पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अंताची सुरुवात

"मारा, मारा" अश्या युद्धगर्जना माझ्या कानावर पडत होत्या. मी माझ्या सैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी ओरडलो,  "तुम्हाला लढायचे आहे आणि लढत राहा, पूर्ण ताकदीनिशी लढा. एकही शत्रू वाचला नाही पाहिजे. तुम्ही आज दिलेले बलिदान तुमच्या पुढच्या पिढीला कामाला येईल."



थोड्या वेळा नंतर सैनिकांनी माझ्या समोर बघितले आणि ते थांबले. मी त्यांच्या भावना समजू शकत होतो. मी पुन्हा ओरडलो, "तुम्ही घाबरू नका ! लढत रहा, माझ्या वाढत्या तापमानाची चिंता नको. माझी सहनशक्ती खूप आहे. शीतलहरी जरी माझ्या अंगावर शहारे आणीत असतील तरी तुम्ही भिऊ नका. मी उष्मावर्धक वस्त्र घालीन पण तुम्ही लढत राहा."



मी या युद्धात माझ्या मदतीसाठी तत्पर असलेल्या परिवारा समोर बघितले आणि म्हणालो, "काळजी नसावी, मी सक्षम आहे हे युद्ध लढण्यासाठी."



आधी विचार केला होता कि हे युद्ध संध्याकाळी च सुरु होईल पण त्या वेळेस असे झाले नाही म्हणून मी थोडा निराश झालो होतो. माझे सैनिक पळपुटे नाही, मग असे का व्हावे. पण शेवटी युद्ध अर्ध्यारात्री सुरु झाले.



युद्ध सुरूच होते, माझे तापमान वाढले होते. शेवटी मी सैनिकांना युद्ध थांबवायला सांगितले. माझे सैनिक जिंकले होते. मी उष्माशामक औषधी घेतली व त्यांना म्हणालो, "सैनिकांनो, तुम्ही ज्यांच्याशी युद्ध लढलात ते खरे शत्रू नव्हते, ते शत्रूंची प्रतिकृती होते.  तुमचे युद्धकौशल्य बघून मी आनंदित झालो आहे. तुमचा आणखी एक असा सराव काही काळा नंतर होईल. आता मला वाटते कि खरा शत्रू येईल त्याचाशी तुम्ही लढू शकाल. त्या शत्रूने माझ्या बऱ्याच स्वजनांचा बळी घेतला आहे. त्याला हरवणे हाच माझा उद्देश."



त्या नंतर मी निद्राधीन झालो. सकाळी माझ्या भ्रमणध्वनी यंत्रात होत असलेल्या घंटानादा मुळे जाग आली. मी खिडकीतून अवकाशा कडे वाटचाल करीत असलेल्या आदित्या कडे बघितले व त्याला नमन केले. कालच्या उदास संध्याकाळ व आनंदी सकाळ मध्ये भरपूर काही घडले होते ज्याच्यामुळे जग बदलणार होते. त्याच्या अंताची हि सुरुवात होती. 



समाप्त 



(कोरोनाची लस घेतल्या नंतर थंडी वाजून आलेल्या तापाची हि अशी कथा)     




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू