पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवण- आगळ्या वेगळ्या होळीची

" आठवण - आगळ्या वेगळ्या होळीची "

----‐---------------------------------------------------- 


मी पाचवीच्या वर्गात शिकत होतो तेंव्हाची गोष्ट. महाशिवरात्र होऊन गेली की, लोकांनी जमा करुन ठेवलेल्या गोव-या, लाकडं यांच्या चो-या व्हायला सुरुवात व्हायची आणि सगळ्यांना कळायचे की होळीचा सण जवळ आला आहे म्हणून. 

बरे, चोरी कुणी केली असेल याची कल्पना असूनही लोक तक्रार वगैरे काही करत नसत कारण घरातल्या लग्नप्रसंगी आणि प्रत्येक अडी- अडचणीच्या वेळी गल्लीतली हीच मंडळी अगदी कंबर मोडेपर्यंत काम करायला हजर असायची. 

दहा-बारा दिवस होळीसाठी लागणा-या  साहित्याची अशी जमवाजमव केल्यावर होळीच्या दिवशी गल्लीच्या कोप-या कोप-यावर, चौका चौकात झाडझूड करणे, साफसफाई करणे, पाण्याचा सडा टाकणे अशा कामांना सुरुवात होत असे. चौकात रस्त्याच्या मध्यभागी एरंडाचे एक झाड रोवून त्याभोवती गोव-या, लाकडे व्यवस्थित रचून झाल्यावर " होळी रे होळी, पुरणाची पोळी " सारख्या पारंपरिक आरोळ्या मारुन गल्लीतल्या मुख्य किंवा जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते होळी पेटवली जायची. रात्री उशीरापर्यंत होळीची राखण करुन झाल्यानंतरच ही मंडळी आपआपल्या घरी परतत असत.

पौर्णिमेच्या दिवशी पेटवलेली ही होळी रंगपंचमी पर्यंत पेटती राहील याची काळजी सगळेच अगदी मनापासून घेत असत. पौर्णिमेच्या दुस-या दिवशी सकाळी या धगीत आंघोळीसाठी पाणी तापवले जायचे आणि या पाण्याने घरातल्या लहान बाळाला आंघोळ घातली जायची. अशी आंघोळ घातल्यावर बाळाला पुढे येणा-या उन्हाळ्याचा त्रास होत नाही असे कारण  सांगितले जायचे. 

चार-पाच दिवस अशाप्रकारचे कार्यक्रम पार पाडल्यानंतर यायचा तो सगळ्यांचा आवडता असा "रंगपंचमी" चा सण. अगदी सकाळपासुनच सगळे विविध रंगात रंगून जात. एकमेकांना गुलाल लावणे, रंगाने तसेच थंडगार पाण्याने भिजवणे, लपून बसलेल्यांना बळजबरी घराबाहेर काढणे व त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये सामील करुन घेणे, मनसोक्त आरडाओरडा, धिंगाणा आदि प्रकार अगदी बिनधास्तपणे चालायचे.

पण माझ्या लक्षात राहिली ती मात्र एक अनोखी, आगळी वेगळी अशी होळी. संपूर्ण गावात असा जल्लोष, धिंगाणा आणि अर्वाच्यपणा चालू असतांनाच गावातील काही ठराविक गल्ल्यांमध्ये एका विशिष्ठ समाजाचे लोक (बहुतेक राजस्थानी गवळी समाज ) अतिशय शिस्तबध्द आणि शांतपणे होळी व रंगपंचमी खेळत होते. त्यांच्या समाजाचे सगळेच लोक एक गट बनवून समाजातील प्रत्येक सभासदाच्या घरी जात होते. घराबाहेर किंवा वाड्याबाहेर अंगणात मोठ्ठी सतरंजी टाकलेली असायची. सर्व जण आल्यावर घरमालक त्यांचे दाराबाहेर उभे राहून, हात जोडून स्वागत करायचा व सर्वांना सतरंजीवर बसण्याची विनंती करत होता. सर्व जण बसल्यानंतर यजमान त्यांच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकत होता, गुलाब पाणी शिंपडत होता आणि प्रत्येकाच्या हाताला अत्तर लावून नमस्कार करतांना दिसत होता. सर्वात शेवटी आलेल्या पाहुण्यांना सरबत किंवा एखादे थंड पेय दिले जात होते. पेयपानाचा असा कार्यक्रम झाल्यावर सर्व जण त्या यजमानाचे आभार व्यक्त करुन पुढच्या घराकडे निघायचे. 

कुठलीही गडबड, गोंधळ, आरडाओरड न करता साजरी केलेली अशी ही होळी व रंगपंचमी नक्कीच आगळी वेगळी होती आणि म्हणूनच ती आजही मला अगदी स्पष्टपणे आठवते आहे. 



दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात)

मोबाईल  : 9723717047.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू