पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असं होतं ना तुलाही..?

असंच होतं ना तुलाही..?

 

 

श्वासात हा गंध दरवळताना तुझ्या आठवणींचे कंप भावनात उमठतात. पानांची थरथर मनात घर करून जाते.. तर अनिल अंगाशी हलकेच लाडिकपणा करतो..अधरांची किलबिल उगाचंच सतावते. मग मात्र माझीच नजर पापण्यांचे तोरण बांधून तुझी वाट पहाते. अल्हाददायक मृद्गंध हा असाच आहे रे..!!

 

मृगाचा हा नाचरा सडा दारी भरगच्च रांगोळी घालून जातो. मग मी ही रेखाटते तुझेच चित्र मनांगणात..!! हे पर्जंन्य तुषार गालावरी उधळण करताना दिसणारे मोह रूप तुझ्या ओंजळीत अलगद विसावते.. तू मात्र अनामिष नेत्रांचे कवाडे सताड उघडे ठेऊन पहाचास..मी मात्र लाजाळूची वेलीप्रमाणे अंग चोरून घ्यायची. कितीतरी मोरपंखी आठवणी येऊन विसावतात माझ्याच कुशीत.. चल.. राहू दे..!! हे मन कधी कधी फारच वेडेपणा करते ना!!..

 

दाटून आलेले मेघ आणि वातावरणातील धुंदलापणा शरारत करताना... तु धरलेले पदराचे टोक..हलकेच मला खुणावते आहे. आणि बघता बघता मीच माझ्याभोवती घेतलेली गिरकी. स्वप्नवत सारं.. 

 

पागोळ्यातील टप टप पडणारे पर्जन्यबिंदू अगदी कसे तालात गात आहेत. तस तुझा तो आवडता भूप राग मलाही आवडतो.. ग प ग रे सा रे ध सा ग ग रे ग प ध हे सूर कर्ण पटलावर गुंजन करू लागलेत पहा. मी तर मंत्रमुग्ध होऊन गेलेय रे..!! हृदयीच्या तंबोर्याची तार झंकारता तुझ्याच नावाचा घोष ऐकायला येतोय.. आठवांच्या या पारंब्या किती झोके घ्यायला लावतात पहा.. तन मन धन सतत तुझ्या आठवणीने झुलत असते. 

 

नभात मंडप घातलेला इंद्रधनू सप्तरंगात न्हाहून निघालाय.. तर रविराज मेघाआड लपून बसलाय. ओथंबून आलेले थेंब अंगावर झेलायला तू ही ये ना..मी एकटीच का घोळतेय तुझेच नाव..का रमते  मी तुझ्याच आठवांच्या पावसात.. सांग ना!.. असंच होतं ना तुलाही..?

 

श्रीकांत दीक्षित, पुणे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू