पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पान्हा

 

रात्र भर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता, अख्खी रात्र तिनें जागून काढली होती, रडून रडून तिचे डोळे सुजले होतें. वेदनेने सर्व अंग ठणकत होतें, कपडे देखील

खराब झाले होतें

महिला पोलीस कस्टडीत रात्रभर तिला एक अनामिक

भीती वाटत होती. तशी एक लेडी कॉन्स्टेबल तिच्या सोबत स्टूल वर बसून होती व सारखा प्रश्नांचा भडीमार

करत होती, अधून मधून हातातल्या दांडूकाने ढोसत होती.

तिचे ओठ मात्र घट्ट बंद होतें जणू कोणी त्यांना शिवण घातली होती, डोळ्यातून सतत अश्रु धारा वाहत होत्या.

प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तिच्या कडे "नाही " हेच होतें.

मोठ्या प्रयासाने आपले अश्रु थोपवत ती मानेनंच नकार देत होती

काहीं वेळाने सकाळ झाल्याची चाहूल तावदानातून येणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या तिरिपाने लागली.

बादलीतल्या पाण्याने तिनें चूळ भरली व चेहऱ्यावर थंड पाण्याचे थपके मारले. त्यानेच तिच्या अंगावर शिरशिरी आली

एवढ्यात लोखंडाचे मॊठे दार उघडण्याच्या आवाजा बरोबरच खाड.. खाड.. बुटांचा आवाज जवळ येऊ लागला. बहुतेक दुसरी पोलीस कॉन्स्टेबल येत असावी.

ती थोडी सावरून बसली.

दुसऱ्याच क्षणी ती लेडी पोलीस आत आली.

" काहीं बोलली का?? तिनें विचारणा केली.

" नाही मॅडम, खूप प्रयत्न केलें पण तोंडच उघडत नाहीये, फक्त डोळ्यातून आसवांचा पूर वाहतोय."

असू दे!आता रुग्णालयात चिकित्सकीय परीक्षण झाल्यावर आपसूकच आपल्याला दोन दिवसा पासून पडलेले कोडे उमगेल!

"बघू या " असे म्हणत ती निघून गेली, बहुदा तिची ड्युटी संपली असावी.

पोलिसाच्या गाडीत चढताना तिचा पाय अडकला, महिला पोलिसाने हातातील दांडूकानेच तिला सावरले पण तोंडाने एक शिवी हासडली.

एक वळण घेऊन गाडी रुग्णालयाच्या आवारात शिरली,

तेच रुग्णालय, तोच औषधांचा उग्र वास!! एक क्षण तिला घेरी आली पण तिनें स्वतःला सावरले.

पोलिसांच्या मागे रखडत ती लेडी डॉक्टर च्या रिसेप्शन रूम मध्ये येऊन बसली

तेवढ्या श्रमानेच तिला ग्लानी आली होती, बहुतेक अंगात

ज्वर चढला असावा. ती तेथेच भिंतीला टेकून बसली, डॉक्टर ची वाट बघत!!

डॉक्टर कोठल्या तरी अवघडलेल्या बाळंतिणीची सुटका करण्यात व्यस्त होत्या.

"अवघड प्रसूती " "त्या " नुसत्या आठवणीने देखील तिच्या शरीरात वेदनेची चमक निघाली.

थोड्याच वेळात कपाळावरचा घाम पुसत, हसऱ्या, सतेज

चेहऱ्याने डॉक्टर ऑपरेशन थियेटर मधून बाहेर आल्या.

"नमस्ते मॅडम "त्यांना पाहताच महिला कॉन्स्टेबल नें त्यांना सॅल्यूट मारला व डॉक्टरच्या मागोमाग त्यांच्या कक्षात प्रवेश केला.

"डॉक्टर आम्हाला काल रात्री एक नवजात बाळ कचऱ्याच्या डब्यात मिळाले बहुतेक कोणी अगतिक मातेने जन्म देऊन टाकून दिलें असावे. आम्हाला या तरुणीचा संशय आहें, त्या साठीच तिला अटक करून डॉक्टरी परीक्षण करण्या साठी आणले आहें "

डॉक्टरनें घंटी वाजवून तिला आत बोलावून घेतले व

पोलिसांना बाहेर जाण्याची खूण केली.

ती थरथरतच डॉक्टर समोर उभी राहिली, तेवढ्यात आया बाई तिचे आंतरिक परीक्षण करण्या साठी ट्रे घेऊन आत आली.

अरे.. देवा..पुन्हा आंतरिक परीक्षण? तिच्या पोटात भीतीने गोळा उठला. त्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले असावे, डॉक्टर एक टक तिच्या हालचाली निरखत होत्या.त्यांनी खुणेनेच आया बाईला बाहेर पाठवले व तिच्या जवळ येत तिच्या पाठीवर हात ठेवला.

" मला खरं सांग, तू परवा रात्री रुग्णालयात आली होतीस ना? "

आपले ओठ गच्च दाबत, डोळ्यातल्या अश्रूना थोपवत तिनें नकारार्थी मान हलवली.

"नक्की??"

नाही " पहिल्यांदा तिनें तोंड उघडले.

"मनू बाई " त्यांनी हाक मारली, त्या बरोबर आयाबाई दार

उघडत आत आली. त्या दोघींची काहीतरी नेत्र पल्लवी झाली व आया बाई परत गेली व दुसऱ्याच क्षणी ती परत आत आली, तिच्या हातात गुलाबी दुपट्यात लपेटलेले एक नवजात बाळ होतें

लुसलुशीत मऊ कांती, गोरेपान गुटगुटीत, काळेभोर दाट

जावळ, गुलाबाच्या पाकळ्या प्रमाणे लाल चुटुक ओठ, इवले इवले डोळे किंचित उघडून तें चहू कडे बघत होतें, मध्येच भूक लागल्याने आपल्या मुठी चोखत होतें.

ती अगदी भारावून प्रेमाने एक टक त्याच्या कडे बघत होती, नकळतच तिचे दोन्ही हात पुढें झाले, डॉक्टरनें काहीं न बोलता बाळ तिच्या हातात दिलें.

त्याला हृदयाशी घट्ट धरत ती पटापट त्याचे मुके घेऊ लागली, तेवढ्यात तिच्या छातीत काहीं कालवाकालव

झाली आणि....... तिच्या डोळ्यातल्या अश्रु पेक्ष्या दुप्पट

वेगाने तिला पान्हा फुटला, तिनें पटकन त्याला पदरा खाली घेतलें.

बाहेरचा पाऊस आता थांबला होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूना ती मोकळीक करून देत होती,

तिच्या चेहऱ्यावर मातृत्व तृप्ततेचे वेगळेच समाधान झळकत होतें.

डॉक्टर, पोलीस सर्व जण अनिमिष नेत्राने हा सोहळा

बघत होत्या.

डॉक्टर ला तिचे आंतरिक परीक्षण न करताच निदान झाले होतें, पोलिसांना दोन दिवसा पासून पडलेले कोडे सुटले होतें.

काहीं वेळाने कलियुगातील कृष्ण आपल्या देवकी बरोबर तुरुंग वासात जात होता.!!

 

डॉ विद्या वेल्हाणकर

अंधेरी, मुंबई 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू