पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सापडली... 2

सापडली... २

राजूचं मस्त चाललं होतं. खरंतर तीच बंगली, तेच खाणं-पिणं, तेच काम, फक्त एक बदल झाला होता, पण तो फार मोठा, सकारात्मक होता. म्हणूनच स्वारी खुषीत होती. शेजारची ती रूपवती, कॅडबरी उर्फ ‘कॅडी’ आता त्याची मैत्रीण झाली होती. दोघांवर आपापल्या मालक व मालक-मालकीण बाईंना पार्कमध्ये घेऊन जायची कामगिरी आली होती. ते लोक दाक्षिणात्य होते, पण त्यांना मोडके-तोडके मराठी येत होते. मालक आणि ते लोक मोडकं-तोडकं हिंदी, तसंच मराठी, थोडं इंग्रजी अशा संमिश्र भाषेत आपसात बोलायचे. ते बोलणे राजूला काही समजत नसे. त्यांना पार्कमध्ये बसवून दोघेही मस्त पार्कभर हुंदडायचे. घरी असताना पण ही मस्ती चालूच असायची, कारण कॅडीच्या मालक-मालकीण बाईंना पण राजू आवडायचा. दोन्ही बंगलींच्या मधली भिंत एका उडीत सहज पार करता येण्यासारखी होती, तेव्हा राजू आणि कॅडी कधी या बंगलीभोवती तर कधी त्या बंगलीभोवती एकमेकांचा पाठलाग करत असायचे, तर कधी लुटुपुटुची कुस्ती खेळायचे. असेच मजेत दिवस जात होते.

एक दिवस सकाळीच कॅडीच्या घरासमोर एक टॅक्सी येऊन थांबली. राजू व कॅडी त्या वेळी राजूच्या व्हरांड्यात होते. कारचा आवाज ऐकून दोघे उठून उभे राहिले व त्या दिशेने पाहू लागले. त्यांना कॅडीचे मालक-मालकीण घाईघाईने फाटकाकडे जाताना दिसले. टॅक्सीतून एक तरुण उतरला होता व सामान काढत होता. दुसऱ्या दारातून एक तरुणी हातात एक कापडात गुंडाळलेले बंडल घेऊन उतरली. मालकीण बाईंने त्वरेने पुढे होत ते बंडल घेतले व पटापट त्याचे मुके घेऊ लागल्या. सर्वजण आत आले व मालकांने कॅडीला हाक मारली. कॅडीने राजूकडे डोळ्यांनेच ‘येते’ खूण केली व घरी निघून गेली. त्यानंतर दिवसभर त्याला कॅडी दिसलीच नाही. ते लोक संध्याकाळी पार्कमध्ये पण गेले नाही. राजू काहीसा खट्टू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मालक तयार झाले व राजूला घेऊन कॅडीच्या घरी गेले. त्यांना नाष्ट्याचे निमंत्रण होते.

मालकांना पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. अर्थातच राजूला काही समजले नाही, पण कॅडी तिथेच सोफ्यापाशी बसली होती. राजूने खूण करून तिला बाहेर येण्यास सांगितले व ते दोघे बाहेर लॉनवर आले. तिच्याकडून त्याला समजले की पाहुणे म्हणजे मालक-मालकिणींचे परदेशात राहणारे मुलगा-सून आणि नातू होते. कॅडीने राजूला सांगितले की त्या छोट्याशा नातवाच्या रक्षणाची जबाबदारी तिने घेतली आहे आणि तो इथे असेपर्यंत तिला फारसे खेळायला येणे जमणार नाही. राजू नाराज झाला, त्याच्या मनात काही अनामिक शंका चमकून गेली, पण इलाज नव्हता. नाही म्हणायला कॅडी दुसऱ्या दिवसापासून पार्कमध्ये यायला लागली होती. पण तिथे ही विषय त्या छोट्या बाळाचाच. त्याचं हसणं, रडणं, त्याच्या भुकेच्या वेळा, त्याचे अवेळी झोपणे, रात्री-बेरात्री उठणे, राजूचे कान किटले...

तीन-चार दिवस असेच गेले. राजू दिवसभर एकटा असायचा. कॅडी संध्याकाळी भेटायची, पण विषय तोच. मग एक दिवस सकाळी अचानक कॅडीचे मालक काही सामान घेऊन राजूच्या घरी आले. राजूने पाहिले तर ते कॅडीचे झोपायचे ब्लँकेट आणि तिची जेवायची थाळी होती...! काय चाललंय काय? राजूला काहीच उमगेना, पण तेवढ्यात मालकांनेच सांगितले, अरे, ते लोक दोन दिवस मुंबईला जात आहेत व्हिसाच्या कामासाठी, म्हणून कॅडी आपल्याकडे राहणार आहे. तुला खेळायचे असेल तेवढे खेळून घे हो कॅडीसोबत. एकदा का ती गेली परदेशात की मग कुठे तुमची भेट?

आयला...! असा लोच्या आहे होय? राजूच्या छातीत धस्स झाले. तो बाहेर लॉनवर आला. कॅडी तिथेच बसली होती, उदास. त्याच्या नजरेला नजर पण देत नव्हती. राजू तिच्या जवळ जाऊन बसला, पण संवाद काहीच नाही. काय बोलावे तेच सुचत नव्हते. दोघे तसेच बसून होते. जेवणाची वेळ झाल्यावर मालकांने बोलावले तसे दोघेही आत गेले, पण भूकच मेली होती. जरा उष्टावल्यासारखे करून दोघांनेही अन्न तसेच टाकून दिले. मालकांना वाटले कॅडी तिच्या घरच्यांची आठवण करत आहे म्हणून जेवली नसेल, आणि तिला पाहून राजू पण. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी मात्र दोघांनीही ‘भूक लागली आहे, पण अन्नावर वासना नाही’ अशा विचित्र अवस्थेत थोडं खाल्लं. मग रात्री कॅडीच्या घरचे परतले. तेव्हा समजले की व्हिसाची मंजुरी एका आठवड्यानंतर समजेल. बिच्चाऱ्या राजू आणि कॅडीची अवस्था कसायाघरच्या बकरी सारखी झाली. कधी वाईट बातमी मिळेल, नेम नाही...

हो-नाही करता करता सोमवार उजाडला. दुपारी कॅडीचे मालक-मालकीण राजूच्या घरी आले. ते मालकांशी बराच वेळ बोलत बसले होते, पण राजूला त्यात मुळीच स्वारस्य नव्हते. निरोपाची बोलणी ऐकून वाईटच वाटले असते ना...? त्याला त्यांची भाषा पण समजत नव्हतीच म्हणा... तो आपला व्हरांड्यात बाकावर जाऊन बसला.

काही वेळाने ते लोक निघून गेले आणि मालक राजूजवळ येऊन बसले. त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि सांगू लागले, “अरे, त्या सगळ्यांना व्हिसा मिळाला आहे आणि ते आता कायमचे परदेशात राहणार आहेत...” जणू काही राजूला ते माहीतच नव्हते “...पण काही तांत्रिक बाबींमुळे कॅडीला व्हिसा नाकारण्यात आला आहे व तिला इथेच ठेवावे लागेल त्यांना. हेच सांगायला आले होते ते लोक. मला विचारत होते तुम्ही कॅडीला ठेवाल का तुमच्याकडे? मी होकार दिला आहे.”

आँ...!! राजूचा आनंद गगनात मावेनासा झाला. घाईघाईने व्हरांडा उतरून तो कंपाउंड वॉलपाशी गेला. तिथल्या गुलाबाचे काटे जरासे बोचत होते, पण तिकडे दुर्लक्ष करून राजूने पुढचे दोन्ही पाय वॉलवर टेकवले आणि तोंड आकाशाकडे करून तो अतिशय आनंदाने भुंकू लगला...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू