पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावणबाळ

*श्रावणबाळ* 

 

नेहमीप्रमाणेच आपल्या सोनेरी कुरळ्या केसांची झुलप उडवत पंधरा वर्षांचा अमर बाजारातून रमत गमत चालला होता. तस त्याच गावं फारस मोठ नव्हत. पण गावची बाजारपेठ मात्र पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बाजारपेठेत सगळ्या प्रकारच्या वस्तूंनी गजबजलेली दुकाने होती. संध्याकाळी खेळून झाले कि घरी जाताना या दुकानातील वस्तू न्याहाळत बाजारपेठेतून रमतगमत घरी जाणे हा अमरचा आवडता छंद होता. 

चालता चालता तो सायकलच्या एका दुकानाजवळ आला, दुकानाच्या भव्य शोरूम मधील त्या सायकलवर त्याची नजर खिळून राहिली. त्याच्या मनात ती आकर्षक सायकल खरेदी करण्याची अनिवार उर्मी उसळली.

      झपाटल्यासारखा तो काचेचे प्रवेशद्वार उघडून आत शिरला आणि काऊंटरवरील

मालकाला त्याने त्या सायकलची किंमत विचारली. पण दुकान मालकाने सांगितलेली किंमत रुपये सहा हजार त्याच्या दृष्टीने अवाढव्य आणि त्याच्या खिशाला न परवडणारी होती.

    त्याने भीत भीतच दुकानदाराला विचारले "काका प्लीज ही सायकल तुम्ही माझ्यासाठी गणपतीच्या पहिल्या दिवसांपर्यंत ठेवू शकाल का?" 

गणेश चतुर्थी ला अद्याप एक महिना तरी अवकाश होता. काका म्हणाले " अरे बाळा अस कस सांगता येईल?" अमरचा चेहरा खर्रकन उतरला. त्याच्या भावस्पर्शी टपोऱ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. दुकानदार बिचारा चांगला माणूस होता. त्याला अमरचा चेहरा पाहून वाईट वाटले. फक्त अमरला बर वाटाव म्हणून अमरच्या केसावरून हात फिरवत तो म्हणाला " बेटा मला  नाही वाटत या महागड्या सायकलसाठी निदान गणपती पर्यंत तरी आपल्या गावात कोणी गिर्‍हाईक येईल म्हणून, तुझ नशीब चांगल असेल तर ती सायकल राहील तो पर्यंत."

   " तस असेल तर काका मी ती नक्कीच विकत घेईन." डोळ्यातले अश्रू पुसत अमरने उत्तर दिले . त्याच्या बोलण्यातून  एक वेगळाच निर्धार व्यक्त होत होता. दुकानदार काकांचे आभार मानून अमर दुकानाच्या बाहेर पडला. 

     अमरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्याचे बाबा हयात असताना गावातील छोट्याश्या गॅरेज मध्ये मॅकॅनिकचे काम करायचे. पण दोन वर्षांपूर्वीच त्यांचे आजारपणात निधन झाले होते. त्यांची होती नव्हती तेवढी तूटपूंजी शिल्लक त्यांच्या आजारपणात संपून गेली होती. 

    त्यांच्या पश्चात अमरची दहावी पर्यंत शिक्षण घेतलेली आई गावातील पतपेढीच्या दैनंदिन ठेवी गोळा करण्याचे काम करुन मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून अमर आणि त्याच्या दहा वर्षांच्या धाकट्या बहिणीचे पोट भरत होती. अमरच्या गावासह आजूबाजूच्या पाच सहा किलोमीटर परिसरातील दुकानातून पायपीट करत वणवण फिरल्यानंतर तिला महिन्याला जेमतेम सहासात हजार रुपये मिळायचे. त्यातूनच तिन माणसांचा संसार चालवताना तिचा जीव मेटाकुटीला येत असे. तिच्याकडे पैसे मागून अमर तिला त्रास देणार नव्हता. 

    आईच्या दिवसभर चालून दमलेल्या पायांना रात्री तेल लावताना त्याला विलक्षण आनंद मिळायचा. आई त्याला कौतुकाने 'श्रावण बाळ' म्हणायची. थकलेली आई तो पायाला तेल लावतानाच झोपून जायची. त्याची पिटूकली बहिण तिच्या कुशीत कधीच झोपून गेलेली असायची. अमर दोघींच्या अंगावर पांघरूण घालायचा आणि नंतर रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करायचा. प्रचंड हुशार असलेल्या अमरचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न होते. त्याचा शाळेतला पहिला नंबर आजवर चुकला नव्हता. 

       विचारांच्या तंद्रीतच अमर घरात शिरला. तेव्हा दिवेलागण झालेली होती अमरची आई घरी येऊन कधीच स्वयंपाकाला लागली होती. " कायरे अमर किती हा उशीर? आणि चेहरा का असा दिसतोय माझ्या श्रावणबाळाचा?" 

    अमरने न बोलताच हात पाय धूतले. देवासमोर शुभंकरोती म्हणतानाच त्याने गणपतीबाप्पांच्या फोटो कडे पाहिल आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. 

     तिथूनच तो ओरडला, " आई, आई आजपासून मी रात्री गोखले सरांच्या घरी गणिताच्या अभ्यासाला जाणार आहे. रात्री घरी यायला उशीर होईल". गोखले सर शाळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांवर जास्तीची मेहनत घेणारे कर्तव्यनिष्ठ शिक्षक होते.

त्यातच अमरचे दहावीचे वर्ष होते. त्यामुळे आईने नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. 

    अमरने रात्री जेवण आटोपल्यावर नेहमीप्रमाणे आईच्या पायाला तेल लावून दिले. आईच्या अंगावर पांघरूण घालून दरवाजा बाहेरून लाॅक करुन तो बाहेर पडला. 

     पण त्याची पावले सरांच्या घराकडे न वळता गणपतीच्या कारखान्याकडे वळली. अमरची चित्रकला छान होती. त्याला रंगांचे उत्तम ज्ञान होते. कितीतरी वेळा तो केवळ हौस म्हणून गणपतीच्या कारखान्यात जाऊन मूर्ती रंगवत बसत असे. गणपतीचा कारखानावाले पाटील काका त्याच्या मूर्ती रंगवण्याची खास करुन डोळ्यांच्या आखणीकौशल्याची विशेष प्रशंसा करत असत. 

         रात्रीच्या वेळी त्याला कारखान्यात पाहून काका प्रथम दचकले पण नंतर त्यांनी एका मूर्तीच्या रंगकाम आणि आखणीचे त्याला शंभर रुपये देण्याचे कबूल केले. 

        वेळ न गमावता अमरने हातात ब्रश घेतला आणि आपले काम सुरू केले. त्यावेळी कारखान्यातील घड्याळात रात्रीचे 10.30 वाजले होते. 12 वाजता त्याला अनावर झोप येऊ लागली. कारखान्यात बनवलेल्या कोऱ्या चहाचा घोट घेऊन तो विलक्षण निग्रहाने काम करत होता. गणपतीची संपूर्ण मूर्ती रंगवून त्याने हातातला ब्रश खाली ठेवला तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. त्याने केलेल्या विलक्षण रेखीव रंगकामावर काका खुश झाले होते. अमर अंथरुणावर पडला तेव्हा रात्रीचे सव्वातीन झाले होते. झोपेत देखील त्याच्या डोळ्यासमोर दुकानातली 'ती' सायकलच दिसत होती. 

     नंतरचा महिनाभर अमरला

 शोरूम मधल्या त्या सायकलने अक्षरशः झपाटलेच होते. तो दिवसातले जेमतेम तीन ते चार तास झोप घेत होता. त्याचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त झाले होते. पहाटे सहा वाजता उठून सर्व आटोपून आईला पुजेसाठी फुले काढून देऊन सव्वासात वाजता शाळेत जाणे. मधल्या सुट्टीत खेळण्यात वेळ न दवडता पटापट गृहपाठ करून टाकणे. साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर इकडे तिकडे न भटकता सरळ घरी येऊन नेहमीप्रमाणे आईला मदत म्हणून आईने धुवून ठेवलेले कपडे वाळत टाकणे, केर काढणे, भांडी विसळणे या सारखी छोटी मोठी कामे करुन जो काही थोडाफार होमवर्क राहिला असेल तो चुटकीसरशी करून टाकून अमर जेमतेम पंधरा वीस मिनिटे वामकुक्षी करत असे. त्याच्या स्वप्नातली ती अप्रतिम सायकल त्याला झोपून देत नव्हती. लगेचच उठून तो गणपतीच्या कारखान्यात जाऊन कामात दंग होऊन जात असे. संध्याकाळी सात वाजता तो कारखान्यातून परत घरी येत असे. येता येता त्या दुकानासमोर उभे राहून ती सायकल डोळ्यात साठवून घ्यायला तो विसरत नसे. 

   तो घरात पाय टाकतानाच आई काळजीपोटी कुरकुरत असे. " हल्ली येवढ्या उशिरापर्यंत कुठे असतोस रे?" अमर फक्त हसून वेळ मारून न्यायचा. रात्री जेवण झाल की कितीही झोप येत असली तरी सुध्दा तो कारखान्यात जायचाच. त्याचे ध्येय त्याला खुणावत होते. जागरण करून करून त्याच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झाली होती तरीदेखील त्याचे अविरत कष्ट चालूच होते. 

       गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मित्राकडे सजावट करायला जात असल्याने आज रात्री घरी येणार नाही असे त्याने आईला सांगितले. गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत जागून तो गणपती रंगवत होता. सहा वाजता त्याने हातातला ब्रश खाली ठेवला. तो विलक्षण थकला होता. त्याला आपण किती गणपती रंगवले हे देखील माहिती नव्हते. 

काकांनी पाकिट घेण्यासाठी स्नान करून सकाळी नऊ वाजता यायला सांगितले. 

       अमरने घरी जाऊन दोन तास झोप काढली. नंतर आंघोळ  करून बरोबर नऊच्या ठोक्याला तो कारखान्यात शिरला. 

काकांनी पाकिटाला कुंकू लाऊन त्याच्या हातात ठेवल. त्याने पाकीट उघडून बघितल. पाकिटात चक्क सात हजार रुपये होते. त्याने दिवसरात्र कष्ट करून बाप्पाच्या सत्तर मूर्ती रंगविल्या होत्या.

   काकांना नमस्कार करून धावतच तो त्याची आवडती सायकल आणायला निघाला. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. काल संध्याकाळ पर्यंत शोरूम मध्ये  असणारी सायकल आज तेथे नव्हती. त्याच्या काळजात धस्स झाल.. तो धावतच आत शिरला. "काका, काका ती सायकल कुठे गेली?" अमरने घायकुतीला येत काकांना विचारले.

    " अरे आत्ताच एक गिर्‍हाईकाला विकली. बरेच दिवस झाले होते ती सायकल दुकानात येऊन म्हणून त्याला १०% डिस्काउंट देखील दिले. तो बघ तो माणूस  त्या टेम्पो स्टॅण्डवर उभा आहे".

   अमरने टेम्पो स्टॅन्ड कडे पाहिले. खत्रुड चेहर्‍याची एक व्यक्ती एका हातात अमरची आवडती सायकल धरुन टेम्पो स्टॅण्डवर टेम्पोची वाट पहात उभी होती. दुसर्‍याच क्षणी अमरने त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली. 

    " काका काका प्लीज ती सायकल मला द्या ना, वाटल्यास त्याच्या बदली ह्या पाकीटातले सगळे पैसे तुम्ही घ्या. सात हजार रुपये आहेत." अमर त्याला विनवत होता.                                                   " अरे पण ती तर मी विकत घेतली आहे. तुला कशी देऊ?" 

"काका प्लीज द्या ना, आज मला त्याची खूप गरज आहे " 

" अरे पण ती तुला कशाला पाहिजे? "

"  काका त्या सायकलवर माझा जीव जडला आहे.  काका प्लीज द्या ना"

अमर आता मात्र रडकुंडीला आला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

टेम्पोची वाट पहात असणारी ती ब्यक्ति सद्गृहस्थ होती. अमरच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना वाईट वाटले. अमरची गरज त्यांना कळली असावी. त्यांनी ती वस्तू अमरला दुकानातून खरेदी केलेल्या किमतीला म्हणजे पाच हजार चारशे रूपयांना देऊन टाकली..

    अमर प्रचंड खुश झाला होता. त्याला त्याची स्वप्नातली वस्तू मिळाली होती. शिवाय एक हजार सहाशे रुपये शिल्लक होते. त्याने त्यातुन देवासमोर ठेवायला शंभर रुपयांचे पेढे घेतले आणि अजून दोन तीन वस्तू खरेदी केल्या.

    नंतर तो अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने सुसाट घरी आला.

 " आई आई आई आई बघ मी  काय आणलय? आई लवकर बाहेर ये अंगणात." अमरचा आरडाओरडा ऐकून प्राजक्ता वहिनी म्हणजे अमरची आई जरा घाबरूनच बाहेर आल्या .

    अमरच्या हातातील सायकल पाहून त्यांना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत.

  गणेश चतुर्थीला म्हणजेच त्यांच्या वाढदिवसाला यापेक्षा मौल्यवान भेट त्यांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती.

अंगणात गुलाबी रंगाची अत्यंत सुंदर लेडीज सायकल हातात धरून अमर उभा होता. बँकेच्या कामासाठी वणवण पायपीट करून आईचे पाय दुखतात म्हणून त्याने त्यांच्यासाठी सायकल आणली होती. त्याच्या दुसर्‍या हातात त्यांच्यासाठी आणि छोट्या बहिणीसाठी आणलेला रेनकोट होता. यापुढे त्यांना पावसात भिजून घरी येण्याची वेळ येणार नव्हती.

  पंधरा वर्षांच्या अमरच्या ओठांवर घरातील कर्त्या पुरुषाचे हसू होते तर डोळ्यात आई विषयीची अपार माया.

     विलक्षण आवेगाने प्राजक्तावहिनी अमरकडे धावल्या. हुंदके देत त्यांनी अमरला जवळ घेतले.

  अमरच्या डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळांचे रहस्य त्यांना उलगडले होते. विलक्षण ममतेने त्या त्यांच्या दमलेल्या श्रावणबाळाला थोपटत होत्या. त्यांचा श्रावणबाळ आता मोठा झाला होता.

 

  ✒️ © नितीन मनोहर प्रधान

                  रोहा रायगड

                  9850424531

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू