पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दुपट्टा

   

    

कथा :


दुपट्टा


 


   वैशाखाचं ऊन खूपच वाढलं होतं. नवतपासारखं सूर्याचे नवतेज धरतीवर जणू आवासून सांडत होते, असेच वाटत होते. अंगाची लाहीलाही होत होती. एवढ्या उन्हाच्या झळात बाहेर फिरणेही कमी झाल्याने रस्ते ओसाड, तेवढीच तुरळक गर्दी असलेली....


   'टरटर.. फटफट.....' गाडीचा कर्कश आवाज, दिवसभर हाच आवाज कानात घों-घों करीत चपखल दडून बसलेला. माझी गाडी 'तेजस अपार्टमेंट' समोर थांबली. गाडी बंद न करताच बाजूला पार्किंग करीत खाली उतरलो. गाडीचे वरचे टप उन्हाच्या झळांनी, चाळीस डिग्री वरील तापमानात आता खूपच गरम झाले होते. त्यामुळे उकळल्यागत झाल्यानं त्या कोंदट व मोजक्याच अरुंद गाडीच्या जागेत जीवही गुदमरतोय. पण हे रोजचेच काम, सवय झाली अशा वातावरणाची. खांद्यावर असलेल्या हिरव्या रंगाच्या रुमालानं गाडीखाली उतरताच चेहऱ्यावरील चरचर वाहणार्‍या घामाच्या धारा सहज सवयीगत पुसून काढल्या. रुमालाने वारंवार घाम पुसून ते ओले झालेलं. घाम पुसताच रुमालाची कुबट वास येत होती. जणू या वासाने किळस आल्यागत वाटू लागले. पण करणार तरी काय?


   'होय, महालातून आपण एखादा दुपट्टा घेऊ म्हटलं, पण शंभर रुपयाचा दुपट्टा घ्यायलाच वारंवार विचार येतो. नव्हेतर दुपट्टा घेणे टाळलं होतं. शंभर रुपयाच्या दुपट्टयावर खर्च झालं तर उद्याचा दिवस... बायको-पोरं, म्हातारी मायबाप किती जीव मेटाकुटीला येतो नाही? असे काय जगणे असते. पण पर्याय काय?' मनात असेच अनंत विचार कवडसे  तरंगत राहायचे.


   'अरे हं! उद्यापासून दोन रुमाल आणत जाऊ काय? पण रुमाल तरी कुठे आहे? हिरव्या फाटलेल्या लुगड्याचे बनवलेले हे रुमाल. किती दिवस झाले बायको दररोज धुऊन देते आणि आपण खिशात कोंबतोय. घरात एखादे तरी खादीचे कापड असेल तर, हो... आज आपण तिला विचारावेच लागेल.'


   गाडीचा फटफट... टरटर... आवाज तसाच सुरू. कुबट वासाची रुमाल खिशात कोंबत गाडीमागे ट्रालीत ठेवलेल्या सिलेंडर जवळ येत त्याकडे बघितलं. हातातील सिलेंडर वितरण पावती परत बघितली.


   'सीमा मॅडम, तेजस अपार्टमेंट, सक्करदरा आणि पराते, तेजस अपार्टमेंट, सक्करदरा.'


    'होय, दोन सिलेंडर. एकाच अपार्टमेंटला द्यायचे होते. तसे रोजच या एरियात फिरणे, रोजचेच हे काम. सिलेंडर वाटप करायचे कमिशन वीस रुपये फक्त. दिवसाकाठी पंधरा-वीस सिलेंडर बुकिंग असलं की काम मिळायचं. दोनतीनशे रुपये मजुरी पडायची. आठवड्यातून एक दिवस सुट्टी. कधीकधी तर बुकिंग नसली की आपल्या गॅस एजन्सीच्या समोर ताटकळत वाट पाहत बसायचं. तर केव्हाकेव्हा आपलं नि घरच्याचे दुखणेसुखणे आलं की सुट्टी करायची.


   सीमा मॅडम आमच्या गॅस एजन्सीमध्ये कम्प्युटर वर्क करणाऱ्या. त्यामुळे त्यांच्याशी ओळख जुनीच, पण मॅडम ऑफिसात असल्याने घरात सिलेंडर मुलाबाळांकडे सोडून द्यायचं आणि निघायचे. निघताना हक्कांने एक ग्लास थंड पाणी मागायचं. घशाला पडलेली कोरड थोडी शांत व्हायची. थंडगार पाणी प्यायल्यानंतर थोडं बरं वाटायचं. सोबत असलेली गाडीतील पाण्याची बॉटल उन्हाच्या झळाने तापलेली. ते तरी पाणी कुठे प्यायला जमणार होतं. पण 'भूक नसो, शिदोरी असो.' म्हणून ती गाडीत सोबत असायचीच.


   'अरेच्चा! घशाला कोरड सुटलीय. चला, आता सीमा मॅडमच्या फ्लॅटवरच तर जायचे आहे. तिथे जाऊन पाणी पिऊ या. बरे झाले, आज एका हक्काच्या घरचे तरी सिलेंडर द्यायचे आहे. या निमित्ताने तरी थंड पाणी प्यायला मिळणार.'


   गाडीतील सिलेंडर इकडून-तिकडे सरकवले, ते व्यवस्थित करीत रिकामे सिलेंडर टकाटक एका बाजूला फेकत, भरलेले सिलेंडर खांद्यावर घेतले.


   रोजचेच काम, पंधरा किलोचा हंडा खांद्यावर उचलून नेताना पुन्हा बरिच दमछाक व्हायची. या शहरातील मोठ्या-मोठ्या मजल्यांची टॉवर, कित्येक ठिकाणी लिफ्ट तर नाहीच नाही. रस्त्याच्या बाजूला ठेवलेली गाडी कुलूपबंद करायची. सिलेंडर कधीकधी कोणी चोरून नेऊ नये ही भीती असायची. ही भीती बाळगतच गाडीतून काढलेले खांद्यावरील सिलेंडर घेऊन चार-पाच मजले जीना चढून जायचं.


   सीमा मॅडमचं घर पाचव्या मजल्यावर आणि त्या पर्वतेचे घर तिसऱ्या मजल्यावर, पुन्हा यायचं आणि पुन्हा दुसर्‍या हंड्यासाठी चढायचं. गाडी मात्र तोवर फटफट आवाज काढत तशीच वाट बघत उभी राहायची.


    गाडीचे शेल्फ गेलेलं. मालक इतकं कमावतात पण साधी बॅटरी दुरुस्त करत नाहीत. किती त्रास होतो नाही का? पण मालकाला काय तेवढे? अरेच्या, होय... आपण कसं दुपट्टा घेऊ शकत नाही. तसंच त्यांच्याही काही अडचणी असतील. आपण समजून घ्यायला हवं ना!


   खांद्यावरील सिलेंडरने खांद्याचे हाड, मानेचे शिपाट लुळेपांगळे झालेत. रात्री खूप दुखतात. बायको कधीकधी सरसोचे तेल जिरवून देते. तेव्हा फार बरं वाटतं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच... होय, मागे दोनदा त्या अस्थीतज्ञ डॉक्टरकडे गेलो. त्यांनी जडवस्तू उचलायला व खांद्यावर ठेवावयास मनाई केलेली आहे. पण सिलेंडर तर खांद्यावर घ्यावाच लागेल, नाहीतर... काम सोडून उपाशी मरण्याची पाळी नाही का?


   दारावरची बेल वाजवली. "कोण आहे?" पलीकडून आवाज.


   "मी आहे. संजू सिलेंडरवाला." सीमा मॅडमच्या मुलानी दार उघडलं. शहरात फारच फिरंगीपणा केला जातो. कोण कुणाला कसा गंडवेल याचा नेम नाही. दाराच्या भोकातून माणसं पडताळल्याशिवाय कोणीही दार उघडतच नाहीत.


   "मामा, तुम्ही... या, या.. बसा ना! पाणी तरी घ्या..."


   "नको, नको... आज बरेच हंडे वाटायचे राहिलेत, उन्हही वाढलं, या लवकर बुक घेऊन. तो पर्यंत पाणी द्या प्यायला." मी हक्कानेच बोललो.  


   एवढेच एक हक्काचं घर, नाहीतर दिवसभर सिलेंडर वाटताना कोणी साधं, 'पाणी घेणार काय?' म्हणून कधीही विचारत नाहीत आणि अशी मामा म्हणून दिलेली हाक, फार बरे वाटते. नाहीतर  'ओ सिलेंडरवाले..' या शब्दानेच आमच्याशी बोलण्याची सुरुवात.


   लगेच पावती कापून परत देत, थंडगार दोन ग्लास पाणी घशात ओतलं. फार हायसं वाटलं. परत रिकामे सिलेंडर घेऊन धावत-पळत जात गाडी गाठली. पुन्हा दुसरे सिलेंडर घेत तीच कृती. या अपार्टमेंटमधील सिलेंडर देऊन होताच पुन्हा गाडीवरील रिकामे सिलेंडर इकडून-तिकडे घट्ट बांधत पुढची पावती बघितली.


   इथून एक किमी सक्करदरा तलावाच्या बाजूने, बिडीपेठ नजीक असलेली झोपडपट्टी सारखी घरं आणि पुन्हा पुढे दिघोरीसह इतर दहा-बारा हंडे वाटप करायचे राहिलेले.


   गाडीचा पुन्हा टरटर... फटफट असा आवाज. रस्त्यावर थोडीफार तरी बरिच ये-जा वर्दळ. वन वे मार्गाने मार्ग काढत जात सिग्नल आलेले. चौका-चौकात असं दोन मिनिट थांबावं लागणारं. ट्राफिक संतुलित करण्याचं हे माध्यम, पण आपलं जीवन किती संतुलित झालं? नाही पुरेसे नाही. कसाबसा जगतोय आपण. होय, शिक्षण फार महत्त्वाचे असते नाही काय? पण शिक्षणातही कितीतरी बेकारी वाढली. हाताला काम नाही. कित्येक बेरोजगार म्हणून जगताहेत. किती संघर्षाचा काळ? हो.. ना! कसेबसे सातआठ वर्षापासून हे काम मिळाले. तर आज आपण कसेबसे घर चालवतोय. होय, नसेल बऱ्यापैकी पण दोन घास श्रमाचे तरी गोड वाटतात यामुळे. आपला 'बा' खेड्यातून या शहरात आला. कामधंदा करून कशीतरी जागा मिळवली. जागा कसली, लालगंज नजूल परिसरातील ती आबादीच होय. झोपडपट्टी म्हणावे तिला.  कसंबसं दहा बाय पंधराची ती जागा. उभारले तिथे तंबू. आज घडीला चार लाकडांच्या डेरीफाटेवर टिनाचं मांडव असलेल्या 'बा' च्या घरावर, विटा-मातीची भींत उभारून इंग्रजी कवेलू घालू शकलो आपण, याचेच समाधान. कसंही झालं तरी हक्काची जागा म्हणूनच, शाबूत आहे. कधीकधी या कोंदट वातावरणात दम घुटमळायला येतो. परिसरात असलेली दाट वस्ती, गर्दी आणि अस्वच्छ, गलिच्छपणा, पण पर्याय काय?


   हे अगदी सक्करदरा तलावाच्या बाजूलाच असलेले ठिकाण, विचार करता करताच आले. परत एकदा पावती वाचली. 'हं पलीकडचे ते घर..' कच्चा रस्ता, बाजूला पडलेला डम्पिंगचा कचरा, काहीतरी सडलेले आहे. कोंदट कुबट घाणेरडा वास, अलगद रुमाल काढून चेहर्‍यावरील घाम पुसले. नाकालाही रुमाल लावला. गाडीच्या खाली उतरून सिलेंडरचे परत वाटप केले. रिकामे हंडे ठेवताच गाडी काढली. समोरूनच एक चार वर्षाचा उघडानागडा मुलगा... आपल्या बापाच्या मागे खाऊला पैसे मागत रडताना दिसला. माझे मन द्रवले, पण काय करणार? आपला मुलगाही सकाळी 'पाच रुपये द्या ना!' म्हणून मागे लागलेला. आपणही त्याला टाळलेच ना! त्याला काय वाटले असेल? पण आपल्याला काय मुलांच्या भावना कळत नाहीत? पण पर्याय काय?


    गाडी पुन्हा टरटर आवाज करीत रस्त्याला वळसा घालून दिघोरीकडे वळवली होती.


   किती दारिद्रयमय जीवन असतं नाही का? भारताचा इंडिया झाला म्हणेत, शायनिंग इंडिया... अरेच्च्या, अच्छे दिन... अच्छे दिन आनेवाली बात... ही गर्जना कुणाची? नाही, आता तेवढं आठवतही नाही. अशा कित्येक गर्जना दररोजच होतात. सारं काही फोकनाड असतं. या राजकारणातला बाते बंबालपणा... आपलं फक्त ओट द्यायचं आणि आपल्याच ओठाला पाणी पाझरवत बसायचं.


   अरेच्च्या, पुन्हा घसा कोरडा पडलाय. कुठे प्यावे पाणी? गाडीतल्या बाटलीला नकळत हात लावून बघितलं. चटका लागलाय... होय, बाटलीतले पाणी उकळल्यासारखे गरम झालेय. चला, समोर जाऊन कुठेतरी थांबत पाणी पिऊया. घशाला कोरड आल्‍याने आता थुंकी गिळली. थोडे बरे वाटले. पण थुंकीही आता आटत चाललेली. ताजबाग समोरून गाडी धावते आहे...


    रस्त्यावरून एक हॉटेल बघून गाडी थांबवली, पुन्हा रुमालाने घाम पुसत पलीकडील हॉटेलात गेलो. तिथे मडक्यात असलेलं थोडंफार थंड पाणी घेतलं. दोन ग्लास... चर्र झोंबत पोटात गेले. मनाचा दाह पाण्याने थंड झाल्यासारखे वाटले. थोडं बरं वाटलं. पण सीमा मॅडमच्या घरासारखं थंड पाणी असतं तर....


   बाजूलाच एक पल्सर बाईक उभी करून श्रीमंत बापाचा बेरोजगार असलेला मुलगा आला. "भैय्या, एक बिस्लेरी देना और एक सिगारेट."  


   त्याने पाकिटातून पन्नासची नोट काढून दिली. बाटलीचे झाकण काढून घटाघटा पाणी पिऊ लागला. मी त्याच्याकडे एक सारखा बघतच राहिलो. आपल्याकडे वीस रुपये असते तर, घेता आली असती एखादी बिसलेरी. पण दररोज आपण कसे घेणार? पाण्यावर एवढा पैसा खर्च करणं, खरंच कुठे जमणार आपल्याला? ही शायनिंग इंडियातील लोकं, त्यांच्या सवयी आणि आपल्या सवयी....


   त्याने सिगारेटचा धूर नाकाने लांबवर सोडला आणि मी गाडीत बसून त्याला निरखत गाडीचा एक्सलेटर वाढवीत गाडीतला धूर सोडला होता. दोघातला धूर सोडण्याचा फरक मात्र वेगळाला....


   गाडी टरटर फटफट करीत चालवीत राहिलो.


   'अरेच्च्या, त्या घोषणा... गर्जना... इंदिरा गांधींनी 'गरिबी हटाव' नारा दिला होता. किती वर्ष झाली? आपण बालपणी ऐकलं होतं. पण या वयात आता आपल्यासारखे गरीब हटताहेत, संपताहेत. होय, पूर्ण होते आहे ही गर्जना..'


   मनात काहीबाही असेच विचार येत राहतात. कधीकधी डोकं चक्रावते. मग खिशातला पेन काढून एका कोर्‍या कागदावर असंच काहीतरी खरडत असतो... ऊन कसं चटका लावून अंगाला झोंबते आहे. अगदी तसेच आपली परिस्थिती, इथे संघर्ष करताना मनातल्या भावनाही आपल्या काळजाला झोंबतात....


   ह्याच झोंबलेल्या भावना त्या दिवशी फेसबुकवर... आपण असंच काहीतरी लिहिलं. किती कमेंट आले, 'छान लिहिता. कविता छान आहे. आगे बढो!....'


   यालाच कविता म्हणतात नाही का? तेव्हापासून चार-दोन ओळी करतोय. अशा विषम जगण्यातील अंतर मांडतोय.


   त्यादिवशी, बायको हळूच म्हणाली. "कशाचा हिशेब करता जी? आता सावकाराचे व्याजसकट किती रुपये राहिले?"


   अरेच्च्या, मागे पोरगी आजारी पडली. दवाखान्यात नेलं. एक्स-रे, स्कॅन, गोळ्याबिस्किट असे वीस हजार खर्च... अखेर बायकोच्या कानातले आणि लग्नातील अंगठी सोनाराकडे गहाण ठेवली. अर्धेअधिक रक्कम झाली असेल भरून. तरीपण अजून बरेच देणे बाकी आहे. च्यायला, आपण विसरलोच होतो.


   "नाही गं, हिशोब नाही, मी कविता लिहितो आहे."


   "कविता आणि तुम्ही... तुम्हाला येडबीड तं लागलं नाही ना!"


   तिच्या बोलण्याने मन जरा रुसलं असलं तरीपण तिचं असं बोलणं खरं होतं. कविता लिहिणे एवढं का दरिद्री असते होय? आणि आम्हाला का लिहिण्याचा अनुभव... आणि जर का कितीही लिहिलं तरी पोटाची भूक थोडीच भागवणार हे लेखन. भाजीपाल्याने तरी पोट भरतं पण कवितेने....


   अरेच्च्या, साहित्याने जगात खूप क्रांती झाली म्हणे, रशियन क्रांती, महात्मा फुले, बाबासाहेबांनी दिलेली विचारक्रांतीची प्रेरणा, आपण वाचलं आहे. पण आता या अशा फास्टफूड जगात शब्दाला कुठे किंमत उरली आहे काय?


   मी काही न बोलता तिच्याकडे स्मित हसत कागद-पेन बाजूला ठेवत तिला जवळ घेतलं होतं आणि तीही मला अशा फाटक्या-तुटक्या जिंदगीला सावरण्यास बळ देत राहिली. तिचे पण खरं...


   हं पोहचलो दिघोरीला... कोणाचे घर असेल? गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पुन्हा पावतीवरील पत्ता पाहिला. हं हे समोरचे अपार्टमेंट आणि पलीकडचा बागलांचा बंगला... गाडीला उजवीकडे वळवीत एका मोठ्या बंगल्यासमोर उभं केलं. दारावर गेटकिपर... गाडीतून उतरताच, त्याने माझ्याकडे बघून 'सिलेंडरवाला' म्हणत जवळ आला. गेटवरच मी सिलेंडर ठेवलं. तो आत जाऊन रिकामा हंडा आणि पावती बुक घेत परत आलेला. तोपावेतो त्याची वाट पाहात तिथेच थांबलो. गेटवर परत येताच त्याची सही घेतली. रिकामा हंडा परत घेत, भरलेला हंडा तपासून दिला. पुन्हा गाडीत व्यवस्थित ठेवत गाडी टरटर पुढे आणि मी विचारात पुन्हा गर्क.....


    च्यायला, किती मोठा बंगला आहे नाही का? बागला साहेबांचा बंगला.... किती श्रीमंत? किती नोकर-चाकर? कसे होत असतील एवढे श्रीमंत? आपल्याला नाही का होता येणार? नाही, आपला जन्मच गरीब घरातला. स्वकर्तृत्वाने अपवादानेच होता येते श्रीमंत. नाहीतर श्रीमंत घरी घ्यावा लागतो जन्म. अरेच्च्या, गर्भातच जन्मण्याचे व जगण्याचे संदर्भ असतात म्हणे, हो... कुठेतरी वाचलं होतं आपण. कितीही जीवतोड मेहनत केली तरी... अपुरे ठरतील. जाऊ दे! विचार करून काय फायदा?


   अरे, आपण एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी हंडा पोहोचतोय तरी खूप झालं, पण हे श्रीमंत लोक करतात का कधी कुणाची कदर?


   त्यांचा गेटकीपर आपल्यासारखाच गरीब असेल कदाचित तो एवढे दिवस इथे सेवा देतोय, पण त्याचं तरी भलं झालं असेल काय?  कुठलं काय नि कुठलं काय? सब साला, स्वार्थी ढोंगी जमाना... हे जग...


   "भाईयो, बहनो... हम आपके खाते मे पंधरा लाख रुपये देंगे. और छिपा हुया कालाधन स्वीस बँक से जरूर लायेंगे."


   तेव्हा आपण टीव्हीवर ऐकलं होतं. कोण म्हणाला असं? आता काही एक आठवत नाही. पण आपण खरंच टाळ्या वाजवल्या होत्या. किती दिवस झाले? कमीत कमी श्रमाला जरी किंमत मिळाली असती तरी पुरे! पुढे काय? आता थाळ्या वाजवत बसतात मुले... कशाला पाहिजे बाबा काळ्या लोकांचे काळे पैसे. सालं सब थोतांड,  पण आपल्या बोटाची शाही...


   मी अलगद आपल्या बोटाकडे पाहिले. वारंवार हातात गाडीचे एक्सलेटर दाबून-दाबून आणि ह्या उन्हाने गरम झालेला हंडा उचलून-उचलून हाताची बोटे झिजत चाललीत, ताठरलीत, वायझार झालं म्हणतात ते हेच नव्हे काय? पुढे असल्या वायझार झालेल्या बोटाने मतदानाची बटन तरी दाबता यायला हवी.


   गाडीचा तोच टरटर आवाज.... सगळे सिलेंडर वितरण करून झालेले. ऑफिस समोरील गोदामात गाडी उभी केली. दुपारचे चार वाजलेले. आज कितीतरी विचार केला आपण. आजच नाही, दररोजच विचार करत असतो आपण. फाटक्या जिंदगानीचे भले होण्यास्तव विचार महत्त्वाचा नाही का?


   "मॅडमजी, घ्या सर्व पावती. झाले सगळे हंडे वाटून." सीमाताईकडे पावत्या देत म्हणालो. खिशातील कोंबलेला रुमाल बाहेर काढून घाम पुसला. परत त्या रुमालातून घामाचा वास...


   "बरं, ठीक आहे. बघते नि खतावते सगळे. ओके, थँक्स हं!" मॅडमने हसतच आभार मानले होते आणि तेवढ्या वेळातच मी आज आपली किती मजुरी झाली म्हणून ताठरलेल्या बोटाने गणित करीत राहिलो.    


   "दोनशे अंशी रुपये..."


   सीमा मॅडमने हसतच पावती बाजूला ठेवल्या, समोर टेबलावर असलेले एक वस्तूचे पाकीट मला दिले.


   "संजयभाऊ, हे घ्या तुम्हाला..."


   मी नकळतच रुमाल खिशात कोंबत मॅडमच्या हातातील ते पाकीट घेतलं.


   "हं! तुमच्या करिताच आहे... माझ्याकडून."  सीमाताई पुन्हा हसली होती.


   मीही ताईकडे बघत थोडे हसण्याचे भाव करीतच ते पाकीट उघडलं.


   'वावभर लांब... पांढरा... कॉटनचा दुपट्टा.'


   मी त्या दुपट्टयाकडे बघतच राहिलो.


   "ताई हे माझ्यासाठी, खरंच!" मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो.


   "अरे हो, तुझ्यासाठीच... किती ऊन वाढले आहे. या उन्हात डोक्याला बांधायला हवं म्हणून.... आणि हो, चेहरा पुसायला नको का? तुझ्याकडे नाही ना म्हणून... आज मुद्दामहून महालातील कॉटन शोरूममधून वेळात वेळ काढून आणलाय बघ, त्यामुळेच मला इकडे यायला उशीर झाला ना. पण तू गाडी घेऊन निघून गेला होतास. मग ठरवले आता आल्यावरच देऊ आणि हो, घरी सिलेंडर दिलास का?"


   मी दुपट्टयाकडे एक सारखा बघतच राहिलो. माझ्या डोळ्यातून आसवे पाझरणार अशी परिस्थिती....


   "संजयभाऊ..." मॅडमचा पुन्हा आवाज...


   "पोहोचवलास ना घरी... नाहीतर सायंकाळचा स्वयंपाक."


   "अं... हं... हो, होय ताई.. दिला... पाणी पण घेतले थंडगार."


    सीमाताई हसली, मी त्यांचे आभार मानत त्यांच्या स्नेह्भेटी खांद्यावर गुंडाळत घराकडे जायला निघालो. बायको, मुलं वाट पाहत असतील आणि पुन्हा विचारचक्र सुरू झालं.... 


   "ताई, किती मायाळू."


   आता पाच वर्ष लोटलीत....


   सीमा मॅडम मला दरवर्षी उन्हाळा लागला की असाच दुपट्टा नेहमी भेट देत आहेत. त्या कधीही चुकल्या नाहीत. दरवर्षी मी त्यांना नकार देतो. पण त्यांचा आग्रह... अखेर माणुसकीचं ते नाते.


   "कशाला मॅडमजी, मला उन्हात फिरायची सवयच झाली आहे. दुपट्टा नसला तरी चालते..."


   "तुम्हाला काय? सवय असेल हो, पण मित्र कर्तव्य म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण करते."


   त्यांचं वाक्य ठरलेलं.


   तीच गाडी... त्या गाडीचा टरटर फटफट आवाज... शहरातील रस्ते... उंचउंच टॉवर, अपार्टमेंट, झोपडपट्टी नि गल्लोगल्ली माझं काम... कुठल्या ना कुठल्या दारातून गाडीचा आवाज येताच कोणी तरी म्हणायचं, "ओ सिलेंडरवाला भैय्या..." त्यांना हंडा पोहोचवण्याचा आनंद, आपल्याला मजुरी मिळाल्याचा आनंद.... आणि असंच दररोज...


   चेहऱ्यावरून वाहणारा घाम, सीमाताईचा दुपट्टा... ताईशी जुळलेले आपुलकीचे नाते. बऱ्याचदा ताई मला अनेक बाबी सांगत आणि मीही त्यांना बरेचसे काही सांगत असे.


   मी दारोदार पोहोचतच राहिलो...


   कधीकधी पाणावलेल्या डोळ्यांच्या थेंबाची शाही करीत आता फेसबुकवर कवितारुपी लिहित राहिलो.


   "तू छान लिहितोस, खूपच आवडले. कमेंट दिलाय मी." सीमाताई म्हणाल्या, मी निव्वळ हसत 'थॅक्स..' म्हणायचा. आणि त्यांचा तो दुपट्टा मानेला गुंडाळत दररोज सायंकाळी घराकडे परतायचा...


   दररोज जिंदगानीचे तेच रडगाणे असले तरी कामाचे स्वरूप दररोजचे तेच ठरलेले.


   आज ऑफिसमध्ये सकाळी नऊला पोहोचलो असेन. समोर बघतो तर थोडी शांतता दिसली. मला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिथल्या चर्चेवरून कळलं. 'नुकत्याच सीमाताई नाही राहिल्यात...."


   काळजाचं पाणीपाणी झालं. बातमीने डोळ्यासमोर अंधार पसरला. आठवणीच्या दग्ध झळात कायम पोळत सीमाताई निघून गेलेल्या. कायमच्याच... न सांगता.... न बोलता...


   "साधं, कधी जवळपास कुठे जायचं असेल तरी, फोन करून मला सांगायच्यात ना तुम्ही आणि आज कायमचे निघून गेलात... न सांगताच... हे बरोबर नाही जी."


   मी गपकन अंधारी आल्यानं खाली बसून विव्हळत मनसोक्त रडत राहिलो. कोणीतरी मला अलगद जवळ घेतले. अश्रू टिपून खाली पडू लागले आणि मी खांद्यावर अलगद हात नेत दुपट्टा शोधू लागलो. खांद्यावर दुपट्टा नव्हताच...


   "आजच दुपट्टा विसरणं कदाचित योगायोग, असेल का ताई?"


   मी मनाला मोकळं होऊन नागनदी सारखं वाहू देत राहिलो... आणि सीमाताई नजरेसमोर……


 


कथा :


संजय व्ही. येरणे, नागभीड,


९४०४१२१०९८.


 





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू