या रस्त्यावरचं आमचं घर.

टायर घर्षणाच्या तानपु-याने नित्य भारलेलं रहातं.

त्यावर निनादत रहाते ती हाॅर्नच्या 'बॅकग्राऊंड म्युझिक'ची सुरावट.. अगदी खर्जातल्या पंचम, धैवतापासून ते तारषडजापर्यंत... कधी सुरेल तर कधी बेसूरीही.


त्या स्वरांच्या मिंडकामाची मजा घेत हसतखेळत सारी कामं होत रहातांत. मिंडकाम ... समजा मध्यमाला वरच्या षडजाकडे जायचंय तर मधल्या पंचमाला, धैवताला अथवा निषादाला बरोबर घेत किंवा हाय-हॅलो करत, टपल्या देतघेत, धमाल मस्ती करत जात असतो हा रहदारीस्वर. तर कधी त्याच खेळकर पद्धतीने खालच्या खर्जावरही जाऊन येतो बरं लीलया. कधी तार अन् खर्ज षडज् एकत्रच गळाभेट घेत असतांत.


त्यातच कधी प्रेशर कुकरच्या वाफभरल्या शिट्ट्यांचा अँम्पलीफायर त्याला घनता बहाल करत मजा आणत असतो.

आहाहाS क्या बात है!!


अगदी खरं सांगायचं तर या संगीतमय माहौलमुळेच तर चहलपहल आहे. जीवनात अशी संगीतमय रहदारी असावीच होय नं हो?!

ज्यांचं घर अशा गजबजत्या रस्त्यावर आहे त्यांना नक्कीच कळेल या रहदारी संगीतातली मजा! ज्यांचं नसेल त्यांना कल्पना करता येईलच! 


तर एकदा माझी एक कॉलेज मैत्रीण रेखा जी सध्या दुबईला असते.

मुंबईत आली होती कामानिमित्त. तर आवर्जून वेळ काढून मला भेटायला आली.

तिला तिथल्या तिच्या शांत वातावरणातल्या निवांत घराची सवय.

आमच्या घरच्या रहदारी संगीतातल्या सुरील्या तर कधी बेसुऱ्या हॉर्नस्वरांना ऐकून मधूनच डिस्टर्ब झाल्यासारखी थोडीशी मान झटकायची. शहाण्या मुलीसारखं उगा बोलून नाही दाखवलं इतकंच. 

तर या रहदारी पार्श्वसंगीताच्या तालस्वरावर, नाश्त्यासह आमच्या भरपेट गप्पा झाल्या.

तशी निघता निघता दुबईला घरी येण्याचं आमंत्रणही देती झाली.

अवघड वाटतंय बाई दुबईला येणं!

तशी विस्फारत्या नजरेने जवळपास ओरडलीच...काय?!

अगं, कुठल्या जमान्यात गं! इथे मुंबई ला विमानात बसलीस नं की पाच तासात दुबई! काय गं तू! जरा बाहेर पड गं! इति रेखा.

हं Ss अगं, काळजी नको गं! बाहेर पडते हो मी! 

फक्त दुबईला तुमच्या घरी यायचं म्हणजे जरा अवघडच आहे.

मग एक थापटी बसलीच खांद्यावर... 

ओये Ss मी नाही कां गं तुला भेटायला आले मुंबईत तुझ्या घरी.

तसंच दुबईत माझ्या घरी यायचं आहेस. बाहेर पडतेस म्हणालीस नं!

अगं हो गं! अर्थात घरकोंबडी नव्हेच मी!

एरवी काही नाही गं, पण आत्ताच बोललीस नं की तुझं घर कसं शांत निवांत आहे.

अगं हो थोडं आतल्या बाजूला आहे नं. असं तुमच्या घरासारखं  गजबजत्या रस्त्यावर नाहीये एवढंच.

हं Ss. तेच तर. करमणार कसं! मुख्य म्हणजे रात्रीच्या झोपेचं काय होणार? झोप पूर्ण झाल्याशिवाय काही खरं नाही बाई माझ्या तब्येतीचं. ऍसिडिटी घेऊन दुबईच्या ऊन काहिलीत फिरणं जमूचा नाय रे बाबा!!

अरे, डरनेका नहींच! पॉवरफुल गोळी तयार ठेवेन हो त्यावर आपल्याकडं!

ए Ss, पण म्हणं झोप कां न्हाई येणार गं?!

आता असा सजलेला भारदस्त रहदारी संगीताचा माहोल कुठचा असायला तुमच्या घरलां किनई!  माझ्या मेंदूला तर या इथं रंगणाऱ्या रहदारी दरबारी कानडा ची सवय.

ओह्ह, हा... हा.... कळलं कळलं!!.

पेटली गं ट्यूबलाईट माझ्या बायची!!

मग मात्र मुक्त हसणं झालं. बऱ्याच दिवसांनी खिदळत्या कॉलेज डे चा आस्वाद घेतला.

हा... हा... अगं डोन्ट वरी त्यावर एक आयडिया करूयात नं भारी!

आता मी आलेच आहे, तर मी बापडी रेकॉर्ड करून ठेवते हे आताचं रंगलेलं रहदारी संगीत. आणि तू येताना घेऊन ये तुझ्या झोपेसाठीचा तो दरबारीं कानडा फॉर्मुला. काय?!

अर्रे!! हा रे! सही च !

टाळ्या देत पुन्हा हास्याची फैर झडली.

चला तू आल्यासरशी माझी दुबई टूर पक्की झाली बघ! 


पण काय नवल हो! मी दुबईत पोचण्याआधी दुबईच तिच्या शांततेसह इथे पोचली जणू! 

हो नं, चक्क!!

ते कोविड लॉकडाऊन आलं काय नि आमच्या या संगीताच्या आनंदावर विरजणच पडलं हो!... बाप्पा!!

वाटलं ते रेखाकडंच दुबईतलं निवांत वातावरण इथं स्थिरवतंय की काय कायमसाठी! 

बापरे!! धास्तावायलाच झालेलं हो!! 

पण नाही...  हळू हळू करत, आता झक्कपैकी पुर्वपदाकडे सरकतंय हो!!

आता कसं पुन्हा रहदारी संगीताच्या भारदस्त तालस्वरांवर मस्त निवांत वाटतंय!

तर शुभेच्छा दया बरं, आमच्या घराची सांगितिक निवांतता अशीच राहो!... देताय नं!

त्यासाठी आधीच धन्यवादही देऊन ठेवतेय बरं का! 

म्हणजे कसं दरबारी कानडाचा रेकॉर्डेड फॉर्मुला घेऊन मी जाऊ शकेन ना मैत्रिणीकडे निवांत!

????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू