पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तात्या उर्फ कुसुमाग्रज यांना पत्र

माझे आवडते लेखक
विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ तात्या उर्फ वि.वा. उर्फ कुसुमाग्रज यांना पत्र.........

आदरणीय तात्या...!!!

साष्टांग नमस्कार....!!!

आपणास तात्या म्हणण्या इतपत , मी आपला सुपरिचित नाही किंवा समवयस्कही नाही. मात्र, सर्वांच्याच आयुष्यात काही व्यक्ती अथवा व्यक्तिमत्वं आपल्या मनाचे अंतराळ व्यापून शिल्लक राहतात. त्यांच्या आयुष्यातील कामाचा ठसा आपल्या मनावर उमटलेला राहतो. कळत-नकळत त्यांच्याबाबत एक आदरभाव निर्माण होतो.... त्यातूनच कदाचित आपलेपणाचा जन्म होत असावा....!!   त्याच आपलेपणाने मी आपला उल्लेख "तात्या" असा केला आहे. साहित्यविश्वात आपण वेगवेगळ्या नावाने सुपरिचित होता विवा उर्फ कुसुमाग्रज उर्फ तात्या आणि मला ज्ञात नसलेली अजूनही आपली संबोधने असतील ........... जेव्हा आपल्या साहित्यसंपदेचा सूर्य माध्यान्ही तळपत होता... तेव्हा आपल्याला आपल्या घनिष्ठ मित्रांनी विविध नावांनी संबोधले असेलही... असो....!!!!

पत्रास कारण की.......
म्हणायच्या आधीच माझी प्रस्तावना थोडी मोठी झाली. आपण म्हणत असाल..... "नमनालाच घडाभर तेल"
मात्र तसं अजिबात नाही... हे अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो...!!!

    आपल्यासारख्या असामान्य आणि अफाट बुद्धिमत्तेचं आणि कल्पनाशक्तीचं वरदान लाभलेल्या लेखकाला, पत्र लिहिताना .... "तेजोमय रवीपुढे काजवा"..... असल्याचा भास होत आहे आणि त्यातून कुठेतरी आदरयुक्त दबलेपण मनातल्या मनात माझे मलाच दाबत आहे.... आपणास ते समजले असेलच.......!!!

तर सांगायची गोष्ट म्हणजे...

पत्रास कारण की .....!!!
तुमची खऱ्या अर्थाने ओळख व्हायला बराच कालावधी जावा लागला. जवळपास सतरा-अठराव्या वर्षी जेव्हा तारुण्यात पदार्पण केले. तेव्हा पाठ्यपुस्तकात असलेल्या कवितेने....... आणि...... त्यातल्या धाडसी.. तसेच बेफिकीर तरीही....... "त्या" वयात भुरळ पाडणाऱ्या विचारांनी..... अस्मादिकांच्या मनावर मोहिनी केली होती. त्यासाठी फक्त एकच वाक्य पुरेसं होतं ते म्हणजे...

"प्रेम कर भिल्लासारखं....
बाणावरती खोचलेलं ;
मातीमध्ये उगवूनसुद्धा.......
मेघांपर्यंत पोहोचलेलं"

खरं सांगायचं तर..... एक प्रेमवीर म्हणून.. त्या ओळी गुणगुणताना किंवाऽऽ..... म्हणताना म्हणूया......विषयच संपला होता.....!!!
                 त्या तारुण्यातल्या नवथर वयात कुणालातरी आपलंसं करण्याची एक अनिवार अशी सुप्त इच्छा असते....त्यामुळे एक वेगळाच 'जोश' काही काळ अंगात संचारतो... हे त्रिकालाबाधित सत्य आहे.....!!!
   तरीही याच कवितेतील

जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत....
नंतर तुला लगीनचिट्ठी आल्याशिवाय राहील काय..?

या प्रश्नार्थक ओळी मनात एक अनामिक भीती आणि हुरहुर निर्माण करायच्या हो...
कारण जी आपल्याला आवडते...... तिचं लग्न वगैरे या गोष्टी दूरच....  पण,  आपण फक्त पहात बसलोय आणि आपल्यामध्ये विचारायची धमकच नाही...... म्हणून, तिने इतर कोणीतरी विचारल्यावर पटकन होकार देऊ नये....!!!
किंवा
देईल की काय .......????

अशी भीती वाटायची....!!!
"त्या".. वयात नकार मिळाला तर काय होईल???.... हा एक मोठा प्रश्न असायचा .......
आणि जर आपण विचारलं ...   आणि तिने
आणखी कोणाला सांगितलं ....... तऽऽर......??

त्यातून कॉलेजमध्ये आणखी वेगळे
  "राडे" व्हायला नकोऽऽऽ.... हीसुद्धा भीती असायची....... पुढे जसा-जसा मोठा होत गेलो....(म्हणजे ......वयाने हा)
तसतशा काही गोष्टी समजत गेल्या. मात्र "आयुष्यात पाय रोऊन उभं राहणं आणि आलेल्या कुठल्याही आपत्तीला निर्भिडपणे तोंड देण्यासाठी लागणारा  "कणा" निर्माण करायचं श्रेय, फक्त तुमचंच आहे."    तुम्ही तुमच्या शब्दातून आम्हाला भेटत होता आणि नकळतपणे आमचं व्यक्तिमत्व घडत होतं. माझ्यासारख्या कितीतरी जणांची व्यक्तिमत्व आपल्या शब्दांनी घडली असतील....!!!

            "गर्जा जयजयकार क्रांतीचा".... मी अनेक समारंभात म्हटलेलं आहे. त्याच वेळी नकळतपणे एका तरुण
(म्हणजे..... मीच बरं का तात्या)  मनात क्रांती आणि चळवळीची बीजे रोवली गेली. आपल्याबद्दलची माहिती विविध प्रकारच्या वाचनातून मिळत होती.....   आणि .......
"मनाच्या "डिस्क"वरील "कुसुमाग्रज" नावाच्या "फोल्डर"मध्ये आपोआप "सेव्ह" होत होती...!!!"
        भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आणि आपली स्वातंत्र्यदेवतेची विनवणी वाचनात आली. तोपर्यंत मीही थोडाफार लिहू लागलो होतो. नाहीतरी आपल्या श्रद्धास्थानाचे अनुकरण आपल्या नकळत होत असतंच की...!!!

त्याच वेळी माझ्याकडूनही

"लखलखाट विषमतेचा अन् ओझे कर्तव्यांचे,
आग पोटात भुकेची...; आतडी जाळत गेली.....
आज आम्ही स्वातंत्र्याची... ५० वर्षे पूर्ण केली ...." 
 
   या ओळी माझ्या मनातून अलगदपणे कागदावर उतरल्या होत्या...!!! शेवटी क्रांतीच्या बीजाचा अंश आपल्याच लेखनातून घेतला होता ना...??... मग तो वाया कसा जाईल???
        
            तात्या...... आपल्या 'विशाखा'ची मोहिनी मनावर कायमच आहे. मात्र जीवनलहरी, मराठीमाती, हिमरेषा, स्वगत, वादळवेल यांनीही माझ्या मनावर वेगळेच गारुड केले आहे. कालिदासांचं आपण मराठीत आणलेलं "मेघदूत" म्हणजे आमच्यासारख्या 'अधाशी' वाचकांसाठी पर्वणीच....!!!     
                
               कालांतराने मराठी रंगभूमीच्या संपर्कात आलो आणि आपली 'नाट्यसंपदा' जवळून वाचण्याचा, अभ्यासण्याचा योग आला. हा अनुभव अत्यंत अविस्मरणीय आणि जीवनातील फार वेगवेगळ्या गोष्टी शिकवणारा  होता...कारण याच कालावधीत सावरकरांच्या संन्यस्त खङग् पासून अगदी गडकरी आणि खाडिलकर ते कोल्हटकर आणि आचार्य अत्रे यांपासून कानेटकर ते तेंडुलकर आणि अगदी पुढे येऊन बोलायचं झालं तर श्याम मनोहर , भारत सासणे, चंप्र देशपांडे, बुद्धीसागर ते अशोक समेळ, प्र ल मयेकर, श्याम मोकाशी..... ते संतोष पवार केदार शिंदे असा हा वाचन प्रवास सुरूच आहे. अजूनही बरीच नावं घेता येतील पण नको..!!! हा अनुभव खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करून टाकणारा होता. कवितेबद्दल बरंच काही बोलू शकतो. मात्र , कवी आणि कवयित्रींची नावे एका लेखात कधीच बसू शकणार नाहीत...!!! म्हणून तो मोह मी टाळत आहे..!!!

                  काही वर्षांपूर्वी आपल्या चतुरस्त्र लेखणीतून साकारलेलं "वीज म्हणाली धरतीला" या राणी लक्ष्मीबाईंच्या  जीवनावरील आधारित नाटकात भूमिका करण्याचा योग आला. एका दूरचित्रवाणी साठी हे नाटक करण्यात आलं. लक्ष्मीबाईंची भूमिका वर्षा उसगावकर यांनी खूप छान रंगवली. त्या नाटकाचा आणि त्याच्या कथावस्तूचा परिघ, त्यातील अनेक पात्रं आणि वाचताना तसेच समजून घेताना मिळालेला नाट्यानुभव खरंच विलक्षण होता.  विशेष म्हणजे "वीज म्हणाली...." मध्ये लक्ष्मीबाई बरोबरच "जुलेखा" या व्यक्तिरेखेला आपण जी झळाळी दिली आहे, ती भान हरपून टाकते. मूळ कथावस्तू नाटकातून मांडत असताना त्यातील मुख्य नायिकेसह; तितकंच मोठं योगदान देणाऱ्या सामान्य व्यक्तिरेखेला ही आपण ज्या खुबीने उभं केलंत ते वाचताना आणि अनुभवताना, त्या इंग्रजांविरुद्धच्या उठावात स्वतः सामील झाल्यासारखं वाटत होतं. बंडाचा इतिहास आणि त्याचा पसारा; तो मांडण्यासाठी गरजेचा असणारा आपल्यासारख्या लेखकाचा लेखनीय आणि समोरच्यांना समजावून सांगणारा.... आवाका याने मी नेहमीच थक्क होत आलो आहे.
              तीच कथा पुढे... ययाती- देवयानी, नटसम्राट, ऑथेल्लो यांची ही नाटके वाचताना असाच प्रत्यय आला.   विविध मानवी स्वभावाचे अनंतरंगी कंगोरे, त्यांच्या वर्तणुकीतून आणि एकमेकांच्या परस्पर संबंधातून, तसेच व्यक्त होण्यातून, फुलत जाणाऱ्या नाट्याची "सजावट" कशी करावी; याचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणजे आपली नाट्यसंपदा आहे.  
      
         साहित्यातील वेगवेगळ्या दालनांमध्ये तुम्ही अगदी अनिर्बंध आणि मुक्त संचार केलात. कथा-कविता अथवा कोणताही साहित्यप्रकार असला तरी, त्यातून विविधांगी आणि बहुपेडी विषय आपण किती सहजतेने हाताळत होता. हे पाहून नतमस्तक झालो. आपल्या लेखणीने जे ज्ञानमोती आमच्यासाठी निर्माण केले. ते पाहून आपण माझ्या आयुष्यातलं  एक महत्त्वाचे "ज्ञानपीठ" आहात हे अभिमानाने सांगावसं वाटतं.
          कालच तुमची जयंती झाली. विशेष म्हणजे सबंध मराठी मनाने आणि मराठी माणसांनी राजभाषा दिनासाठी आपल्या जन्मदिना ची निवड करावी याहून मोठे काय असू शकते आणि म्हणूनच मी खूप खूष आहे....!!!
            
                शब्दांची सुद्धा काय गंमत असते ना....??  दोन माणसे एकमेकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत परंतु तेच शब्द वाचणारा वाचक त्यातील विचारांनी अंतर्बाह्य बदलत असतो. समाजात जगताना, आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तात्विक आणि वैचारिक भूमिका पक्क्या करत असतो. आपण आपल्या शब्दांच्या माध्यमातून नेहमीच आमच्या मनावर अधिराज्य केले. आपल्या विचारांच्या माध्यमातून आमच्या सभोवताली वावरत आलात. आज भले आपण आमच्या सोबत देह रूपानं नसलात तरी तुमचं अस्तित्व पावलोपावली जाणवत राहतं...!!!
          अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला माझ्या नावाचा खूपच अभिमान वाटतो... आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन...!!!    कारण तुमचं पाळण्यातले नाव गजानन असल्याची माहिती मला मिळाली आहे. माझंही नाव तेच असल्यामुळे नाही म्हणायला, माझी कॉलर उगाचच टाईट होत असते. म्हणजे हा मानवी स्वभावच म्हणा ना... माणूस आपले श्रद्धास्थान असलेल्या कोणत्याही गोष्टीत, काहीतरी साम्य शोधत असतो. ही गोष्ट मी माझ्या मित्रांना सांगितली. तेव्हा ते माझ्यावर हसले होते. पण.... मी फारसं मनावर घेतलं नाही. कारण आपलं मूळ नाव 'गजानन' असून दत्तक गेल्यानंतर आपलं नाव बदलण्यात आलं याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे.
  काही माणसं कलाकार म्हणून, लेखक म्हणून, कवी म्हणून खूप मोठी असतात. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कुठे ना कुठे माणूसपण सोडलेलं असतं.... बऱ्याच ठिकाणी ही विरोधाभासी परिस्थिती मी पाहिली आहे. तुम्ही तुमच्या जन्मदिना दिवशी आदिवासी पाड्यांवर जाऊन केलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती, मी बऱ्याच वर्तमानपत्रातून वाचली आहे. गोदा तटावर थंडीने कुडकुडणाऱ्या गरीब निराधार माणसांच्या अंगावर आपण पांघरूण घालायचात...!!! नेमके इथेच तुमच्या माणूसपणाची सीमारेषा ओलांडून तुम्ही माझ्या नजरेत दैवत बनलात. जेव्हा जेव्हा तुमचे विचार मनात येतात. तेव्हा खरंच काय रसायनाने आपण बनला असाल ? असा प्रश्न मनात येतो. मात्र, "सगळ्याच गोष्टी प्रत्येकाच्या आवाक्यात येत नसतात", हा सिद्धांत मला माहित आहे. म्हणूनच, आपल्या बद्दलची माहिती एखाद्या टिप कागदाप्रमाणे टिपून मनात साठवीत असतो. तुमच्याबद्दल काय काय आणि किती किती लिहू....?  एका एका विषयावर लिहायचं झालं, तर दिवसच्या दिवस आणि महिनेच्या महिने निघून जातील. परंतु जन्म घेतलेल्या.... या नश्वर नरदेहाच्या काही गरजा आहेत. म्हणून काही काळ उसंत घ्यावी लागते. "काळ अनंत असला तरी माणसाला कुठेतरी थांबावं लागतं...!!!" हे मला पटलेलं आहे. अगदी म्हणूनच आजच्या पुरतं आवरतं घेतोय.  मी या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलो. ज्या मराठी मातीतला आपण "कोहिनूर" आहात. माझ्यासारख्या नवशिक्या मंडळींचे "ज्ञानपीठ" आहात. एवढेच मनापासून सांगून अत्यंत नम्रतेने नमस्कार करतो...!!!
  धन्यवाद.... हा शब्द वापरून फिटण्यासारखे आपले ऋण नाहीतच...!!!  ते फार अमूल्य आहेत...!!!

                         आपलाच
                     गजानन तुपे
                         96992 46358
                  फोर्ट मुंबई

(स्पष्टीकरण =  वि. वा. शिरवाडकर यांचे मूळ पाळण्यातले नाव गजानन होते. त्यांना दत्तक दिल्यानंतर त्यांचे नाव "विष्णू" असे ठेवण्यात आले.)
यामागील मूळ गोष्ट अशी आहे की कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे आहे मात्र चूलत्यांच्या घरात त्यांना दत्तक दिल्यामुळे... त्यावेळी त्यांचे नवीन नामकरण झाले तेव्हा ते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा. शिरवाडकर झाले...!!!

????????????????????????????????????????????????????????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू