पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुनवलता

                         पुनवलता



                     मुरलीधर देवर्डेकर




                         एक


     आज पौर्णिमा.चंदेरी पांढरीशुभ्र रात्र.प्रसन्न वातावरण. जंगलातून येणारा थंड गार वारा.एकदम सुखद वातावरण. वातावरणाचा मनसोक्तपणे ही आस्वाद घ्यावा असे चंदेरी सुखद क्षण.

     थंड हवेचे ठिकाण.एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ. नेहमी पर्यटकानी भारलेलं. शहराच्या एका कोप-यातले हॉटेल. सतत गजबजलेले. सर्वांचे स्वागत करणारे. हॉटेल 'पॅराडाईज'. आणि मी या हॉटेलचा मॅनेजर सुजित काळे.

      मी या हॉटेलचा मॅनेजर झालो आणि मरगळलेले  हॉटेल टवटवीत झाले. मी या हॉटेलचा मँनेजर झाल्यानंतर खूपच बदल केले आणि पर्यटक वाढवले.सीझन मध्ये खूप गर्दी होऊ लागली. हॉटेलच्या रूम दोन दोन महिने अगोदर बुक व्हायच्या. बरेच लोक नाराज होऊन परतायचे. हॉटेलचे मालक डिसोझा माझ्या या कामगिरीवर खूष होते.

      हॉटेल मधल्या एका खोलीत मी राहतो.त्यामुळे चोवीस तास हॉटेल माझ्याच निरीक्षणाखाली असायचं.

     मुख्य वस्तीपासून थोडासं दूर.एका बाजूला जंगल. समोरच्या बाजूला मार्केट. जंगला पासून थोड्या अंतरावर तलाव. तो हॉटेलमधून दिसायचा. त्यामुळे पर्यटकांना त्या बाजूच्या रुम  आवडायच्या. गॅलरीत बसून त्यांना सौंदर्याचा उपभोग घ्यायला मिळायचा. त्यासाठी जादा पैसे देण्याची पण त्यांची तयारी असायची.

     त्या बाजूला सगळ्या डीलक्स रुम होत्या.गॅलरीत बसून दिसणारा तलाव, जंगलातून येणार थंडगार वारे मनाला सुखावायचे.जंगलात रातकिड्यांची किरकिर मनाला प्रसन्न करायची. सफेद चांदणे  वातावरणाला रंग चढवायचे. गँलरीत  दोन खुर्च्या व एक टिपाँयची सोय होती. त्यामुळे पर्यटक सौंदर्याचा आस्वाद घेत ड्रिंक घ्यायचे. त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायची. त्यामुळे त्या खोल्या सर्वांना आवडायच्या.


    आज माझा एक मित्र अमन गाला मुंबईवरून येणार होता.त्याच्या करता रूम नंबर 302 राखून ठेवली होती. तो वरचेवर यायचा. त्याच रूम मध्ये राहायचा. एकटाच. त्याचा खूप मोठा बिझनेस होता. त्याला हे ठिकाण आवडायचं. आणि हे हॉटेल पण आवडायचं.  जेव्हापासून मी मॅनेजर झालो तेव्हापासून तो हक्काने यायचा.हटकून यायचा. नेहमी यायचा. मी त्याला ड्रिंक्स, डिनर आणि कंपनी द्यायचा. खूप बरं वाटायचं. लहानपणाचा मित्र त्यामुळे आम्हाला एकमेकांची सुख-दुःख शेअर करायला आवडायचे. त्याच्या अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या. संध्याकाळी दोन पेग आणि छान पैकी नॉनव्हेज जेवण. एवढे झाले की खुश व्हायचा. तो आणि मी एकत्र जेवण घ्यायचे.रात्री वस्ती आणि सकाळी उठून  निघून जायचा. एवढ्या धावपळीच्या जीवनातून त्याला इथं राहणं आवडायचं. मला पण त्याच्या सहवासात बरं वाटायचं. नाही तरी मी एकटाच होतो.

     रूम नंबर 302 साफ करायला सांगितली. मी स्वतः गेलो. कारण माझा मित्र येणार होता. त्याच्या आवडीप्रमाणे सोय करायला पाहिजे होती.

     रुम चकाचक झाली होती. गॅलरी साफ केली होती. टेबल  पुसून घेतले होते. कोपर्‍यातल्या कुंडीतल्या वेलाची वाढ झाली होती. आता त्याला छोटी छोटी फुलं पण आली होती.आज मी पहिल्यांदाच फुल बघत होतो.खूप सुंदर, नाजूक  फुलं. एक वेगळ्या प्रकारचा सुगंध पण येत होता. ती वेल प्रत्येक पौर्णिमेला वाढायची. म्हणून  आम्ही नाव दिले होते 'पुनवलता'.

     एकदा समोरच्या जंगलात फिरत असताना मला त्या वेलीचं रोप दिसलं. एका शेतकऱ्याने सांगितले की ती खुपच दुर्मिळ वनस्पती होती. सहसा कोठेही मिळत नाही. म्हणून मी त्याला आणलं. एका कुंडीत लावलं मोठं झाल्यावर त्याची अनेक रोपे करता येतील असा माझा विचार होता.ते कुंडीत वाढू लागलं.मी त्याची निगा ठेवली. त्याच्या सौंदर्यानं सौंदर्याने मी भारावून गेलो. सुरुवातीला  त्याला वेटिंग रूम मध्ये ठेवले होतं. खूप छान वाटलं होतं. पण एक पर्यटक एक लेखक महाशय  एक महिन्याकरता त्या रूममध्ये आले त्यांनी विनंती केली. आपल्या रुममध्ये ही कुंडी ठेवण्यात यावी. मग ती कुंडी रूम नंबर 302 मध्ये ठेवली आणि तशी त्याच रूम मध्ये राहिली.

     प्रत्येक पौर्णिमेला छान पैकी बहरायची आणि आता तर तिला फुले  येऊ लागली होती. छान छान, केशरी रंगाची नाजूक फुले. खोलीचे सौंदर्य वाढलं होतं.

     मोबाईलची रिंग वाजली नंबर बघितला. अमनचा कॉल आला होता. मी मोबाईल उचलला,

    " हॅलो सुजित,.मी जवळ आलोय. गावामध्ये प्रवेश करतोय. दहा मिनिटात पोहोचेन."

    " हो, तुझी खोली तयार केली मी आहे.सध्या तुझ्या खोलीतच आहे. ये लवकर."

    " ओके, एन्जॉय करू. आज पौर्णिमा आहे म्हणून मी आलोय. मस्तच वातावरण आहे."

    "ओ के. ये ये  वाट पाहतोय."


    मी रूम मध्ये स्वतः गॅलरीत टेबल-खुर्च्या नीट ठेवल्यात का नाही ते पाहत होतो. समोरचं सौंदर्य पाहून मन भरत नव्हतं. दूर तलावात छोट्या छोट्या बोटी फिरताना दिसत होत्या. अमनबरोबरचा सहवास म्हणजे न विसरण्यासारखा. खूप गप्पिष्ट माणूस. चांगला मित्र. मला बरं वाटतं त्याच्याबरोबर.

    हातातली बॅग सांभाळत अमननं प्रवेश केला.

    " सुजित, तुला भरून बघून बरं वाटलं."

    " तुझीच वाट पाहतोय.."

    " खूप कंटाळा आला होता यार.. कामापासून थोडी सुटका करून घ्यावी म्हणून आलो. आणि त्यात आज पौर्णिमा. आजची रात्र इथं काढायची. सोबतीला तू आहेसच. एन्जॉय करू.तसं खूप दिवसांनी आलोय."

     त्याने बॅग ओपन केली 'शिवास रीगल'ची बाटली बाहेर काढली व टेबलावर ठेवली.

    " खूप मोठ्या तयारीनं आलास."

    " हो,आज एन्जॉय करू."

     " फ्रेश हो.. कॉफी वगैरे घे. अजून वेळ आहे ना!"

     " हो, वेळ आहेच.डिनर सांगून ठेव."

     "तु काळजी करू नकोस. तुझा मेनू तयार होईलच!"

     " तुला कॉफी पाठवून देऊ का?"

     " पाठवून दे."

     " ओके,पाठवतो."

     "  वेळ करू नको."

 

   मी काउंटरला आलो.सगळी रजिस्टर पडताळून पाहिली. सगळ्या रुम फुल्ल होत्या.

    हे हॉटेल म्हणजे पर्यटकांचं आवडतं हॉटेल होतं. ह्या शहरातले एक मोठं हॉटेल.वारंवार भेट देणारे पर्यटक पण बरेच होते. कारण हे स्थळ खूप रमणीय होते.स्वच्छ व थंड हवा. नयनरम्य  पॉइंट्स. आणि आजच्या चंदेरी वातावरणात ते आमचे हॉटेल पॅराडाईज.बरेच मोठे मोठे  लोक या हाँटेलमध्ये राहून गेले.कधी चित्रपटातले तारे, तारका मुद्दाम या हॉटेल मध्ये राहायला यायच्या. कधी बिझनेस मॅन सुट्टी घालवायला यायचे. सर्वांना मनसोक्तपणे खायला मिळायचे. इथलं चविष्ट भोजन सर्वत्र प्रसिद्ध होतं. त्यामुळे ह्या हॉटेलमध्ये राहायला मिळालं नाही तरी जेवणासाठी मात्र हॉटेलमध्ये हटकून यायचे लोक.

    माझा स्टाफ खूप चांगला होता. येणाऱ्या पर्यटकांचे विनयपूर्वक स्वागत व्हायचं.त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे जेवण मिळायचे. त्यांची चांगली व्यवस्था व्हायची आणि पर्यटकांकडून चांगल्या टिप्स मिळायच्या. त्यामुळे कोणाची काही तक्रार नव्हती. खूप चांगलं चाललं होतं.

     मी माझ्या केबिन मध्ये आलो. शेवटची नजर फिरवली. केबिन बंद केली. आजची माझी ड्युटी संपली होती. आता अमनला सोबत करायची होती .

     मी माझ्या रूममध्ये गेलो.तळमजल्यावरच्या एका खोलीत मी राहतो.रूम मध्ये गेलो. नाईटवेअर परिधान केली.

    मी इथे एकटाच राहतो. माझी पत्नी पुण्यामध्ये जॉब करत होती. मुले तिथेच होती.मग मी एकटाच राहायचा. जेवणाची पण सोय होती. पगार पण चांगला होता. खरं तर मला इथे राहायला आवडतं.असं वाटायचं की इथं जागा घेऊन घरं बांधावं अशी इच्छा होती. पण जागेच्या वारेमाप किंमतीमुळे मला ते शक्य होत नव्हतं. म्हणून माझी इथं रहायची इच्छा या माझ्या नोकरीद्वारे पूर्ण करत होतो.  मी नोकरीशी प्रामाणिक होतो आणि हॉटेलची प्रगती केली होती. हॉटेलचं नाव लांबपर्यंत गेलं होतं.

     मी माझी रूम बंद केली व जिन्यावरून रूम नंबर 302 कडे वळलो.

    अमन माझा खूप जुना मित्र. बिझनेसमॅन.खूप पैसा मिळवायचा. पण त्याला व्यापातून कधीच शांतता मिळायची  नाही. म्हणून तो इथे यायचा. त्याला हे स्थान खूप आवडायचे. आणि इथं  तो रूम नंबर 302 मध्ये रहायचा.एक रात्र काढायची. मी त्याच्याबरोबर ड्रिंक,डिनर शेअर करायचा. गप्पा मारायचा आणि दुसऱ्या दिवशी तो निघून जायचा.कधी एखाद दुसरा दिवस थांबला तर गँलरीत बसून निसर्गाचा आस्वाद घ्यायचा.

    " ये सुजित, कधीचा वाट पाहतोय."

    " सॉरी यार, थोडा वेळ झाला."

    " काही हरकत नाही. चला स्टार्ट करूया?"

    " चालेल,मी तुझ्या मेनूची ऑर्डर दिली आहे. आपण आपला कार्यक्रम चालू करू."

     " ओके तर मग."

    आम्ही दोघे गॅलरीत बसलो.'शिवास रीगल' ची बाटली बघून माझा घसा कोरडा पडू लागला.प्रत्येक वेळी अमन येताना इम्पोर्टेड बाटली आणायचा. त्यामुळे मलाही एन्जॉय करायला मिळायचं.तसं बघायला गेलं तर एवढ्या महागड्या दारू पिणे मला शक्यच नव्हते. पण ते अमनमुळेच शक्य व्हायचं.

     बाटलीचे टोपण बाजूला सरकले आणि तो काळा द्राव ग्लासमध्ये पडू लागला. ते  पहाणं तेवढंच आल्हाददायक होतं. त्यांनं दोन्ही ग्लास भरले. मग आपला ग्लास उचलून माझ्या ग्लासला लावला. चिअर्सची घोषणा झाली आणि एक एक सिप मुखावाटे पोटात पडू लागली. पोट जाळू लागली. एक आनंददायक, आल्हाददायक संवेदना मनाला उभारी लावून गेली.

    रूमबाँयनं स्नॅक  टेबलावर मांडलं.

    चंद्र हळूहळू वर सरकत होता. बाहेर पांढराशुभ्र प्रकाश पडलेला होता. या जंगलाचं सौंदर्य आणखी उजळले होतं. तलाव पण चमचम करताना दिसत होता. अवर्णनिय  असं दृश्य होतं. बाहेर नजर थांबत होती.

     अमन नेहमी आरामात प्यायचा.घाई नाही,गडबड नाही. एक एक सीप उडवत,स्नँकबरोबर गप्पा मारत.त्याची नेहमीची स्टाईल. पाय गॅलरीच्या कठड्यावर येऊन बसायचा आणि मग जुन्या आठवणी सांगायचा. कॉलेजमधल्या आठवणी. बरं वाटायचं त्याच्या सहवासात.

    " सुजीत.."

     आता त्याला चढू लागलीय याची  जाणीव झाली.

    " मला आज  जास्त काय आवडलं असेल  सांगा बघू."

    " ड्रिंक्स आणि खाना, दुसरं काय?"

    " चुक. अरे तू अशी काही काम करतोस की मला इथं नेहमी यावसं वाटतं. रहावसं वाटतं."

   " हो का?"

   " अरे,  कुंडीतली वेल कसली आहे?"

    "माहीत नाही. जंगलात फिरायला गेल्यानंतर एक रोपटं मिळालं.खूप आवडलं.आणून लावलं.पौर्णिमेला बहरतं म्हणून त्याचं नाव आम्ही 'पुनवलता' ठेवलेलं आहे."

    " अरे वा! असं वाटतं की पाहतच रहावं! किती नाजूक! किती छोटी फुले. मला वाटतं ती आजच बहरून आली."

    "  हो ना यार,आणि फुलं आजच पहिल्यांदा लागलेत."

    "  वा! वा! वा! काय सुंदर योग आहे."

    मनसोक्त ड्रिंक्स झाली. अमन प्यायचा पण प्रमाणबद्ध  प्यायचा. दोन पेगच्या  वर एक थेंबही घ्यायचा नाही. अर्धी बाटली शिल्लक राहिली होती.ती बाटली माझ्याकडे सुपुर्द केली.मी पण खुश झालो. मनसोक्त जेवण झाली.तोही खूष झाला. मी उठलो.

    " आता साडेबारा वाजलेत."

    " काय? साडेबारा? ठीक आहे. काही हरकत नाही. खूप चांगली सोय केलीस बाबा. थँक्यू व्हेरी मच! आता अशा कित्येक पौर्णिमेला मी येत जाईन. मला हेच सौंदर्य न्याहाळायचं  आहे. इथेच एंजॉय करायचे आहे."

     मी जायला निघालो.लक्ष गेलं.वेलीच सौंदर्य अप्रतिम असं झालं होतं. फुलांचा सुगंध मन भरून टाकत होता. असं वाटत होतं की  तिकडे बघत बसावं. मी अमनला 'गुड नाईट' केलं आणि झोपायला गेलो.



                       दोन



     सकाळी नेहमी प्रमाणे लवकर उठलो.मॉर्निंग साठी बाहेर पडलो.चंद्र अस्ताला गेला होता पण वातावरणात थंड हवा होतीच. बरं वाटत होतं. रस्त्याला मॉर्निंग वाँकला  बरेच लोक येत होते.हळू हळू अंधार संपू लागला होता.पूर्व दिशा उजळली होती. वातावरणात लालसर प्रकाश होता आणि ह्या प्रकाशात ही हे ठिकाण अतिशय शोभून दिसत होतं.

       रूमवर आलो. स्नान वगैरे आटोपलं विचार केला की अमनला फोन करावा. त्याच्या बरोबर कॉफी घ्यावी. पण अमनला उशिरा उठायची सवय होती. तो खूप वेळ झोपायचा. मग  विचार केला नऊ वाजताच त्याच्या रूमवर जायचं.तो बारा नंतर बाहेर पडणार होता.

     'शिवास रिगल' ची अर्ध्यापेक्षा जास्त राहिलेली बाटली माझ्या कपाटात ठेवली. मला आता ती दोन वेळा पुरणार  होती.अशा इम्पोर्टेड दारूच्या बाटल्या मला तो नेहमी देऊन जायचा.

    मी माझ्या केबिनमध्ये आलो.मेल चेक केले. नंतर काउंटरला गेलो. एक चक्कर टाकली. एव्हाना नऊ वाजले होते.मी आमच्या खोलीकडे चाललो. सूचना केली पंधरा मिनिटात कॉफी आणावी.

     अमन  अजून झोपला असावा! कारण दरवाजा बंद होता.मी बझर प्रेस केला. आतून बझर वाजल्याचा आवाज होता. बराच वेळ बझर दाबला पण काही प्रत्युत्तर नाही. इतका वेळ कसा झोपला  असेल काही समजत नाही.तो झोपायचा.  एकदम गाढ झोपायचा.

    परत ट्राय केला. प्रत्युत्तर नाही. मग मोबाईलवर कॉल केला. आतून मोबाईलची रींग वाजण्याचा आवाज येत होता. पण मोबाईल उचलत नव्हता. चार वेळा रिंगटोन ऑफ झाल्यानंतर परत काँल केला. काहीही प्रत्युत्तर नाही. त्यात अर्धा तास गेला.

    आता मात्र मला भीती वाटू लागली. उगीच शंकाकुशंका मनात डोकावू लागल्या. परत बझर दाबला.प्रत्युत्तर नाही.  मी माझ्या स्टाफला बोलावलं. दरवाजा ठोठावला.तरीपण काही प्रत्युत्तर नाही.मग एकाला  रूम नंबर 301 मधून गॅलरीत पाठवलं.त्या गॅलरीतून तो 302 मध्ये आला आणि एकदम त्याच्या ओरडण्याचा आवाज आला,

     " साहेब ..साहेब हे काय झाले बघा ?"

     "अरे काय झालंय?"

     " साहेब ...हे साहेब बघा कसे पडलेत?"

     " अरे पण दरवाजा उघड नां!आम्हाला कसं समजणार?"

      त्यानं दरवाजा उघडला.आम्ही सगळे जण भेदरून गेलो. आतलं द्रश्य   भयानक होतं. मी तर गारठून गेलो.  सगळेजण भेदरून गेले.

    अमन बेडवर पडला होता. काहीही हालचाल नव्हती. त्याचं शरीर प्राणहीन झालेलं होतं.कुठलीही चेतना नव्हती.

    माझ्या अंगाचा थरकाप उडाला.असं काही आतापर्यंत घडलं नव्हतं.  माझ्या मित्रांच्या संदर्भात असं धडावं हा मोठा दुर्दैवविलास होता. बहुतेक माझ्या मित्राचा खून झाला होता. कुणी त्याला मारून टाकलं होतं.अर्थात कुठलंच शस्त्र वापरलं  नव्हतं. पण हा नैसर्गिक मृत्यू नसावाच. माझ्याबरोबर माझा सगळा स्टाफ सुद्धा घाबरून गेला.जवळपासच्या सगळ्यात खोल्यातले पर्यटक येऊन बघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनामिक भिती होती. मृत्यू कशामुळे झाला काही समजत नव्हते. मी डॉक्टरना पाचारण केलं.

     काही वेळात डॉक्टर आले त्यांनी सांगितले की अमनचा म्रुत्यु झालाय.  कुणीतरी निश्चितच मारलं त्यांला. कशासाठी मारलं हे समजत नव्हते.का मारलं हे समजत नव्हतं. कोण वैरी होता समजत नव्हता.  पैशासाठी मारलं का हे पण समजत नव्हते. दरवाजा उघडाच होता.कुणीतरी गँलरीतून प्रवेश केला असावा.

     मी तर घाबरून गेलो होतो. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.माझ्या मित्राची ही अवस्था बघून माझ्या तोंडचं पाणी पळून गेलं होतं.

     मी पोलिस स्टेशनला फोन केला.


     काही वेळात इन्स्पेक्टर दामले आपल्या स्टाफसह  हजर झाले.त्यांनी पाहणी केली. अंगावर कुठल्याही शस्त्राचा प्रहार नव्हता.कुठेही रक्त सांडले नव्हते.

    मी खूप दुःखी होतो.कारण माझा जिवाभावाचा मित्र गेला होता.मी त्यांच्या घरच्यांना माहिती दिली.

    इन्स्पेक्टर सगळीकडे पाहत होते.  त्यांनी पाहिलं, अमनच्या गळ्याभोवती कसलेतरी वळ होते. अर्थात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गळ्याभोवती दोरी आवळून त्याचा खून केला असावा! दोरखंडाचे वळ स्पष्ट होते. त्यामुळे गळा दाबून खून झाला असावा!

     पोलिसांनी सर्व सोपस्कार केले. पोस्टमार्टम झाले. त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे मृत्यू गुदमरण्याने झालेला होता. अंदाजे नऊ तासापूर्वी झालेला होता. म्हणजे साधारण साडेबारा ते एक  ह्या दरम्यान हा मृत्यू झालेला होता.

    याप्रकरणी मी मात्र  सैरभैर झालो होतो.

   पोलिसांनी सगळ्या तपासण्या चालू केल्या.गँलरीचा  दरवाजा उघडा होता. त्यांच्या अंदाज प्रमाणे रूम नंबर 301 किंवा 303 मधून मारेकर्‍यांनी प्रवेश केलेला असावा! त्याच्या बॅगा तपासल्या. बँगेत पैसे तसेच होते. एटीएम कार्ड होती. गळ्यात सोन्याचे लॉकेट तसेच होते. म्हणजे खून पैशासाठी झालेला नव्हता.

    परत पोलिसांनी त्याच्या घराकडे नजर वळवली. त्यांचे कोण वैरी होते का हे तपासले. कोणीतरी असुयेनं त्यांचा खून केला का हे पण तपासावे लागणार होतं.बिझनेसमध्ये कोणी शत्रु होतं का हे पण पहावं लागणार होतं.  पण अमन एक साधा प्रामाणिक माणूस होता. अजातशत्रू होता. कधीही एखादा  वाकडा शब्द त्याच्या तोंडातून पण यायचा नाही.कधी कुणाला रागावायचा  नाही. तो आला की कर्मचाऱ्यांना भरपूर टिप्स मिळायच्या.

    पोलीसानी हॉटेल मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच शेजारच्या पर्यटकांची पण चौकशी केली.हे त्यांचं तपासणी सत्र चालूच होतं. त्यानी ती रुम  लाँक केली. दर दोन-तीन दिवसांनी पोलीस यायचे. रुम उघडायचे. मग त्यावेळी त्या वेलीला पाणी घातलं जायचं.

    इन्स्पेक्टर दामले अतिशय चाणाक्ष होते. कुठलीही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटायची नाही. त्यांनी ही खूनाची केस  चॅलेंज म्हणून स्वीकारली.

    त्यांचं काम चालू होतं पण काही धागादोरा हाती लागत नव्हता. त्याशिवाय वरिष्ठांकडून सतत चौकशीच्या सत्राला  उत्तरं द्यावी लागत होती.

    आता इन्स्पेक्टर दामलेंच्या नेहमीच्या येण्यामुळे त्यांची नी माझी चांगली मैत्री झाली होती. त्यांना मी त्या रात्री घडलेला किस्सा सांगितला.आमच्या मैत्रीविषयी सांगितले. 

    चौकशीच्या फेर्‍या चालू होत्या. वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या. हॉटेलच्या स्वच्छ परंपरेला काळिमा लागला होता. एक गूढ वातावरण तयार झाले होते.खुनाचे गुढ वाढतच होते. सगळ्या शहरात खुनाची चर्चा चालू होती.

    एक दिवस दामले बोलले,

    "काळे, मला वाटतं मी इथं राहायला एक दिवस यावं.स्व:ता रहावं.कारण,मी प्रत्यक्ष थांबल्याशिवाय मला काही अंदाज घेता येणार नाही."

    " थांबा ना! अवश्य थांबा!"

    " त्याच रूममध्ये थांबणार.302 मध्ये"

     " काही गुढ असेल का?"

     " नाही. नाही. भुत,पिशाच्च असले अंधविश्वास आम्हाला पटत नाहीत.खून झाला आहे. कुणीतरी गळा दाबून खून केला आहे एवढे मात्र खरे."

    " मग आता काय करणार तुम्ही?"

    "मला हेच बघायचं आहे.मला त्या रुममध्ये थांबायचंय."

    " काही हरकत नाही साहेब."

    " म्हणजे मलाही काहीतरी अंदाज बांधता येतील. माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळतील. नाहीतरी असं किती दिवस चालायचं? आम्हाला या कामाचा कंटाळा आलाय. वरिष्ठांच्या प्रश्नांना उत्तरे ध्यावी लागतात. याशिवाय पत्रकार, जनता ,राजकारणी यांच्या नजरेत आमची किंमत शून्य ठरते."

     "कधी थांबणार आहात आपण?"

     "उद्ध्याच..मी एकटाच असेन.कुणालाही कल्पना देऊ नका.ही गोष्ट गुप्त ठेवा."

     "काही हरकत नाही साहेब."

     दामले खूपच कष्ट करायचे.जेवढे जेवढे प्रयत्न करायला पाहिजे सगळे प्रयत्न केले पण त्यांना यश येत नव्हते. आणि हेच त्यांना वाईट वाटतं होतं. हीच गोष्ट त्यांना टोचत होती. पण ते खूप चिकाट होते.त्यानी ही  केस एखाद्या घोरपडीसारखी  पकडून धरली होती. मला तरी खात्री होती निश्चितपणे चार दिवसात ह्या केसचा फडशा पडू शकेल! हमखास खुन्याला पकडून देतील ही माझी खात्री होती आणि विश्वास पण होता.


    मी माझ्या रूम मध्ये बसून केबीनमध्ये बसून स्टेटमेंट चेक करत होतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर दामले केबिनचा दरवाजा उघडून आत आले.मी त्यांना बसायची विनंती केली.

     "कॉफी घेणार का साहेब?"

     " चालेल.. मागवा."

     " आणखी काही?"

     "काही नको..आज मी थांबणार आहे. मला ती रूम ओपन करायचीआहे. जरा तुमच्या लेबरना सांगून रूम साफ करून घ्या. मी आज इथेच थांबणार.ही गोष्ट  तुमच्या स्टाफ मध्ये कोणालाही गोष्ट सांगू नका."

    " ठीक आहे साहेब,आपल्याला खाण्याचा मेनू काय.?'

    " मी तर खाण्यासाठी आलो नाही. तुम्हाला जे हवे असेल ते पाठवून द्या.पण फ्रीमध्ये नको."

     " ठीक आहे,  ड्रिंक्स काही हवी का?नाहीतर असं करु..शिवास रिगलची अर्धी बाटली आहे.आपण एन्जॉय करु.तुम्हाला चालत असेल तर."

     " अरे हो, काही हरकत नाही. चालेल मला ते. आपण दोघं मिळून ड्रिंक्स शेअर करू. तुमच्या बरोबर ड्रिंक्स घ्यायला मजा येईल."


     रूम नंबर 302. एक महिन्यानंतर रुम प्रकाशमान झाली होती. रूम झाडून पुसून लखलखीत करून घेतली होती. गॅलरी साफ केली होती. टेबल-खुर्च्या साफ करून ठेवलेल्या होत्या. सगळं नीटनेटकं होतं.

     आज पौर्णिमा.अमनला  जाऊन एक महिना झाला होता.मागच्या पौर्णिमेला तो आणि मी या रूममध्ये गप्पा मारत बसलो होतो.मी गंभीर झालो.  एक चांगला मित्र गमावला होता.

       आजच्या विधीला परत फुले उमलायला सुरू झाली होती. अतिशय सुंदर फुले. नाजूक नाजूक.इवली इवलीशी. मला वाटतं ती फक्त पौर्णिमेलाच लागत असतील!कारण यापूर्वी आणि नंतर कधीही दिसली नाहीत. आणि ती वेल हिरवीगार दिसत होती.फुलांचा सुगंध दरवळला होता. वेलीचा आकार पण वाढला होता. अत्यंत सुंदर दृश्य होतं.

    गॅलरीत खुर्च्या मांडल्या.मी आणि इन्स्पेक्टर दामले दोघे  बसलो.अर्धी राहिलेली बाटली रिकामी करू लागलो.

    '"वा काळे! काय मस्त ड्रिंक आहे. एकदम साँफ्ट.  मी पहिल्यांदा अशी ड्रिंक घेतो. आणि अशा  महागड्या ड्रिंक्स  परवडत नाहीत  हो.तस पाह्यलं तर आमचे पगार अल्पच आहेत. छान.. छान.अशी चैन परवडत नाही."

     "महागडी तर आहेच!"

     " चला मग आता खायला सांगा.आणि हो काळे, पैसे मी भरणार."

     " असं का हो साहेब, हॉटेल आमचं आहे."

     "म्हणून काय झालं? तुम्ही कामगार आहात ,मालक नाही.आणि हो, मी आज पर्यंत कोणाकडूनही साधा चहासुद्वा घेतला नाही."

      "वा साहेब!अशी माणसं दुर्मिळच."

      "  काळे,किती वर्षापासून काम करता इथं?"

      " मी ना!सात वर्षे झाली.सात वर्षापासून हे हॉटेल सांभाळतोय."

       " छान आहे,तुम्ही चांगल सांभाळलं हॉटेल."

       " पण हा कलंक लागला ना!"

       " हां, लागला .पण  काळजी करू नका. मी आहे. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. त्या गुन्हेगाराला बेड्या ठोकीनच."

     दोघही भरपेट जेवलो.पोटावरून हात फिरवत इन्स्पेक्टर दामले बोलले,

     "जेवण चांगलं होतं काळे."

     "येत जा वरचेवर. आता आपण चांगले मित्र बनलो आहोत. काही हरकत नाही कधीतरी डिनर घ्यायला.मी ड्रिंक्सचा शौकीन नाही पण आठवड्यातून एकदा होते."

     "हो हो येईन. काय सुंदर जागा आहे. मन प्रसन्न झाले."

     नंतर फुललेल्या वेलीकडे पहात बोलले,

    " काय सुंदर वेल! वा!वा!काय नाव याचं?"

     " पुनवलता. हे आम्ही दिलेलं नांव."

     " छान आहे,खूप छान वेल."

    साडेबारा वाजले .दामलेना गुड नाईट केलं आणि माझ्या रूम मध्ये येऊन झोपलो. मी विचार करत होतो असं काय असेल ज्याने माझ्या मित्राचा बळी घेतला.  आता इन्स्पेक्टर दामले आहेत म्हणजे आता काही काळजी नाही.


                      तिन

 

     सकाळचे नित्यकर्म आटोपले. हॉटेलमधून चक्कर मारली .नऊ वाजले होते.

      मी रूम नंबर 302 कडे वळलो. दामले उठले का अजून झोपेत आहेत का माहीत नव्हते.

     रूम बंद होती.आतून कडी लावली होती.

     मी बझरचा स्विच  प्रेस केला. आतून बझरचा आवाज येत होता. पण काही हालचाल होत नव्हती. काहीही प्रत्युत्तर नव्हते.

    पंधरा मिनिटे झाली.

    आता मात्र मी भीतीने पांढराफटक पडलो. अंगाला दरदरून घाम सुटू लागला. मती गुंग झाली. मन व शरीर थिजून गेलं.परत मागच्या घटनेची पुनरावृत्ती होत होतं. परत परत बझर वाजू लागला. पण काहीही प्रत्युतर मिळत नव्हते

   अर्धा तास झाला.

   मी मात्र हबकून गेलो. माझ्या मनाचं अस्तित्व संपल्यासारखं वाटलं.असं काय झाले असेल? दामले आतून उत्तर देत का नसतील? अजून झोपले असतील का? त्यांना बझरचा आवाज ऐकायला येत नसेल का? एवढ्या गोंगाटाने ते उठायला हवे होते.आत शांतच.काहीही प्रत्युत्तर नव्हते.

     सगळा स्टाफ जमला. परत रूम नंबर 301 मधून 302 गॅलरीत एका माणसाला पाठवले. तो आत गेला आणि त्याने ते दृश्य पाहिले. तो हबकून गेला आणी  घाबरून मोठ्याने ओरडू लागला,

     "साहेब..साहेब.."

   त्याला पुढचं काही बोलता येत नव्हते.त्याने दरवाजा उघडला.आम्ही आत आलो. आतलं वातावरण बघून माझा धीर  संपला. मी बसकण मारली. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण. सर्वांची मनं थिजलेली, भयाने भिजलेली.

     इन्स्पेक्टर दामले बेडवर पडलेले. निर्जीव अवस्थेमध्ये.

    गळ्यावर दोरीच्या आवळलेल्या खुणा.

     मागच्या घटनेची पुनरावृत्ती झालेली होती. मी पोलिस स्टेशनला फोन केला.

     काही क्षणात पोलीस आले. त्यांच्याच एका इन्स्पेक्टर चा मृत्यू झाल्यामुळे तेही भेदरलेले होते.डॉक्टर आले. डॉक्टरांनी मृत घोषित केले.

     पोलिस पटापट आले. त्यानी रूम ताब्यात घेतली.रूम लाँक केली. पोलिसांची चक्रे फिरू लागली. पोलीस आपल्यापरीने तपास करू लागले. रुम लाँक केल्यामुळे ती वेल मरून जाईल म्हणून  मी ती फुलांची कुंडी  माझ्या रूम मध्ये शिफ्ट केली.

     आता मात्र प्रत्यक्षात पोलिसाचा खून झाला त्यामुळे पोलिस स्टेशन पण हादरले.शहरात भितिचे वातावरण होते. मृत्यू गुढ होता. कल्पनेच्या पलीकडची वास्तवता होती.जिल्ह्याच्या वरीष्ठ अधिकार्यानी भेट दिली होती. सर्वांना सुचना केल्या होत्या.

    एव्हाना सगळ्या शहरांमध्ये बातमी पोचली होती. पत्रकार आले होते.  मी मालकांना फोन केला. मालक डिसोझा संध्याकाळी आले होते.

     मी असं ऐकलं होतं की वनस्पतींना पण भावना असतात.  वनस्पतीना पण माणसं कळतात.कुठल्यातरी एका  देशामध्ये एका खुनाचा शोध वनस्पती द्वारे लावला होता.त्या रुममध्ये एकेका संशयिताना सोडण्यात आले.  जेव्हा खुनी त्या रूममध्ये गेला  तेव्हा ती वनस्पती मलुल पडली.आणि मग खुनाचा छडा लागला. अर्थात हे परदेशातले तंत्रज्ञान होते. आपल्या देशामध्ये या गोष्टी साध्य होतील का नाही माहीत नाही.असतं तर आपल्या पूनवलतेचा  खूप उपयोग झाला असता. पूनवलतेने  खुनी  शोधून काढला असता.

     आठ दिवस पोलिसांनी तंबू टाकला.आम्हाला पण वारंवार पोलीस स्टेशनला जावं लागायचं. कारण नसताना मला खूपच मनस्ताप झालेला होता. पोलिसांच्या हा:हा:किरीने स्टाफ पण वैतागला  होता. पोलिस नेहमी दादागिरीची भाषा वापरायचे. सगळ्यांना कस्पटासमान समजायचे. जणू हॉटेल आपलेच आहे अशा वृत्तीने वागायचे. आणि हॉटेलमधल्या प्रत्येक कर्मचार्‍याकडे खुनी  म्हणून बघायचे.

     हॉटेलचे मालक डिसोझा पण आले होते. त्यांनी आठ दिवस तळ ठोकला.पण सगळ्या नकारात्मक घटना घडत होत्या.हॉटेलमधली बुकिंग रद्द झाली होती. सगळं हॉटेल रिकामं झालं होतं.

     दोन महिन्यात दोन मृत्यू झाल्याने हॉटेलच्या प्रतिमेला डाग लागला होता.

     आम्ही मात्र सगळेजण  भांबावून गेलो होतो.


    चौकशीसाठी दिल्लीहून स्पेशल स्काँड आला होता. त्यांच्या प्रश्नाना  उत्तर देउन  वेळ जाऊ लागला. हॉटेल जवळ जवळ बंद होण्याची पाळी आली होती.

    आम्हाला या प्रकाराचा खूप त्रास झाला. हॉटेल आहे म्हणजे पोलिसांचे जेवण, चहा वगैरे व्हायचं. सगळेच काही इन्स्पेक्टर दामले यांच्यासारखे प्रामाणिक नव्हते. आपल्या मालकीचे हॉटेल समजून ऑर्डर द्यायचे. त्यांची भाषा उद्धट होती.अरेरावी होती. अंगावर यूनिफार्म असला की ताकद दाखवायची खुमखमी येते. घरात बायकोच्या नजरेत मांजर झालेला पोलीस सुद्धा युनिफॉर्म असल्यावर इथं वाघासारखा डरकाळ्या फोडायचा. दादागिरी मुकाट्यानं सहन करायची. त्यांना उलट पण बोलता येत नाही. कायदा पण त्यांच्या बाजूने.जिथे युनिफॉर्म तिथे कायदा.

      एकदम सुरळीत सुरू असलेली यंत्रणा कोलमडून गेली होती. आतापर्यंत या जागेवर खूप प्रेम केले पण आता मात्र ही जागा नकोशी वाटू लागली. हे शहर पण नकोसं वाटू लागलं.हे शहर सोडून पडावं अशी माझी इच्छा झाली.

     आतापर्यंतच्या दोन्ही घटना या पौर्णिमेला घडलेल्या होत्या.पोलिसांच्या पण लक्षात आले की अशा घटना पौर्णिमेला घडल्या.त्यामुळे येणार्‍या पौर्णिमेला जय्यत तयार करायचे असे ठरवले. पौर्णिमेचे आणी या घटनेचे काहीतरी लागेबांधे असावे असे त्यांना वाटत होते.त्यामुळे पौर्णिमा जवळ येताच पोलिसांनी जय्यत तयारी केली.

     पोलिसांनी रूममध्ये  वेगवेगळ्या बाजूने कॅमेरे लावले. जेणेकरून आरोपी आला तर तो दिसेल.पर्यटक म्हणून एक पोलीस त्या रूममध्ये राहणार होता. हॉटेलमधल्या एका खोलीत निरीक्षण चालणार होते. आणि मग येणारा आरोपी त्यात मध्ये बंद होणार होता.


   आजची पौर्णिम.  पौर्णिमेचे सौंदर्य पहायला मनस्थिती नव्हती, नजर नव्हती. आज पुनवलतेला फुले उमलायला सुरुवात झाली होती. पुनवलतेची कुंडी  माझ्या खोलीत ठेवल्यामुळे त्याचं सौंदर्य मला उपभोगायला मिळणार होतं.

    संध्याकाळी सगळा लवाजमा एकत्र झाला. एका रूममध्ये निरीक्षण कक्ष ठेवला. पर्यटक म्हणून एका पोलिसाला पाठवण्यात आले.

      पौर्णिमेचा चंद्र हळूहळू वरती सरकू लागला. पण आज माझी निसर्गाची किमया पहायची इच्छा नव्हती.

     मारेकरी कोण होते ते स्क्रीनवर दिसणार होते. यातून काहीही सुटणार नव्हते. जो कोणी आरोपी असेल तो त्यामध्ये बंद होणार होता. आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकणार होता. पोलिसांचा पहारा सर्वत्र  होता. बाहेर काही  साध्या वेशातील पोलिस पण पहारा करत होते. ही घटना गुप्त ठेवली होती.

      दुसऱ्या मजल्यावरच्या एका रूम मध्ये सगळी व्यवस्था होती.स्क्रीन चालू होते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. सर्वांच्या नजरा स्क्रीनवर खिळलेल्या होत्या. मी पण त्याच्याबरोबर थांबलो होतो.

     आतापर्यंत खून साडेबारा ते एक या वेळेत झाले होते.

     एक वाजला होता. स्क्रीनवर काही हालचाल दिसत नव्हती.वाट पहाणे एवढंच काम होतं.

     अचानक स्क्रीनवर हालचाल दिसू लागली.रूम 302 मधला माणूस उठला.त्याने दरवाजा उघडला.दरवाजातून कोणीतरी आत आले.सगळेजण सावध झाले. रूम मध्ये कुणीतरी आत शिरलेले दिसले. तो हॉटेलचा रूमबाँय होता. तो उभा राहून रूम मधल्या व्यक्तीशी चर्चा करत होता. म्हणजे खुनी हा रुमबाँय होता. बापरे..काहीही असो मारेकरी सापडणार होता!

      सगळे सावध झाले.  रूमच्या चोहोबाजूला पोलीस होते.सगळे सावध होते.

     कदाचित हाच खुनी असावा असं सर्वांना वाटत होते. तो आत गेलेला दिसला. त्याचं रूम मधला इसमाशी संभाषण चालले होते. आता मात्र सर्वांनी हालचाल केली. पुढचं काही घडायच्या अगोदर त्याला पकडावं लागणार होतं.त्या व्यक्तीला जेरबंद करायचं होतं.

    सगळेजण पटकन आत शिरले. आणि रूमबाँयला ताब्यात घेतले.

    " साहेब,साहेब,काय करताय?"

    " काय रे ? तूच खून केलेत का आतापर्यंतचे? सापडलास की नाही?"

    " नाही साहेब,ह्या साहेबांनी मला कॉफीची ऑर्डर दिली म्हणून मी कॉफी घेऊन आलो होतो."

     तो रूम मधला पोलीस पण बोलला.

    " हो..हो..  मीच कॉफीची ऑर्डर दिली होती."

     परत मरगळलेलं वातावरण प्रसन्न झालं.ताजंतवानं झालं. सर्वांनी सुटकेचा  श्वास घेतला.आणि परत आपल्या रूम मध्ये थांबले. रूम  302 परत बंद केली.

     पोलीस स्टाफबरोबर मीही थांबलो होतो. तीन वाजले होते.मला कंटाळा आला. झोप येऊ लागली.मी पोलिसांना सांगितले आणि मी माझ्या रूम मध्ये गेलो. दरवाजा बंद केला आणि बेडवर पडलो.निद्रादेवी वाट पहात होती.

     पूनवलतेला बहर आला होता.वेलीची उंची पण वाढली होती. फुलं दरवळली होती. सगळा सुगंध सुटला होता. मी वेड्यासारखा वेलीकडे पाहत होतो.कधी झोप लागली मला समजलेच नाही.


      अचानक मला जाग आली. गळ्याभोवती काहीतरी आवळलं जातंय त्याचा भास झाला. मी झोपेत हात लावला. थंडगार स्पर्श होऊ लागला होता.एखाद्या दोरीसारखा.

     मी डोळे उघडले. नाईटलँपच्या त्या मंद प्रकाशात मला ते दिसले. पूनवलतेचा आकार खूप मोठा झाला होता.वेल  खूप मोठी झाली होती. झपाट्याने वाढत होती आणि त्याचं एक टोक माझ्या गळ्याभोवती आवळत चालले होते. आणि माझ्या गळ्याभोवती लपेटत होती.  हळूहळू गळा आवळला जात होता. मी सोडवण्याचा प्रयत्न केला पण मी दुबळा पडत होतो.वेलीचा फास  एकदम घट्ट होत होता. मला काहीही समजत नव्हतं. वेलीचा आकार पण मोठा होत होता.मला ओरडायचं पण भान राहिलं नव्हतं.

    मी घाबरलो.धडपडलो. काही चालत नाव्हते. जीव वाचवण्यासाठी जेवढे प्रयत्न करायचे ते केले. ती वेल सोडू लागलो. पण एवढी घट्ट चिकटली होती की माझं काही चालत नव्हते. माझी ताकत अपुरी पडत होती. माझा श्वास कमी पडू लागला होता. गळ्याभोवती फास आवळत चालला होता.मी गुदमरत चाललो होतो. श्वास घेणं कठीण जात होतं. आणि मग लक्षात आलं की माझा श्वास हळूहळू बंद होतोय. आता काहीही आपला उपयोग होणार नाही. मी  शांत पडलो.निरीक्षण करत पडलो. निरीक्षण करण्याची क्षमता पण राहिली नव्हती. मी डोळे उघडून शांत पडलो.


   दुसऱ्या दिवशीची स्थानिक वर्तमानपत्रातली बातमी

  '' हॉटेल पॅराडाईज मॅनेजर काळे यांचा गुढ मृत्यू."



मुरलीधर देवर्डेकर

9423275252


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू