पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गड्या तो काळ.......

गड्या तो काळ 

खूप बरा होता

दुःखात रडणारा

गाव खरा होता ।।


साधी होती माणसे 

साधीच होती घरे

चौकात घोळक्यांनी 

खेळायची पोरे

मैत्रीच्या धाग्याचा 

रंग गहिरा होता ।।


मैदानी मर्दानी 

खूप होते खेळ 

कळत नव्हते कधी

कसा जायचा वेळ 

संकटात मैत्रीचा 

खरा आसरा होता ।।


ज्याचा त्याला तेव्हा

मान दिला जायचा 

नात्यांचा खरा

सन्मान व्हायचा 

मोठ्यांचा घरात

खूप दरारा होता ।।


दूरदूरचे पैपाहुणे 

भेटायला यायचे 

चार आठ दिवस 

मनसोक्त राहायचे 

काळजात मायेचा 

प्रेमळ झरा होता ।।


साधी होती राहणी 

साधीच विचारसरणी 

लहानगे नम्र होते 

मोठ्यांच्या चरणी 

संस्काराच्या नजरेचा 

जागता पहारा होता ॥


शेतावर दिवस कसा 

आनंदाने जायचा 

दिवस मावळायला घरी 

बळीराजा यायचा

कष्टात सुद्धा त्याचा 

हसरा चेहरा होता ॥


दिवा कंदिल समईची 

होती रोषणाई 

लेकरांत रमायची 

लेकरांची आई 

साधी होती दिवाळी 

साधा दसरा होता ॥

_____________________________

श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू