पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बकुळी



"आजी, आत येऊ का?", एक गोड आवाज आला.

 

साधारण सत्तरीच्या वयाच्या त्या आजी स्वयंपाकघरातून पदराला हात पुसत बाहेर आल्या.

 

"कोण आहे?"

 

"अहो आज्जी मी आलेय, राधा! "

 

"अगं बाई, राधे, ये की गं! विचारतेस कसली? ये ये आत ये"

 

शाळेत जाणारी, दोन वेण्या करकचून बांधलेली, मध्यम उंचीची, गोड स्वभावाची, राधा गडबडीत आत शिरली.

 

"अररर! विसरलेच मी. थांबा हा आज्जी, हात पाय धुवून येते"

 

"हा हा ये हो हात पाय धुवून!"

 

(घरात प्रवेश करताच)

 

"कसला तरी भारी वास येतोय आजी"

 

"होय? मला नाही बुवा येत"

 

"असं कसं? गम्मत करताय ना माझी?"

 

"अगं तसं नाही, खरंच कळत नाहीये मला"

 

"हा वास खाण्या पिण्याचा नाहीये एवढं मात्र खरं"

 

"बघ...आत्ता तेच म्हणणार होते की पडलेल्या चार कैऱ्या मिळालेल्या....त्यांचं लोणचं घालत होते, तेव्हा फोडणी करून ठेवली, त्याचा येतोय की काय वास? पण आता ते ही नाही म्हणतेस"

 

"होय हो आज्जी, तो वास तर ओळखीचा आहे. हा वास जो येतोय ना तो वेगळाच आहे अगदी. खाद्यपदार्थांचा नाही,पण सुवास आहे एवढं खरं"

 

".....अं.... आता लक्षात आलं"

 

"काय ते? कसला वास आहे हा?"

 

"असं सांगत नाही, चल दाखवते"

 

मालती आजी राधा ला घेऊन समोरच्या अंगणात आल्या.किती तरी वर्षांनी असा देखावा पाहायला मिळाल्याने राधा अगदी सगळं निरखून पाहत होती. हल्लीच वडिलांची बदली झाल्यानंतर राधा आणि तिचं कुटुंब या गावात राहायला आलेलं. गेल्या काही दिवसातच राधा आणि मालती आजींची अगदी गट्टी जमली होती. जन्म च शहरात झाल्यामुळे आता गावाकडच्या अनेक नवीन नवीन गोष्टींशी राधाचा परिचय होऊ लागला होता. आजींच्या दारासमोर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं होती. राधा अगदी सगळं कौतुकाने पाहत होती. आजी-आजोबांची मेहनत अगदी बहरलेली दिसत होती.

 

"आजी, अहो आता तर अगदी घमघमाट सुटलेला आहे; सांगून टाका बरं कसला वास आहे? माझी खात्री आहे कोणत्या तरी फुलांचाच सुवास आहे हा"

 

"अगदी बरोबर. हे झाड बघ"

 

"अय्या, ही फुलं तर अगदी नाजूक आणि छान दिसतायत. नुसता सडा पडलेला आहे. कसली फुलं आहेत ही?"

 

"बकुळीचं झाड आहे हे! गेले कित्येक वर्षे असंच बहरतं. एवढंस फुल आहे पण सुगंध मात्र आगळावेगळाच!तुमच्या त्या अत्तरांपेक्षा हा खरा सुगंध घेऊन पाहा, कायम स्मरणात राहील असा सुगंध आहे"

 

" अगदी खरं हो आजी!मला तर आत्तापर्यंत कृत्रिम अत्तरांचेच वास भारी वाटायचे ,पण या फुलांचा सुवास तर अगदी जिवंत वाटतोय"

 

"एवढी नाजूक फुलं कशी बरं निवडता तुम्ही? आणि एवढ्या फुलांचं करता काय?"

 

"हा हा! अगं काही कठीण नाही निवडण्यात. पटापट वेचली जातात. हा जरा नाजूक काम आहे हे मात्र खरं. तशी आकाराने छोटी असतात ना. या फुलांचे गजरे करते मी. काही देवाला होतात, काही केसांत माळते आणि काही ठेऊन देते फ्रीज मध्ये, अशा तुझ्यासारख्या आल्या ना 'फुल'वेडा बाई की त्यांना द्यायला होतात!"

 

आजी आणि राधा दोघीही खळखळून हसल्या.

 

"मी सुद्धा वेचू का थोडी फुलं? आज मी स्वतः गजरा करेन. मला नाही आवडत पण आईसाठी आणि देवांसाठी नक्की करेन!"

 

"हो हो! जरूर! हवी तेवढी घेऊन जा फुलं"

 

"...आणि आज्जी, पुढच्या वेळेस तुम्हाला सुद्धा मी करून देणार हा गजरा!"

 

"वा वा! एवढं बोललीस ना हेच खूप झालं हो!"

 

राधा हसली.

थोड्या वेळाने दोघीही घरात आल्या.मस्त गप्पा-गोष्टी झाल्या. आजींनी खास राधासाठी दडपे पोहे केले आणि ताज्या कैरीच्या लोणच्याने नाश्त्याला कशी रंगत आली.राधा स्वतःच्या घरी परतली.

 

आईने राधाला विचारले,"काय राधा, काय-काय केलं आजींकडे जाऊन?"

 

राधा म्हणाली,"आई, आज मी सुगंध वेचत होते...!"

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू