पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपलं घर

- आपलं घर -

शशीताई नुकत्याच अमेरिकेहून परत आल्या होत्या ,म्हणून सार्या मैत्रिणी त्यांच्याकडे जमल्या होत्या .सगळ्यांच सत्तरीच्या जवळपास वयाच्या होत्या .सगळ्यांच्या मुलामुलींची लग्नं झाली होती .सगळ्या आज्या झाल्या होत्या .काॅफी घेता घेता छान गप्पांची मैफील रंगली होती .सगळ्यांनी शशीताईंना विचारले , "काय कशी झाली अमेरिकेची ट्रिप ? मुलगा - सून आणि नातवंड कशी आहेत ?" शशीताई म्हणाल्या , "ट्रिप छान झाली .मुलगा - सून ,नातवंड सारेच मजेत आहेत . त्यांनी खूप फिरवलं मला . मला सारख ' रहा रहा 'म्हणत होते पण खरं सांगू ?सारं जग फिरलं ना तरी आपलं घर ते आपलं घर असतं .आपल्या घरात मनाला जी शांती - समाधान
मिळते ना ती कुठेच मिळत नाही .ते सारे खूप प्रेम करतात .काही कमी नसतं गं .पण शेवटी आपलं घर ते आपलं घर ! "
लगेच संध्याताई म्हणाल्या , " हे मात्र खरं हं शशीताई , आम्ही मुलीच्या आग्रहामुळे बंगलोरला तिच्याकडे महिनाभर रहायचे म्हणून गेलो . पण आठ दिवस होत नाही तोवर ,ह्यांचे एखाद्या लहान मुला सारखे ," बस झालं ,चल आता आपल्या घरी "असं सारखं टुमणं सुरू केलं.पण मुलगी - जावयाला वाईट वाटू नये ,नातवंडांचा हिरमोड होऊ नये म्हणून कसेबसे १५ दिवस राहिलो.सगळ्यांनी रहाण्याचा खूप आग्रह केला.जावई व मुलगी म्हणाले ,"तिकडे घरी तुमची कोण वाट पहात आहे ? या वयात एकटे राहू नका .आता येथेच रहा ." पण आम्ही म्हटलं , "अहो हातपाय धड आहे तोवर आमचं आम्हाला राहू दे .गरज असेल तेंव्हा बोलवा ,आम्ही नक्की येऊ .
आम्हालाही तुमच्या शिवाय कोण आहे ?" असे म्हणून त्यांचा निरोप घेतला .
कुसूमताई लगेच म्हणाल्या ,"होना आपण मुलींना मुलांच्या बरोबरीने वाढविलेले असते .तिच्या लग्नानंतर तिच्या सासरची माणसं कितीही चांगली असली,तरी का कोणास ठाऊक आपल्या पिढीतल्यांना मुलीकडे चार दिवसापलीकडे रहाणे म्हणजे अवघडल्या सारखे होते हे मात्र खरे ."
रेखाताई ... "ते काही नाही काळानुसार ,गरजेनुसार आपले विचार बदलायलाच हवे ." पुढे बर्याच वेळ या विषयावर चर्चा चालू होती .
शेवटी सगळ्यांच्या चर्चेतून एकच निष्कर्ष निघाला तो म्हणजे मुलगा असो वा मुलगी ,कोणाहीकडे गेले आणि ते आपले असले तरी शेवटी आपल्या घरीच यावेसे वाटते.जे पहिल्यापासून मुलगा - सून किंवा मुलगी - जावई यांच्या जवळ रहात असतील त्यांना तेच आपलं घर वाटत असत हे मात्र खरे.( बर्याच वेळा मुलंच त्यांच्या घरात रहात असल्यामुळे ,तो प्रश्ण नसतो .)
मुलीचे लग्न होत नाही तोवर आई - वडिलांचे घर तेच तिला 'आपलं घर' वाटत असते .लग्नानंतरही काही वर्ष तिला माहेरचे घर आपलं वाटत असते.पण नंतर हळूहळू ती सासरी रमते आणि तिला सासरचं घर 'आपलं घर 'वाटू लागते .
सुरवातीच्या काळात भाड्याचे घरही आपलं वाटत असतं.कारण ते घर भाड्याचे असले तरी तिने त्या घरात आपला संसार मांडलेला असतो .पण नंतर मात्र तिला आपले स्वत:च्या मालकीचे 'आपलं घर ' असावं असं तिला वाटू लागते . नंतर जेंव्हा ती भाड्याच्या घरातून स्वत:च्या मालकीच्या घरात येते ,तेंव्हा तिला 'आपलं घर' गवसल्याचा आनंद होतो. मोठ्या कष्टाने हे 'आपलं घर' घेतलेलं असतं .नवर्याच्या खांद्याला खांदा लावून , नोकरी करून ह्या घरासाठी पैसे गोळा केलेले असतात तिने . एखादी स्त्री नोकरी करत नसली तरी तिने नवर्याच्या पगारातून कटकसर करून घरासाठी पैसे साठवायला मदत केलेली असते .त्यामुळे तिला ते घर 'आपलं घर ' वाटत असते .या घरातील माणसांना ती जिवापलीकडे जपत असते .आपलं हे घर विखरू नये म्हणून जीवाचं रान करीत असते .
नवरा - बायकोचे छान जमत असते तोवर घर दोघांचे असते .त्यांची भांडणं पेल्यातील वादळ असते तोवर ठिक असते .पण ते वादळ वाढले की मात्र पुरुषी इगो जागा होतो ." हे घर माझं आहे .तू चालती हो या घरातून "असं जेंव्हा नवरा म्हणतो तेंव्हा तिच्या पाया खालची जमीन हादरते .तिच्या मनात येते ,'अरे ,ह्या घरासाठी इतके दिवस मी काहीच केले नाही का ? हे घर उभे करण्यात माझे काहीच योगदान नाही का ? इतके दिवस हे घर माझे नव्हते का ?" त्या घरासाठी तिने तन - मन - धन सारे ओतलेले असते तरी नवर्याला असा प्रश्न का पडतो की या घरासाठी 'बायको कुठे काय करते ?जे करायचे ते मीच करतो " आणि जेंव्हा तो तिला हाताला धरून घराबाहेर काढतो ,तेंव्हा किती स्त्रिया स्वत:ला सावरू शकत असतील ? म्हणूनच हल्ली मुलीला पायावर उभ केल्या शिवाय पालक तिचे लग्न करीत नाहीत .त्यामुळे वेळप्रसंगी ती स्वत:ला सावरून,खंबीरपणे , न थांबता पुढची वाटचाल करू शकते .तिच्यात आत्मविश्वास निर्माण झालेला असतो .त्याच आत्मविश्वासाने ती पुन्हा 'आपलं घर 'उभ करते .
खरच ,विसाव्यासाठी 'आपलं घर ' हवेच .वृध्दाश्रमात राहणार्यांना वृध्दाश्रम 'आपलं घर ' नक्कीच वाटत नाही .पण नाईलाजाने त्यांना वृध्दाश्रमला 'आपलं घर ' म्हणावेच लागते .
अनाथालयातील मुलांना तरी ते अनाथालय ' आपलं घर ' वाटतं का ? नक्कीच नसेल वाटत .म्हणूनच ते तेथून बाहेर पडण्याची वाट पहात असतात.बाहेरचं मोकळं आकाश त्यांना खुणवत असतं .जेंव्हा ती मुलं अनाथालयातून बाहेर पडतात ,तेंव्हा वणवण फिरल्यानंतर विसाव्यासाठी तेही 'आपलं घर 'शोधू लागतात .मग ती पत्र्याची किंवा ताडपत्र्याची झोपडी असो , वा दगडविटांनी बांधलेले छान घर असो ,त्यांना 'आपलं घर ' हवं असतं हेच खरं .त्यासाठी ते जीवाचं रान करीत असतात .
सगळ्यांचेच आपल्या सुंदर घराचे एक स्वप्न असते .त्या घराला ....
आपल्या माणसांच्या विश्वासाची ,प्रेमाची उब देणार्या भिंती !
परमेश्वराच्या कृपेचे छत !
आणि खंबीरपणे उभे राहण्याचे बळ देणारी , आत्मविश्वास देणारी जमीन ! ... हवी .
असं घर असलं की ,शेवटपर्यंत ते ' आपलं घर ' असतं .
असे हे 'आपलं घर ' सर्वांना लाभो !


- स्मिता भलमे -
9421058149

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू