पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनकल्लोळ

मनकल्लोळ

 

 गणू एक शहरात राहणारा मुलगा, आई-वडिलांचा एकुलता एक असा हा गणू, अभ्यासात देखील हुशार. प्रचंड कष्ट करून आई-वडिलांनी त्याला मोठे केले होते. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला आणि आई शिक्षिका होती. दोघे मिळून आपल्या मुलाच्या आणि स्वतःच्या गरजा अगदी छान भागवत असत. 

 

आई शिक्षिका असल्यामुळे मुळातच त्याची आई अनुशासन प्रिय होती. तिने गणूला लहानपणापासूनच खूप शिस्त लावली होती. फिरत्या चाकावर ठेवलेल्या ओल्या मातीला कुंभार जसा एक सुंदर आकार देतो,  त्या कुंभारा सारखेच काम गण्याच्या आईने देखील त्याच्यासाठी केले होते. गणू देखील आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांचे उपकार नेहमीच मानत असेल. 

 

गणू हा लहानपणापासूनच शहरात राहिल्यामुळे त्याला गावाकडे जायचा प्रचंड कंटाळा येई.  सर्वांसाठी त्याला प्रेम होते, परंतु आपल्या सोबत असणाऱ्या किंवा सोबत शिकणाऱ्या मुलांना ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाही असे वाटून बरेचदा तो मनोमन स्वतःला वाईट वाटून घ्यायचा. गणू जसजसा मोठा होऊ लागला, तशी तशी त्याची हुशारी देखील वाढू लागली. त्याला चांगले मार्क मिळू लागले, परंतु त्याचं लक्ष हे पुस्तकांपेक्षा गाईड वरील अभ्यास आणि क्लास वरच जास्त असायचं. गोष्टी चांगल्या आत्मसात करण्यापेक्षा चांगले मार्क काढणे यावर त्याचा भर जास्त असे.

 

 

पुढे गणूने उच्च शिक्षण घेण्यासाठी तयारी सुरू केली, व त्याने एका डिप्लोमा कॉलेजला प्रवेश देखील घेतला. कॉलेज सुरू झाले आणि पुन्हा गणूचे "मला क्लास लावायचा आहे, मला गाईड हवे आहे."  असे निरनिराळे हट्ट सुरू झाले. पण गणू चे वडील त्याला नेहमी म्हणायचे की अभियांत्रिकीचा अभ्यास हा क्लास पेक्षा स्वअभ्यास किंवा रेफरन्स बुकस वाचूनच होतो. पण गणू म्हणजे गणूच, त्याने आपल्या आईला सांगितले " आई, बाबांना सांग ना मला क्लास लावायचा आहे . माझे सर्व मित्र क्लासला जातात पण मला जायला मिळत नाही ". गणूच्या आईने गणूच्या वडिलांना क्लास लावण्यासाठी तयार केले. असे गणूचे डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि शेवटच्या वर्षी गणूचा निकाल आला तेव्हा तो कॉलेजमध्ये पहिल्या दहा मुलांमध्ये आला होता. आई-वडीलच नव्हे तर तो रहात असणाऱ्या चाळीत सर्वांनी गणूचे खूप अभिनंदन केले व सर्वांनीच त्याचे खूप कौतुक केले. गणू आता लवकरच इंजिनिअरिंगची डिग्री कॉलेज मध्ये जाणार होता. दोन महिन्यातच गणूची ऍडमिशन दुसऱ्या गावी झाली आणि गणू पहिल्यावहिल्यांदाच आपलं घर सोडून बाहेर जाण्यास सज्ज झाला.

 

बॅग घेऊन गणू व त्याचे आई-वडील गणूला स्टेशनवर सोडण्यास गेले. गणूच्या हुशारीवर त्याचे चाळीतले सर्व लोक खूप भाळले होते. सर्व त्याला भावी अभ्यासासाठी शुभेच्छा देता होते व आई-वडिलांचे देखील अभिनंदन करत होते. आपल्या पालकांना सोडण्याचे दुःख डोळ्यात लपवून गणू  नवीन ठिकाणी शिकण्यास गेला.

 

गणूला ज्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली ते कॉलेज एका गावात होते. मेरिट स्टुडन्ट असल्यामुळे त्याला अगदी माफक फीस होती. शहरात राहणाऱ्या गणूला गाव ही संकल्पना मुळी नवीनच होती. गावची भाषा, राहणीमान, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, खानावळीत जेवण करणे असं सर्व काही नवीनच.  

शहरात घरी राहत असताना हे सर्व काही त्याची आईच करायची. त्यामुळे त्याला कधीही हे सर्व करायची वेळच नाही आली. गावखेड्यात जसे वीज जाणे हे अगदी स्थानिकांचे अंगवळणी पडलेले असते पण शहरांमध्ये विजेचा गैरवापर बऱ्याचदा होत असे, पंखा कोणी खोलीत नसतानासुद्धा सुरू असे, कधी लाईट सुरु असे पण गावात उन्हाळ्यात बरेचदा लोडशेडींग मुळे बारा तास वीज नसे. वीज नसल्याने त्याला पंखा देखील लावता न येई. वीज नसल्याने बऱ्याचदा त्याला मेणबत्तीच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागी. 

 

खानावळीत जेवण हे तिखट असल्याने त्याला फार त्रास होई आणि आपल्या आईच्या साजुक स्वयंपाकाची त्याला आठवण येई. हळूहळू या सर्वांचा गणूला कंटाळा येऊ लागला. एरव्ही सर्व काही मिळत असून सुद्धा, आपल्याकडे किती कमी आहे असा वाटणारा गणू आता आपल्या शहरातल्या जीवनालाच चांगले मानु लागला. कारण शहरात मिळणाऱ्या मूलभूत गोष्टी देखील त्याला आता मिळेनाशा झाल्या होत्या.

 

कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्या बोलक्या स्वभावामुळे त्याचे खूप मित्र झाले होते, एव्हाना त्याला हळू हळू गावची भाषा देखील अवगत होऊ लागली होती. त्या सर्व मित्रांमध्ये त्याचे एक पक्का मित्र झाला त्याचं नाव दगडू.

 

हा दगडू आठवड्यातून दोन ते तीन दिवस एकच शर्ट घालत असे आणि पॅंट तर पुर्ण आठवडा भर घालत असे.  बर्याचदा शेजारी बसल्यावर दगडूच्या कपड्यांमधून जुनाट कपड्यांचा वास येई. त्याचं नाव दगडू असलं तरी तो होता, मात्र कमालीचा हुशार  !!!!!

 

बरेच वर्गातील मुलं दगडूची थट्टा करीत आणि त्याच्या कपड्यांमधून येणार्या वासामुळे बरेच जण त्याच्या शेजारी देखील बसत नसत. पण गणूची आणि दगडूची चांगलीच गट्टी झाली. दगडू हा जवळच्याच गावात राहायचा. दहा किलोमीटर सायकलिंग करून कॉलेजला यायचा.  घनिष्ठ मैत्रीमुळे बर्याचदा हे दोघं मनसोक्त गप्पा मारत बसायचे.

 

गप्पा मारता मारता एक दिवस दगडूने गणूला त्याच्या कुटुंबाला बाबतीत विचारले. गणूने आपले कुटुंब, आपण शहरात केलेल्या मजा-मस्ती बद्दल त्याला सांगितले. हे सांगता सांगताच ह्या गावात आल्यावर त्याला किती कंटाळा येत आहे हे देखील सांगितले. दगडूने हे सर्व शांतपणे ऐकून घेतले व गणूचे बोलणे झाल्यावर गणूने दगडूला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले.

 

दगडू म्हणाला, " मी येथेच जवळच्या एका गावात राहतो. माझे आई-वडील एका शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना दिवसाचा (रोजंदारीवर) पगार मिळतो त्यावरच आम्ही भाकरतुकडा खातो. मला एक भाऊ आहे तो शाळेत शिकतोय ".

 

गणू ना एवढे ऐकूनच गहिवरुन आले. दगडू पुढे म्हणाला " मला बारावी इयत्तेत 90 टक्के गुण मिळाले व या कॉलेजात प्रवेश मिळाला. माझ्या आई-बाबांना इंजीनियरिंग हा शब्ददेखील उच्चारता येत नाही. एका संस्थेकडून शिष्यवृत्ती घेऊन मी या कॉलेजमध्ये शिकत आहे 

 

आता गणूची उत्कंठा कमालीची वाढल, तो म्हणाला  

 

" मग तुम्ही राहता कुठे? आणि घरात विजेचं काय ? "

 

दगडू म्हणाला शेताच्या जवळच माझ्या आई-बाबांनी एक झोपडी बांधली आहे. त्याच्यात आम्हाला विज तर मिळत नाही पण आम्ही रॉकेलचा कंदील (लालटेन) लावतो व माझी माय रानातून लाकडे आणते. ती पेटवून कंदिलाच्या प्रकाशातच आम्ही जेवतो. 

 

गणूचे मन आता अगदी खट्टू होऊ लागले होते. त्याने कुतूहलापोटी पुन्हा विचारले, " दगडू तुझ्या घरी वीज नाही मग तू अभ्यास कसा करतोस आणि पैसे नाहीत तर क्लासेस कसे लावशील ? पंख्याशिवाय तुला गर्मी नाही होत का ?" 

 

दगडू गावरानी भाषेत म्हणाला " आरं तसं न्हाई, माझी झोपडी माडावर आहे. रातच्याला वारा येतो त्यातच रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात मी अभ्यास करतो व रात्री माडाच्या वाऱ्यामुळे मला झोप बी येते ".

 

हे ऐकून गणूच्या मनात जणू कल्लोळ सुरू झाला होता.

 

स्वतःकडे इतका सर्व असून सुद्धा मी किती दुःखी आहे व ह्या दगडू कडे काहीही नसून सुद्धा हा किती खुश आणि हुशार आहे ह्या विचारांमध्ये गणू अगदी बुडून गेला होता. 

 

कोणताही क्लास न लावता सुद्धा याने बारावीला 90 टक्के मार्क आणले आणि मी क्लास शिवाय अभ्यासाला ही तयार नव्हतो या विचारांनी गणू, जणू "मनकल्लोळातच " अडकला होता.  

 

लेक्चरची वेळ झाली आणी दगडू कडे आदराच्या नजरेने पाहत, आपले अश्रू व लाज डोळ्यातच लपवत गणू, आपला मित्र दगडू सोबत आपल्या वर्गाकडे रवाना झाला.

 

अमेया पद्माकर कस्तुरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू