पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्मार्ट

स्मार्ट 

- स्मिता भलमे -
एक दिवस मैत्रिणीकडे बारशाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणून झटपट छानशी साड़ी नेसले, टाल्कम पावडरची फक्की तोंडावर मारली आणि पायात चप्पल अडकवून निघाले.तेव्हढ्यात ' काय हे आई ,बारश्याला चाललीस मग अशी काय चाललीस ? थांब जरा .लेकीने ,अनुने अडविले .मी म्हटले ,' काय झाले ? ' ती म्हणाली ,'अग आई , साड़ी जरा नीट नेस .पिना लाव .ये मी लावून देते .आणि तुही ते शिकून घे . खांद्यावर पदर फेकल्या सारखी नको करत जाऊस .अग ,बरं दिसत नाही ते .अग स्मार्टीचा जमाना आला आहे .माणसाने कसं स्मार्ट दिसावं .'अस म्हणत ,माझा ताबा घेत लेकीनं छान साडी नेसवून पदराला ,निर्यांना ,काठाला अशा सतरा ठिकाणी पिना लावल्या .कुठलीशी क्रिम चेहर्याला लावून काॅम्पक्ट पावडरीचा पफ हलकेच चेहर्यावर फिरवला .हलकिशी ओठांवर लिप्टीक फिरवली. नवीन चप्पल घालायला लावली आणि त्यानंतरच तिने मला सोडले .
आता या वयात काय स्मार्ट दिसणार मी ? ह्यांच्या म्हणण्या प्रमाणे ,'आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार ?'जाऊ द्या झालं .आता या वयात आपल्या मुलांना आपली लाज वाटू नये म्हणजे मिळवली .
हल्ली स्मार्ट दिसण्या बरोबरच स्मार्ट फोनचही वारं आलं आहे .हातात मावणार नाही असे स्मार्ट फोन ज्याच्या त्याच्या हाती आले आहेत .त्याच्यात इंटरनेट पासून सगळ्या सुविधा असतात .रेलवे ,विमान ,बस, हाॅटेलचे सगळे बुकिंग , आणि बॅऺकेचे व्यवहार सारं काही घरात बसून करता येतात .घरात बसून हवे ते मागवता येते .खरच विज्ञान किती प्रगत झाले आहे ना?त्यामुळे सारं जग जवळ आले आहे.घरात मुलं,लेकी ,सुना, नातवंड सगळ्यांकडे हे स्मार्ट फोन आहेत.नातवंड तर आपला फोन कोणाच्या हाती लागू देत नाहीत . हल्ली प्रत्यक्ष भेटी होत नसल्या तरी Whats App मुळे सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात . हल्ली या तरूण पिढीला एकमेकांशी भेटायला आणि बोलायला आहे कुठे वेळ ?
माझे नातेवाईक ,मैत्रिणी सारेच Whats App ग्रुपला आहेत .त्यामुळे सगळेच स्मार्ट फोन घे म्हणून मागे लागले .पण मला ते जमणार नाही याची मला खात्री होती . कारण आपण स्मार्ट नाही याची मला पूर्ण कल्पना होती .(थोडक्यात बावळट ) त्यामुळे मी स्मार्ट फोन घेणे टाळत होते .
पण एक दिवस नातू आला आणि मला म्हणाला ,'आजी ,सगळे म्हणतात तर तू स्मार्ट फोन का वापरत नाहीस ? असं कर हा माझा स्मार्ट फोन तू घे ' अरे बापरे, नातू आपला फोन मला देतो म्हणजे नक्की काही तरी गडबड आहे .'डालमे कुछ काला है ।'याची मला चाहूल लागली .मी म्हणाले ,' अरे पण तुझे अडेल ना ? ' यावर नातू म्हणाला , 'अग आता स्मार्टफोनचे नवीन मस्त माॅडेल आले आहे .हा फोन तू घे ,मी नवीन घेईन .'लगेच त्याने आॅन लाइन त्याला हवा तो फोन मागवला आणि त्याच्या जुन्या मोबाइल मध्ये माझे सिम कार्ड घालून माझ्या हाती दिला .आहे ना माझा नातू गुणी आणि उदार ...
खरं तर या स्मार्ट फोनला हातच काय बोट लावायचीही मला भिती वाटायची .चुकून कुठे बोट लागले की हमखास गोंधळ हा ठरलेला .पण माझा नातू ,' अग ,आजी सोपं आहे बघ ' असं म्हणून दोन्ही अंगठ्यांनी भराभर टच करून वेगवेगळी अॅपस् कशी वापरायची ते सांगत होता. मी मात्र,' अरे जरा सावकाश सांग 'असे म्हणत हळूहळू शिकत होते.ज्याला चालायला , बोलायला ,लिहा - वाचायला शिकवले .तोच माझा लाडू माझा गुरू झाला . 'काळाचा महिमा ' दुसरे काय ?
पण काहीही म्हणा हा स्मार्ट फोन म्हणजे खुलजा सिमसिमच आहे.जगातली कुठलीही माहिती यावर मिळते .जगातल्या कुणाशीही घरात बसून संपर्क साधता येतो .पण हे जरी खरे असले तरी सुरवातीला फजिती ही होतेच .माझी तरी खूप वेळा झाली .
एकदा रात्री झोप येत नव्हती म्हणून Whats App बघत असतांना कुठे कसे टच झाले ते कळले नाही .रात्री साडे बारा वाजता मोठ्या दिरांना फोन लागला .कसाबसा तो बंद केला .पण दिरांना काळजी वाटली म्हणून त्यांनी परत फोन केला .मला आपले उगीच टेंशन मात्र आले .
एकदा टिव्ही अॅटिनाच्या कंपनीच्या ऑफीस मध्ये फोन केला .बोलतांना फोनवरील बंद करण्याचे लाल चिन्ह नाहिसे झाले.मला तो फोन बंदच करता येईना .तिकडून कंपनीचा माणूस सारखा म्हणत होता , 'मॅडम ,तुम्ही फोन बंद कराना .नियमा प्रमाणे आम्ही बंद करू शकत नाही.'मी आपली स्क्रिन वरून उभी - आडवी बोटे फिरवत होते पण फोन बंद होईना .नंतर मात्र कसा बंद झाला तेही कळले नाही .अशी माझी फजिती व्हायची .मेसेज पाठवतांनाही अशीच फजिती .नातवंड आली की नवीन काही तरी शिकवायची .
आमचे ' हे ' मात्र स्मार्ट फोन पासून दूरच रहायचे .पण आता मुलांनी हट्टाने त्यांना स्मार्ट फोन घेऊन दिला .मात्र हा फोन हाताळतांना 'हे ' घाबरतात .आता मी त्यांची गुरू झाले आहे .नेहमी 'असं कसं तुला कळत नाही ' असे म्हणणारे या बावळट बायको कडून स्मार्ट फोनचे धडे घेऊ लागले .एक मात्र खरे गुगलवर त्यांचे शोध निबंध बघतांना त्यांचा चेहरा असा छान फुलतो की त्यांचा तो चेहरा बघण्याचा एक वेगळाच आनंद मला मिळतो.
पुर्वी टिव्हीवर मॅच पहायची की सिरीयल बघायची यावरून आमच्यात नेहमी वाद व्हायचा पण आता ते मोबाइल वर मॅच बघतात आणि मी टिव्हीवर ' माझ्या नवर्याची बायको ' बघते .आता मात्र आमच्यातील भांडणाचा एक मुद्दा पुर्णपणे संपला आहे .
असा हा स्मार्ट फोन माझ्या हाती असला तरी घरातील सर्वानुमते मी अजूनही आपली आहे तशीच आहे म्हणजे ..........?
-- स्मिता भलमे
९४२१०५८१४९

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू