पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोड तू अबोला सये

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला 

कशाला ग करायच्या डोळी कडा ओल्या 

काही शब्द मागे घे तू , काही मागे मी घेतो 

देव असा परत जन्म थोडाच तुला-मला देतो ?

चल ग  परत पेटवूया सुखाचा हा चुल्हा  

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला 


सुख दुःखे अशीच गडे येत राहणार आयुष्यात 

वादळापुढे कुठे झुकते झाडाची ती  कोवळी पात?

तुझ्या माझ्या प्रवासाची आता आहे एकच वाट 

एकाच डोळ्याने पाहूया ,रोज नवीन सुंदर पहाट  

पुसून टाकू झालेल्या कडा ओल्या ओल्या 

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला


आठव ती सप्तपदी ,आठव  तो अंतरपाठ 

एकमेका हात धरून घेतले होते फेरे सात 

एक पाऊल पुढे घे तू , एक पाऊल मी घेतो 

परत हात तोच सये तुझ्या हाती माझा देतो 

चल ग परत झुलवूया हा स्वप्नांचा तो झुला 

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला 


जरी नाही बोललो तरी माहीत आहे मजला 

जेवढे प्रेम माझ्या उरी ,तेवढेच आहे तुजला 

बोलून सगळे मिटेल नी  बोलून सगळे सुटेल ग 

बोललोच नाही तर सये सगळे काही तुटेल ग 

कुढत राहून मिळणार नाही काहीच तुला मला   

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला 


सुन्न झाले आहे घर, सुन्न  झाल्या आहेत भिंती 

नको रे वेड्या मनाची नको वेडी अशी भ्रमंती   

जुने-पाने सोडून देऊ , नवीन जगणे जगूयात 

परत सये आकाशात , शुभ्र चांदणे मागुयात

हे सोडवाया नाही येणार  देव आणि मौला 

सोड तू अबोला सये , सॊडतो मी अबोला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू