पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

झोप कुठे हरवली?


अचानक बॅटरी चा उजेड आला. मिटलेल्या डोळ्यांना सुद्धा काही तरी जाणवलं. मनात भीती दाटली.

"इतक्या काळोखात कोण मारतंय चेहऱ्यावर बॅटरी?" झोपलेली सीमा अचानक जागी झाली.डोळे उघडायची भीती वाटत होती. ती तशीच डोळे गच्च मिटून विचार करीत होती. इतक्यात दोन मिनिटांसाठी उजेड दुसरीकडे गेला आणि परत चेहऱ्यावर प्रकाश जाणवला. बहुधा बॅटरी पुन्हा सीमाच्या चेहऱ्यावर प्रकाश फेकत होती जणू.

पुढच्या काही मिनिटांतच खोकण्याचा आवाज आला आणि तिच्या लक्षात आलं," अरेच्चा! हा तर ओळखीचा आवाज आहे"

तिने डोळे उघडायचं धाडस केलं.


सीमा- "अगं काकू!काय गं? काय झालं?जागी कशी तू अजून? १वाजला आता"


काकू- "अगो, काय नकळे, मला झोपच येत नाही"


सीमा- "का ते? दुपारी झोपलेलीस?"


काकू- "छे, एक चुटका काढला तेवढाच"


सीमा- "पण बॅटरी घेऊन काय करतेस? काही हवंय का तुला?"


काकू - "नाही, बघायला आले उगाच, तुम्ही सगळी तरी झोपलात का ते"


सीमा- "जरा गाणी ऐकत पड, झोप येईल तुला पण"


एवढ्यात मागून आवाज आला


आई- "वहिनी? अहो जाग्या कशा अजून?"


काकू- "अगं झोप नाही येत,काय करू बसून?"


आई- "अहो मला पण येत नाही, शेवटी उठून आले म्हटलं पाणी तरी पिते थोडं"


सीमा- "आई? अगं तुला काय झालं? झोप नाहीच का?"


आई- "छे, नुसती तळमळतेय. या कुशीवरून त्या कुशीवर"


सीमा- "कठीण गो बाई! झोपा कशा येत नाहीत तुम्हाला?"


काकू - "अगं हल्ली काय ते असंच होतं, एक चुटका लागतो की पुन्हा जाग येते मग झोपच नाही"


आई - "आणि अहो गरमा काय वाढलाय, उटेरेटे लागले नुसते"


काकू- "त्या पंख्याचा काय वारा लागतोय?गरम येतो नुसता वारा. दिवस जातो आपला बरा, रात्र आली की कठीण होतं"


सीमा- "हो!!तुमची झोप भावखाऊच ती. येत नाही पटकन. आली तरी पाहुण्यासारखी. काही तासांत छु होते."


काका-"काय गो बायांनो,तुम्हाला पण झोपा नाहीत का?"


बाबा-"मी पण जागाच होतो , या महिला मंडळाचे आवाज ऐकून आलो"


सीमा- "अरे काय चाललंय काय?काका बाबा तुम्ही पण कसे जागे?झोप गेल्या कुठे सगळ्यांच्या?"


काकू-"अगो तुझ्या काकांची झोप कसली खाट-खुट वाजलं तरी यांना जाग येते"


आई-  "आणि तुझ्या  बाबांचं काही वेगळं नाही, इकडे कसला आवाज झाला, तिकडे कोण ओरडतंय यात झोपेचे बारा वाजतात"


सीमा- "मी सुखी आहे म्हणायचं तर, मला झोप लागते पडल्या पडल्या,पण तुम्ही सगळे मला काही झोपू देत नाही"


"म्याऊ, म्याऊ..... म्याआआआआऊ!"


सीमा- "हा ये तुझीच कमी होती. याला पण झोप नाही.भूक लागलेली असेलच!"


सगळे खळखळून हसले.


सीमा- "मी तुम्हा सगळ्यांना सांगते, तुम्ही सगळे नको नको ते विचार करत बसता, म्हणून झोप लागत नाही. खरं तर तुम्ही सगळे दमता माझ्यापेक्षा , या हिशोबाने तुम्हाला चटावर झोप लागली पाहिजे"


काकू- "तू आमच्याएवढी झालीस ना की कळेल, कसं नि काय ते"


आजोबा- "गो पोरांनो, किती कचकचता"


सीमा- "घ्या....आजोबा पण जागेच आहेत"


आजी-"गो ते जागे असायचेच, शंभर वेळेला जायला लागतं मागच्या दारी त्यातच पहाट होते, मग उठायचंच.


सीमा- "ही बघ, ही पण!! नाही नाही म्हणता सगळेच जागे आहेत की. मीच डाराडूर होते म्हणजे!"


काकू- "झोपेच्या गोळ्या खायला हव्या आता नाही म्हणजे"


आई- "ते पंखे तरी कसले वारा लागतच नाही"


सीमा -"हम्म! पंख्याचा वेग वाढवला की सहन होत नाही मग टोपरी घालायची लहान मुलांसारखी,कमी केला की हे असं म्हणायचं,एसी चा पण थंडावा झेपत नाही.


काकू- "अगो आमचं आता ते म्हणतात ते वेलचीचा थंडावा नि लवंगेची उष्णता तसला प्रकार झालेला आहे. त्या पंख्याचा आवाज सहन होत नाही आणि कमी ठेवला तर तळमळायला होतं"


आजी- "माडात जा तुम्ही सगळी झोपायला, गोणपाट घेऊन जा सोबत. झाडांच्या नैसर्गिक गारव्या मध्ये अगदी झकास येईल झोप"


सीमा- "आज्जी, एक नंबर उपाय सांगतेस तू"


सगळे हसले.


आजोबा- "हो मग काय, नाही तर गोठा आहेच. बाजलं टाका आणि झोपा त्याच्यावर. तास गोठा उघडाच आहे, येईल हवा छानपैकी"


सीमा- "आजोबा यु रॉक्स !"


आई- "ए गप! काय बोलतेस"


सीमा- "अगं आई आमचं चालतं ते!"


काका- "चला मग आता काय करूया? आडवे पडून राहू. लागेल कधी तरी झोप"


बाबा- "मस्त चहा पिऊया!"


सीमा-"नको, मी छान भरपूर जायफळ घालून कॉफी करते. सुटी कॉफी आहेच घरात. कशी झोप येत नाही सगळ्यांना तेच बघते"


बाबा- "हरकत नाही. प्रयोग करून बघू"

.

.

.


(चला.... कॉफी आली...जायफळयुक्त!)


काका- "सीमा, सुंदर झालीय हो कॉफी"


सीमा-"है ना? प्या प्या!"


बाबा-"श्या.. अडीच वाजले तरी टक्क जागे आहोत"


आई-"अहो आता लागेल झोप"


सीमा- "मला काय वाटतं तुम्ही सगळे ना विचार खूप करता. ते असतात ना तुमच्या डोक्यात म्हणून हे सगळं असं होतं. ते विचार झोपू देत नाहीत. मारून मुटकून एखादा चुटका काढता खरा पण जाग आली मधेच की विचारचक्र सुरू आपली. हो की नाही?"


आजी- "गधडे, तुला आमच्या जागी आल्याशिवाय कळणार नाही"


(सगळे हसतात)


आजोबा- "बरं चला, जायफळाचा तर उपयोग होतो का ते पाहू"


काकू-"हो चला, शुभ रात्री"


सीमा- "बॅटऱ्या लांब ठेऊन द्या रे! घाबरायला होतं तोंडावर उजेड आला एकदम की"


(सगळे हसतात)


आजी- "झोपा ....झोपा...! लक्षात ठेवा प्रयत्नांती परमेश्वर!"


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू